व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपलं बंधुप्रेम टिकवून ठेवण्याचा निर्धार करा!

आपलं बंधुप्रेम टिकवून ठेवण्याचा निर्धार करा!

तुमचं “बंधुप्रेम टिकून राहो.”—इब्री १३:१.

गीत क्रमांक: ३, २०

१, २. पौलानं इब्री ख्रिश्चनांना पत्र लिहिण्याचं कारण काय होतं?

एकसष्ट सालचा काळ, इस्राएलमधील मंडळ्यांकरता बऱ्यापैकी शांतीचा काळ होता. पौलाचा सोबती तीमथ्य याला तुरुंगातून नुकतीच सुटका मिळाली होती. प्रेषित पौल रोममधील एका तुरुंगात होता, तरी आपली लवकरच सुटका होईल असं त्याला वाटत होतं. त्यामुळे दोघं मिळून यहुदीयातील आपल्या बांधवांना भेटण्याची आशा ठेवून होते. (इब्री १३:२३) पण, फक्त पाच वर्षांतच परिस्थिती बदलणार होती. यरुशलेम शहराभोवती शत्रूंचा वेढा पडणार होता. त्यामुळे यहुदीयातील आणि खासकरून यरुशलेममधील ख्रिश्चनांवर अगदी निर्णायक पाऊल उचलण्याची वेळ येणार होती. येशूनं आधीच सांगितल्याप्रमाणे या घटना पाहताच त्याच्या अनुयायांना तिथून पळ काढायचा होता.—लूक २१:२०-२४.

येशूनं आपल्या अनुयायांना हा इशारा देऊन आता २८ वर्षं झाली होती. या सबंध काळादरम्यान इस्राएलमधील ख्रिस्ती बऱ्याच दबावांचा आणि छळांचा सामना करूनही विश्वासू राहिले होते. (इब्री १०:३२-३४) पण, आता त्यांना त्यांच्या विश्वासाच्या सर्वात मोठ्या परीक्षेचा सामना करावा लागणार होता. आणि यासाठी त्यांना तयार करण्याची पौलाची इच्छा होती. (मत्त. २४:२०, २१; इब्री १२:४) येशूनं सांगितल्यानुसार त्यांना तिथून पळ काढायचा होता आणि यासाठी पूर्वी कधी नव्हती इतक्या धीराची आणि विश्वासाची त्यांना गरज होती. कारण त्यावरच त्यांचं जीवन अवलंबून होतं. (इब्री लोकांस १०:३६-३९ वाचा.) यामुळेच तिथल्या बंधुभगिनींना पत्र लिहिण्यास यहोवानं पौलाला प्रेरित केलं. याच पत्राला आपण इब्री लोकांस पत्र म्हणून ओळखतो. बांधवांचा विश्वास मजबूत करण्यासाठी खासकरून हे पत्र लिहिण्यात आलं होतं.

३. पौलानं लिहिलेल्या पत्राचं आपणही परीक्षण का केलं पाहिजे?

पौलानं लिहिलेल्या या पत्राचं आज आपणही देवाचे लोक या नात्यानं परीक्षण करणं महत्त्वाचं आहे. कारण, आपलीही परिस्थिती यहुदीयातील ख्रिश्चनांसारखीच आहे. आपण अतिशय कठीण काळात जगत आहोत आणि अनेकांनी विश्वासूपणे मोठमोठ्या समस्यांचा आणि परीक्षांचा सामना केला आहे. (२ तीम. ३:१, १२) पण आपल्यापैकी अनेक जण आज चांगल्या परिस्थितीत राहत आहेत आणि त्यांना कुठल्याही परीक्षांचा थेट सामना करावा लागत नाही. ते आतासुद्धा एका अर्थानं शांतीपूर्ण वातावरणातच आहेत. तरीदेखील पौलाच्या काळातील ख्रिश्चनांप्रमाणे आपल्यालाही सतर्क राहण्याची गरज आहे. कारण लवकरच विश्वासाच्या सर्वात मोठ्या परीक्षेचा आपल्याला सामना करावा लागणार आहे!—लूक २१:३४-३६ वाचा.

