व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रिटोरियन रक्षकसैन्याला मिळाली साक्ष!

प्रिटोरियन रक्षकसैन्याला मिळाली साक्ष!

वर्ष आहे इ.स. ५९. प्रवासाने शिणलेल्या सैनिकांच्या पहाऱ्‍यात, कैद्यांचा एक गट पॉर्टा कॉपेना नावाच्या द्वारातून रोममध्ये प्रवेश करतो. पॅलटाइन टेकडीवर सम्राट नीरोचा राजवाडा आहे. सैलसर झग्यांखाली (टोगा) तलवारी लपवलेले सम्राटाचे प्रिटोरियन रक्षक राजवाड्याला पहारा देत आहेत. * यूल्य नावाचा शताधिपती कैद्यांना रोमन फोरमच्या (सार्वजनिक सभाचौक) समोरून व्हिमिनल टेकडीवर घेऊन जातो. वाटेत ते रोमन दैवतांच्या अनेक वेद्या असलेल्या एका उद्यानासमोरून, तसेच एका मोठ्या मैदानासमोरून जातात जेथे लष्करी कवायती होत असत.

प्रिटोरियन सैनिकांचे एक उत्थित शिल्प जे कदाचित इ.स. ५१ साली बांधण्यात आलेल्या क्लॉडियसच्या कमानीवरील असावे

त्या कैद्यांमध्ये प्रेषित पौलदेखील आहे. काही महिन्यांआधी तो वादळात सापडलेल्या एका जहाजात असताना देवाच्या एका दूताने त्याला असे सांगितले होते: “तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे.” (प्रे. कृत्ये २७:२४) आता ती वेळ आली आहे का? पौलाने वळून रोमन साम्राज्याच्या या राजधानीवर नजर टाकली, तेव्हा जेरूसलेममध्ये अँटोनियाच्या गढीत असताना प्रभू येशूने त्याला जे सांगितले होते, त्याची त्याला नक्कीच आठवण झाली असावी. येशूने म्हटले होते, “धीर धर; जशी तू यरुशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल.”—प्रे. कृत्ये २३:१०, ११.

कदाचित पौल कॅस्ट्रा प्रिटोरियाचा किल्ला पाहण्यासाठी क्षणभर थांबला असेल. हा भला मोठा किल्ला लाल विटांपासून बनलेल्या उंचच उंच तटबंदीने वेढलेला असून, तटबंदीवर अनेक बुरूज बांधलेले आहेत. किल्ल्यात प्रिटोरियन रक्षकसैन्याचे सदस्य राहतात. हे खास सैनिक सम्राटाचे अंगरक्षक, तसेच शहरातील पोलीस बळ म्हणून काम करतात. प्रिटोरियन रक्षकांच्या १२ तुकड्या * तसेच शहरी पोलीस शिपायांच्या अनेक तुकड्या किल्ल्यात राहतात. घोडदळातील सैनिकांसहित हजारो सैनिकांची राहण्याची व्यवस्था या किल्ल्यात आहे. कॅस्ट्रा प्रिटोरिया, सम्राटाच्या सामर्थ्याची आठवण करून देणारी वास्तू आहे. रोमच्या प्रांतांतील कैद्यांची जबाबदारी प्रिटोरियन रक्षकसैन्यावर असल्यामुळे, यूल्य त्याच्यासोबतच्या कैद्यांना रोममध्ये आणतो. ते शहराच्या चार मुख्य द्वारांपैकी एका द्वारातून रोममध्ये प्रवेश करतात. कित्येक महिन्यांच्या खडतर प्रवासानंतर शेवटी यूल्य या कैद्यांसोबत रोमला येऊन पोचला आहे.—प्रे. कृत्ये २७:१-३, ४३, ४४.

पौल साक्ष देण्याचे थांबवत नाही

रोमला येत असताना अनेक चमत्कारिक घटना घडतात. जहाज वादळात सापडते तेव्हा देव पौलाला दृष्टान्ताद्वारे कळवतो की त्यांचे जहाज फुटेल, परंतु सर्व लोक सुखरूप किनाऱ्‍यावर पोचतील. नंतर, एका विषारी सापाचा दंश होऊनही पौलाला काहीही इजा होत नाही. मिलिता बेटावर तो रोग्यांना बरे करतो, तेव्हा तेथील लोक त्याला देव समजतात. या सर्व घटनांची चर्चा प्रिटोरियन रक्षकसैन्यातील अंधश्रद्धाळू सैनिकांमध्ये नक्कीच झाली असेल.

