व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“आम्ही तुम्हाबरोबर येतो”

“आम्ही तुम्हाबरोबर येतो”

“आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”—जख. ८:२३.

गीत क्रमांक: ३२, ३१

१, २. (क) आपल्या काळात काय घडेल असं यहोवानं सांगितलं होतं? (ख) या लेखात कोणत्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येईल? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

यहोवानं आधीच सांगितलं होतं की आपल्या काळात, “सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांपैकी दहा जण यहूदी माणसाचा पदर धरून म्हणतील, आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.” (जख. ८:२३) या वचनातील ‘यहूदी माणूस’ पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना सूचित करतो. त्यांना ‘देवाचे इस्राएल’ असंही म्हणण्यात आलं आहे. (गलती. ६:१६) वचनातील “दहा जण” या पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा असलेल्यांना सूचित करतात. त्यांना माहीत आहे की यहोवानं अभिषिक्त जनांना खास आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे या अभिषिक्तांसोबत मिळून यहोवाची उपासना करण्याच्या संधीला ते एक बहुमान समजतात.

जखऱ्या संदेष्ट्याप्रमाणे येशूनंही सांगितलं होतं, की देवाच्या लोकांमध्ये एकता असेल. स्वर्गीय जीवनाची आशा असलेल्यांना त्यानं ‘लहान कळप’ असं म्हटलं, तर पृथ्वीवर जगण्याची आशा असलेल्यांना त्यानं ‘दुसरी मेंढरं’ असं म्हटलं. पण, पुढे येशूनं असंही सांगितलं की हे सर्व “एक कळप” होतील, त्यांचा “एक मेंढपाळ” असेल आणि हे सर्व मिळून त्याच्या आज्ञेचं पालन करतील. (लूक १२:३२; योहा. १०:१६) दोन गट असल्यामुळे काही जण कदाचित असा विचार करतील: (१) दुसऱ्या मेंढरांतील लोकांना सर्व अभिषिक्तांची नावं माहीत असणं गरजेचं आहे का? (२) अभिषिक्तांनी स्वतःबद्दल कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे? (३) माझ्या मंडळीतील कोणी स्मारकविधीच्या प्रतीकांचं सेवन करू लागल्यास मी त्याच्यासोबत कसा व्यवहार केला पाहिजे? (४) अभिषिक्तांची संख्या वाढत चालली आहे, याबद्दल मी चिंता करण्याची गरज आहे का? या प्रश्नांची उत्तरं आपण या लेखात पाहू या.

सर्व अभिषिक्तांची नावं आपल्याला माहीत असली पाहिजेत का?

३. स्वर्गीय जीवनाचं प्रतिफळ नेमकं कोणाला मिळेल हे आज आपण खात्रीनं का सांगू शकत नाही?

इतर मेंढरांतील लोकांना आज पृथ्वीवर असलेल्या सर्वच अभिषिक्तांची नावं माहीत असणं गरजेचं आहे का? नाही. कारण, स्वर्गीय जीवनाची आशा असली तरी त्यांपैकी कोणाला स्वर्गीय जीवनाचं प्रतिफळ मिळेल हे खात्रीनं सांगणं आज कोणालाही शक्य नाही. [1] देवानं त्यांना स्वर्गात जाण्यासाठी निवडलं असलं, तरी त्यांना त्यांचं प्रतिफळ तेव्हाच मिळेल जेव्हा ते शेवटपर्यंत विश्वासू राहतील. सैतानालाही ही गोष्ट माहीत आहे आणि म्हणून तो ‘खोट्या संदेष्ट्यांचा’ वापर करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतो. (मत्त. २४:२४) जोपर्यंत यहोवा या अभिषिक्तांचा विश्वासू म्हणून न्याय करत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वर्गीय जीवनाचं प्रतिफळ नक्की मिळेल अशी खात्री ते बाळगू शकत नाहीत. त्यांच्यावर हा शेवटला शिक्का एकतर त्यांच्या मृत्यूच्या वेळी किंवा मग ‘मोठं संकट’ सुरू होण्याआधी मारला जाईल.—प्रकटी. २:१०; ७:३, १४.

