कुरुक्षेत्र ते हर्मगिदोन—आणि तुमचा बचाव
कुरुक्षेत्र ते हर्मगिदोन—आणि तुमचा बचाव
१. मानवाची स्वाभाविक इच्छा काय आहे? परंतु ती सहजसाध्य का नाही?
तुम्हाला सुख, शांती व खरा न्याय असलेल्या जगात राहणे आवडेल काय? तुम्ही सहाजिकच “होय” म्हणाल! मानवी इतिहासातील सर्व सदाचरणी लोकांची ही स्वाभाविक आवड आहे. परंतु जोवर दुष्ट व अन्यायी माणसे अस्तित्वात आहेत, तोवर तुम्हाला वा इतर कोणालाहि अढळ मानसिक शांतता लाभणे अशक्य आहे.
२. क्लेश व अन्यायाचे उच्चाटन करण्याचा मानवाने कसा प्रयत्न केला?
२ अन्यायाचे उच्चाटन व सदाचरणी लोकांसाठी आनंदी वातावरण स्थापण्याच्या मानवाच्या यत्नांनी लढाया होऊन मानवी इतिहास रक्तलांच्छित बनला आहे. अशीच एक लढाई प्राचीन हिंदुस्थानातील कुरुक्षेत्र येथे झाली. ईश्वरी सत्शक्तिचा दुष्ट शक्तिवर विजय व्हावा या मानवी इच्छेमुळे कालांतराने कुरुक्षेत्राची रणभूमि, हिंदू धार्मिक महाकाव्य महाभारताची व प्रामुख्याने, त्याचा गाभा असलेल्या भगवद् गीतेची पार्श्वभूमि बनली. हिंदू लेखक के. एम. सेन यांनी म्हटले आहे की गीता कधी लिहिली गेली याबाबत बरेच मतभेद असून, मता–मता प्रमाणे तिचा काल इ.स.पू. ४०० ते इ.स.पू. २०० असावा.
३-६ (अ) प्राचीन हिंदुस्तानात असा कोणता प्रयत्न झाला? (ब) परंतु कायमची तोड त्यातून निघाली नाही हे आपण कसे जाणतो?
३ आप्त–स्वकीय लढाईसाठी एकमेकांविरूद्ध उभे ठाकलेले पाहून, पांडव–वीर अर्जुन अत्यंत दुःखी झाला. त्यामुळे भगवद् गीतेच्या पहिल्या अध्यायात २६ ते २९ व ४७ या ओव्यांमध्ये म्हटले आहे: “तेथे अर्जुन तो पाहे उभे सारे व्यवस्थित, आजे, काके तसे मामे सासरे सोयरे सखे, गुरु बंधु मुले नातू दोन्ही सैन्यात सारखे. असे पाहूनि तो सारे सज्ज बांधव आपुले. अत्यंत करुणाग्रस्त विषादे वाक्य बोलिला: ‘कृष्णा स्व–जन हे सारे युद्धी उत्सुक पाहुनी, गात्रे चि गळती माझी, होतसे तोंड कोरडे, शरीरी सुटतो कंप उभे रोमांच राहती, गांडीव न टिके हाती, सगळी जळते त्वचा.’ असे रणात बोलूनि शोकावेगात, अर्जुन धनुष्य–बाण टाकूनि रथी बैसूनि राहिला.” a
४ तेव्हा, अर्जुनाचा सारथी बनलेले, कृष्णाच्या अवतारातील विष्णू, त्या यादवी युद्धाचे समर्थन करताना व अर्जुनास आपले योध्याचे कर्तव्य पार पाडण्यास आवर्जुन सांगताना म्हणतात: “हे धर्म–युद्ध टाळूनि पापात पडशील तू, स्वधर्मासह कीर्तीस दूर सारूनियां स्वये. हानि लाभ, सुखे दुःखे, हार जीत करी सम, मग युद्धास हो सिद्ध न लागे पाप ते तुज.”—गीता २:३३, ३८.
