व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्याने देवाकडून सांत्वन मिळवले

त्याने देवाकडून सांत्वन मिळवले

त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा

त्याने देवाकडून सांत्वन मिळवले

आकाश काळवंडले होते आणि मुसळधार पाऊस पडत होता. या पावसात एलीया पळत सुटला होता. त्याला इज्रेलला पोहचायचे होते. हे अंतर कमी नव्हते आणि एलीयासुद्धा तरुण नव्हता. तरीपण तो अथकपणे पळत राहिला कारण “परमेश्‍वराचा वरदहस्त” त्याच्यावर होता. त्याच्या शरीरात संचारलेली ही शक्‍ती पूर्वी त्याने कधीही अनुभवली नव्हती. तो इतका बेफाम धावत होता, की राजा अहाबाचा रथ ओढणाऱ्‍या घोड्यांनाही त्याने मागे टाकले!—१ राजे १८:४६.

राजा अहाब खूप मागे राहिला होता. आणि या मोकळ्या रस्त्यावर एलीया एकटाच होता. पाऊस अगदी जोराने कोसळत होता; त्याच्या डोळ्यांवर पावसाचे थेंब पडत असताना त्याच्या मनात कोणते विचार चालले असतील याची कल्पना करा. त्याच्या जीवनातील सर्वात आनंदाच्या दिवसाची कदाचित त्याला आठवण झाली असावी. त्या दिवशी, यहोवा देवाचा आणि खऱ्‍या उपासनेचा विजय झाला होता! मुसळधार पावसामुळे कर्मेल पर्वत दिसेनासा झाला होता. याच कर्मेल पर्वतावर यहोवाने, बआल उपासनेतील थोतांड चमत्कारिकपणे उघड करण्यासाठी एलीयाचा उपयोग केला होता. शेकडो बआल संदेष्ट्यांना दुष्ट व लबाड ठरवून त्यांची कत्तल करण्यात आली होती. त्यानंतर त्या देशावर साडेतीन वर्षांपासून पडलेली कोरड थांबवण्यास त्याने यहोवाला प्रार्थना केली. आणि त्यानंतर पाऊस पडला. *१ राजे १८:१८-४५.

इज्रेलपर्यंतचे ते ३० किलोमीटरचे अंतर पळत असताना एलीयाला वाटले असावे, की बआल संदेष्ट्यांचा नाश झाला आहे तर परिस्थिती बदलेल. अहाब राजा बदलेल! कर्मेल पर्वतावर अहाब राजाने जे काही आपल्या डोळ्यांनी पाहिले त्यानंतर त्याला बआलाची उपासना सोडून द्यावीच लागेल आणि आपली पत्नी राणी ईजबेल हिला आवर घालून यहोवाच्या सेवकांचा छळ थांबवावाच लागेल!

आपल्या मनासारख्या गोष्टी जेव्हा घडू लागतात तेव्हा साहजिकच आपली आशादेखील वाढू लागते. आपल्या सर्वात क्लेशदायक समस्यांनी शेवटी एकदाचा आपला पिच्छा सोडला आहे आणि आता आपली परिस्थिती सुधारत जाईल, अशी आपण कल्पना करायला लागतो. एलीयाच्या मनात हे सर्व विचार आले असतील तर त्यात नवल काही नाही कारण तोही “आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता.” (याकोब ५:१७) पण एलीयाच्या समस्या मुळीच सुटल्या नव्हत्या. खरे पाहता, काही तासातच तो इतका भयभीत होणार होता, इतका निराश होणार होता, की तो आपण मरून जावे अशी इच्छा करू लागणार होता. का बरे? यहोवाने आपल्या या संदेष्ट्याला पुन्हा एकदा नव्याने त्याचा विश्‍वास व त्याचे धैर्य मिळवण्यास कशी मदत केली? पाहू यात.