४. सर्व अभिषिक्तांची नावं माहीत नसली तरी आपण त्यांच्यासोबत जाऊ शकतो, असं का म्हणता येईल?

आज पृथ्वीवर असलेल्या सर्वच अभिषिक्तांची नावं आपल्याला माहीत नाहीत. तर मग, त्यांच्यासोबत जाणं आपल्याला कसं शक्य आहे? बायबल म्हणतं की “दहा जण यहूदी माणसाचा पदर धरून म्हणतील, आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.” या वचनात केवळ एका यहूदी माणसाचा उल्लेख करण्यात आला आहे. पण, त्यातील “तुम्हाबरोबर” या शब्दामुळे या ठिकाणी एकापेक्षा जास्त लोकांबद्दल सांगितलं जात आहे हे दिसून येतं. त्यामुळे, हा यहूदी माणूस एका व्यक्तीला नव्हे, तर अभिषिक्तांच्या पूर्ण गटाला सूचित करतो. आणि म्हणून, इतर मेंढरांतील लोकांना प्रत्येक अभिषिक्ताची ओळख करून त्याच्या किंवा तिच्या सोबत जाण्याची गरज नाही. उलट, त्यांनी या अभिषिक्तांना एक गट या नात्यानं ओळखून त्यांच्यासोबत यहोवाची सेवा करण्याची गरज आहे. शिवाय, आज येशू आपलं नेतृत्व करत आहे आणि बायबल म्हणतं की आपण केवळ त्याचंच अनुकरण केलं पाहिजे.—मत्त. २३:१०.

अभिषिक्तांनी स्वतःबद्दल कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे?

५. अभिषिक्तांनी कोणत्या इशाऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आणि का?

अभिषिक्तांनी पहिले करिंथ ११:२७-२९ (वाचा.) मध्ये देण्यात आलेल्या इशाऱ्याबद्दल गंभीरतेनं विचार केला पाहिजे. पण, एखादी अभिषिक्त व्यक्ती “अयोग्य प्रकारे” स्मारकविधीच्या प्रतीकांचं सेवन कशी करू शकते? जेव्हा एखादी अभिषिक्त व्यक्ती यहोवाला विश्वासू राहत नाही किंवा त्याच्यासोबतचं तिचं नातं टिकवून ठेवत नाही आणि तरीही स्मारकविधीच्या प्रतीकांचं सेवन करते, तेव्हा ती अयोग्य प्रकारे त्यांचं सेवन करत आहे असा त्याचा अर्थ होईल. (इब्री ६:४-६; १०:२६-२९) या वचनातील कडक इशाऱ्यामुळे अभिषिक्तांना याची आठवण होते, की “ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी” त्यांनी शेवटपर्यंत विश्वासू राहणं गरजेचं आहे.—फिलिप्पै. ३:१३-१६.

६. अभिषिक्त जन स्वतःबद्दल कसा दृष्टिकोन बाळगतात?

पौलानं अभिषिक्त ख्रिश्चनांना म्हटलं: “म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की, तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला.” अभिषिक्त जन या गोष्टीचं कशा प्रकारे पालन करू शकतात? पौलानं पुढे म्हटलं: “पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या; आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा.” (इफिस. ४:१-३) यहोवाचा पवित्र आत्मा त्याच्या सेवकांना गर्विष्ठ वृत्ती नव्हे तर नम्र वृत्ती बाळगण्यास मदत करतो. (कलस्सै. ३:१२) म्हणून, जे अभिषिक्त आहेत ते स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत नाहीत. त्यांना माहीत असतं, की यहोवा अभिषिक्तांना इतर सेवकांपेक्षा जास्त पवित्र आत्मा देत नाही. शिवाय, आपल्याला बायबलमधील सत्यं इतरांपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे समजतात असंही त्यांना वाटत नाही. तसंच, ते कधीच कोणाला असं सांगणार नाहीत, की ‘तुलाही अभिषिक्त करण्यात आलं आहे आणि तूही स्मारकविधीच्या प्रतीकांचं सेवन केलं पाहिजे.’ याउलट, ते नम्र राहण्याचा प्रयत्न करतात आणि फक्त यहोवाच एखाद्याला स्वर्गीय जीवनासाठी निवडतो हे ते नेहमी लक्षात ठेवतात.

