व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्वकालचा राजा यहोवा याची उपासना करा

सर्वकालचा राजा यहोवा याची उपासना करा

“सर्वकालचा राजा . . . याला सन्मान व गौरव सदासर्वकाळ असो.”—१ तीम. १:१७, पं.र.भा.

१, २. (क) “सर्वकालचा राजा” कोण आहे, आणि ही पदवी इतकी योग्य का आहे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.) (ख) कोणती गोष्ट आपल्याला यहोवाकडे आकर्षित करते?

स्वाझीलँडचा राजा सोबूझा दुसरा याने जवळजवळ ६१ वर्षे राज्य केले. आजच्या काळात एखाद्या राजाने इतकी वर्षे राज्य करणे उल्लेखनीय आहे. राजा सोबूझाचे राज्य उल्लेखनीय असले, तरी एक असा राजा आहे ज्याचे आयुष्य मानवाच्या आयुष्यासारखे सीमित नाही. बायबल त्या राजाला “सर्वकालचा राजा” म्हणते. (१ तीम. १:१७) या राजाचे नाव स्तोत्रकर्ता आपल्याला सांगतो. तो म्हणतो: “यहोवा सदासर्वकाल राजा आहे.”—स्तो. १०:१६, पं.र.भा.

देवाच्या शासनकाळाची तुलना कोणत्याही मानवी शासनाशी करता येणार नाही. पण, आपण यहोवाकडे आकर्षित होतो ते त्याच्या शासन करण्याच्या पद्धतीमुळे. ४० वर्षे प्राचीन इस्राएल राष्ट्रावर राज्य करणाऱ्या एका राजाने यहोवाची या शब्दांत स्तुती केली: “परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे. परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापले आहे; त्याचे राज्य सर्वांवर आहे.” (स्तो. १०३:८, १९) यहोवा आपला राजाच नव्हे तर तो आपला प्रेमळ स्वर्गीय पितादेखील आहे. पण, कोणत्या अर्थाने यहोवा एका पित्याप्रमाणे वागला आहे? एदेन बागेत झालेल्या बंडाळीनंतर, यहोवा कशा प्रकारे राज्य करत आला आहे? या प्रश्नांच्या उत्तरांमुळे आपण यहोवाच्या आणखी जवळ जाण्यास आणि मनापासून त्याची उपासना करण्यास प्रवृत्त होऊ.

 सर्वकालचा राजा विश्वव्यापी कुटुंब निर्माण करतो

३. यहोवाच्या विश्वव्यापी कुटुंबातील पहिला सदस्य कोण होता, आणि देवाचे पुत्र या नात्याने आणखी कोणाला निर्माण करण्यात आले?

यहोवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला निर्माण केले तेव्हा त्याला किती आनंद झाला असेल! आपल्या अधिकाराखाली असलेली एक कमी दर्जाची व्यक्ती या दृष्टीने यहोवाने आपल्या ज्येष्ठ पुत्राकडे पाहिले नाही. उलट, त्याने एका पित्याप्रमाणे त्याच्यावर प्रेम केले आणि कोट्यवधी परिपूर्ण देवदूतांना निर्माण करण्याच्या आनंदात त्यालाही आपल्यासोबत सहभागी केले. (कलस्सै. १:१५-१७) हे देवदूत आनंदाने यहोवाची “सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस” नेतात. यहोवाने त्यांना देवकुमार म्हणजेच आपले पुत्र असे संबोधण्याद्वारे आदर दिला आहे. हे देवदूत यहोवाच्या विश्वव्यापी कुटुंबाचे सदस्य आहेत.—स्तो. १०३:२०-२२; ईयो. ३८:७.

४. देवाच्या विश्वव्यापी कुटुंबात मानवांचा समावेश कसा झाला?