घटनांना अनपेक्षित वळण लागते

अहाब राजा जेव्हा इज्रेलात त्याच्या महालात पोहचतो तेव्हा त्याच्यात काही बदल झाल्याचे, तो आध्यात्मिक मनोवृत्तीचा बनल्याचे दाखवतो का? त्याच्याविषयी आपण असे वाचतो: “एलीयाने काय काय केले, तसेच त्याने सर्व संदेष्टे तरवारीने कसे वधिले हे सगळे अहाबाने ईजबेलीस कळविले.” (१ राजे १९:१) अहाबाने ईजबेलीला दिवसभरात झालेल्या घटनांबद्दल सांगितले खरे परंतु त्यात त्याने एलीयाचा देव यहोवा याच्याबद्दलचा काही उल्लेख केला नाही, हे तुम्ही पाहिले का? “एलीयाने काय काय केले,” असे सांगून अहाबाने त्या दिवशी झालेल्या चमत्कारिक घटनांकडे मानवी दृष्टिकोनातून पाहिले. यावरून स्पष्ट होते, की तो यहोवा देवाचा आदर करण्यास शिकला नव्हता. आणि मनात सुडाची भावना बाळगणारी त्याची बायको ईजबेल हिने जेव्हा अहाबाच्या गोष्टी ऐकल्या तेव्हा तिने कशी प्रतिक्रिया व्यक्‍त केली?

ती रागाने लालबुंद झाली! तिने एलीयाला हा संदेश पाठवला: “संदेष्ट्यांच्या जिवाच्या गतीसारखी तुझ्या जिवाची गति उद्या याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच व त्याहूनहि अधिक करोत.” (१ राजे १९:२) ही अगदी भयंकर धमकी होती! दुसऱ्‍या शब्दांत ईजबेल अशी शपथ घेत होती, की उद्या याच वेळी एलीयाला ठार मारून तिने जर तिच्या बआल संदेष्ट्यांच्या मृत्यूचा सूड घेतला नाही तर ती तिचा प्राण देईल. राणीच्या जासुदाने एलीयाला हा संदेश दिला तेव्हा तो इज्रेलमधील एका साध्याशा आश्रयाच्या ठिकाणी झोपला होता. तुम्ही कल्पना करू शकता, की या जासुदाने त्याला झोपेतून उठवून राणीचा हा संदेश सांगितला तेव्हा त्याची काय अवस्था झाली असेल. काय परिणाम झाला त्याच्यावर?

तो निराश व अत्यंत भयभीत होतो

बआल उपासनेविरुद्धची लढाई एकदाची संपली असे एलीयाला जर वाटले असेल तर आता जासुदाचा हा संदेश ऐकून त्याला जाणवले असावे, की तो जसा विचार करत होता तसे काहीही झालेले नव्हते. ईजबेलीने त्याला ठार मारण्याचा जणू विडाच उचलला होता. एलीयाबरोबर असलेल्या इतर अनेक विश्‍वासू संदेष्ट्यांना तिने ठार मारले होते आणि आता असे दिसते की एलीयाची पाळी होती. जासुदाचा संदेश ऐकल्यावर तो भयभीत होतो. ईजबेल त्याला कशी ठार मारेल याचे चित्र त्याच्या डोळ्यांपुढे आले असावे का? कदाचित होय. तो यावरच जास्त विचार करत असल्यामुळे त्याचे धैर्य खचले. आणि म्हणून तो ‘आपला जीव मुठीत घेऊन पळाला.’—१ राजे १८:४; १९:३.

पण केवळ एलीयाचीच अशी भीतीने गाळण उडाली नव्हती. बायबलमध्ये अशा विश्‍वासू पुरुषांबद्दल सांगितले आहे जे त्यांच्यासमोर आलेल्या परिस्थितीत भयभीत झाले होते. त्यांपैकी एक प्रेषित पेत्र होता. एकदा जेव्हा येशूने पेत्राला त्याच्याबरोबर पाण्यावर चालण्याची शक्‍ती दिली तेव्हा पेत्राचे लक्ष ‘वाऱ्‍याकडे’ गेले. त्यामुळे त्याचे धैर्य खचले आणि तो बुडू लागला. (मत्तय १४:३०) पेत्र आणि एलीया या दोघांच्या उदाहरणांवरून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. आपण जर आपले धैर्य टिकवू इच्छितो तर, आपल्याला घाबरवणाऱ्‍या परिस्थितींवर आपण विचार करू नये. त्याऐवजी आपल्याला आशा व शक्‍ती देणाऱ्‍या देवावर आपण आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे.