७, ८. अभिषिक्त जन कशाची अपेक्षा करत नाहीत, आणि का?

स्वर्गीय जीवनासाठी निवडलं जाणं हा खरोखरच एक खूप मोठा बहुमान आहे. तरी, इतरांकडून आपल्याला खास प्रकारचा आदर मिळावा अशी अपेक्षा अभिषिक्त जन करत नाहीत. (इफिस. १:१८, १९; फिलिप्पैकर २:२, ३ वाचा.) यहोवा जेव्हा एखाद्याला अभिषिक्त करतो तेव्हा ही गोष्ट फक्त त्या व्यक्तीमध्ये आणि यहोवामध्ये असते. इतर लोकांना त्याबद्दल सांगितलं जात नाही. त्यामुळे, ते अभिषिक्त आहेत यावर जर कोणी लगेच विश्वास ठेवत नसेल, तर त्यांना याचं आश्चर्य वाटत नाही. उलट, मला देवाकडून एक खास जबाबदारी मिळाली आहे असं कोणी म्हणत असेल, तर त्याच्यावर आपण लगेच विश्वास ठेवू नये हा बायबलमधील सल्ला ते लक्षात घेतात. (प्रकटी. २:२) त्यामुळे, आपल्याला विशेष आदर मिळावा म्हणून ‘मी अभिषिक्त आहे’ अशी ओळख ते इतरांना करून देत नाहीत. शिवाय, स्वर्गात गेल्यावर आपल्याला कोणत्या अद्‌भुत गोष्टी करायला मिळतील याविषयीही ते इतरांना सांगत बसत नाहीत.—१ करिंथ. १:२८, २९; १ करिंथकर ४:६-८ वाचा.

अभिषिक्त जनांना, ते एका विशिष्ट गटाचे, जणू निवडक लोकांच्या एका क्लबचे सदस्य आहेत असं वाटत नाही. म्हणून ते केवळ इतर अभिषिक्त जनांसोबत वेळ घालवण्याचं टाळतात. शिवाय, ते इतर अभिषिक्तांसोबत ओळख करून घेण्याचा किंवा गट या नात्यानं त्यांच्यासोबत मिळून बायबलचा अभ्यास करण्याचाही प्रयत्न करत नाहीत. (गलती. १:१५-१७) अभिषिक्तांनी जर अशा गोष्टी केल्या तर मंडळीची एकता धोक्यात येईल. शिवाय, असं करण्याद्वारे खरंतर ते देवाच्या पवित्र आत्म्याच्या विरोधात पाप करत असतील. कारण, देवाचा पवित्र आत्मा त्याच्या लोकांना शांतीनं आणि एकतेनं राहण्यास मदत करतो.—रोमकर १६:१७, १८ वाचा.

आपण त्यांच्याशी कसा व्यवहार केला पाहिजे?

९. स्मारकविधीच्या प्रतीकांचं सेवन करणाऱ्यांसोबत व्यवहार करताना आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे? (“प्रीती ‘गैरशिस्त वागत नाही’” ही चौकट पाहा.)

