व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या अगाध कृपेची सुवार्ता घोषित करा

यहोवाच्या अगाध कृपेची सुवार्ता घोषित करा

“देवाच्या कृपेची सुवार्ता निश्‍चितार्थाने” सांगा.—प्रे. कृत्ये २०:२४.

गीत क्रमांक: १०, २५

१, २. देवाकडून मिळालेल्या अगाध कृपेची कदर असल्याचं पौलाने कसं दाखवलं?

प्रेषित पौल अगदी खात्रीने म्हणू शकला: “माझ्यावर त्याची [देवाची] जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही.” (१ करिंथकर १५:९, १० वाचा.) पौलाने आधी ख्रिश्चनांचा छळ केला होता. त्यामुळे देवाची कृपा मिळवण्यास आपण पात्र नाही हे त्याला चांगलं माहीत होतं.

आपल्या मृत्यूच्या काही काळाआधी पौलाने तीमथ्याला असं लिहिलं: “ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो; कारण . . . मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरता ठेवले.” (१ तीम. १:१२-१४) ही सेवा कोणती होती? इफिसच्या मंडळीतील वडिलांना पौलाने म्हटलं: “मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करत नाही, यासाठी की, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्‍चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी.”—प्रे. कृत्ये २०:२४.

३. पौलाला कोणती खास जबाबदारी देण्यात आली होती? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

पौलाने कोणती “सुवार्ता” घोषित केली आणि त्यावरून यहोवाची अगाध कृपा कशी दिसून आली? पौलाने इफिसमधील ख्रिश्चनांना सांगितलं: “देवाची जी कृपा तुमच्यासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल.” (इफिस. ३:१, २) जे यहुदी नाहीत त्यांना सुवार्ता सांगण्याचं काम येशूने पौलाला दिलं होतं. यामुळे आता त्यांनाही मसीहाच्या स्वर्गीय सरकाराचा भाग होण्याची संधी मिळणार होती. (इफिसकर ३:५-८ वाचा.) आवेशाने प्रचारकार्य करण्याविषयी पौलाने आजच्या ख्रिश्चनांसमोर अगदी चांगलं उदाहरण मांडलं आहे. त्याने हे दाखवून दिलं की देवाने त्याच्यावर केलेली अगाध कृपा ही “व्यर्थ” गेली नाही.

देवाची अगाध कृपा तुम्हाला प्रेरित करते का?

४, ५. “राज्याची सुवार्ता” आणि “देवाच्या कृपेची सुवार्ता” एकच आहे, असं का म्हणता येईल?

शेवटल्या काळात “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची . . . सुवार्ता सर्व जगात” घोषित करण्याची जबाबदारी यहोवाच्या सेवकांना देण्यात आली आहे. (मत्त. २४:१४) राज्याच्या सुवार्तेला “देवाच्या कृपेची सुवार्ता” असंही म्हणता येईल. कशावरून? देवाच्या राज्यात आपल्याला जे आशीर्वाद मिळतील, ते यहोवाच्या आपल्यावर असलेल्या कृपेमुळेच मिळतील. (इफिस. १:३) आवेशाने प्रचारकार्य करण्याद्वारे पौलाने देवाच्या अगाध कृपेबद्दल कदर असल्याचं दाखवलं. आज आपण पौलाच्या उदाहरणाचं अनुकरण करत आहोत का?—रोमकर १:१४-१६ वाचा.

मागच्या लेखात आपण पाहिलं की पापी असतानाही यहोवाच्या अगाध कृपेमुळे आपल्याला अनेक फायदे होतात. याची कदर म्हणून, आपण इतरांनाही देवाच्या प्रेमाबद्दल आणि त्यातून त्यांना कसा फायदा होऊ शकतो याबद्दल शिकवलं पाहिजे. तर मग देवाच्या अगाध कृपेबद्दल कदर बाळगण्यास आपण इतरांना कशा प्रकारे मदत करू शकतो?

खंडणी बलिदानाविषयीची सुवार्ता घोषित करा

६, ७. खंडणी बलिदानाबद्दल इतरांना सांगत असताना आपण देवाच्या कृपेची सुवार्ता घोषित करत असतो, असं का म्हणता येईल?