“आता पुरे झाले”

एलीया इतका भयभीत झाला होता, की तो नैर्ऋत्यास सुमारे १५० किलोमीटर दूर यहुदाच्या दक्षिणेच्या सीमेलगत असलेल्या बैर-शेबा येथे पळून गेला. तेथे त्याने त्याच्या चाकरास थांबायला सांगितले आणि तो पुढे एकटाच रानात निघून गेला. तो “एक दिवसाची मजल चालून” गेला असे अहवालात म्हटले आहे. आपण कल्पना करू शकतो, की सूर्योदय झाल्याबरोबर तो निघाला असेल. त्याने सोबत अन्‍न-पाणी काहीही घेतले नव्हते. रणरणत्या उन्हात कशाची तमा न बाळगता तो फक्‍त चालत राहिला, तो गळून गेला होता. हळूहळू सूर्य खाली आला व अंधार पडू लागला तेव्हा एलीयाची शक्‍तीसुद्धा संपली. त्या ओसाड जमिनीवर त्याला फक्‍त एक रतामाचे झुडूप दिसले आणि त्याखाली तो जाऊन बसला.—१ राजे १९:४.

तेव्हा एलीयाने यहोवाला अगदी व्याकूळ होऊन प्रार्थना केली. त्याला जिवंत राहायची इच्छा उरली नाही. तो म्हणाला: “मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही.” त्याची अवस्था कबरेत असलेल्या त्याच्या पूर्वजांसारखीच झाली होती; ते कोणाचे भले करण्याच्या स्थितीत नव्हते कारण त्यांची माती झाली होती, त्यांची फक्‍त हाडे उरली होती. (उपदेशक ९:१०) एलीयाला त्यांच्यासारखेच निरुपयोगी वाटत होते. जगण्यात काही अर्थ उरला नाही असा विचार करून तो ओरडला: “आता पुरे झाले!”

पण, देवाचा माणूस इतका नाउमेद होऊ शकतो, हे ऐकून आपल्याला धक्का बसला पाहिजे का? गरज नाही. बायबलमध्ये, याकोब, मोशे, योना आणि ईयोब अशा अनेक विश्‍वासू स्त्रीपुरुषांबद्दल सांगितले आहे ज्यांनी निराश झाल्यामुळे जिवंत राहण्यापेक्षा मेलेले बरे अशी इच्छा व्यक्‍त केली.—उत्पत्ति ३७:३५; गणना ११:१३-१५; योना ४:८; ईयोब १४:१३.

आज आपण ‘कठीण दिवसांत’ जगत आहोत. त्यामुळे पुष्कळ लोक, ज्यात देवाच्या विश्‍वासू सेवकांचादेखील समावेश होतो कधीकधी हताश होतात. (२ तीमथ्य ३:१) तुम्ही कधी असे हताश झाला तर एलीयाने जसे केले तसे करा. देवापुढे आपले मन मोकळे करा. कारण यहोवा हा “सांत्वनदाता देव” आहे. (२ करिंथकर १:३) त्याने एलीयाला सांत्वन दिले का?

यहोवाने आपल्या संदेष्ट्याला बळ दिले

आपला प्रिय संदेष्टा रानातील त्या झुडूपाखाली पडून मरण येण्याची विनंती करत आहे हे जेव्हा यहोवाने स्वर्गातून पाहिले असेल, तेव्हा त्याला कसे वाटले असेल असे तुम्हाला वाटते? त्याला नक्कीच वाईट वाटले असेल. कारण एलीयाला गाढ झोप लागली तेव्हा यहोवाने त्याच्या एका देवदूताला एलीयाला मदत करायला पाठवले. या देवदूताने एलीयाला स्पर्श करून हळूच जागे करत म्हटले: “उठ, हे खा.” एलीया उठून बसला आणि देवदूताने त्याच्यासमोर ठेवलेली गरमागरम भाकर त्याने खाल्ली आणि पाणी प्यायला. एलीयाने देवदूताचे आभार मानले का? अहवालात फक्‍त इतके म्हटले आहे, की एलीयाने भाकर खाल्ली, पाणी प्यायला आणि पुन्हा झोपी गेला. एलीया खूप निराश झाला होता म्हणून तो देवदूताबरोबर काही बोलला नसावा का? कदाचित. पण, देवदूताने दुसऱ्‍यांदा, म्हणजे कदाचित पहाटे एलीयाला पुन्हा उठवले आणि त्याला म्हटले: “उठ, हे खा.” आणि नंतर पुढे त्याला म्हणाला: “कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करावयाचा आहे.”—१ राजे १९:५-७.

