व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

राज्य प्रचारकांची नितांत गरज असलेल्या ठिकाणी तुम्ही सेवा करण्यास तयार आहात का?

राज्य प्रचारकांची नितांत गरज असलेल्या ठिकाणी तुम्ही सेवा करण्यास तयार आहात का?

राज्य प्रचारकांची नितांत गरज असलेल्या ठिकाणी तुम्ही सेवा करण्यास तयार आहात का?

“अमेरिकेत आम्ही सुखासुखी जीवन जगत होतो. पण आमच्यावर व आमच्या दोन मुलांवर तिथल्या भौतिकवादी जीवनशैलीचा वाईट परिणाम होण्याची आम्हाला भीती होती. पूर्वी आम्ही दोघं पतीपत्नी मिशनरी म्हणून सेवा करत होतो. त्यामुळे पुन्हा एकदा मिशनऱ्‍यांसारखं साधंसुधं पण आनंदी जीवन जगण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली.”

खूप दिवसांपासून मनात रेंगाळत असलेल्या या इच्छेने प्रवृत्त होऊन, राल्फ व पॅमने सरतेशेवटी, १९९१ साली अनेक शाखा कार्यालयांना, राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याची आपली इच्छा पत्राद्वारे व्यक्‍त केली. मेक्सिकोतील शाखा कार्यालयाने त्यांच्या पत्राचे लगेच उत्तर पाठवले. त्या देशातील इंग्रजी भाषिकांना प्रचार करण्याकरता राज्य प्रचारकांची नितांत गरज असल्याचे शाखा कार्यालयाने त्यांना कळवले. शेते “कापणीसाठी पांढरी” झाली आहेत, असे शाखा कार्यालयाने त्यांना पाठवलेल्या उत्तरात म्हटले. (योहा. ४:३५) राल्फ व पॅमने लगेच आपल्या ८ व १२ वर्षीय मुलांसह हे आमंत्रण स्वीकारले व ते परदेशात स्थलांतर करण्याच्या तयारीला लागले.

प्रचंड मोठे क्षेत्र

बंधू राल्फ सांगतात: “अमेरिका सोडायच्या आधी, काही बंधूभगिनींनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यांचा हेतू चांगलाच होता. ते आम्हाला म्हणू लागले: ‘परक्या देशात जाऊन राहणं जरा जिकरीचंच आहे.’ ‘तुम्ही आजारी पडलात तर?’, ‘इंग्रजी बोलणारे लोक तर इथंही आहेत, मग परक्या देशात जाऊन तिथल्या इंग्रजी भाषिक लोकांना प्रचार करायची काय गरज आहे? तुम्ही इथंही प्रचार करू शकता. शिवाय, तिकडचे इंग्रजी बोलणारे लोक सत्यात आवड घेणार नाहीत.’ परंतु, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो. कारण, आम्ही हा निर्णय काही एका रात्रीत घेतला नव्हता. कित्येक वर्षांपासून आम्ही या गोष्टीवर विचार करत होतो. त्यासाठी आम्ही मुद्दामहून मोठे कर्ज घेण्याच्या भानगडीत पडलो नाही. आम्ही पैशाची बचत करू लागलो आणि आपल्याला कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात, यावर आम्ही कुटुंब मिळून अनेकदा चर्चा केली होती.”

सर्वात आधी बंधू राल्फ आणि त्यांच्या कुटुंबाने मेक्सिको शाखा कार्यालयाला भेट दिली. तिथे बांधवांनी त्यांना संपूर्ण देशाचा नकाशा दाखवला आणि म्हटले: “हे तुमचे क्षेत्र आहे!” मेक्सिको सिटीच्या नैऋत्यास सुमारे २४० किलोमीटर दूर असलेल्या सॅन मिगेल द ऑयन्डे नावाच्या शहरात हे कुटुंब स्थायिक झाले. परदेशातून आलेले बरेच लोक या शहरात स्थायिक झाले होते. बंधू राल्फ व त्यांच्या कुटुंबाला इथे येऊन तीन वर्षे झाल्यानंतर १९ प्रचारकांची एक इंग्रजी भाषिक मंडळी या शहरात तयार झाली. मेक्सिकोतील ही सगळ्यात पहिली इंग्रजी भाषिक मंडळी होती. परंतु अजूनही बरेच काम बाकी होते.

