व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्याला ‘जागृत राहण्याची’ गरज का आहे?

आपल्याला ‘जागृत राहण्याची’ गरज का आहे?

“कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हास ठाऊक नाही.”—मत्त. २४:४२.

गीत क्रमांक: १६, ५४

१. वेळेचं भान असणं आणि आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव असणं गरजेचं का आहे, हे उदाहरण देऊन स्पष्ट करा. (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

अधिवेशन सुरू होण्याची वेळ झाली. सत्राचे अध्यक्ष स्टेजवर आले आणि त्यांनी सर्वांचं स्वागत केलं. आता लवकरच संगीत सुरू होणार होतं. आपआपल्या जागेवर बसून कार्यक्रमाचा आनंद घेण्याची वेळ झाली आहे हे बऱ्याच जणांनी ओळखलं. खास त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या मधुर संगीताचा त्यांना आनंद घ्यायचा होता. आणि अधिवेशनातील भाषणं ऐकण्यासाठी ते उत्सुक होते. पण काही लोक असे होते ज्यांचं अध्यक्षांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं आणि संगीत सुरू झालं आहे याचं भानही त्यांना राहिलं नाही. त्यामुळे ते आपल्या मित्रांशी अजूनही गप्पा मारत होते आणि सभागृहात फिरत होते. या परिस्थितीवरून आपल्याला समजतं की जर आपण सावध नसलो, तर आपल्याला वेळेचं भान राहणार नाही आणि आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीवदेखील आपल्याला नसेल. हा आपल्यासाठी मोलाचा धडा आहे, कारण लवकरच एक खूप महत्त्वाची घटना घडणार आहे आणि आपल्याला त्यासाठी तयार राहणं फार गरजेचं आहे. ही महत्त्वाची घटना कोणती आहे?

२. येशूने आपल्या शिष्यांना “जागृत राहा” असं का सांगितलं?

येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना ताकीद दिली की त्यांनी नेहमी दक्ष राहावं आणि ‘युगाच्या समाप्तीसाठी’ तयार असावं. येशू त्यांना म्हणाला: “सावध असा, जागृत राहा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही.” नंतर तो त्यांना बऱ्याच वेळा म्हणाला: “जागृत राहा.” (मत्त. २४:३; मार्क १३:३२-३७ वाचा.) मत्तयाच्या पुस्तकातून देखील आपल्याला हे दिसून येतं की येशूने ही ताकीद बऱ्याच वेळा आपल्या शिष्यांना दिली. त्याने म्हटलं: “जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हास ठाऊक नाही.” आणि पुन्हा एकदा त्याने शिष्यांना ताकीद दिली: “तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” नंतर पुन्हा एकदा त्याने त्यांना आठवण करून दिली: “तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही.”—मत्त. २४:४२-४४; २५:१३.

३. येशूने जे सांगितलं त्याकडे आपण लक्ष का देतो?

येशूने जे सांगितलं त्याकडे यहोवाचे साक्षीदार या नात्यानं आपण बारकाईनं लक्ष देतो. आपण शेवटल्या काळात जगत आहोत आणि लवकरच “मोठे संकट” सुरू होईल याची जाणीव आपल्याला आहे. (दानी. १२:४; मत्त. २४:२१) येशूने सांगितल्यानुसार यहोवाचे लोक आज जगभरात राज्याची सुवार्ता घोषित करत आहेत. जगाची परिस्थिती पाहिली तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला युद्धे, आजारपण, भूकंप आणि अन्न टंचाई पाहायला मिळते. धर्माच्या बाबतीत लोक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. तसंच, अपराध आणि हिंसा पूर्वी कधी नव्हती इतकी वाढली आहे. (मत्त. २४:७, ११, १२, १४; लूक २१:११) पृथ्वीवर येशू आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करेल, त्या वेळेची आपण सर्व जण खूप आतुरतेनं वाट पाहत आहोत.—मार्क १३:२६, २७.

तो दिवस जवळ येत आहे

४. (क) हर्मगिदोन कधी सुरू होईल याची वेळ येशूला आता माहीत असेल असं आपण का म्हणू शकतो? (ख) मोठे संकट नेमके कधी सुरू होईल हे आपल्याला माहीत नसलं तरी आपण कोणत्या गोष्टीबद्दल खात्री बाळगू शकतो?