देवाने त्या देवदूताला पूर्वज्ञान दिल्यामुळे एलीया कुठे चालला होता हे त्याला माहीत होते. हा प्रवास एलीयाला झेपणार नव्हता हेही त्या देवदूताला माहीत होते. आपले हेतू आणि आपल्या मर्यादा, आपल्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे माहीत असलेल्या देवाची आपण सेवा करतो, हा विचार किती दिलासा देणारा आहे, नाही का? (स्तोत्र १०३:१३, १४) एलीयाने खाल्लेल्या भाकरीने त्याला शक्‍ती दिली का?

“त्याने उठून ते अन्‍नपाणी सेवन केले; त्या अन्‍नाच्या बळावर चाळीस दिवस व चाळीस रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहंचला,” असे अहवालात आपण वाचतो. (१ राजे १९:८) एलीयाच्या सहा शतकांआधी हयात असलेल्या मोशेप्रमाणे व एलीयाच्या जवळजवळ दहा शतकांनंतर पृथ्वीवर आलेल्या येशूप्रमाणे एलीयाने ४० दिवस व ४० रात्र अन्‍न सेवन केले नाही. (निर्गम ३४:२८; लूक ४:१, २) देवदूताने त्याला दिलेल्या त्या एका भोजनाने त्याच्या समस्या सुटल्या नसल्या तरीसुद्धा एका चमत्कारिक मार्गाने त्याचे पोषण केले होते. तुम्ही कल्पना करू शकता. दिवसामागून दिवस जात होते, आठवड्यामागून आठवडे जात होते; हा वृद्ध मनुष्य पोटात अन्‍नाचा कण नाही आणि रानात जवळजवळ दीड महिना नुसता भटकत होता.

यहोवा आजही आपल्या सेवकांना सांभाळतो. तो त्यांना चमत्काराने शारीरिक भोजन पुरवत नसला, तरी एका महत्त्वाच्या मार्गाने त्यांचे पोषण करतो. तो आपल्या सेवकांना आध्यात्मिक भोजन देतो. (मत्तय ४:४) देवाचे वचन बायबल आणि बायबलच्या आधारावर काळजीपूर्वक बनवलेली प्रकाशने यांच्यातून मिळणारे आध्यात्मिक अन्‍न आपल्याला आध्यात्मिक अर्थाने जिवंत ठेवते. हे आध्यात्मिक अन्‍न घेतल्यावर आपल्या सर्वच समस्या जात नाहीत तर आपल्याला त्यांचा सामना करण्याची सहनशक्‍ती मिळते. या आध्यात्मिक अन्‍नाविना आपण त्यांचा सामना करू शकलो नसतो. तसेच हे अन्‍न आपल्याला “सार्वकालिक जीवन” मिळवून देते.—योहान १७:३.

एलीया जवळजवळ ३२० किलोमीटर चालत-चालत होरेब डोंगरावर पोहचतो. फार पूर्वी या डोंगरावर यहोवा देव एका देवदूतामार्फत मोशेशी जळत्या झुडूपातून बोलला होता आणि याच ठिकाणी प्राचीन इस्राएल राष्ट्राबरोबर यहोवाने नंतर नियमशास्त्राचा करार केला होता. याच डोंगरावरील एका गुहेत एलीयाने आश्रय घेतला.

यहोवाने आपल्या संदेष्ट्याला सांत्वन व बळ कसे दिले?