रोममधील बांधवांशी पौलाची आधीच भेट झाली आहे. “अप्पियाची पेठ व तीन उतारशाळा” येथे ते खास पौलाला भेटायला आले होते. (प्रे. कृत्ये २८:१५) पण कैदेत असलेला पौल, रोममध्ये सुवार्ता घोषित करण्याची त्याची इच्छा कशी काय पूर्ण करू शकणार होता? (रोम. १:१४, १५) काहींच्या मते, कैद्यांना रोमला आणल्यावर त्यांना रक्षकसैन्याच्या सेनापतीकडे सोपवले जायचे. तसे असल्यास, पौलाला कदाचित प्रमुख प्रिटोरियन वरिष्ठाधिकारी आफ्रानियूस ब्यूरोस याच्याकडे नेण्यात आले असेल. सम्राटानंतर कदाचित याच अधिकाऱ्‍याचा रोममध्ये सर्वात जास्त दबदबा असावा. * काहीही असो, आता पौलाला शताधिपतींच्या पहाऱ्‍याखाली राहावे लागणार नव्हते; तर, केवळ एकच प्रिटोरियन रक्षक सैनिक त्याच्यावर पहारा करणार होता. पौलाला स्वतःचे राहण्याचे ठिकाण शोधण्याची परवानगी देण्यात आली. शिवाय, त्याला भेटायला लोक येऊ शकत होते. यामुळे पौलाला त्याच्याकडे येणाऱ्‍यांना “कोणापासून अडथळा न होता” प्रचार करणे शक्य झाले.—प्रे. कृत्ये २८:१६, ३०, ३१.

पौल लहान मोठ्यांस साक्ष देत राहिला

कॅस्ट्रा प्रिटोरियाची तटबंदी आज अशी दिसते

प्रेषित पौलाला सम्राट नीरोपुढे नेण्याआधी ब्यूरोसने त्याच्या न्यायालयीन जबाबदारीचा एक भाग म्हणून, कदाचित राजवाड्यात किंवा प्रिटोरियन छावणीतच पौलाची चौकशी केली असेल. “लहान मोठ्यांस साक्ष” देण्याची ही खास संधी पौलाने वाया घालवली नाही. (प्रे. कृत्ये २६:१९-२३) ब्यूरोसच्या मते पौल दोषी होता किंवा नाही हे तर आपल्याला माहीत नाही, पण एवढे मात्र खरे की प्रिटोरियन छावणीतील तुरुंगात * पौलाची रवानगी करण्यात आली नाही.

पौलाने भाड्याने घेतलेले घर बऱ्‍यापैकी मोठे असावे कारण तेथे तो यहुद्यांच्या मुख्य माणसांना बोलावून त्यांना साक्ष देतो. तसेच, त्याला भेटायला त्याच्या घरी आलेल्या पुष्कळ लोकांनाही तो साक्ष देतो. शिवाय, तो यहुद्यांना “सकाळपासून संध्याकाळपर्यंत” देवाच्या राज्याविषयी व येशूविषयी साक्ष देत असताना त्याच्यावर पहारा करणारे प्रिटोरियन रक्षक सैनिकही त्याचे बोलणे ऐकत असतात.—प्रे. कृत्ये २८:१७, २३.

कैदेत असताना पौलाने निरनिराळ्या मंडळ्यांसाठी पत्रे लिहून घेतली तेव्हा सैनिक ऐकत होते