आपण अधिवेशनाला जातो तेव्हा कार्यक्रमातील प्रत्येक भाग नेमका केव्हा सुरू होईल हे आपल्याला माहीत असतं. पण, ‘मोठं संकट’ नेमकं कधी सुरू होईल हे जाणून घेणं आपल्यासाठी अशक्य आहे. येशूने म्हटलं होतं: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांस नाही, पुत्रालाही नाही.” (मत्त. २४:३६) पण आता येशू स्वर्गात राजा आहे आणि तोच हर्मगिदोनाच्या युद्धात नेतृत्व करणार आहे. त्यामुळे ते युद्ध कधी लढलं जाईल याची कल्पना येशूला नक्कीच असेल असं आपण म्हणू शकतो. (प्रकटी. १९:११-१६) अंत कधी येईल याची निश्‍चित तारीख आणि वेळ आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपल्याला नेहमी जागृत राहणं खूप गरजेचं आहे. मोठं संकट कधी सुरू होईल याची तारीख यहोवाने ठरवली आहे आणि दिवसेंदिवस आपण त्याच्या जवळ जात आहोत. त्या दिवसाला “विलंब लागावयाचा नाही.” (हबक्कूक २:१-३ वाचा.) हे आपण इतक्या खात्रीनं कसं म्हणू शकतो?

५. यहोवा आपलं वचन दिलेल्या वेळेवर पूर्ण करतो याचं एक उदाहरण द्या.

यहोवाने केलेल्या भविष्यवाण्या अगदी ठरवलेल्या वेळेवर नेहमी पूर्ण झाल्या आहेत. उदाहरणार्थ, ज्या दिवशी इस्राएली लोकांची इजिप्तमधून सुटका झाली त्याचा विचार करा. इ.स.पू. १५१३ सालच्या निसान १४ या तारखेला हे घडलं. मोशेने त्या दिवसाबद्दल नंतर असं लिहिलं: “चारशेतीस वर्षे संपली त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून निघाल्या.” (निर्ग. १२:४०-४२) या ४३० वर्षांची सुरवात इ.स.पू. १९४३ सालच्या निसान १४ रोजी झाली. या दिवसापासून यहोवाने अब्राहामासोबत केलेला करार अंमलात आला. (गलती. ३:१७, १८) याच्या काही काळानंतर यहोवाने अब्राहामाला म्हटलं: “तू निश्‍चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहील व तिथल्या लोकांचे दास्य करेल, आणि ते लोक चारशे वर्षे त्यांना छळतील.” (उत्प. १५:१३; प्रे. कृत्ये ७:६) इश्माएल इसहाकाशी वाईटपणे वागू लागला तेव्हा या ४०० वर्षांची, म्हणजे इ.स.पू. १९१३ मध्ये, याची सुरवात झाली. आणि इस्राएली लोकांची इजिप्तमधून सुटका झाली तेव्हा ही ४०० वर्षं संपुष्टात आली. (उत्प. २१:८-१०; गलती. ४:२२-२९) शेकडो वर्षांआधीच यहोवाने ठरवलं होतं की कोणत्या दिवशी तो आपल्या लोकांची सुटका करेल. आणि अगदी त्याच दिवशी यहोवाने आपलं वचन पूर्ण केलं.

६. यहोवा आपल्या लोकांना मोठ्या संकटातून वाचवेल याची खात्री आपण का बाळगू शकतो?

इजिप्तमधून ज्या लोकांची सुटका झाली त्यात यहोशवादेखील होता. बऱ्याच वर्षांनंतर त्याने इस्राएली लोकांना एका गोष्टीची आठवण करून दिली. तो म्हणाला: “तुम्ही सर्व जण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्वर याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकही निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यातली एकही व्यर्थ गेली नाही.” (यहो. २३:२, १४) मोठ्या संकटातून आपल्या लोकांची सुटका करून नवीन जगात सदासर्वकाळाचं जीवन देण्याचं, यहोवाने आपल्याला अभिवचन दिलं आहे. आणि आपण पूर्ण खात्री बाळगू शकतो की त्याचं हे अभिवचन नक्की पूर्ण होईल. आपल्याला जर त्या नवीन जगात जायचं असेल, तर आज आपण जागृत राहणं खूप गरजेचं आहे.

बचाव होण्यासाठी जागृत राहणं गरजेचं

७, ८. (क) प्राचीन काळी पहारेकऱ्याची काय भूमिका होती आणि आपण त्यांच्याकडून काय शिकतो? (ख) पहारेकरी झोपी गेल्यामुळे काय घडू शकतं, हे समजण्यासाठी एक उदाहरण द्या.