अभिषिक्त बंधुभगिनींसोबत तुम्ही कसा व्यवहार केला पाहिजे? येशूनं त्याच्या शिष्यांना सांगितलं: “तुम्ही सर्व भाऊ-भाऊ आहा.” पुढे तो म्हणाला: “जो कोणी स्वतःला उंच करेल तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवेल तो उंच केला जाईल.” (मत्त. २३:८-१२) तेव्हा, एखाद्या व्यक्तीला मग ती अभिषिक्त असली तरी, ‘उंच करणं’ किंवा श्रेष्ठ दर्जा देणं योग्य ठरेल का? मंडळीतील वडिलांबद्दल बोलताना, पुढाकार घेणाऱ्यांच्या विश्वासाचे अनुकरण करण्यास बायबल आपल्याला सांगतं. पण कोणत्याही मानवाला आपला नेता म्हणून पाहण्यास ते सांगत नाही. (इब्री १३:७) हे खरं आहे की काही जण “दुप्पट सन्मानास योग्य” आहेत. पण असे लोक, ते अभिषिक्त आहेत म्हणून नव्हे तर “चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात” आणि “उपदेश व शिक्षण या बाबतीत श्रम घेतात” म्हणून ते दुप्पट सन्मानास योग्य आहेत. (१ तीम. ५:१७) तेव्हा आपण जर अभिषिक्तांची गरजेपेक्षा जास्त स्तुती करत राहू किंवा त्यांना अवाजवी महत्त्व देऊ तर त्यांना ते नक्कीच आवडणार नाही. याहूनही वाईट म्हणजे, आपल्या अशा व्यवहारामुळे कदाचित त्यांच्यात गर्विष्ठपणाची वृत्ती निर्माण होऊ शकते. (रोम. १२:३) आपल्यापैकी कोणालाही असं काही करण्याची इच्छा नाही, ज्यामुळे ख्रिस्ताच्या बांधवांपैकी कोणाच्या हातून अशी गंभीर चूक होईल.—लूक १७:२.

स्मारकविधीच्या प्रतीकांचं सेवन करणाऱ्यांसोबत आपण कसा व्यवहार केला पाहिजे? (परिच्छेद ९-११ पाहा)

१०. आपण अभिषिक्तांना कसा आदर दाखवू शकतो?

१० तर मग, आपण अभिषिक्तांना कसा आदर दाखवू शकतो? त्यांना कसं अभिषिक्त करण्यात आलं हे आपण त्यांना कधीही विचारू नये. कारण, ही त्यांची खासगी बाब आहे आणि ते जाणून घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. (१ थेस्सलनी. ४:११, १२; २ थेस्सलनी. ३:११) शिवाय, एखाद्या अभिषिक्त व्यक्तीचा विवाह जोडीदार, तिचे आईवडील किंवा कुटुंबातील इतर सदस्यही अभिषिक्त असतील असा विचार करणंही योग्य ठरणार नाही. कारण, वारशानं कोणीही अभिषिक्त होत नाही. (१ थेस्सलनी. २:१२) तसंच, एखाद्याचं मन दुखावेल असे प्रश्नही विचारायचे आपण टाळले पाहिजे. उदाहरणार्थ, आपण अभिषिक्त बांधवाच्या पत्नीला असं विचारणार नाही की नंदनवनात आपल्या पतीशिवाय सदासर्वकाळ जगण्याबद्दल तिला काय वाटतं. कारण, आपल्याला याची पूर्ण खात्री आहे की नवीन जगात, यहोवा सर्व “प्राणिमात्राची इच्छा पुरी” करेल.—स्तो. १४५:१६.

११. अभिषिक्तांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगल्यामुळे आपलं संरक्षण कसं होतं?

११ आपण जर अभिषिक्तांना इतरांपेक्षा जास्त महत्त्व दिलं नाही, तर यामुळे खरंतर आपलंच संरक्षण होतं. असं का म्हणता येईल? बायबल म्हणतं की मंडळीत ‘खोटे बंधुही’ येतील. आणि कदाचित हे खोटे बंधू अभिषिक्त असल्याचा दावाही करू शकतात. (गलती. २:४, ५; १ योहा. २:१९) शिवाय, काही अभिषिक्त जन कदाचित शेवटपर्यंत विश्वासूही राहणार नाहीत. (मत्त. २५:१०-१२; २ पेत्र २:२०, २१) म्हणून, आपण कुठल्याही व्यक्तीला महत्त्व देण्याचं टाळलं पाहिजे. मग ते अभिषिक्त असोत, एखाद्या अधिकार पदावर असोत किंवा यहोवाची अनेक वर्षांपासून सेवा करणारे असोत. यामुळे, पुढे समजा ते देवाला विश्वासू राहिले नाहीत किंवा ते सत्यातून बाहेर गेले, तर त्यामुळे यहोवावरचा आपला विश्वास कमी होणार नाही किंवा त्याची सेवा करण्याचं आपण सोडून देणार नाही.—यहू. १६.