होरेब डोंगरावर यहोवाने त्याच्या ‘वचनाद्वारे’ अर्थात एका देवदूताद्वारे एलीयाला अगदी प्रेमळपणे एक साधासा प्रश्‍न विचारला: “एलीया, तू येथे कशासाठी आलास?” प्रश्‍न विचारताच एलीया आपल्या मनातील भावना त्याला सांगू लागला. त्याला जे जे वाटत होते ते ते त्याने बोलून दाखवले. तो म्हणाला: “सेनाधीश देव परमेश्‍वर याजविषयी मी फार ईर्ष्यायुक्‍त झालो आहे; कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडिले, तुझ्या वेद्या मोडून टाकिल्या, तुझे संदेष्टे तरवारीने वधिले; मीच काय तो एकटा उरलो आहे; आणि आता ते माझाहि जीव घेऊ पाहत आहेत.” (१ राजे १९:९, १०) एलीयाने दिलेल्या उत्तरातून आपल्याला, तो इतका उदास का झाला होता त्याची तीन कारणे दिसून येतात.

पहिले कारण, एलीयाला वाटत होते, की त्याने केलेले काम पाण्यात गेले. आपण इतकी वर्षे यहोवाची ‘फार ईर्ष्येने’ सेवा केली, देवाच्या नावाला आणि उपासनेला प्रथम स्थान दिले तरीपण त्याचा काही फायदा झाला नाही. उलट परिस्थिती आणखीनच वाईट झाली होती. लोक अजूनही विश्‍वासहीन व बंडखोर होते आणि खोट्या उपासनेला तर ऊत आला होता. दुसरे कारण, एलीयाला एकटे पडल्यासारखे वाटत होते. “मीच काय तो एकटा उरलो आहे,” असे तो म्हणाला. जणू काय, संपूर्ण इस्राएल राष्ट्रात तोच एकटा यहोवाची सेवा करत होता. तिसरे कारण, एलीया घाबरला होता. त्याच्याबरोबर संदेष्टे म्हणून सेवा करणाऱ्‍या अनेकांची कत्तल करण्यात आली होती आणि आता आपली पाळी आहे याची त्याला पक्की खात्री होती. एलीयाला कदाचित त्याच्या मनातील भावना व्यक्‍त करणे सोपे गेले नसेल तरीपण त्याने कसलाही गर्व किंवा मनात संकोच न बाळगता त्याच्या मनात जे काही होते ते सर्व भडाभडा बोलून दाखवले. देवापुढे आपले मन मोकळे करून त्याने सर्व विश्‍वासू लोकांपुढे एक उत्तम उदाहरण मांडले आहे.—स्तोत्र ६२:८.

एलीयाने जेव्हा त्याच्या मनातील भीती, चिंता व्यक्‍त केल्या तेव्हा यहोवाने कशी प्रतिक्रिया दाखवली? यहोवाने त्या देवदूताकरवी एलीयाला गुहेच्या मुखापाशी उभे राहायला सांगितले. तो जाऊन उभा राहिला, पण पुढे काय होणार आहे हे त्याला माहीत नव्हते. अचानक जोराने वारा वाहू लागला. त्या वाऱ्‍याचा इतका भयानक आवाज होता, की त्याने कानठळ्या बसत होत्या. शिवाय, तो इतका जोरदार होता, की त्यामुळे डोंगर व खडक अक्षरशः दुभंगले! तुम्ही तुमच्या डोळ्यांपुढे असे चित्र उभे करू शकता: सुसाट्याचा वारा वाहतोय आणि एलीया आपला एक हात डोळ्यांसमोर ठेवत आपला जड, केसाळ अंगरखा सांभाळत उभा आहे. शिवाय त्याला आपला तोलदेखील सांभाळावा लागत होता कारण पृथ्वी हेलकावे खात होती; तिथे भूमिकंप होत होता! त्यानंतर मोठा अग्नी प्रगट झाला तेव्हा एलीयाला त्या धगधगत्या ज्वालांच्या उष्णतेपासून गुहेच्या आत पळत जावे लागले.—१ राजे १९:११, १२.