प्राचीन काळी जे लोक शहराची राखण करण्यासाठी पहारेकरी म्हणून काम करायचे, त्यांच्याकडून आपण एक धडा शिकू शकतो. यरुशलेमसारख्या अनेक शहरांच्या भोवती उंच भिंती होत्या. यामुळे शत्रू सहजपणे आत येऊ शकत नव्हते. पहारेकरी या भिंतींवर उभे राहायचे. तिथून त्यांना शहराभोवतीच्या सर्व परिसराची पाहणी करणं शक्य व्हायचं. काही पहारेकरी शहराच्या दरवाज्याजवळ उभे असायचे. या पहारेकऱ्यांना रात्रंदिवस पाळत ठेवावी लागायची आणि शत्रू येत असल्यास शहरातील लोकांना सावध करावं लागायचं. (यश. ६२:६) जागृत राहून आपल्या आजूबाजूला काय घडत आहे यावर बारकाईनं लक्ष ठेवणं किती गरजेचं आहे याची जाणीव त्यांना होती. ते जर जागृत राहण्यास चुकले तर बऱ्याच लोकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता होती.—यहे. ३३:६.

इ.स. ७० मध्ये रोमी सैन्यानं यरुशलेम कसं काबीज केलं, याबद्दल यहुदी इतिहासकार जोसिफसने लिहिलं आहे. त्याने आपल्या लिखानात सांगितलं की जेव्हा रोमी सैन्यानं शहरावर हल्ला केला होता, तेव्हा शहराच्या एका विशिष्ट भागातील पहारेकरी झोपले होते. त्यामुळे रोमी सैनिक सहज रीत्या शहरात दाखल होऊ शकले. त्यांनी मंदिर जाळून टाकलं आणि मग यरुशलेम शहराचाही नाश केला. यहुदी लोकांवर आतापर्यंत आलेल्या सर्वात मोठ्या संकटाचा हा एक भयानक शेवट होता.

९. आज बऱ्याच लोकांना कोणती गोष्ट माहीत नाही?

आज जवळपास सर्वच मानवी सरकार, आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी सैनिकांचा आणि अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. देशाचं रक्षण करण्यासाठी ते रात्रंदिवस पाळत ठेवतात. पण आपल्यापेक्षाही जास्त शक्तिशाली असं एक सरकार आहे, याची जाणीव या मानवी सरकारांना नाही. ते सरकार म्हणजे स्वर्गातील सरकार आणि त्याचा राजा ख्रिस्त येशू आहे. हे सरकार लवकरच पृथ्वीवरील सर्व सरकारांविरुद्ध युद्ध करेल. (यश. ९:६, ७; दानी. २:४४) त्या दिवसाची आपण सर्वच जण वाट पाहात आहोत आणि त्यासाठी आपण तयार असावं अशीदेखील आपली इच्छा आहे. म्हणून आपण बायबलमधील भविष्यवाण्यांवर मनन करतो आणि यहोवाची विश्वासूपणे सेवा करतो.—स्तो. १३०:६.

लक्ष विचलित होऊ देऊ नका

१०, ११. (क) आपण कोणत्या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे आणि का? (ख) बायबलमधील भविष्यवाण्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी सैतानाने लोकांच्या मनावर प्रभाव पाडला आहे, असं आपण खात्रीनं का म्हणू शकतो?

१० एका पहारेकऱ्याची कल्पना करा ज्याने रात्रभर जागून पहारा दिला आहे. रात्रभर जागं राहिल्यामुळे आणि थकून गेल्यामुळे, शेवटच्या काही तासांदरम्यान जागं राहणं त्याला खूप कठीण जातं. आज आपणही अंताच्या अगदी जवळ आलो आहोत. आणि अंत जितका जवळ येईल तितकंच आपल्यासाठी आध्यात्मिक रीत्या जागृत राहणं कठीण होत जाईल. आपण जागृत राहिलो नाही किंवा लाक्षणिक अर्थाने झोपी गेलो तर त्याचे परिणाम फार वाईट होतील. आपल्याला जागृत राहणं ज्यामुळे कठीण जाऊ शकतं अशा तीन गोष्टींवर आता आपण चर्चा करू.