आकाश आणि पृथ्वी निर्माण केल्यानंतर, यहोवाने त्याचे विश्वव्यापी कुटुंब वाढवण्यास सुरुवात केली. ती कशी? मानवांकरता एक सुंदर घर म्हणून पृथ्वीला निर्माण केल्यानंतर यहोवाने आपल्या प्रतिरूपात पहिला पुरुष, आदाम याला निर्माण केले. (उत्प. १:२६-२८) आदामाने आज्ञाधारक राहावे अशी निर्माणकर्ता या नात्याने यहोवाने अपेक्षा करणे योग्य होते. एका पित्याप्रमाणे, यहोवाने अगदी प्रेमळपणे व दयाळूपणे आपल्या सर्व सूचना कळवल्या. आणि या सूचना मानवांसाठी खूप जास्त बंधनकारक अशा नव्हत्या.—उत्पत्ति २:१५-१७ वाचा.

५. मानवी मुलांनी पृथ्वी व्यापून टाकावी म्हणून देवाने कोणती व्यवस्था केली?

यहोवा मानवी राजांसारखा नाही. तो आपल्या सेवकांना एक कुटुंब या नात्याने लेखतो. या कुटुंबातील सदस्यांवर त्याला इतका भरवसा आहे की तो आनंदाने त्यांना बऱ्याच जबाबदाऱ्या देतो आणि त्या पूर्ण करण्याचा अधिकारही देतो. उदाहरणार्थ, यहोवाने आदामाला सर्व सजीव प्राण्यांवर अधिकार दिला. शिवाय, आपल्या विचारशक्तीचा उपयोग करून प्रत्येक प्राण्याला नाव देण्याचे रोमांचकारी कामदेखील यहोवाने आदामाला दिले. (उत्प. १:२६; २:१९, २०) पृथ्वीवर राहण्यासाठी लाखो परिपूर्ण मानवांना देवाने स्वतः निर्माण केले नाही; तर त्याने आदामाची पत्नी होण्याकरता एका परिपूर्ण स्त्रीला, हव्वेला निर्माण केले. (उत्प. २:२१, २२) त्यानंतर, यहोवाने या जोडप्याला आपल्या संततीने पृथ्वी व्यापून टाकण्याची संधी दिली. आदाम आणि हव्वा परिपूर्ण परिस्थितीत एदेन बागेच्या सीमा हळूहळू वाढवून संपूर्ण पृथ्वीला एक नंदनवन बनवू शकले असते. स्वर्गातील देवदूतांसह एक विश्वव्यापी कुटुंब या नात्याने ते एकत्र मिळून यहोवाची उपासना करू शकले असते. किती अद्भुत भवितव्य! हे अद्भुत भवितव्य आदाम व हव्वेला देऊ करण्याद्वारे यहोवाने एका पित्याप्रमाणे त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केले.

बंडखोर पुत्र देवाचे राज्य नाकारतात

६. (क) देवाच्या विश्वव्यापी कुटुंबात बंडाळी कशा प्रकारे सुरू झाली? (ख) बंडाळी झाल्यानंतरही परिस्थिती यहोवाच्या नियंत्रणात होती हे आपल्याला कसे कळते?

दुःखाची गोष्ट म्हणजे आदाम व हव्वा यहोवाला आपला राजा म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हते. उलट त्यांनी बंडखोर देवदूत, सैतान याचे ऐकले. (उत्प. ३:१-६) पण देवाच्या राज्याला नाकारल्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या संततीवर दुःखे, संकटे आणि मृत्यू आला. (उत्प. ३:१६-१९; रोम. ५:१२) पृथ्वीवर आता देवाचे आज्ञाधारक सेवक उरले नव्हते. याचा अर्थ असा होतो का की पृथ्वीवरील परिस्थितीवर आता यहोवाचे नियंत्रण नव्हते? यहोवाने आपल्या सर्वोच्च अधिकाराचा त्याग केला होता का? मुळीच नाही! यहोवाने पहिला पुरुष आणि स्त्री यांना एदेन बागेतून बाहेर काढून टाकले आणि ते पुन्हा बागेत येऊ नयेत म्हणून बागेच्या दाराजवळ करूब उभे केले. (उत्प. ३:२३, २४) पण, त्याच वेळी त्याने एका पित्याप्रमाणे प्रेमदेखील दाखवले. त्याने अभिवचन दिले की विश्वासू देवदूतांचे आणि मानवी पुत्रांचे एक विश्वव्यापी कुटुंब तयार करण्याचा त्याचा उद्देश तो नक्कीच पूर्ण करेल; तसेच, आदामाच्या संततीपैकी एक जण सैतानाला नाहीसे करेल व आदामाच्या पापामुळे झालेली हानी भरून काढेल.—उत्पत्ति ३:१५ वाचा.