स्मारकविधीच्या प्रतीकांचं सेवन करणाऱ्यांच्या संख्येविषयी काय?

१२, १३. स्मारकविधीच्या प्रतीकांचं सेवन करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे याबद्दल आपण चिंता करत बसण्याची गरज का नाही?

१२ अनेक वर्षांपासून स्मारकविधीच्या प्रतीकांचं सेवन करणाऱ्यांची संख्या कमी होत होती. पण, अलीकडे प्रत्येक वर्षी त्यांची संख्या वाढत चालली आहे. तर मग ही चिंतेची बाब आहे का? नाही. याची काही कारणं आता आपण पाहू या.

१३ यहोवा “आपले जे आहेत त्यांना ओळखतो.” (२ तीम. २:१९) स्मारकविधीच्या प्रतीकांचं सेवन करणाऱ्यांपैकी कोण खरोखर अभिषिक्त आहेत हे फक्त यहोवालाच माहीत आहे. पण ही गोष्ट त्यांच्या संख्येची नोंद घेणाऱ्या बांधवांना माहीत नसते. त्यामुळे, या संख्येत अशांचाही समावेश होतो ज्यांना केवळ वाटतं की ते अभिषिक्त आहेत पण खरं पाहता ते अभिषिक्त नसतात. उदाहरणार्थ, काही जण आधी स्मारकविधीच्या प्रतीकांचं सेवन करायचे पण नंतर त्यांनी ते थांबवलं. काही असेही आहेत ज्यांना कदाचित काही मानसिक किंवा भावनिक समस्या असल्यामुळे, आपण येशू ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करणार आहोत असं वाटतं. त्यामुळे आज पृथ्वीवर अभिषिक्तांपैकी नेमके किती उरले आहेत हे खात्रीनं सांगणं आपल्याला शक्य नाही.

१४. मोठं संकट सुरू होईल तेव्हा अभिषिक्तांच्या संख्येबद्दल बायबल काय सांगतं?

१४ अभिषिक्तांना स्वर्गात घेऊन जाण्यासाठी येशू येईल तेव्हा अभिषिक्त जन पृथ्वीच्या अनेक भागांत असतील. बायबल म्हणतं: “कर्ण्याच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतांस पाठवेल, आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्यांस चाऱ्ही दिशांकडून जमा करतील.” (मत्त. २४:३१) बायबल असंही सांगतं की शेवटल्या काळात, अभिषिक्तांपैकी काही लोक या पृथ्वीवर असतील. (प्रकटी. १२:१७) पण, मोठं संकट सुरू होईल तेव्हा त्यांच्यापैकी नेमके किती लोक या पृथ्वीवर असतील हे बायबलमध्ये सांगितलेलं नाही.

१५, १६. यहोवानं निवडलेल्या १,४४,००० जणांबद्दल आपल्याला कोणती गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे?