४. या वर्षाचं वार्षिक वचन काय आहे, आणि ते योग्यच आहे असं का म्हणता येईल?

भविष्यात घडणाऱ्या घटनेचा सामना करण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होईल? इब्री लोकांस पत्रात पौलानं अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांमुळे आपला विश्वास बळकट होतो. यांपैकी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इब्री लोकांस १३:१ या वचनात सापडते. त्यात म्हटलं आहे: तुमचं “बंधुप्रेम टिकून राहो.” हे शास्त्रवचन २०१६ सालचं वार्षिक वचन म्हणून निवडण्यात आलं आहे.

२०१६ सालचं आपलं वार्षिक वचन: तुमचं “बंधुप्रेम टिकून राहो.”—इब्री लोकांस १३:१

बंधुप्रेम म्हणजे काय?

५. बंधुप्रेमात कोणत्या गोष्टीचा समावेश होतो?

बंधुप्रेम म्हणजे काय? या ठिकाणी पौलानं जो मूळ ग्रीक शब्द वापरला, त्याचा अर्थ “बांधवांबद्दल असलेली जिव्हाळ्याची किंवा आपलेपणाची भावना.” बंधुप्रेम हे कुटुंबातील सदस्यात किंवा घनिष्ठ मित्रांमध्ये असलेल्या भावनिक ओलाव्यासारखं किंवा अत्यंत जिव्हाळ्याच्या नात्यासारखं आहे. (योहा. ११:३६) त्यामुळे आपण केवळ बंधुप्रेम असल्याचा दिखावा करत नाही, तर खरोखरच आपल्या बंधुभगिनींवर अगदी मनापासून प्रेम करतो. (मत्त. २३:८) पौल म्हणतो: “बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना.” (रोम. १२:१०) या शब्दांवरून, आपल्या बांधवांबद्दल आपल्या मनात असलेलं प्रेम किती गहिरं असलं पाहिजे, हे दिसून येतं. त्यामुळे, ख्रिस्ती तत्त्वांवर आधारित असलेल्या अगापे प्रेमासोबतच या प्रकारच्या बंधुप्रेमामुळे देवाच्या लोकांना एकमेकांसोबत जवळची मैत्री करण्यास आणि एकतेनं राहण्यास मदत होते.

६. खरे ख्रिस्ती या नात्यानं बंधुप्रेमाचा आपल्यासाठी काय अर्थ होतो?

“बंधुप्रेम” ही संज्ञा खासकरून ख्रिस्ती साहित्यामध्येच जास्त पाहायला मिळते. यहुदी धर्मात “बंधू” हा शब्द सहसा नातेवाइकांना आणि कधीकधी कुटुंबातील सदस्य नसलेल्या लोकांना उद्देशून वापरला जायचा. तरी या शब्दाचा वापर फक्त त्यांच्या राष्ट्रातील सदस्यांपुरताच मर्यादित होता. पण, ख्रिस्ती या नात्यानं आपल्यासाठी या शब्दाचा अर्थ केवळ एखाद्या राष्ट्रापुरताच मर्यादित नाही. उलट, आपण आपल्या सर्वच बंधुभगिनींवर प्रेम करतो. मग ते कोणत्याही राष्ट्रातील का असेनात. (रोम. १०:१२) यहोवानं आपल्याला बंधुभगिनी या नात्यानं एकमेकांवर प्रेम करण्यास शिकवलं आहे. (१ थेस्सलनी. ४:९) पण मग, आपलं हे बंधुप्रेम टिकवून ठेवणं का महत्त्वाचं आहे?

बंधुप्रेम टिकवून ठेवणं इतकं महत्त्वाचं का आहे?

७. (क) बंधुप्रेम दाखवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे? (ख) एकमेकांप्रती असलेलं आपलं प्रेम वाढवण्याचं आणखी एक कारण कोणतं आहे? स्पष्ट करा.