७, ८. (क) नोहाच्या काळापर्यंत परिस्थिती किती वाईट झाली होती? (ख) पृथ्वीवरून दुष्टाई काढून टाकण्यासाठी आणि मानवी कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी यहोवाने कोणती कारवाई केली?

 त्यानंतरच्या शतकांत, काहींनी यहोवाला एकनिष्ठ राहण्याची निवड केली. त्यांपैकी हाबेल व हनोख हे दोघे होते. पण, बहुतेक मानवांनी यहोवाला आपला पिता व राजा या नात्याने नाकारले. नोहाच्या काळापर्यंत तर पृथ्वी “जाचजुलमांनी भरली होती.” (उत्प. ६:११) याचा असा अर्थ होतो का की पृथ्वीवरील घडामोडी आता यहोवाच्या नियंत्रणात नव्हत्या? याविषयी बायबल आपल्याला काय सांगते?

बायबल आपल्याला सांगते की यहोवाने नोहाला एक प्रचंड मोठे तारू बांधण्यास सांगितले ज्यामुळे त्याचा व त्याच्या कुटुंबाचा जीव वाचू शकणार होता. तारू बांधण्याविषयी यहोवाने त्याला सविस्तर माहिती आणि सूचना दिल्या होत्या. शिवाय, देवाने नोहाला “नीतिमत्त्वाचा उपदेशक” म्हणून नेमले तेव्हासुद्धा संपूर्ण मानवी कुटुंबावरील त्याचे गहिरे प्रेम दिसून आले. (२ पेत्र २:५) लोकांनी पश्‍चात्ताप करावा आणि येणाऱ्या नाशातून स्वतःचा बचाव करावा असा संदेश नोहा लोकांना देत होता. पण, कोणीही त्याचे ऐकले नाही. कित्येक दशके नोहा आणि त्याचे कुटुंब दुष्ट आणि अतिशय अनैतिक जगात राहिले. पण एक प्रेमळ पित्याप्रमाणे यहोवाने त्या आठ एकनिष्ठ सेवकांचे संरक्षण केले आणि त्यांना आशीर्वादित केले. पृथ्वीवर एक जलप्रलय आणून यहोवाने बंडखोर मानवांवर आणि दुष्ट दूतांवर त्याचे प्रभुत्व असल्याचे दाखवले. खरेच, परिस्थिती यहोवाच्या नियंत्रणात होती.—उत्प. ७:१७-२४.

यहोवाने त्याच्या राज्य अधिकाराचा केव्हाही त्याग केला नाही (परिच्छेद ६, ८, १०, १२, १७ पाहा)

जलप्रलयानंतर यहोवाचे राज्य शासन

९. जलप्रलयानंतर यहोवाने मानवांना कोणती संधी दिली?

नोहा आणि त्याच्या कुटुंबाने जेव्हा तारवाच्या बाहेर एका स्वच्छ पृथ्वीवर पाऊल टाकले, तेव्हा यहोवाने त्यांचा जो सांभाळ व संरक्षण केले होते त्याबद्दल त्यांना किती कृतज्ञ वाटले असावे! लगेचच, नोहाने यहोवाची उपासना करण्यासाठी एक वेदी बांधली आणि बलिदान अर्पण केले. देवाने नोहा व त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद देऊन म्हटले: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका.” (उत्प. ८:२०–९:१) अशा रीतीने मानवांना एकत्र मिळून यहोवाची उपासना करण्याची आणि पृथ्वी व्यापून टाकण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली होती.

१०. (क) जलप्रलयानंतर लोकांनी यहोवाविरुद्ध बंडाळीची सुरुवात केव्हा व कशी केली? (ख) आपला उद्देश पूर्ण करण्याकरता यहोवाने काय केले?