मेक्सिकोत, जवळजवळ दहा लाख अमेरिकन लोक आहेत, असा अंदाज केला जातो. शिवाय, इथे अनेक व्यावसायिक व विद्यार्थी देखील आहेत ज्यांना इंग्रजी भाषा बोलायला येते. बंधू राल्फ म्हणतात: “आम्हाला आणखी कामगार मिळावेत म्हणून आम्ही यहोवाला प्रार्थना केली. आमच्या घरातील एक खोली आम्ही खास अशा बंधूभगिनींसाठी ठेवली होती जे ‘देश हेरण्यासाठी’ म्हणजे, मेक्सिकोविषयी आणखी माहीत करून घेण्यासाठी यायचे.”—गण. १३:२.

सेवेत अधिक भाग घेण्याकरता संसाराचा व्याप कमी केला

सेवेत अधिक भाग घेण्याकरता बंधू राल्फ व त्यांच्या कुटुंबानंतर अनेक बंधूभगिनी येथे राहायला आले. त्यांपैकी अमेरिकेतील एक जोडपे होते, बिल व कॅथी. अधिक गरज असलेल्या विविध ठिकाणी सेवा करण्याचा त्यांना २५ वर्षांचा अनुभव होता. आधी स्पॅनिश भाषा शिकायचा त्यांचा विचार होता, पण चपाला सरोवराच्या किनाऱ्‍यांवर असलेल्या ऑकीकीक शहरात राहायला आल्यानंतर त्यांचा विचार बदलला. ऑकीकीक शहर, अमेरिकेतील निवृत्त झालेल्यांकरता एक नंदनवन आहे. बंधू बिल म्हणतात: “ऑकीकीकमध्ये आम्ही, सत्य शिकू इच्छिणाऱ्‍या इंग्रजी भाषिकांना शोधायचा कसोशीने प्रयत्न करू लागलो.” या शहरात आल्यानंतर दोनच वर्षांत, बिल व कॅथीला एका नवीन मंडळीची स्थापना झाल्याचे पाहून खूप आनंद झाला. ही मेक्सिकोतील दुसरी इंग्रजी भाषिक मंडळी होती.

कॅनडातील केन व जोआन यांनाही आपल्या जीवनातील व्याप कमी करून राज्य कार्यात अधिक वेळ खर्च करण्याची इच्छा होती. त्यामुळे तेही मेक्सिकोत राहायला गेले. बंधू केन सांगतात: “या नवीन ठिकाणी राहण्याची सवय व्हायला आम्हाला जरा वेळ लागला. कारण प्रत्येकच वेळी आम्हाला गरम पाण्याची किंवा वीजेची सोय असायची असे नाही. कित्येक दिवसांपर्यंत टेलिफोन सेवा उपलब्ध नसायची.” पण प्रचार कार्यात भाग घेण्याचा त्यांना आगळाच आनंद मिळायचा. काही दिवसांतच बंधू केन यांना आधी सेवा सेवक आणि दोन वर्षांनंतर वडील म्हणून नियुक्‍त करण्यात आले. सुरुवातीला त्यांची मुलगी ब्रिटनी हिला, तिथल्या लहानशा इंग्रजी भाषिक मंडळीत मित्रमैत्रिणी शोधायला जरा जड गेले. पण जसजशी ती राज्य सभागृह बांधकाम प्रकल्पात मदत करू लागली तसतशी तिची देशभरातील अनेक बंधूभगिनींबरोबर दोस्ती झाली.

अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील पॅट्रीक व रोक्सान या जोडप्याने, त्यांच्यापासून फार दूर नसलेल्या व जिथे इंग्रजी बोलणारे लोक आहेत अशा एका मिशनरी क्षेत्राविषयी ऐकले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. बंधू पॅट्रीक म्हणतात: “ईशान्य मेक्सिकोतील माँटेर्रेई या शहराला भेट दिल्यानंतर, ‘तुम्ही इथं या, मी तुमच्या पाठीशी आहे,’ असं यहोवा जणू काय म्हणत असल्याचं आम्हाला जाणवलं.” पाच दिवसांतच त्यांनी आपले घरदार विकले आणि ते “मासेदोनियात” अर्थात माँटेर्रेईत राहायला गेले. (प्रे. कृत्ये १६:९) कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम करणे भाग होते आणि मेक्सिकोत नोकरी इतक्या सहजासहजी मिळत नाही. पण, दोनच वर्षांत त्यांना, १७ साक्षीदार असलेल्या एका लहानशा समूहाची वाढ होऊन त्याची ४० प्रचारक असलेली एक मंडळी पाहण्याचा आनंद झाला.

सेवेत अधिक भाग घेण्याकरता आपल्या जीवनातील व्याप कमी करणारे आणखी एक जोडपे आहे, जेफ आणि डेब. अमेरिकेत त्यांचा प्रशस्त बंगला होता तो त्यांनी विकला आणि मेक्सिकोच्या पूर्व किनाऱ्‍यावर असलेल्या कानकून शहरात एका लहानशा अपार्टमेंटमध्ये ते राहायला गेले. पूर्वी त्यांना, त्यांच्या घराजवळच व एअरकंडिशन संमेलनगृहांमध्ये संमेलनांना जायची सवय होती. पण आता त्यांना एका खुल्या स्टेडियममध्ये भरवल्या जाणाऱ्‍या सर्वात जवळच्या इंग्रजी संमेलनाला जायला आठ तासांचा प्रवास करावा लागतो. तरीपण, कानकूनमध्ये जवळजवळ ५० प्रचारकांची एक नवीन मंडळी स्थापन झाल्याचे पाहून त्यांना मनापासून समाधान मिळाले.

काही मेक्सिकन बंधूभगिनींनीसुद्धा इंग्रजी भाषिक क्षेत्रात प्रचार कार्यात हातभार लावायला सुरुवात केली. जसे की, बंधू रुबन आणि त्यांच्या कुटुंबाने जेव्हा सॅन मिगेल द ऑयन्डेमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या इंग्रजी मंडळीविषयी आणि संपूर्ण मेक्सिको शहर या मंडळीचे क्षेत्र होते असे ऐकले तेव्हा त्यांनीही लगेच प्रचारकार्यात मदत करण्याचे ठरवले. पण यासाठी त्यांना इंग्रजी शिकावे लागणार होते, एका वेगळ्या संस्कृतीची सवय करून घ्यावी लागणार होती आणि सभांना जाण्याकरता खूप लांबचा प्रवास म्हणजे दर आठवडी जवळजवळ ८०० किलोमीटरचा प्रवास करावा लागणार होता. बंधू रुबन म्हणतात: “मेक्सिकोत आम्हाला अशा परदेशी लोकांना सुवार्ता सांगण्याचा आनंद मिळाला जे अनेक वर्षांपासून तिथं स्थायिक होते परंतु पहिल्यांदाच त्यांना त्यांच्या मातृभाषेत हा संदेश ऐकायची संधी मिळाली होती. काही लोक तर आपली कृतज्ञता व्यक्‍त करताना अक्षरशः रडले.” सॅन मिगेल द ऑयन्डे येथील मंडळीला मदत केल्यानंतर, बंधू रुबन आणि त्यांच्या परिवाराने, मध्य मेक्सिकोतील ग्वानाव्हातो शहरात पायनियर म्हणून सेवा केली. येथे त्यांनी ३० पेक्षा अधिक प्रचारक असलेली इंग्रजी भाषिक मंडळी स्थापन होण्यास हातभार लावला. आज, बंधू रुबन आपल्या परिवारासह ग्वानाव्हातोजवळच असलेल्या ईराप्वातो येथे एका इंग्रजी भाषिक गटात सेवा करत आहेत.