आजच्या जगात अनेक लोक पाप करत असले, तरी पापी असल्याची त्यांना जाणीव होत नाही. त्यामुळे मानवांना खंडणीची गरज का आहे, हे ते समजू शकत नाहीत. पण, त्याच वेळी बऱ्याच लोकांना हे जाणवतं की ते ज्या प्रकारचं जीवन जगत आहेत त्यातून खरा आनंद मिळवणं शक्य नाही. तसंच, कितीतरी लोकांना पाप काय आहे, त्याचा आपल्यावर कसा परिणाम होतो आणि पापाच्या दास्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे हे माहीत नाही. पण, यहोवाच्या साक्षीदारांसोबत बोलल्यानंतर त्यांना या प्रश्नांची उत्तरं मिळतात. आणि तेव्हा पाप आणि मृत्यूच्या दास्यातून आपली सुटका करण्यासाठी यहोवाने आपल्या पुत्राला पृथ्वीवर पाठवलं, या गोष्टीची नम्र अंतःकरणाचे लोक कदर करू लागतात. त्यांना हेदेखील समजतं की आपल्यावर असलेल्या महान प्रेमामुळे आणि अगाध कृपेमुळेच यहोवाने ही तरतूद केली आहे.—१ योहा. ४:९, १०.

यहोवाच्या प्रिय पुत्राबद्दल पौलाने असं लिहिलं: “त्याच्या [देवाच्या] कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे.” (इफिस. १:७) ख्रिस्ताचं खंडणी बलिदान हा देवाच्या प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा आहे. आणि त्याची आपल्यावर किती अगाध कृपा आहे हेदेखील त्यावरून दिसून येतं. आपण जर येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवला, तर आपल्याला पापांची क्षमा मिळेल आणि आपला विवेकही शुद्ध राहील. हे जाणून आपल्याला किती दिलासा मिळतो! (इब्री ९:१४) ही खरोखरच एक सुवार्ता आहे आणि आपण इतरांनाही ती सांगितली पाहिजे, असं तुम्हाला वाटत नाही का?

इतरांना देवाचे मित्र बनण्यास मदत करा

८. पापी मनुष्यांनी देवासोबत समेट करणं गरजेचं का आहे?

देवासोबत मैत्री करणं शक्य आहे हे इतरांना सांगण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. कारण लोकांचा जर येशूच्या बलिदानावर विश्वास नसला, तर ते देवाच्या नजरेत त्याचे शत्रू ठरतात. त्यामुळे प्रेषित योहानाने लिहिलं: “जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.” (योहा. ३:३६) ख्रिस्ताच्या बलिदानामुळे आपल्याला देवाचे मित्र बनणं शक्य आहे, हे जाणून आपल्याला खरोखरच आनंद होत नाही का? याबद्दल पौलाने असं म्हटलं: “जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनाने वैरी झाला होता, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे.”—कलस्सै. १:२१, २२.

९, १०. (क) ख्रिस्ताने आपल्या अभिषिक्त बांधवांना कोणती जबाबदारी दिली आहे? (ख) ‘दुसऱ्या मेंढरांतील’ सदस्य अभिषिक्तांना कशा प्रकारे मदत करत आहेत?

ख्रिस्ताने पृथ्वीवरील त्याच्या अभिषिक्त बांधवांवर “समेटाची सेवा” सोपवली आहे. पौलाने त्यांना सांगितलं: “ही सगळी देवाची करणी आहे; त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली; म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता, देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता, आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले. म्हणून देव आम्हाकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो; देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो.”—२ करिंथ. ५:१८-२०.

१० अभिषिक्तांना या सेवेत सहकार्य करणं ‘दुसऱ्या मेंढरांतील’ सदस्यांकरता एक बहुमान आहे. (योहा. १०:१६) खरं पाहिलं तर ख्रिस्ताचे ‘राजदूत’ किंवा संदेश सांगणारे या नात्याने ‘दुसऱ्या मेंढरांतील’ सदस्यांचा प्रचारकार्यात सर्वात मोठा वाटा आहे. ते लोकांना सत्य शिकवत आहेत आणि यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्यासाठी मदत करत आहेत. देवाच्या अगाध कृपेची सुवार्ता सांगण्याचा हा महत्त्वपूर्ण भाग आहे.

यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो हे इतरांना शिकवा

११, १२. ‘आपल्याला यहोवाकडे प्रार्थना करणं शक्य आहे’ ही एक सुवार्ता आहे, असं का म्हणता येईल?

११ अनेक लोक प्रार्थना करतात. कारण, असं केल्यामुळे त्यांना एक प्रकारचं समाधान मिळतं. पण, देव खरंच आपल्या प्रार्थना ऐकतो का, अशी शंका त्यांच्या मनात असते. त्यामुळे, यहोवा हा ‘प्रार्थना ऐकणारा’ देव आहे हे त्यांना समजणं खूप गरजेचं आहे. स्तोत्रकर्ता दाविदाने लिहिलं: “तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते. दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे तरी तू आमचे अपराध नाहीसे करशील.”—स्तो. ६५:२, ३.

१२ येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं: “तुम्ही माझ्या नावाने . . . काही मागाल तर मी ते करेन.” (योहा. १४:१४) याचा अर्थ आपण यहोवाच्या इच्छेप्रमाणे कोणतीही गोष्ट त्याच्याकडे मागू शकतो. योहानाने लिहिलं: “त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.” (१ योहा. ५:१४) प्रार्थना केल्याने फक्त समाधान मिळतं असं नाही, तर त्याद्वारे आपण यहोवाच्या “कृपेच्या राजासनाजवळ” जाऊ शकतो. इतरांना ही गोष्ट समजण्यास मदत करणं ही आपल्यासाठी खरंच किती बहुमानाची गोष्ट आहे! (इब्री ४:१६) प्रार्थना करण्याची योग्य पद्धत काय आहे, कोणाला प्रार्थना करावी आणि कशाविषयी प्रार्थना करावी हे आपण लोकांना शिकवतो. असं करण्याद्वारे आपण खरंतर त्यांना यहोवाचे मित्र बनण्यास आणि संकटांचा सामना करताना यहोवावर निर्भर राहण्यास मदत करत असतो.—स्तो. ४:१; १४५:१८.

नवीन जगात यहोवा दाखवणार असलेली अगाध कृपा

१३, १४. (क) भविष्यात अभिषिक्तांना कोणता मोठा बहुमान मिळणार आहे? (ख) अभिषिक्त जन मानवांकरता कोणतं कार्य करतील?

१३ यहोवा “येणाऱ्या युगात” आणखी जास्त प्रमाणावर त्याची अगाध कृपा दाखवेल. ती कशी? जे ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करतील त्या १,४४,००० जनांना देव मोठा बहुमान देईल. त्यांचा बहुमान काय असेल याविषयी पौलाने लिहिलं: “देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले, कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याच बरोबर उठवले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवले, यासाठी की, ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुम्हाआम्हावरील ममतेच्या द्वारे येणााऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी.”—इफिस. २:४-७.

१४ अभिषिक्त ख्रिश्चनांसाठी यहोवाने कोणकोणते आशीर्वाद राखून ठेवले आहेत, त्यांबद्दल आताच कल्पना करणं आपल्याला शक्य नाही. (लूक २२:२८-३०; फिलिप्पै. ३:२०, २१; १ योहा. ३:२) अभिषिक्त ख्रिश्चनांना यहोवा एका खास मार्गाने त्याच्या “कृपेची अपार समृद्धी” दाखवेल. ते “नवी यरुशलेम” अर्थात ख्रिस्ताची वधू बनतील. (प्रकटी. ३:१२; १७:१४; २१:२, ९, १०) ते येशूसोबत मिळून ‘राष्ट्रांना बरे’ करण्याच्या कार्यात सहभाग घेतील. ते मानवांना पाप आणि मृत्यूच्या दास्यातून मुक्त होऊन पुन्हा परिपूर्ण होण्यास मदत करतील.—प्रकटीकरण २२:१, २, १७ वाचा.

१५, १६. येणाऱ्या काळात यहोवा ‘दुसऱ्या मेंढरांतील’ सदस्यांवर अगाध कृपा कशी दाखवेल?