या प्रश्‍नाचं सोपं उत्तर म्हणजे आपण एकमेकांना बंधुप्रेम दाखवावं अशी स्वतः यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. जर आपलं आपल्या बांधवांवर प्रेम नसेल, तर आपण यहोवावरही प्रेम करू शकत नाही. (१ योहा. ४:७, २०, २१) पौलानं जेव्हा इब्री ख्रिश्चनांना पत्र लिहिलं तेव्हा त्याला माहीत होतं की लवकरच काहींना आपली घरं, आपली मालमत्ता आणि इतर सर्व काही सोडून जावं लागणार आहे. शिवाय, हा काळ अतिशय कठीण असेल याविषयी येशूनं आधीच सांगितलं होतं. (मार्क १३:१४-१८; लूक २१:२१-२३) त्यामुळे, ती वेळ येण्याआधीच ख्रिश्चनांना त्यांचं एकमेकांप्रती असलेलं प्रेम आणखी वाढवण्याची गरज होती. (रोम. १२:९) साहजिकच अशा कठीण प्रसंगांचा सामना करताना आपल्याला एकमेकांच्या साहाय्याची नितांत गरज असते. आणि हेच दुसरं कारण आहे, ज्यामुळे आपलं बंधुप्रेम आपण टिकवून ठेवलं पाहिजे.

८. मोठं संकट सुरू होण्याआधी आपण काय करण्याची गरज आहे?

मानवजातीच्या संपूर्ण इतिहासात कधीही आलं नव्हतं इतकं मोठं संकट लवकरच येत आहे. (मार्क १३:१९; प्रकटी. ७:१-३) त्या वेळी आपल्याला या सल्ल्याचं पालन करावं लागेल: “चला, माझ्या लोकांनो, आपआपल्या खोल्यांत जा, दारे लावून घ्या; क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा.” (यश. २६:२०) या ठिकाणी ज्या ‘खोल्यांचा’ उल्लेख करण्यात आला आहे त्या कदाचित आपल्या मंडळ्यांना सूचित करतात. याच ठिकाणी आपण आपल्या बंधुभगिनींसोबत मिळून यहोवाची उपासना करतो. पण, फक्त नियमितपणे एकत्र जमणंच पुरेसं नाही. कारण पौलानं इब्री ख्रिश्चनांना याची आठवण करून दिली होती, की त्यांनी या प्रसंगांचा उपयोग एकमेकांना “प्रीती व सत्कर्मे” करण्यास उत्तेजन देण्यासाठी केला पाहिजे. (इब्री १०:२४, २५) आपण आत्ताच आपलं बंधुप्रेम वाढवण्याची गरज आहे. कारण, यामुळेच भविष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करण्याची ताकद आपल्याला मिळेल.

९. (क) असे कोणते प्रसंग आहेत जेव्हा आपल्याला बंधुप्रेम दाखवण्याची संधी मिळते? (ख) स्थानिक मंडळीतील किंवा इतर ठिकाणी असलेल्या यहोवाच्या लोकांनी कशा प्रकारे बंधुप्रेम दाखवलं आहे, याची काही उदाहरणं सांगा.

मोठ्या संकटाची सुरवात होण्याआधी, आज आपल्या काळातही बंधुप्रेमाची नितांत गरज आहे. आज आपल्या बांधवांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. भूकंप, पूर, वादळ, त्सुनामी किंवा अशा इतर अनेक नैसर्गिक विपत्तींना त्यांना तोंड द्यावं लागतं. तसंच, काहींना छळाचादेखील सामना करावा लागतो. (मत्त. २४:६-९) यात आणखी भर म्हणजे या भ्रष्ट जगात आर्थिक समस्याही आहेतच. (प्रकटी. ६:५, ६) आपल्या बांधवांवर जितक्या जास्त समस्या येतात, तितकंच त्यांच्यावर आपलं किती प्रेम आहे हे दाखवण्याची संधी आपल्याला मिळत असते. “अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल,” असं बायबल म्हणतं. पण आपण मात्र आपलं बंधुप्रेम दाखवत राहिलं पाहिजे.—मत्त. २४:१२. [1]

आपण आपलं बंधुप्रेम कसं टिकवून ठेवू शकतो?

१०. आता आपण कशाचं परीक्षण करणार आहोत?