सहजासहजी न भेटणाऱ्‍यांना प्रचार करणे

परदेशी लोकांव्यतिरिक्‍त अनेक मेक्सिकन लोकही इंग्रजी भाषा बोलतात. परंतु त्यांना प्रचार करणे कठीण आहे कारण ते रईस भागात राहतात व दार वाजवल्यावर त्यांच्या घरातील मोलकरणीच दार उघडतात. आणि घरमालकाने दार उघडले तरी, तो कदाचित आपला संदेश ऐकणार नाही कारण त्यांना वाटते, की यहोवाचे साक्षीदार हे अशाच कुठल्यातरी एका छोट्या पंथाचे आहेत. पण याच लोकांना जेव्हा बाहेरच्या देशातून आलेले साक्षीदार सुवार्ता सांगतात तेव्हा काहींनी सुवार्ता ऐकली आहे.

मध्य मेक्सिकोतील केरेतारो शहरात राहणाऱ्‍या ग्लोरियाचे उदाहरण घ्या. ती म्हणते: “पूर्वी माझ्याकडे एकदा स्पॅनिश बोलणारे साक्षीदार आले होते, तेव्हा मी त्यांचं ऐकलं नाही. पण, माझ्या आणि माझ्या मैत्रिणींच्या कुटुंबात समस्या येऊ लागल्या तेव्हा मी खूप निराश झाले आणि मला यातून मार्ग दाखवावा म्हणून देवाला विनंती केली. थोड्याच दिवसांत एक इंग्रजी बोलणारी स्त्री माझ्या घरी आली. घरात इंग्रजी बोलणारं कोणी आहे का, असं तिनं मला विचारलं. ती परदेशी असल्यामुळे मला तिच्याविषयी कुतूहल वाटलं आणि मला इंग्रजी येतं असं मी तिला सांगितलं. ती जेव्हा मला संदेश सांगत होती तेव्हा मी मनातल्या मनात विचार करत होते, ‘ही बिचारी अमेरिकन बाई इथं काय करतेय?’ पण मी तर देवाला मदतीसाठी प्रार्थना केली होती. मग ही स्त्रीच तर माझ्या प्रार्थनेचं उत्तर नसावी, असा विचार माझ्या मनात आला.” ग्लोरियाने बायबल अभ्यास सुरू केला आणि कुटुंबाकडून विरोध होत असतानाही, प्रगती करून तिने लगेच बाप्तिस्मा घेतला. आज ती एक सामान्य पायनियर म्हणून सेवा करत आहे आणि तिचा पती व मुलगाही यहोवाची सेवा करत आहेत.

सेवा वाढवणाऱ्‍यांना मिळालेले प्रतिफळ

राज्य प्रचारकांची नितांत गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणे सोपे नाही परंतु त्यामुळे मिळणारे आशीर्वाद अनेक आहेत. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेले बंधू राल्फ म्हणतात: “आम्ही ब्रिटन, चीन, जमेका, स्वीडन या देशांतून आलेल्या तसेच घानाच्या राजघराण्यातील सदस्यांबरोबर बायबलचा अभ्यास केला. यांपैकी काही बायबल विद्यार्थी आज स्वतः पूर्ण वेळेच्या सेवेत आहेत. गेल्या अनेक वर्षांत, आमच्या कुटुंबाने सात इंग्रजी मंडळ्या स्थापन झाल्याचे पाहिले आहे. आमच्या दोन्ही मुलांनी आमच्याबरोबर पायनियरींग केली आणि आता ते दोघंही अमेरिकेतील बेथेलमध्ये सेवा करत आहेत.”