५ अनेकांच्या मते ती लढाई १८ दिवस चालली. शेवटी फक्त अर्जुन, त्याचे चार भाऊ व कृष्ण एवढेच उरले. यावरून ते असा निष्कर्ष काढतात की कुरुक्षेत्रावर सत्याच्या बाजूचे लोक वाचले आणि न्यायाची परिपूर्ति झाली व त्यानंतर शांती स्थापन झाली. पण ती कोठवर?
६ आज अन्याय व दुःख सर्व मानवजातीला, आतापर्यंत कधीहि नव्हती इतक्या अधिक क्षेत्रात व अधिक तीव्रतेने क्लेश देत आहेत. तद्वत इतक्या दुष्प्रवृत्तीला कारणीभूत ठरलेली तऱ्हतऱ्हेची मानवी शासने व देवाचे प्रभुत्व यातील वाद कोणत्याहि युद्धाने निकालात निघाला नाही हे मान्य करावेच लागेल. चिरंतन शांती व सुरक्षितता मानवाच्या हाती लागलेली नाही. याकरताच आज, खऱ्या न्यायाची परिपूर्ति अजूनहि व्हावयाची आहे. पण ती, कशी होईल?
७. कायमची तोड कशी साध्य होईल?
७ इतर कोणत्याही मार्गाने नव्हे तर जो मार्ग कुरुक्षेत्रावर अवलंबिला गेला असे मानले जाते त्यानेच न्यायाची परिपूर्ति होईल. त्यासाठी निर्णायक परंतु खरोखरच अक्षय फल–प्राप्ती करून देणाऱ्या लढाईची अतिशय जरूरी आहे. ज्यातून सत्शील लोक वाचल्याने मानवी वंशाच्या अस्तित्वाची हमी मिळेल अशा युद्धाची आवश्यकता आहे. तथापि अगदी अशाच एका युद्धाचे भविष्य वर्तविलेले आहे. आणि ते कोठल्याहि क्षणी सुरु होण्याची, लाखो लोक वाट पाहात आहेत. मानवजातीतील आताची परिस्थिती अशा युद्धास अगदी परिपक्व आहे. या कारणास्तव प्रकटीकरण १६:१४, १६ मध्ये पवित्र शास्त्र म्हणते: “ते चिन्ह दाखविणारे भूतांचे आत्मे आहेत. ते सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांस एकत्र करावयास त्यांच्याकडे बाहेर जातात. त्यांनी त्याना इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले.”
८. हर्मगिदोन काय आहे व त्याचा विस्तार केवढा असेल?
८ सर्व जगातील राजांचे एकत्रित बल या युद्धात वापरले जाईल याची येथे खास दखल घेतली पाहिजे. त्यामुळे ते एक जगव्याप्त युद्ध असेल. तद्वत, कुरुक्षेत्राप्रमाणे, हर्मगिदोन हे कोणा–एका ठिकाणाचे संकुचित रणक्षेत्र नाही. एखाद्या वास्तव ठिकाणाऐवजी, यहोवा हे नाम असणाऱ्या देवाच्या, पवित्र हेतूविरूद्ध सर्व मानवी राजकारण्यांची एकत्रित पवित्रा घेण्याची स्थिती, असा हर्मगिदोनाला लाक्षणिक अर्थ प्राप्त होतो.—स्तोत्र ८३:१८, पवित्र शास्त्र.
९, १०. हर्मगिदोनाची गरज का आहे व त्यात कोणाचा नाश होईल?
९ सत्य व न्याय यासाठी हर्मगिदोनाचे युद्ध होईल. याविषयीची हमी एका प्राचीन, ख्रिस्तपूर्व गीतात देताना देवाच्या प्रमुख योध्याबद्दल ते म्हणते: “सत्य, नम्रता व न्याय परायणता ह्याच्या प्रीत्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली हो. म्हणजे तुझा उजवा हात तुला भयप्रद कृत्ये करावयास शिकवील.” (स्तोत्रसंहिता ४५:४) कुरुक्षेत्रावरील युद्धाप्रमाणेच येथेहि प्रचंड संहार होईल. हर्मगिदोनानंतर, रणभूमीविषयी पवित्र–शास्त्र म्हणते:
१० “‘पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हा गोंगाट पोंचला आहे. कारण मी, यहोवा, राष्ट्रांशी प्रतिवाद करीत आहे. मी सर्व मानवजातीबरोबर वाद घालीत आहे व दुष्टांस तरवारीच्या स्वाधीन करीत आहे,’ असे यहोवा म्हणतो. सेनाधीश यहोवा म्हणतो: ‘पहा राष्ट्रां–राष्ट्रांतून अरिष्ट फिरत आहे. पृथ्वीच्या अतिदूरच्या प्रदेशातून मोठे तुफान उद्भवेल. त्या दिवशी यहोवाने संहारिलेले पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पडून राहतील. त्याकरिता कोणी शोक करणार नाही, त्यांस कोणी उचलणार नाही, पुरणार नाही. ते भूमीला खत होतील’.”—यिर्मया २५:३१–३३.