१० आज आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असला, तरी आपलं बंधुप्रेम टिकून आहे हे आपण खात्रीनं कसं म्हणू शकतो? आपलं बंधुप्रेम अजूनही टिकून आहे हे आपण कोणत्या मार्गांनी दाखवू शकतो? तुमचं “बंधुप्रेम टिकून राहो” असं म्हटल्यानंतर प्रेषित पौलानं असे बरेच मार्ग सांगितले, ज्यांद्वारे आपण इतरांवर प्रेम असल्याचं दाखवू शकतो. आता आपण त्यांपैकी सहा मार्गांचं परीक्षण करू या.

११, १२. पाहुणचार दाखवण्याचा काय अर्थ होतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

११ “अतिथिप्रेमाचा विसर पडू देऊ नका.” (इब्री लोकांस १३:२ वाचा.) “अतिथ्य” किंवा पाहुणचार या शब्दाचा काय अर्थ होतो? पौलानं या ठिकाणी ज्या शब्दाचा वापर केला त्याचा अर्थ “अनोळखी लोकांवर दया दाखवणं” असा होतो. ही संज्ञा आपल्याला अब्राहाम आणि लोट यांची आठवण करून देते. या दोघांनीही त्यांना भेटायला आलेल्या अनोळखी पुरुषांचा पाहुणचार केला. नंतर अब्राहाम आणि लोट यांना समजलं की ते अनोळखी पाहुणे खरंतर देवदूत होते. (उत्प. १८:२-५; १९:१-३) या उदाहरणांवरून इब्री ख्रिश्चनांना इतरांचा पाहुणचार करण्याद्वारे बंधुप्रेम दाखवण्याची प्रेरणा मिळाली.

१२ आपण इतरांचा पाहुणचार कसा करू शकतो? आपण आपल्या बंधुभगिनींना जेवणासाठी किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवून त्यांना उत्तेजन देण्यासाठी आपल्या घरी बोलवू शकतो. आपल्याकडे येणाऱ्या विभागीय पर्यवेक्षकाला आणि त्यांच्या पत्नीला आपण जवळून ओळखत नसलो, तरी ते जेव्हा आपल्या मंडळीला भेट देतात तेव्हा आपण त्यांना आपल्या घरी बोलवू शकतो. (३ योहा. ५-८) पाहुणचारासाठी बोलवलेल्या बांधवांना खूप मोठी मेजवानी देण्याची किंवा त्यासाठी खूप खर्च करण्याची गरज नाही. कारण आपला उद्देश इतरांवर छाप पाडण्याचा नाही, तर त्यांना उत्तेजन देण्याचा असतो. तसंच, फक्त जे लोक आपली परतफेड करू शकतील, केवळ अशांनाच आपण आमंत्रण देणार नाही. (लूक १०:४२; १४:१२-१४) मुद्दा हाच की आपण इतकं व्यस्त असू नये ज्यामुळे आपल्याला पाहुणचार करण्याचा विसर पडेल.

१३, १४. तुरुंगात असलेल्यांना आपण कशी मदत करू शकतो?

१३ तुरुंगात असलेल्यांची आठवण ठेवा. (इब्री लोकांस १३:३ वाचा.) पौलानं जेव्हा हे शब्द लिहिले तेव्हा तो अशा बांधवांना उद्देशून बोलत होता ज्यांना आपल्या विश्वासामुळे तुरुंगात टाकण्यात आलं होतं. पौलानं मंडळीतील सदस्यांची प्रशंसा करत म्हटलं, “बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झाला” आहात. (इब्री १०:३४) पौल चार वर्षांसाठी तुरुंगात होता तेव्हा काही बांधवांनी त्याला मदत केली. पण, काही बांधव त्याच्यापासून खूप लांब होते. मग ते पौलाची कशा प्रकारे मदत करू शकत होते? पौलासाठी ते कळकळीची प्रार्थना करू शकत होते.—फिलिप्पै. १:१२-१४; इब्री १३:१८, १९.