सध्या मेक्सिकोत इंग्रजी भाषिकांच्या ८८ मंडळ्या व अनेक गट आहेत. ही प्रचंड वाढ कशामुळे शक्य झाली? मेक्सिकोत राहणाऱ्‍या बहुतेक इंग्रजी भाषिकांनी या पूर्वी कधीही संदेश ऐकला नव्हता. इतर जण परदेशात असल्यामुळे, त्यांच्या घरच्यांचा व मित्रमैत्रिणींचा दबाव त्यांच्यावर नव्हता म्हणून सत्य स्वीकारणे त्यांना सोपे झाले. आणखी इतरांनी बायबल अभ्यास स्वीकारला कारण निवृत्त असल्यामुळे त्यांच्याकडे वेळच वेळ होता. शिवाय, इंग्रजी मंडळीतले एकतृतीयांशपेक्षा अधिक प्रचारक पायनियर म्हणून सेवा करत आहेत. या पायनियरांचा आवेश पाहून इतरांनाही पायनियरींग करण्याचे उत्तेजन मिळते. परिणामतः मंडळ्यांमध्ये वाढ होत आहे.

तुम्हालाही आशीर्वाद मिळू शकतील

स्वतःच्या मातृभाषेत राज्य संदेश ऐकायला मिळाल्यास, जगभरातील अनेक लोक तो नक्कीच स्वीकारतील. म्हणूनच यहोवाच्या सेवेत अधिक भाग घेऊ इच्छिणारे अनेक लहान-थोर, तरुण-वृद्ध बंधूभगिनी राज्य प्रचारकांची नितांत गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करायला तयार आहेत हे पाहून आपल्याला किती प्रोत्साहन मिळते! प्रामाणिक मनाचे लोक बायबल सत्य स्वीकारत असल्याचे पाहून त्यांना जो आनंद मिळतो त्या आनंदापुढे त्यांना तोंड द्याव्या लागणाऱ्‍या अडीअडचणी फिक्या पडतात. राज्य प्रचारकांची अधिक गरज असलेल्या तुमच्याच देशातील एखाद्या क्षेत्रात किंवा परदेशात जाऊन सेवा करण्याकरता तुम्ही आपल्या जीवनात काही फेरबदल करू शकता का? * (लूक १४:२८-३०; १ करिंथ. १६:९) तुम्ही असे केल्यास, तुम्हालाही आशीर्वाद मिळतील अशी खात्री तुम्ही बाळगू शकता.

[तळटीप]

^ परि. 21 जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास, आमची राज्य सेवा मार्च २००७, पुरवणी पाहा.

[२१ पानांवरील चौकट]

लक्ष वेधणारे निवृत्त आनंदी लोक

बेरील ब्रिटनहून कॅनडाला राहायला गेली. तिथे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तिने मॅनेजर म्हणून काम केले. अश्‍वारोहणातही तिने नाव कमावले होते आणि १९८० च्या ऑलंपिक्समध्ये कॅनडाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी तिची निवड झाली होती. निवृत्त झाल्यानतंर ती मेक्सिकोतील चपाला येथे राहायला आली. इथे बेरील आणि तिचा पती बहुतेकदा बाहेरच जेवायला जायचे. रेस्टॉरंटमध्ये बसलेले इंग्रजी भाषिक निवृत्त लोक इतके आनंदी कसे दिसतात, हा प्रश्‍न तिच्या मनात नेहमी यायचा. ती त्यांच्याकडे जाऊन स्वतःची ओळख करून द्यायची आणि ते मेक्सिकोत कसे काय, असे त्यांना विचारायची. बहुतेकदा असे व्हायचे, की हे निवृत्त लोक यहोवाचे साक्षीदार असायचे. मग बेरील आणि तिच्या नवऱ्‍याला वाटले, की देवाचे ज्ञान घेतल्यावर आपले जीवन आनंदी व अर्थपूर्ण होणार असेल तर मग आपणही त्याच्याविषयी जाणून घेतले पाहिजे. अनेक महिने ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिल्यानंतर बेरीलने बायबलचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर बऱ्‍याच वर्षांपर्यंत ती सामान्य पायनियर म्हणून सेवा करू शकली.