निसर्गाने आत्ताच त्याच्या शक्‍तीचे जे विलक्षण प्रदर्शन केले त्यात यहोवा नव्हता, याची आठवण आपल्याला हा अहवाल करून देतो. एलीयाला माहीत होते, की यहोवा कुठल्यातरी दंतकथेतील निसर्ग दैवतासारखा, जसे की बआल दैवतासारखा नव्हता ज्याला त्याचे उपासक “ढगांवर स्वारी करणारा” किंवा पाऊस पाडणारा असे बोलून त्याची स्तुती करायचे. निसर्गात दिसणारी अमर्याद शक्‍ती ही यहोवाकडून आहे. शिवाय त्याने जे काही बनवले आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने तो महान आहे. आकाशात व नभोमंडळातसुद्धा तो मावणे शक्य नाही! (१ राजे ८:२७) यहोवाच्या शक्‍तीचे हे सर्व प्रदर्शन पाहून एलीयावर काय परिणाम झाला? तो कसा घाबरला होता, हे तुम्हाला आठवते का? पण आता यहोवाच्या अमर्याद शक्‍तीचे प्रदर्शन पाहून त्याला हा भरवसा मिळाला असेल, की अशी अफाट शक्‍ती असलेला यहोवा माझ्या बाजूने असताना, मला अहाब व ईजबेलीला घाबरण्याचे काही कारण नाही!—स्तोत्र ११८:६.

अग्नीनंतर तिथे शांतता पसरली. आणि एलीयाने एक “शांत, मंद वाणी” ऐकली. या वाणीने त्याला आपल्या मनातल्या भावना व्यक्‍त करण्यास पुन्हा एकदा प्रेरित केले. एलीया आता दुसऱ्‍यांदा भडाभडा बोलू लागला. * कदाचित यामुळे त्याला आणखी हलके वाटले असावे. पण त्या ‘शांत, मंद वाणीने’ त्याला नंतर जे सांगितले त्यामुळे खरेतर त्याला आणखी सांत्वन मिळाले. यहोवाने एलीयाला अशी हमी दिली, की तो मुळीच निरुपयोगी नाही. ते कसे? इस्राएलमधील बआल उपासनेविरुद्धच्या लढाईबद्दल यहोवाने त्याचा भविष्यातील उद्देश सांगितला. यावरून स्पष्ट होते, की एलीयाने केलेले काम पाण्यात गेले नव्हते कारण देवाचा उद्देश काही केल्या थांबणार नव्हता. आणि तो उद्देश पूर्ण करण्याकरता यहोवा एलीयाचा उपयोग करून घेणार होता कारण यहोवाने एलीयाला त्या संदर्भात काही विशिष्ट सूचना देऊन त्याला पुन्हा माघारी पाठवले.—१ राजे १९:१२-१७.

पण मग, एलीयाला वाटत असलेल्या एकटेपणाबद्दल काय? त्यासाठी यहोवाने दोन गोष्टी केल्या. पहिली गोष्ट, त्याने एलीयाला तरुण अलीशाला संदेष्टा म्हणून अभिषिक्‍त करण्यास सांगितले. अलीशा एलीयानंतर संदेष्टा म्हणून सेवा करणार होता. तो एलीयाचा सोबती होणार होता व अनेक वर्षांपर्यंत त्याला मदत करणार होता. हा दिलासा किती व्यावहारिक होता! दुसरी गोष्ट, यहोवाने त्याला एक रोमांचक बातमी सांगितली. तो त्याला म्हणाला: “इस्राएलांपैकी सात हजारांनी बआलमूर्तीपुढे गुडघे टेकिले नाहीत व त्यातल्या एकानेहि आपल्या मुखाने त्याचे चुंबन घेतले नाही; त्यांस मी वाचवीन.” (१ राजे १९:१८) आता एलीयाला समजले की तो एकटा नव्हता! बआलची उपासना करण्यास नकार देणारे हजारो विश्‍वासू लोक होते हे ऐकल्यावर त्याला किती हायसे वाटले असावे! आणि या विश्‍वासू लोकांना एलीयाची गरज होती. कारण बहुतेक सर्वच लोक यहोवाविरुद्ध बंड करणारे होते. त्यामुळे यहोवाशी एकनिष्ठ राहण्याबाबतीत व विश्‍वासूपणे त्याची सेवा करण्याबाबतीत त्यांच्यापुढे उदाहरण मांडणारा कोणीतरी त्यांना हवा होता. देवदूताकरवी त्याने ऐकलेल्या आपल्या देवाच्या ‘शांत, मंद वाणीचा’ त्याच्या मनावर किती खोल प्रभाव पडला असावा!