१४ आजही आपल्या बऱ्याच बांधवांना त्यांच्या विश्वासामुळे तुरुंगात टाकण्यात आलं आहे. त्यांच्या जवळ राहणारे बंधुभगिनी त्यांना व्यावहारिक रीत्या मदत करू शकतात. पण, आपल्यापैकी बरेच जण या तुरुंगातील बांधवांपासून खूप लांब आहेत. मग अशा बांधवांना न विसरता, आपण त्यांची कशी मदत करू शकतो? आपलं बंधुप्रेम आपल्याला त्यांच्यासाठी कळकळीची प्रार्थना करण्यास प्रवृत्त करेल. उदाहरणार्थ, एरिट्रिया इथं तुरुंगात असलेल्या आपल्या बांधवांकरता, बहिणींकरता आणि लहान मुलांकरता आपण कळकळीची प्रार्थना करू शकतो. याठिकाणी असणाऱ्या बांधवांमध्ये पौलूस इयास्सू, आयझॅक मोगोस आणि नेगेडी टेकलेमरिअम हेदेखील आहेत. हे बांधव गेल्या २० वर्षांपासून तुरुंगात आहेत आणि अजूनही त्यांची सुटका झालेली नाही.

१५. आपण विवाह व्यवस्थेचा आदर का केला पाहिजे?

१५ “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे.” (इब्री लोकांस १३:४ वाचा.) आपण नैतिक रीत्या शुद्ध राहण्याद्वारेही बंधुप्रेम दाखवू शकतो. (१ तीम. ५:१, २) उदाहरणार्थ आपण जर कोणा बांधवासोबत किंवा बहिणीसोबत अनैतिक कृत्य केलं, तर त्या व्यक्तीचं आणि त्यासोबत तिच्या कुटुंबाचंही आपण नुकसान करत असतो. यामुळे बांधवांमध्ये असलेल्या भरवशाला तडा जाऊ शकतो. (१ थेस्सलनी. ४:३-८) विचार करा: एखाद्या पत्नीला जेव्हा हे कळेल की तिचा पती पोर्नोग्राफी (अश्‍लील साहित्य) पाहतो, तेव्हा तिला कसं वाटेल? आपल्या पतीचं आपल्यावर प्रेम आहे आणि तो विवाह व्यवस्थेचा आदर करतो, असा विचार तिला करता येईल का? नक्कीच नाही!—मत्त. ५:२८.

१६. समाधानी वृत्ती आपल्याला बंधुप्रेम दाखवण्यास कशा प्रकारे मदत करते?

१६ “जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे.” (इब्री लोकांस १३:५ वाचा.) यहोवावर असणाऱ्या आपल्या भरवशामुळे आपण आहे तेवढ्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न करत असतो. पण मग, यामुळे आपण बंधुप्रेम दाखवतो असं का म्हणता येईल? आहे तेवढ्यात समाधानी असल्यामुळे भौतिक गोष्टींप्रती आपला दृष्टिकोन संतुलित राहतो. (१ तीम. ६:६-८) यामुळे यहोवा आणि आपल्या ख्रिस्ती बांधवांसोबत असणारं आपलं नातं पैशापेक्षा कैक पटीनं मौल्यवान आहे याची जाणीव बाळगण्यास आपल्याला मदत होते. शिवाय, एक व्यक्ती जेव्हा समाधानी असते तेव्हा तक्रार करण्याच्या, कुरकूर करण्याच्या किंवा इतरांमध्ये दोष पाहण्याच्या वृत्तीपासून ती दूर राहते. तसंच, बंधुप्रेमाच्या आड येणाऱ्या हेव्याच्या आणि लोभाच्या वृत्तीलाही ती बळी पडत नाही. याउलट, समाधानी असल्यामुळे ती व्यक्ती उदारतेनं देण्यास प्रवृत्त होते.—१ तीम. ६:१७-१९.

१७. धैर्यामुळे आपल्याला बंधुप्रेम दाखवण्यास कशी मदत होते?