११ सैतान लोकांना फसवतो. सैतान “या जगाचा अधिकारी” आहे, या गोष्टीची येशूने आपल्या मृत्यूच्या काही काळाआधी शिष्यांना तीन वेळा आठवण करून दिली. (योहा. १२:३१; १४:३०; १६:११) सैतानाने लोकांची फसवणूक करण्यासाठी खोट्या धर्माचा उपयोग केला आहे. जगाचा अंत खूप जवळ आला आहे असं बायबल शिकवतं, पण सैतानाने लोकांची फसवणूक केल्यामुळे बरेच लोक बायबलमधील भविष्यवाण्यांकडे दुर्लक्ष करतात. (सफ. १:१४) सैतानाने लोकांची मने “आंधळी केली आहे,” असं बायबलमध्ये जे सांगितलं आहे ते अगदी खरं आहे. (२ करिंथ. ४:३-६) म्हणून मग आपण जेव्हा लोकांना जाऊन सांगतो की अंत जवळ आला आहे आणि ख्रिस्त राज्य करत आहे, तेव्हा बऱ्याच लोकांची ऐकायची इच्छा नसते. लोक सहसा आपल्याला म्हणतात की त्यांना या गोष्टीत आस्था नाही.

१२. आपण सावध राहणं का गरजेचं आहे?

१२ बायबलमधील भविष्यवाण्यांकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात, पण त्यांच्या या मनोवृत्तीचा आपण आपल्यावर प्रभाव पडू देऊ नये. जागृत राहणं गरजेचं का आहे याचं गांभीर्य आपण पूर्णपणे समजतो. पौलाने बांधवांना असं म्हटलं: “तुम्हाला स्वतःला पक्के माहीत आहे की, जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो.” (१ थेस्सलनीकाकर ५:१-६ वाचा.) येशूने आपल्याला इशारा दिला: “तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” (लूक १२:३९, ४०) लवकरच सैतान लोकांना असा विचार करायला लावेल की या जगात सगळीकडे “शांती आहे, निर्भय आहे.” आणि त्याच वेळी अकस्मात यहोवाचा महान दिवस येईल व सर्व जण गोंधळून जातील. पण आपल्याबाबतीत काय? आपल्याला जर त्या दिवसासाठी तयार राहायचं असेल, आणि इतरांसारखी फसवणूक होऊ द्यायची नसेल, तर आपण “जागे व सावध” राहणं खूप गरजेचं आहे. यामुळेच आपण बायबलचं दररोज वाचन केलं पाहिजे आणि यहोवा आपल्याला जे शिकवू इच्छितो त्यावर मनन केलं पाहिजे.

१३. जगाच्या आत्म्याचा आज लोकांवर कसा प्रभाव पडत आहे, आणि आपण तो कसा टाळू शकतो?

१३ जगाच्या आत्म्याचा लोकांच्या विचारसरणीवर प्रभाव पडतो. आज बऱ्याच लोकांना वाटतं की देवाबद्दल जाणून घेण्याची त्यांना काहीच गरज नाही. (मत्त. ५:६) त्याऐवजी ते आपला बहुतेक वेळ आणि शक्ती जगातील गोष्टी मिळवण्यात घालवतात. (१ योहा. २:१६) तसंच, आज कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना आकर्षित करणारं वेगवेगळ्या प्रकारचं मनोरंजन उपलब्ध आहे. आणि यातून लोकांना स्वतःच्या स्वार्थी इच्छा, मग त्या कोणत्या का असेनात, पूर्ण करण्याचं प्रोत्साहन दिलं जातं. (२ तीम. ३:४) यामुळे महत्त्वाच्या गोष्टीपासून लोकांचं लक्ष विचलित होतं आणि ते देवासोबत एक जवळचा नातेसंबंध जोडण्याबद्दल विचारच करत नाहीत. याच कारणामुळे पौलाने ख्रिश्चनांना आठवण करून दिली की त्यांनी स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याचं सोडून, “झोपेतून उठावे.”—रोम. १३:११-१४.

१४. लूक २१:३४, ३५ या वचनांतून आपल्याला कोणता इशारा मिळतो?

१४ आपल्या विचारसरणीवर जगाच्या आत्म्याचा नाही, तर देवाच्या आत्म्याचा प्रभाव पडावा अशी आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे. भविष्यात काय घडणार आहे हे स्पष्टपणे समजून घेण्यासाठी, यहोवाने आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे मदत केली आहे. [1] (१ करिंथ. २:१२) पण आपण नेहमी सावध राहणं गरजेचं आहे. जीवनातील अगदी लहानसहान गोष्टीही यहोवाची सेवा करण्यापासून आपलं लक्ष विचलित करू शकतात. (लूक २१:३४, ३५ वाचा.) आपण शेवटल्या दिवसांत जगत आहोत असा आपला विश्वास आहे. यामुळे कदाचित इतर जण आपल्यावर हसतील, आपली थट्टा करतील. (२ पेत्र ३:३-७) पण त्यांच्या अशा वागण्यामुळे आपण निराश होऊ नये, कारण अंत खूप जवळ आला आहे याचे सबळ पुरावे आपल्याजवळ आहेत. यहोवाच्या आत्म्याने आपल्या विचारसरणीवर प्रभाव पाडावा अशी आपली इच्छा असेल, तर आपण नियमितपणे आपल्या बांधवांसोबत सभांमध्ये उपस्थित राहिलं पाहिजे.