१० पण जलप्रलयामुळे मानवी अपरिपूर्णता नाहीशी झाली नाही आणि मानवांना अद्यापही सैतानाच्या व त्याच्या दुष्ट दूतांच्या अदृश्य प्रभावाचा सामना करावा लागत होता. काही काळातच लोक पुन्हा देवाच्या प्रेमळ राज्याविरुद्ध बंड करू लागले. त्यांपैकी एक होता नोहाचा पणतू निम्रोद. निम्रोद “[“यहोवाच्या विरोधात,” NW] बलवान पारधी झाला.” त्याने बाबेलसारखी मोठमोठी शहरे बांधली आणि तो “शिनार देशात” राजा म्हणून राज्य करू लागला. (उत्प. १०:८-१२) सर्वकालचा राजा, यहोवा या बंडखोर राजाचे काय करणार होता? निम्रोद देवाच्या उद्देशाच्या विरुद्ध जे काही करत होता त्याला यहोवा कसा प्रतिसाद देणार होता? देवाने लोकांच्या भाषेत गोंधळ निर्माण केला; यामुळे निम्रोदची प्रजा “सर्व पृथ्वीच्या पाठीवर” पांगली. जेथेजेथे ते गेले तेथेतेथे ते खोटी उपासना आणि मानवी राज्यपद्धती आपल्यासोबत घेऊन गेले.—उत्प. ११:१-९.

११. यहोवाने आपला मित्र अब्राहाम याच्याप्रती एकनिष्ठा कशी दाखवली?

११ जलप्रलयानंतर बरेच लोक जरी खोट्या दैवतांची उपासना करायचे तरी काही विश्वासू जन यहोवाचा आदर करत राहिले. त्यांपैकी एक होता अब्राहाम. त्याने आज्ञाधारकपणे ऊर शहरातील त्याचे आरामदायक घर सोडले आणि तो कित्येक वर्षे तंबूंत राहिला. (उत्प. ११:३१; इब्री ११:८, ९) अब्राहाम तंबूंत राहत होता त्या वेळी त्याच्या आजूबाजूचे अनेक राजे तटबंदी शहरांत राहायचे. पण, यहोवानेच अब्राहामाचे आणि त्याच्या कुटुंबाचे रक्षण केले. यहोवाने कशा प्रकारे अब्राहामाचे एका पित्याप्रमाणे संरक्षण केले, याविषयी स्तोत्रकर्त्याने असे म्हटले: “[देवाने] कोणत्याही मनुष्याला त्यांस उपद्रव करू दिला नाही, त्यांच्याकरता त्याने राजांचाही निषेध” केला. (स्तो. १०५:१३, १४)  यहोवा त्याचा मित्र अब्राहाम याच्याप्रती एकनिष्ठ होता म्हणून त्याने त्याला असे अभिवचन दिले: “तुजपासून राजे उत्पन्न होतील.”—उत्प. १७:६; याको. २:२३.

१२. इजिप्तच्या राजाला यहोवाने कसे दाखवले की केवळ तोच सर्वोच्च राजा आहे, आणि त्याच्या निवडलेल्या लोकांवर याचा काय परिणाम झाला?

१२ देवाने अब्राहामाला अभिवचन दिले होते की तो त्याच्या वंशजांतून राजे उत्पन्न करेल. हे वचन त्याने अब्राहामाचा पुत्र इसहाक आणि नातू याकोब यांनादेखील पुन्हा दिले. (उत्प. २६:३-५; ३५:११) पण, राजे उत्पन्न होण्याआधी याकोबाची संतती इजिप्तमध्ये गुलाम बनली. याचा अर्थ यहोवा त्याचे अभिवचन पूर्ण करणार नव्हता का? या पृथ्वीचा सर्वोच्च राजा म्हणून त्याने आपल्या अधिकाराचा त्याग केला होता का? मुळीच नाही! यहोवाने त्याच्या नियुक्त वेळी त्याची शक्ती प्रकट केली आणि केवळ आपणच सर्वश्रेष्ठ आहोत हे हट्टी फारोला दाखवून दिले. गुलामगिरीत असलेल्या इस्राएली लोकांनी यहोवावर विश्वास ठेवला आणि यहोवाने अद्भुत रीत्या त्यांची लाल समुद्रातून सुटका केली. अशा रीतीने यहोवाने दाखवून दिले की तो अद्यापही सर्वोच्च राजा होता. एका प्रेमळ पित्याप्रमाणे त्याने आपल्या शक्तीचा वापर करून आपल्या लोकांचे संरक्षण केले.—निर्गम १४:१३, १४ वाचा.