१५ इफिसकर २:७ म्हणतं की देव “येणााऱ्यया युगात” त्याची अगाध कृपा दाखवेल. त्या वेळी पृथ्वीवर असलेले सर्व जण देवाच्या “कृपेची अपार समृद्धी” अनुभवतील. (लूक १८:२९, ३०) मृतांचं पुनरुत्थान करण्याद्वारे यहोवा त्याच्या अगाध कृपेचा आणखी एक मोठा पुरावा देईल. (ईयो. १४:१३-१५; योहा. ५:२८, २९) कोणाचं पुनरुत्थान केलं जाईल? ख्रिस्ताच्या आधी ज्या विश्वासू स्त्री-पुरुषांचा मृत्यू झाला त्यांचं आणि शेवटल्या काळात यहोवाला विश्वासू राहिलेल्या ‘दुसऱ्या मेंढरांतील’ सदस्यांचं पुनरुत्थान केलं जाईल. या सर्व विश्वासू लोकांना यहोवाची सेवा करण्यासाठी पुन्हा जिवंत केलं जाईल.

१६ यासोबतच, ज्या लाखो लोकांना देवाला जाणून घेण्याची संधी मिळाली नाही त्यांचंही पुनरुत्थान होईल. त्यांना यहोवाबद्दल शिकण्याची आणि त्याला आपला शासक म्हणून स्वीकारण्याची संधी मिळेल. योहानाने लिहिलं: “मग मृत झालेल्या लहानथोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी पुस्तके उघडली गेली; तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले ते जीवनाचे होते; आणि त्या पुस्तकांमध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरवण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यांस बाहेर सोडले; मृत्यू व अधोलोक यांनी आपल्यातील मृतांस बाहेर सोडले; आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला.” (प्रकटी. २०:१२, १३) ज्यांचं पुनरुत्थान होईल त्यांना बायबलमधील तत्त्वं आणि नवीन पुस्तकांत देण्यात आलेलं मार्गदर्शन शिकून, त्यांचं पालन करावं लागेल. हे नवीन मार्गदर्शनदेखील यहोवाच्या अगाध कृपेचा पुरावा असेल.

सुवार्ता घोषित करत राहा

१७. प्रचार करताना आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१७ अंत खूप जवळ आला आहे. त्यामुळे, राज्याची सुवार्ता घोषित करण्याची गरज पूर्वी कधी नव्हती इतकी आज आहे. (मार्क १३:१०) आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की, प्रचार करण्यामागचा आपला उद्देश यहोवाच्या नावाला गौरव देणे हा असतो. आपण हे कसं करू शकतो? नवीन जगात आपल्याला जे सुंदर आशीर्वाद मिळणार आहेत ते फक्त यहोवाच्या अगाध कृपेमुळेच शक्य आहेत, हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे.

देवाची अगाध कृपा मिळालेल्या “चांगल्या कारभााऱ्यांप्रमाणे” आवेशाने त्याची सेवा करा (परिच्छेद १७-१८ पाहा)

१८, १९. आपण यहोवाच्या अगाध कृपेची महिमा कशी करतो?

१८ प्रचार करताना आपण लोकांना सांगितलं पाहिजे की ख्रिस्ताच्या राज्यात मानवांना त्याच्या खंडणीचे सर्व फायदे अनुभवता येतील आणि हळूहळू संपूर्ण मानवजात परिपूर्ण बनेल. बायबल म्हणतं: “सृष्टीही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने वाट पाहते.” (रोम. ८:२१) हे फक्त यहोवाच्या अगाध कृपेमुळेच शक्य होईल.

१९ प्रकटीकरण २१:४, ५ यात दिलेल्या उल्लेखनीय आशीर्वादांबद्दल इतरांना सांगण्याचा आपल्याला खरोखर एक मोठा बहुमान मिळाला आहे. त्यात म्हटलं आहे: “तो [देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल; यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” यहोवा जो राजासनावर बसलेला आहे तो असं म्हणतो: “पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो.” तो पुढे असंही म्हणतो: “लिही; कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत.” आपण जेव्हा आवेशाने ही सुवार्ता इतरांना सांगत असतो, तेव्हा खरंतर आपण ‘यहोवाच्या अगाध कृपेची’ एक प्रकारे महिमा करत असतो.