१५ अभिषिक्तांची निवड केव्हा करायची ते यहोवा ठरवतो. (रोम. ८:२८-३०) येशूच्या पुनरुत्थानानंतर यहोवानं अभिषिक्तांची निवड करण्यास सुरवात केली. असं दिसतं की पहिल्या शतकातील सर्वच ख्रिस्ती अभिषिक्त होते. यानंतर शेकडो वर्षांपर्यंत ख्रिस्ती असल्याचा दावा करणारे बहुतेक लोक खरं पाहता ख्रिस्ताचं अनुकरण करणारे नव्हते. असं असलं तरी, त्या काळातही जे थोडेफार खरे ख्रिस्ती होते त्यांची निवड यहोवानं अभिषिक्त म्हणून केली. येशूनं सांगितल्याप्रमाणे ते निदनासोबत वाढणाऱ्या गव्हासारखे होते. (मत्त. १३:२४-३०) शेवटल्या दिवसांदरम्यानही यहोवा १,४४,००० ही संख्या पूर्ण होण्याकरता काही लोकांची निवड करत आहे. [2] तेव्हा, अंत येण्याच्या काही काळाआधीसुद्धा यहोवानं काही जणांची निवड करण्याचं ठरवलं तर तो योग्य करत आहे का, अशी शंका आपण घेणार नाही. (यश. ४५:९; दानी. ४:३५; रोमकर ९:११, १६ वाचा.)  [3] तेव्हा, येशूच्या दाखल्यातील शेवटच्या तासाला आलेल्या कामकऱ्यांबद्दल इतर कामकऱ्यांनी जी प्रतिक्रिया दाखवली तशी प्रतिक्रिया दाखवण्याचं आपण टाळू या.—मत्तय २०:८-१५ वाचा.

१६ स्वर्गात जाण्याची आशा असलेले सर्वच जण ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ नाहीत. (मत्त. २४:४५-४७) पहिल्या शतकाप्रमाणे यहोवा आणि येशू आजही अगदी थोड्या लोकांचा वापर करून अनेकांना आध्यात्मिक अन्न पुरवत आहेत. पहिल्या शतकात ग्रीक शास्त्रवचनं लिहिण्यासाठी केवळ ठरावीक अभिषिक्त ख्रिश्‍चानांचाच वापर करण्यात आला होता. आणि आजही केवळ मोजक्याच अभिषिक्त ख्रिश्चनांना देवाच्या लोकांना “यथाकाळी” आध्यात्मिक अन्न पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

१७. तुम्हाला या लेखातून काय शिकायला मिळालं आहे?

१७ या लेखातून आपल्याला काय शिकायला मिळालं? यहोवानं त्याच्या लोकांपैकी अनेकांना या पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा दिली आहे. आणि काहींना येशूसोबत स्वर्गात राज्य करण्यासाठी निवडलं आहे. यहोवा आपल्या सर्वच सेवकांना, अभिषिक्तांना आणि दुसऱ्या मेंढरांतील लोकांना त्यांचं प्रतिफळ देईल. या सर्वांना त्यानं एकसारखेच नियम दिले आहेत आणि त्यांनी ते पाळावेत आणि शेवटपर्यंत विश्वासू राहावं अशी तो अपेक्षा करतो. शिवाय, सर्वांनी नम्र असलं पाहिजे आणि सोबत मिळून एकतेनं यहोवाची सेवा केली पाहिजे. तसंच, सर्वांनी मंडळीतील एकता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण अंताच्या अगदी उंबरठ्यावर आहोत. तेव्हा, आपण सर्व एक कळप या नात्यानं यहोवाची सेवा करू या आणि ख्रिस्ताचं अनुकरण करत राहू या.

^ [१] (परिच्छेद ३) स्तोत्र ८७:५, ६ मध्ये सांगितल्यानुसार येशूसोबत स्वर्गात राज्य करणाऱ्यांची नावं कदाचित यहोवा भविष्यात आपल्याला सांगेल.—रोम. ८:१९.

^ [२] (परिच्छेद १५) एखाद्याला अभिषिक्त करण्यात येतं तेव्हा येशूचाही त्यात समावेश असतो असं प्रेषितांची कृत्ये २:३३ या वचनातून सूचित होत असलं तरी, फक्त यहोवाच एखाद्या व्यक्तीला स्वर्गीय जीवनासाठी निवडतो.

^ [३] (परिच्छेद १५) याबद्दलची अधिक माहिती टेहळणी बुरूज १ मे २००७ (इंग्रजी) यातील पृष्ठे ३०-३१ वरील “वाचकांचे प्रश्न” यात देण्यात आली आहे.