व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगाचा अज्ञात शासक कोण ते उघड झाले आहे

जगाचा अज्ञात शासक कोण ते उघड झाले आहे

जगाचा अज्ञात शासक कोण ते उघड झाले आहे

एके प्रसंगी येशूने लोकांना सांगितले: “ह्‍या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल.” नंतर तो म्हणाला, ‘जगाच्या अधिकाऱ्‍याची माझ्यावर काही सत्ता नाही’ आणि या “जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे.” (योहान १२:३१; १४:३०; १६:११) येशू याठिकाणी कोणाविषयी बोलत होता?

‘या जगाच्या अधिकाऱ्‍याबद्दल,’ येशूने जे काही म्हटले त्यावर विचार केल्यावर कळते की तो नक्कीच त्याच्या पित्याबद्दल म्हणजे यहोवाबद्दल बोलत नसावा. तर मग, “ह्‍या जगाचा अधिकारी” कोण आहे? तो कसा “बाहेर टाकला” जाईल आणि त्याचा “न्याय” कसा करण्यात आला आहे?

“ह्‍या जगाचा अधिकारी” स्वतःला उघड करतो

एक सराईत गुन्हेगार जशी स्वतःच्या शक्‍तीची अभिमानाने फुशारकी मारतो तसेच देवाच्या पुत्रावर म्हणजेच येशूवर प्रलोभन आणण्याद्वारे सैतानानेही तेच केले. येशूला “जगातील सर्व राज्ये” दाखवून सैतानाने त्याला म्हटले: “ह्‍यांवरचा सर्व अधिकार व ह्‍यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल.”—लूक ४:५-७.

आता काही लोक म्हणतात त्याप्रमाणे सैतान फक्‍त जर एक दुर्गुण आहे तर येशूसमोर आलेल्या प्रलोभनांचे स्पष्टीकरण आपण कसे देऊ शकतो? येशूच्या बाप्तिस्म्यानंतर त्याच्यातीलच आंतरीक इच्छा त्याला प्रलोभित करत होती का? असे असेल तर मग, “त्याच्या ठायी पाप नाही” असे म्हणता येईल का? (१ योहान ३:५) मानवजातीवर सैतानाचे वर्चस्व आहे ही गोष्ट येशूने कधीच नाकारली नाही; उलट, त्याला “जगाचा अधिकारी,” असे संबोधून तो “खुनी” आणि “लबाड” आहे असे त्याने त्याचे वर्णन केले.—योहान १४:३०; ८:४४; मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर.

सैतानाने येशूवर ही प्रलोभने आणली त्याच्या जवळजवळ ६० वर्षांनंतर, प्रेषित योहानाने ख्रिश्‍चनांना सैतानाच्या शक्‍तिशाली प्रभावाची जाणीव करून देत म्हटले: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” तो पुढे असेही म्हणाला की तो “सर्व जगाला ठकविणारा” आहे. (१ योहान ५:१९; प्रकटीकरण १२:९) यावरून स्पष्ट होते की बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेला “जगाचा अधिकारी” एक अदृश्‍य आत्मिक व्यक्‍ती आहे. पण, तिचा मानवजातीवर कितपत प्रभाव आहे?

जगाचा शासक त्याच्या दुरात्म्यांना शक्‍ती देतो

विश्‍वासासाठी लढणाऱ्‍या ख्रिश्‍चनांबद्दल लिहिताना प्रेषित पौलाने स्पष्टपणे त्यांच्या सर्वात दुष्ट शत्रुंची ओळख करून दिली. तो म्हणाला: “आपले झगडणे रक्‍तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्‍यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” (इफिसकर ६:१२) खरे पाहता, हे झगडणे “रक्‍तमांसाबरोबर” नाही अर्थात मानवांबरोबर नाही तर “दुरात्म्यांबरोबर” आहे.

या वचनात उल्लेख करण्यात आलेले ‘दुरात्मे’ हा शब्दप्रयोग निव्वळ एका दुर्गुणाला नव्हे तर शक्‍तिशाली आत्मिक व्यक्‍तींना सूचित करतो. यावरून स्पष्ट होते की, सैतान त्याच्या शक्‍तीचा उपयोग ज्यांनी स्वर्गातील “आपले वसतिस्थान सोडले” आहे अशा बंडखोर दूतांकरवी करत आहे.—यहूदा ६.