एलीयाप्रमाणे आपणही सृष्टीतून दिसणारी निसर्गाची विलक्षण शक्‍ती पाहून अचंबित होऊ; नव्हे आपण अचंबित झालेच पाहिजे. कारण सृष्टीतून आपल्याला आपल्या निर्माणकर्त्याच्या शक्‍तीचे ज्वलंत उदाहरण दिसते. (रोमकर १:२०) यहोवाला आजही आपल्या विश्‍वासू सेवकांना मदत करण्यासाठी आपल्या अमर्याद शक्‍तीचा उपयोग करायला आनंद वाटतो. (२ इतिहास १६:९) पण यहोवा देव त्याचे वचन बायबल याद्वारे आपल्याबरोबर अधिक सविस्तरपणे बोलतो. (यशया ३०:२१) खरे तर बायबल हे त्या ‘शांत, मंद वाणीसारखे’ आहे जिच्याद्वारे यहोवा आपल्याला आज मार्गदर्शन देतो, आपली सुधारणूक करतो, आपल्या मनाला उभारी देतो आणि त्याच्या प्रेमाची खात्री देतो.

होरेब डोंगरावर यहोवाने दिलेले सांत्वन एलीयाने स्वीकारले का? होय. तो लगेच कामाला लागला! या धाडसी, विश्‍वासू संदेष्ट्याने पुन्हा एकदा खोट्या उपासनेच्या दुष्टपणाविरुद्धची आपली लढाई सुरू केली. आपणही जर, बायबलमध्ये देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या गोष्टी मान्य केल्या अर्थात ‘शास्त्रापासून मिळणारे उत्तेजन’ स्वीकारले तर एलीयाच्या विश्‍वासाचे अनुकरण करू शकू.—रोमकर १५:४. (w११-E ०७/०१)

[तळटीपा]

^ परि. 4 १ जानेवारी २००८ च्या टेहळणी बुरूज अंकातील “त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा” यांतील “तो खऱ्‍या उपासनेच्या बाजूने उभा राहिला” हा लेख पाहा.

^ परि. 29 ही “शांत, मंद वाणी” जी एलीयाने ऐकली ती कदाचित त्याच देवदूताची होती ज्याने १ राजे १९:९ मध्ये उल्लेखण्यात आलेले “परमेश्‍वराचे वचन” प्रकट केले होते. १५ व्या वचनात म्हटले आहे, की “परमेश्‍वर” एलीयाशी बोलला. पण आपण आठवू शकतो, की इस्राएल राष्ट्र रानात असताना त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी यहोवाने एका देवदूताचा उपयोग केला होता आणि त्याच्याविषयी असे म्हटले, की “त्याच्या ठायी माझे नाव आहे.” (निर्गम २३:२१) याबाबतीत आपण निश्‍चितपणे काहीही सांगू शकत नसलो तरी, एका गोष्टीची मात्र आपण नोंद घेतली पाहिजे. ती अशी की, पृथ्वीवर मानव म्हणून येण्याआधी येशू यहोवाचे “वचन” अर्थात त्याचा खास प्रवक्‍ता म्हणून सेवा करत होता.—योहान १:१.

[१५ पानांवरील चित्र]

यहोवाने एलीयाला सुखदुःखाच्या काळात खूप आशीर्वादित केले

[१६ पानांवरील चित्र]

निराश असताना एलीयाने यहोवापुढे आपले मन मोकळे केले

[१७ पानांवरील चित्र]

एलीयाला सांत्वन देण्यासाठी, त्याच्या मनाला उभारी देण्यासाठी यहोवाने आपल्या अफाट शक्‍तीचा उपयोग केला