‘जागृत राहण्यासाठी’ तुम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहात का? (परिच्छेद ११-१६ पाहा)

१५. पेत्र, याकोब आणि योहान यांच्या बाबतीत काय घडलं, आणि तेच आपल्या बाबतीतही कसं घडू शकतं?

१५ आपल्या कमतरतांमुळे आपल्याला जागृत राहणं कठीण जातं. मानव अपरिपूर्ण आहेत आणि त्यांच्यामध्ये कमतरता आहेत हे येशूला माहीत होतं. येशूचा मृत्यू झाला त्याच्या आदल्या रात्री काय घडलं त्यावर विचार करा. येशू हा परिपूर्ण होता. पण तरी यहोवाला विश्वासू राहण्यासाठी प्रार्थनेत मदत मागण्याची गरज आहे, या गोष्टीची जाणीव त्याला होती. येशू प्रार्थना करायला जात असताना त्याने पेत्र, याकोब आणि योहान यांना जागृत राहायला सांगितलं. पण त्या रात्री जागृत राहणं इतकं महत्त्वाचं का आहे हे त्यांनी ओळखलं नाही. ते खूप थकलेले असल्यामुळे ते झोपी गेले. येशूदेखील थकलेला होता, पण तो जागृत राहिला आणि आपल्या पित्याला प्रार्थना करत राहिला. खरंतर प्रेषितांनीही त्या वेळेस येशूप्रमाणेच प्रार्थना करत राहण्याची गरज होती.—मार्क १४:३२-४१.

१६. लूक २१:३६ या वचनाद्वारे जागृत राहण्याविषयी येशूने काय सांगितलं?

१६ यहोवाच्या महान दिवसासाठी “जागृत” आणि तयार राहण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? यासाठी योग्य ते करण्याची आपल्या मनात उत्कट इच्छा असली पाहिजे. पण फक्त इच्छा असणंच पुरेसं नाही. येशूने आपल्या मृत्यूच्या काही दिवसांआधी आपल्या शिष्यांना सांगितलं की त्यांनी नेहमी यहोवाला प्रार्थनेत मदत मागितली पाहिजे. (लूक २१:३६ वाचा.) शेवटल्या दिवसांत जगत असताना जागृत राहण्यासाठी आपणही यहोवाला नेहमी प्रार्थना करत राहिलं पाहिजे.—१ पेत्र ४:७.

नेहमी जागृत राहा

१७. लवकरच ज्या घटना घडणार आहेत त्यासाठी आपण तयार आहोत याची खात्री आपण कशी करू शकतो?

१७ येशूने म्हटलं की, “तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” (मत्त. २४:४४) त्यामुळे आपण नेहमी तयार राहणं खूप गरजेचं आहे. आनंद मिळवण्यासाठी सैतानाचं जग आपल्याला बऱ्याच गोष्टी देऊ करतं, पण त्या गोष्टी मिळवण्याची ही वेळ नाही. खरंतर सैतानाचं जग फक्त स्वप्नं दाखवतं, अशी स्वप्नं जी कधीच पूर्ण होणार नाहीत. याच्या अगदी उलट यहोवाने आणि येशूने आपल्याला जागृत कसं राहता येईल याबद्दल बायबलद्वारे सांगितलं आहे. म्हणून मग आपण बायबलमधील भविष्यवाण्यांवर मनन करू या आणि त्या आज कशा पूर्ण होत आहेत याकडे लक्ष देऊ या. तसंच, आपण यहोवासोबत आपला नातेसंबंध आणखी घनिष्ट करण्याचा प्रयत्न करत राहू या. आणि त्याच्या राज्याला जीवनात नेहमी प्रथम स्थानी ठेवू या. या गोष्टी केल्या तर आपण अंतासाठी तयार असू. (प्रकटी. २२:२०) कारण आपला बचाव त्यावर अवलंबून आहे!

^ [१] (परिच्छेद १४) गॉड्‌स किंगडम रूल्स! या पुस्तकातील अध्याय २१ आणि टेहळणी बुरूज १५ जुलै २०१३, या अंकातील “या गोष्टी केव्हा होतील, . . . हे आम्हास सांगा” हा लेख पाहा.