बायबलमधील दानीएल नावाचे भविष्यवाणींचे पुस्तक, हे ‘जगाचे अधिपती’ प्राचीनकाळापासून जगावर कसे वर्चस्व गाजवत आहेत यावर प्रकाश टाकते. इ.स.पू. ५३७ साली बॅबिलोनच्या बंदिवासातून जेरुसलेमला परतणाऱ्‍या यहुद्यांची काळजी असल्यामुळे संदेष्टा दानीएलाने तीन आठवडे त्यांच्यासाठी प्रार्थना केली. दानीएलाला प्रोत्साहन देण्याकरता देवाने एका देवदूताला पाठवले पण त्याला येण्यास उशीर का झाला ते या देवदूताने सांगितले. तो म्हणाला: “पारसाच्या राज्याचा अधिपति एकवीस दिवस मला आडवा आला.”—दानीएल १०:२, १३.

हा ‘पारसाचा अधिपती’ कोण होता? तो देवदूत नक्कीच पारसचा राजा कोरेश याच्याविषयी बोलत नव्हता कारण कोरेश राजाची दानीएल आणि त्याच्या लोकांवर मर्जी होती. शिवाय, एक देवदूत जर एका रात्रीत १,८५,००० शक्‍तिशाली योद्ध्‌यांना ठार मारू शकत होता तर एक साधासुधा मानवी राजा तीन आठवड्यांपर्यंत एका देवदूताला कसे अडवू शकतो? (यशया ३७:३६) म्हणून विरोध करणारा ‘पारसाचा अधिपती’ हा सैतानाचा हस्तक असावा म्हणजेच, तो एक दुरात्मा असावा ज्याला पर्शियन साम्राज्यावर ताबा ठेवण्याचा अधिकार दिला होता. दानीएलाच्या उताऱ्‍यात पुढे असा उल्लेख करण्यात आला आहे की या देवदूताला पुन्हा एकदा, “पारसाच्या अधिपतीबरोबर” आणि आणखी एका दुरात्मिक अधिपतीबरोबर अर्थात, ‘ग्रीसच्या अधिपतिबरोबर’ लढावे लागणार होते.—दानीएल १०:२०.

यातून आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो? हाच की, या ‘जगाचे अदृश्‍य अधिपतीदेखील,’ म्हणजेच दुरात्मिक अधिपतीदेखील आहेत जे त्यांच्या म्होरक्याच्या अर्थात सैतानाच्या अधिकारात राहून जगावर ताबा ठेवून आहेत. पण, जगावर आतापर्यंत ताबा ठेवण्याचा त्यांचा हेतू काय आहे?

जगाचा शासक त्याचे खरे रूप दाखवतो

बायबलमधील प्रकटीकरण नावाच्या शेवटल्या पुस्तकात, प्रेषित योहान येशूचा उल्लेख आद्यदेवदूत मीखाएल असा करतो. मीखाएल सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना पराभूत करतो आणि त्यांना स्वर्गातून पृथ्वीवर खाली फेकून दिल्याने कोणते भयंकर परिणाम होतात त्याबद्दल सांगतो. याबद्दल बायबल असे म्हणते: ‘पृथ्वीवर अनर्थ ओढवला आहे कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.’—प्रकटीकरण १२:९, १२.

सैतान त्याचा संताप कसा व्यक्‍त करत आहे? जीवावर उदार झालेल्या अनेक गुन्हेगारांचे धोरण असते, ‘राज्य करा किंवा मरा,’ तसेच सैतानाने व त्याच्या दुरात्म्यांनी, असा निश्‍चय केला आहे की पृथ्वी आणि त्यातील मानवजातीलाही ते आपल्याबरोबर घेऊन मरतील. सैतानाच्या हातात वेळ खूप कमी आहे हे त्याला माहीत आहे म्हणून तो त्याच्या ताब्यात असलेल्या मानवी समाजाच्या एका प्रमुख घटकाचा अर्थात मोठ्या व्यापाराचा उपयोग करत आहे. अधिकाधिक वस्तू विकत घेण्याचे लोकांना वेड लावून तो आपला हेतू साध्य करत आहे. यामुळे संपूर्ण जगभरात, नैसर्गिक संपत्ती कमी होऊन नष्ट होऊ लागली आहे व यामुळे मानवाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.—प्रकटीकरण ११:१८; १८:११-१७.

मानव इतिहासाच्या सुरुवातीपासून, सैतान शक्‍तीसाठी किती हपापलेला आहे ते त्याने राजकारण आणि धर्म यातून दाखवून दिले आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात राजकीय सत्ता यांची तुलना जंगली श्‍वापदांशी केली आहे ज्यांना सैतानाने “मोठा अधिकार दिला” आहे. त्यामध्ये राजकारण आणि धर्म यांच्यात असलेल्या लज्जास्पद संबंधांचेदेखील वर्णन करण्यात आले आहे. या संबंधांना घृणास्पद आध्यात्मिक व्यभिचार असे म्हटले आहे. (प्रकटीकरण १३:२; १७:१, २) विचार करा, अनेक शतकांपासून होत असलेला जुलूम, गुलामगिरी, युद्धे, जातीय वाद यांमुळे लाखो लोकांचे प्राण गेले आहेत. मानवी इतिहासाची पाने ज्या धक्कादायक व भयंकर घटनांमुळे रक्‍ताने माखली आहेत त्या घटनांना, मानवांची दैनंदिन कार्ये म्हणता येईल की या घटना घडवण्यामागे, दुष्ट अदृश्‍य आत्मिक शक्‍तींचा हात होता असे म्हणता येईल?