१७ धैर्यवान असा. (इब्री लोकांस १३:६ वाचा.) यहोवावर भरवसा असल्यामुळे आपण कठीण परीक्षांचा अगदी धैर्यानं सामना करू शकतो. हे धैर्य आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास मदत करतं. आणि सकारात्मक असल्यामुळे आपण आपल्या बंधुभगिनींना प्रोत्साहन देऊ शकतो आणि त्यांचं सांत्वन करू शकतो. असं करण्याद्वारे आपण त्यांना बंधुप्रेम दाखवत असतो. (१ थेस्सलनी. ५:१४, १५) शिवाय, मोठ्या संकटादरम्यान आपला मुक्तीसमय जवळ आहे ही जाणीव आपल्याला धैर्य दाखवण्यास मदत करेल.—लूक २१:२५-२८.

वडील आपल्यासाठी जे काही करत आहेत, त्याची तुम्ही कदर बाळगता का? (परिच्छेद १८ पाहा)

१८. मंडळीतील वडिलांप्रती आपण आपलं बंधुप्रेम कसं वाढवू शकतो?

१८ आपल्या अधिकाऱ्यांची आठवण ठेवा. (इब्री लोकांस १३:७, १७ वाचा.) आपल्या मंडळीतील वडील त्यांचा व्यक्तिगत वेळ आपल्यासाठी खर्च करतात. ते आपल्यासाठी जे कष्ट घेत आहेत त्याबद्दल विचार केल्यामुळे त्यांच्याप्रती असलेलं आपलं प्रेम आणि आपली कदर आणखी वाढते. त्यामुळे त्यांचा आनंद कमी होईल किंवा ते निराश होतील अशी कोणतीही गोष्ट आपण करणार नाही. उलट, अगदी मनापासून आपण त्यांच्या आज्ञेत राहण्याचा प्रयत्न करू. असं करण्याद्वारे आपण “त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान,” देत असतो.—१ थेस्सलनी. ५:१३.

आपलं बंधुप्रेम आणखी वाढवत राहा

१९, २०. आपण आणखी जास्त प्रमाणात आपलं बंधुप्रेम कसं दाखवू शकतो?

१९ यहोवाचे लोक आपसात असणाऱ्या त्यांच्या बंधुप्रेमाकरता ओळखले जातात. पौलाच्या काळातही हीच गोष्ट खरी होती. पण पौलानं बांधवांना एकमेकांवर असलेली प्रीती वाढवून ती “उत्तरोत्तर अधिक करावी,” असं प्रोत्साहन दिलं. (१ थेस्सलनी. ४:९, १०) यावरून स्पष्ट होतं की आपण आपलं बंधुप्रेम नेहमीच वाढवत राहिलं पाहिजे.

२० तर मग, या वर्षी आपण जेव्हा राज्य सभागृहात आपल्या वार्षिक वचनाकडे पाहू, तेव्हा आपण पुढील प्रश्नांवर मनन करू या: पाहुणचार दाखवण्याच्या बाबतीत मला आणखी सुधारणा कशी करता येईल? तुरुंगात असलेल्या बांधवांना मी कशी मदत करू शकतो? देवानं केलेल्या विवाहाच्या व्यवस्थेचा मी आदर करतो का? समाधानी असण्यासाठी मला कशामुळे मदत होऊ शकते? यहोवावरील माझा भरवसा मला आणखी कसा वाढवता येईल? मंडळीत पुढाकार घेणाऱ्यांच्या आज्ञेत राहण्यास मला कशी मदत होईल? आपण या सहा क्षेत्रांमध्ये आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, तर आपलं वार्षिक वचन केवळ भिंतीवरील एक फलक राहणार नाही. उलट त्यामुळे पौलाच्या या शब्दांचं पालन करण्याची आपल्याला आठवण होईल: तुमचं “बंधुप्रेम टिकून राहो.”—इब्री १३:१.

^ [१] (परिच्छेद ९) यहोवाचे साक्षीदार संकटाच्या काळात त्यांचं बंधुप्रेम कसं दाखवतात याची काही उदाहरणं जाणून घेण्यासाठी टेहळणी बुरूज १५ जुलै २००२ यातील पृष्ठे ८-९, आणि जेहोवाज विटनेसेस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉड्स किंग्डम, अध्याय १९ पाहा.