[२२ पानांवरील चौकट]

“ते आमच्यासाठी एक वरदान आहेत”

स्थानिक बंधूभगिनी, राज्य प्रचारकांची नितांत गरज असलेल्या देशांमध्ये जाऊन सेवा करणाऱ्‍या बांधवांची खूप कदर करतात. कॅरिबियन येथील एका शाखा कार्यालयाने असे लिहिले: “इथं सेवा करणारे शेकडो विदेशी बांधव, इथून निघून गेले तर मंडळ्या डळमळतील. हे बंधूभगिनी खरोखरच आमच्यासाठी एक वरदान आहेत.”

“मंगल वार्ता प्रसिद्ध करणाऱ्‍या स्त्रियांची मोठी सेना” आहे, असे देवाच्या वचनात म्हटले आहे. (स्तो. ६८:११) परदेशात सेवा करणाऱ्‍यांमध्ये अनेक अविवाहित भगिनींचा समावेश आहे. या निःस्वार्थी भगिनी खरोखरच खूप मदत करतात. पूर्व युरोपातील एका शाखा कार्यालयाने अशी टिपणी केली: “आमच्या अनेक मंडळ्यांमध्ये, भगिनींचींच संख्या जास्त आहे; काही वेळा तर, मंडळीतल्या एकूण प्रचारकांपैकी ७० टक्के भगिनीच आहेत. त्यांतील बहुतेकजणी सत्यात नवीनच आहेत. पण इतर देशांतून आलेल्या अविवाहित पायनियर भगिनी अशा नवीन भगिनींना मदत करतात. बाहेरगावहून आलेल्या या भगिनींची आम्ही मनापासून कदर करतो.”

परदेशात सेवा करण्याविषयी या भगिनींचे काय मत आहे? अविवाहित राहून परदेशात अनेक वर्षे सेवा केलेली तिशीतील अँजेलिका नावाची एक भगिनी म्हणते: “परदेशात सेवा करताना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. एका नेमणुकीत मला, दररोज चिखलाच्या रस्त्यावरून जावं लागायचं. तसेच, लोकांची दयनीय स्थिती पाहून मी निराश व्हायचे. पण सेवेत लोकांना मदत केल्याचं मला समाधान मिळायचं. आणि स्थानिक भगिनी, मी त्यांना देत असलेल्या मदतीसाठी माझे आभार मानायच्या तेव्हा मी खूप भारावून जायचे. एका भगिनीनं मला सांगितलं, की पायनियर म्हणून सेवा करण्यासाठी तू इतक्या दूर देशावरून आलीस हे पाहून मलाही पूर्ण वेळेची सेवा करण्याचं प्रोत्साहन मिळालं.”

पन्‍नाशीत नुकतेच पदार्पण केलेली सू नावाची पायनियर भगिनी म्हणते: “तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते हे खरं आहे. पण मिळणाऱ्‍या आशीर्वादांच्या तुलनेत या समस्या काहीच नाहीत. ख्रिस्ती सेवा खरोखरच खूप समाधान देणारी आहे. सेवेमध्ये माझ्याबरोबर बहुतेकदा तरुण भगिनी असल्यामुळे मी त्यांना, बायबलमधून किंवा मग आपल्या प्रकाशनांतून, आपल्यासमोर अडचणी येतात तेव्हा काय करायचं याबद्दल शिकलेल्या गोष्टी सांगते. इतक्या वर्षांपासून अविवाहित पायनियर म्हणून तुम्ही अनेक अडचणी यशस्वीपणे पार केल्या आहेत तर आम्हीही जीवनातील आव्हानांना तोंड देऊ, असं मला त्या अनेकदा म्हणतात. या भगिनींना मदत केल्यानं मला मनापासून समाधान मिळतं.”

[२० पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

मेक्सिको

माँटेर्रेई

ग्वानाव्हातो

ईराप्वातो

ऑकीक

चपाला

चपाला सरोवर

सॅन मिगेल द ऑयन्डे

केरेतारो

मेक्सिको सिटी

कानकून

[२३ पानांवरील चित्र]

पहिल्यांदाच सुवार्ता ऐकणाऱ्‍या विदेश्‍यांना साक्ष देण्याचा आनंद, काही जण उपभोगत आहेत