मानवी नेत्यांना आणि जगिक शक्‍तींना आपल्या बोटांवर नाचवणारा कोण आहे याची ओळख बायबलमध्ये अगदी अचूकपणे करून देण्यात आली आहे. कळत नकळत मानव समाज त्यांच्या शासकाची मनोवृत्ती आणि ‘राज्य करा किंवा मरा’ हे त्याचे धोरण आपल्या कार्यातून दाखवून देतो. पण, लोक किती काळ सैतानाच्या शासनाचा त्रास सोसणार आहेत?

सैतान शेवटला श्‍वास घेतो

पहिल्या शतकात येशूने त्याच्या कार्यांतून दाखवून दिले की लवकरच सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांचा अंत केला जाईल. भूतग्रस्त लोकांना आपण कसे बरे केले हे जेव्हा येशूच्या शिष्यांनी त्याला सांगितले तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “सैतान आकाशांतून विजेसारखा पडला हे मी पाहिले.” (लूक १०:१८) या शब्दांतून येशू, तो जेव्हा आद्यदेवदूत मीखाएल म्हणून पुन्हा स्वर्गात जाईल तेव्हा जगाच्या अधिपतीवर भविष्यात मिळवणार असलेल्या विजयाबद्दल आनंद व्यक्‍त करत होता. (प्रकटीकरण १२:७-९) बायबलच्या भविष्यवाणींचा सखोल अभ्यास केल्यावर समजते की स्वर्गात १९१४ साली किंवा त्यानंतर लगेचच येशूला हा विजय मिळाला. *

त्या दिवसापासून सैतानाला माहीत आहे की त्याचा खूप कमी वेळ उरला आहे. जरी ‘सगळे जग त्या दुष्टाला वश,’ झाले असले तरी लाखो असे लोक आहेत ज्यांच्यावर सैतान ताबा मिळवण्याचा या नाही तर त्या मार्गांनी प्रयत्न करतो पण तरीसुद्धा ते त्याला बळी पडत नाहीत. कारण बायबलचा अभ्यास केल्यामुळे त्यांना सैतानाची खरी ओळख पटली आहे आणि त्याच्या कुयुक्त्यांबद्दल त्यांचे डोळे उघडले आहेत. (२ करिंथकर २:११) त्यांना पौलाच्या शब्दातून आशा मिळाली आहे: “शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील.” *रोमकर १६:२०.

लवकरच सैतान शेवटला श्‍वास घेईल! ख्रिस्ताच्या प्रेमळ राजवटीत नीतिमान लोक देवाच्या लाक्षणिक पादासनाचे अर्थात पृथ्वीचे रूपांतर नंदनवनात करतील. हिंसा, क्रोध आणि लोभ यापुढे राहणार नाहीत. “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत,” असे बायबल सांगते. (यशया ६५:१७) अज्ञात शासक म्हणजेच सैतान आणि त्याच्या अधिकाराच्या तावडीतून सुटका मिळणाऱ्‍यांसाठी ही किती दिलासा देणारी गोष्ट आहे! (w११-E ०९/०१)

[तळटीपा]

^ परि. 20 या तारखेबद्दल जास्त माहिती हवी असल्यास, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाच्या पृष्ठे २१५ ते २१८ वरील परिशिष्टातील लेख पाहा.

^ परि. 21 पौलाचे हे शब्द सैतानाच्या नाशाबद्दल भाकीत करण्यात आलेल्या उत्पत्ति ३:१५ या पहिल्या भविष्यवाणीचे पडसाद आहेत. या घटनेचे वर्णन करताना पौलाने वापरलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ, “तुकडे तुकडे करणे, चक्काचूर करणे” असा होतो.—वाईन्स कम्पलीट एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ ओल्ड ॲन्ड न्यू टेस्टमेंट वर्ड्‌स.

[२९ पानांवरील संक्षिप्त आशय]

ख्रिस्ताच्या प्रेमळ राजवटीत नीतिमान लोक देवाच्या लाक्षणिक पादासनाचे अर्थात पृथ्वीचे रूपांतर नंदनवनात करतील