राजवाड्याला पहारा देणाऱ्‍या प्रिटोरियन रक्षक सैनिकांची तुकडी दररोज आठव्या तासाला बदलायची. त्याच प्रकारे, पौलावर पहारा करणारा सैनिकही दररोज बदलायचा. त्यामुळे त्याने दोन वर्षे कैदेत असताना इफिसकर, फिलिप्पैकर, कलस्सैकर तसेच, इब्री लोकांसाठी जी पत्रे लिहून घेतली त्यांतील मजकूर, त्याच्यावर आळीपाळीने पहारा करणाऱ्‍या अनेक सैनिकांनी ऐकला असेल; तसेच फिलेमोन नावाच्या ख्रिस्ती बांधवास स्वतःहून पत्र लिहितानादेखील त्यांनी पौलाला पाहिले असेल. कैदेत असताना पौलाने, आपल्या मालकाकडून पळून आलेल्या अनेसिम नावाच्या एका गुलामाला मदत केली. पौलाला तो स्वतःच्या मुलासारखा वाटू लागला, पण नंतर त्याने त्याला त्याच्या मालकाकडे परत पाठवले. (फिले. १०) पौल नक्कीच त्याच्यावर पहारा करणाऱ्‍या सैनिकांशीही आपुलकीने वागला असेल. (१ करिंथ. ९:२२) एका पत्रात पौलाने सैनिकाच्या शस्त्रसामग्रीचे सुरेख उदाहरण वापरले आहे. आपण कल्पना करू शकतो, की हे उदाहरण वापरण्याआधी पौलाने कदाचित त्याच्यावर पहारा करणाऱ्‍या एखाद्या सैनिकाला त्याच्या शस्त्रसामग्रीतील प्रत्येक वस्तूचा उद्देश विचारला असावा.—इफिस. ६:१३-१७.

“देवाचे वचन निर्भयपणे” सांगा

पौलाच्या कैदेमुळे प्रिटोरियन रक्षकसैन्यात व इतर सैनिकांतही सुवार्तेच्या “वृद्धीला” हातभार लागला. (फिलिप्पै. १:१२, १३) कॅस्ट्रा प्रिटोरियात राहणाऱ्‍या सैनिकांचे लागेबांधे सबंध रोमन साम्राज्यातील लोकांशी, तसेच सम्राटाशी व त्याच्या मोठ्या घराण्याशीही होते. या घराण्यात सम्राटाचे नातलग, सेवक व गुलामही होते, ज्यांच्यापैकी काही जण ख्रिस्ती बनले. (फिलिप्पै. ४:२२) पौलाने धैर्याने साक्ष दिल्यामुळे रोममधील बांधवांनीही “देवाचे वचन निर्भयपणे सांगावयास अधिक धाडस केले.”—फिलिप्पै. १:१४.

कोणत्याही परिस्थितीत असलो, तरी आपण विविध सेवा पुरवण्यासाठी येणाऱ्‍या लोकांना साक्ष देऊ शकतो

आपण “सुवेळी अवेळी” देवाच्या वचनाची घोषणा करत असताना, पौलाने रोममध्ये केलेले साक्षकार्य आपल्यासाठीही खूप प्रोत्साहनदायक ठरू शकते. (२ तीम. ४:२) आपल्यापैकी काही जणांना या ना त्या कारणाने घराबाहेर पडणे शक्य नसेल. काही नर्सिंग होममध्ये किंवा इस्पितळात असतील किंवा काहींना आपल्या विश्‍वासांमुळे तुरुंगातही टाकण्यात आले असेल. पण कोणत्याही परिस्थितीत असलो, तरी आपण आपल्या संपर्कात येणाऱ्‍या लोकांना, उदाहरणार्थ आपल्याला भेटायला येणाऱ्‍या किंवा विविध सेवा पुरवण्यासाठी येणाऱ्‍या लोकांना साक्ष देऊ शकतो. आपण सर्व प्रसंगी धैर्याने साक्ष देतो तेव्हा आपण स्वतःहून हे अनुभवू शकतो की कोणीही “देवाच्या वचनाला बेडी” घालू शकत नाही.—२ तीम. २:८, ९.

^ “नीरोच्या काळातील प्रिटोरियन रक्षकसैन्य” या शीर्षकाची चौकट पाहावी.

^ रोमी सैन्याच्या एका तुकडीत सुमारे १,००० सैनिक असायचे.

^ “सेक्सटस आफ्रानियूस ब्यूरोस” या शीर्षकाची चौकट पाहा.

^ कॅलिगुला लवकरच सम्राट बनेल असे मत व्यक्‍त केल्याबद्दल, हेरोद अग्रिप्पाला टायबेरियस सीझरने इ.स. ३६/३७ मध्ये येथे कैदेत ठेवले होते. कॅलिगुला यास सम्राटपद मिळाल्यानंतर त्याने हेरोदला यहूदियाचा राजा घोषित केले.—प्रे. कृत्ये १२:१.