यहोवा इस्राएल लोकांचा राजा बनला

१३, १४. (क) इस्राएली लोकांनी एका गीतात यहोवाच्या राजपदाबद्दल काय घोषित केले? (ख) देवाने दाविदाला कोणते अभिवचन दिले?

१३ इजिप्तच्या दास्यातून चमत्कारिक रीत्या सुटका झाल्यानंतर लगेच, इस्राएल लोकांनी यहोवाचा जयजयकार व स्तुती करण्याकरता गीत गायले. हे गीत निर्गम अध्याय १५ यात दिले आहे. १८ व्या वचनात असे म्हटले आहे: “परमेश्वर [“यहोवा,” NW] युगानुयुग राज्य करेल.” खरेच, यहोवा या नव्या राष्ट्राचा अदृश्य राजा बनला होता. (अनु. ३३:५) पण, लोक समाधानी नव्हते. इजिप्त सोडून जवळजवळ ४०० वर्षे लोटल्यानंतर, इतर मूर्तिपूजक राष्ट्रांप्रमाणे आपल्यालाही एक मानवी राजा हवा अशी विनंती ते देवाकडे करू लागले. (१ शमु. ८:५) पण, दाविदाच्या राज्यादरम्यान ही गोष्ट अगदी स्पष्ट झाली की यहोवा अद्यापही राजा होता.

१४ दाविदाने पवित्र कराराचा कोश जेरूसलेम नगरात आणला. या आनंदाच्या प्रसंगी लेव्यांनी एक गीत गाऊन यहोवाची स्तुती केली. या गीतात त्यांनी एक महत्त्वाचे विधान केले जे पहिले इतिहास १६:३१ [NW] यात नमूद आहे. त्यात म्हटले आहे: “राष्ट्रांमध्ये घोषित करा की यहोवा राजा बनला आहे.” हे वाक्य वाचल्यानंतर कदाचित एक व्यक्ती विचार करेल की,  ‘यहोवा जर सर्वकालचा राजा आहे, तर मग तो त्या वेळी राजा कसा बनला?’ जेव्हा यहोवा एखाद्या विशिष्ट परिस्थितीत आपल्या अधिकाराचा वापर करतो किंवा आपल्या वतीने कार्य करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला नियुक्त करतो तेव्हा यहोवा राजा बनला आहे असे म्हणता येते. ही गोष्ट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. दावीद मरण पावण्याआधी यहोवाने त्याला त्याचे राज्य शासन सदासर्वकाळ सुरू राहील असे वचन दिले. त्याने म्हटले: “[मी] तुझ्या पोटच्या वंशजास तुझ्यामागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करेन.” (२ शमु. ७:१२, १३) एक हजारपेक्षा जास्त वर्षांनंतर दाविदाचा एक वंशज किंवा पुत्र प्रकट झाला त्या वेळी हे अभिवचन पूर्ण झाले. तो कोण होता, आणि तो राजा केव्हा बनला?

यहोवा एका नव्या राजाला नेमतो

१५, १६. भावी राजा म्हणून येशूला केव्हा अभिषिक्त करण्यात आले, आणि पृथ्वीवर असताना त्याच्या राज्यासाठी त्याने कोणती तयारी केली?

१५ इ.स. २९ साली बाप्तिस्मा देणारा योहान “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे,” असा प्रचार करू लागला. (मत्त. ३:२) योहानाने जेव्हा येशूला बाप्तिस्मा दिला तेव्हा यहोवाने प्रतिज्ञात मशीहा म्हणून व भविष्यातील देवाच्या राज्याचा राजा म्हणून येशूला नेमले. एका प्रेमळ पित्याचे आपल्या मुलावर प्रेम असते, त्याच प्रकारे यहोवाने येशूबद्दल आपले प्रेम व्यक्त करत म्हटले: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”—मत्त. ३:१७.

१६ येशूच्या सेवाकार्यादरम्यान त्याने आपल्या पित्याचे गौरव केले. (योहा. १७:४) त्याने देवाच्या राज्याचा प्रचार करण्याद्वारे असे केले. (लूक ४:४३) त्याने त्याच्या शिष्यांना देवाचे राज्य यावे अशी प्रार्थना करण्यासही शिकवले. (मत्त. ६:१०) भावी राजा या नात्याने तो त्याच्या विरोधकांना असे म्हणू शकला: “देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.” (लूक १७:२१) त्याचा मृत्यू होण्याआधीच्या संध्याकाळी त्याने त्याच्या शिष्यांसोबत या राज्याचा करार केला. अशा प्रकारे त्याने त्याच्या काही विश्वासू शिष्यांना भविष्यात देवाच्या राज्यात त्याच्यासोबत सहराजे म्हणून सेवा करण्याचा बहुमान देऊ केला.—लूक २२:२८-३० वाचा.

१७. कोणत्या अर्थी येशूचे राज्य इ.स. ३३ मध्ये सुरू झाले, पण त्याला आणखी कशासाठी थांबावे लागणार होते?

१७ देवाच्या राज्याचा राजा म्हणून येशू त्याचे राज्य केव्हा सुरू करणार होता? तो लगेच असे करू शकणार नव्हता. दुसऱ्याच दिवशी दुपारी, येशूला जिवे मारण्यात आले आणि त्याच्या शिष्यांची पांगापांग झाली. (योहा. १६:३२) पण, प्राचीन काळात परिस्थिती जशी यहोवाच्या नियंत्रणात होती तशी आताही होती. तिसऱ्या दिवशी त्याने त्याच्या पुत्राचे पुनरुत्थान केले आणि इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी येशू, अभिषिक्त बांधवांनी बनलेल्या ख्रिस्ती मंडळीवर आध्यात्मिक अर्थाने राज्य करू लागला. (कलस्सै. १:१३) तरी येशूला, जो दाविदाचा प्रतिज्ञात पुत्र होता, पृथ्वीवर पूर्णपणे राज्य करण्यास आणखी थांबावे लागणार होते. म्हणून यहोवाने त्याच्या पुत्राला म्हटले: “मी तुझे वैरी तुझे पदासन करेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.”—स्तो. ११०:१.

सर्वकालच्या राजाची उपासना करा

१८, १९. कोणती गोष्ट करण्यास आपण प्रवृत्त झालो आहोत, आणि पुढच्या लेखात आपण कशाविषयी शिकणार आहोत?

१८ हजारो वर्षांपासून देवदूतांनी आणि मानवांनी देवाच्या राज्याविरुद्ध बंड केले आहे. पण परिस्थिती नेहमी यहोवाच्या नियंत्रणात होती आणि त्याने या पृथ्वीवर सर्वोच्च राजा या नात्याने राज्य करण्याचा आपला अधिकार केव्हाही त्यागला नाही. एका प्रेमळ पित्याप्रमाणे त्याने नोहा, अब्राहाम आणि दावीद यांसारख्या एकनिष्ठ सेवकांचे संरक्षण केले व त्यांची काळजी घेतली. तर मग, ही गोष्ट आपल्याला आपल्या राजाच्या अधीन राहण्यासाठी व त्याच्या आणखी जवळ जाण्यासाठी प्रवृत्त करत नाही का?

१९ पण आपल्या मनात कदाचित असे प्रश्न उद्भवू शकतात: आपल्या दिवसांत यहोवा राजा कसा बनला आहे? आपण यहोवाच्या राज्याची एकनिष्ठ प्रजा आहोत हे आपण कसे दाखवू शकतो आणि त्याच्या विश्वव्यापी कुटुंबातील परिपूर्ण पुत्र कसे बनू शकतो? देवाचे राज्य यावे अशी आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा त्याचा काय अर्थ होतो? या प्रश्नांची उत्तरे पुढच्या लेखात मिळतील.