११. हर्मगिदोनाच्या युद्धातून कोण वाचेल?
११ परंतु आनंदाची गोष्ट म्हणजे, कुरुक्षेत्रात जे झाले असे कांही मानतात, त्या प्रमाणे, या संहारातून कांही लोक वाचतील. हर्मगिदोनाच्या युद्धातून वाचणारे लोक मानवी वंश टिकवून ठेवण्यास आपल्या निर्मात्याने लायक गणलेले, सत्शील व्यक्ति असतील. परंतु ते त्या संघर्षात भाग घेणार नाहीत. हे कसे होईल हे सांगताना यहोवाचा एक प्राचीन सेवक यशया म्हणतो: “चला माझ्या लोकांनो, आपआपल्या खोल्यात जा, दारे लावून घ्या. क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून रहा. कारण पहा, यहोवा पृथ्वीवरील रहिवाशांना त्यांच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानाहून निघाला आहे. शोषलेले रक्त पृथ्वी प्रकट करील. वधिलेल्यांस ती यापुढे झाकून ठेवणार नाही.” (यशया २६:२०, २१) यास्तव, हर्मगिदोन म्हणजे माणसा–माणसातील झगडा किंवा “जागतिक–युद्ध,” नसून ज्यात देवाचे अदृश्य सैन्य भाग घेईल असे युद्ध असेल हे उघड आहे.
हर्मगिदोनाची वेळ
१२, १३. अतिप्राचीन काळी कोणता प्रश्न विचारला गेला व सत्यशोधक व्यक्ति कशाची चौकशी करीत होते?
१२ हर्मगिदोनाचे देवाचे युद्ध कधी होईल? ते अगदी होऊ घातल्याची कोणती चिन्हे असतील? असाच प्रश्न खूप पूर्वी काही प्रामाणिक व चौकस लोकांनी केला होता. त्यांना मिळालेल्या उत्तराचे परिक्षण करणे अगत्याचे आहे. त्यांनी पृच्छा केली: “ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या उपस्थितीचे व ह्या व्यवस्थिकरणाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हास सांगा.” (मत्तय २४:३) ग्रीक भाषेतील आयोन शब्दाचे “व्यवस्थिकरण” असे भाषांतर केले आहे. त्याला कधी कधी ‘युग’ हे म्हटले आहे. द एम्फॅटिक डायग्लॉट मत्तय २४:३ चे भाषांतर या प्रकारे देते: “‘या गोष्टी कधी होतील? आपल्या उपस्थितीचे व या युगाच्या पूर्ततेचे चिन्ह काय ते आम्हास सांगा.” पवित्र–शास्त्राच्या संस्कृत आवृत्तीमध्ये आयोन चे ‘युग’ असे भाषांतर केले आहे. “कृत, त्रेता, द्वापार व कली असे जे विश्वाचे कालमापक मोठे विभाग केले आहेत त्यातील प्रत्येक, मोठा कालविभाग चाऱ्ही कालविभाग मिळून होणारा कलि.” अशी युगाची व्याख्या आहे. त्यातील तीन सरली असून आपण कलियुगात आहोत. यामुळेच, इ.स. १९७८ मधील न्यू हिंदी बायबल मध्ये मत्तय २४:३ येथे ‘युगांत’ शब्द वापरला आहे.
१३ एकंदरीत ते सत्य शोधक, ‘सध्याच्या युगाच्या अंताचे चिन्ह काय?’ असे विचारीत होते. त्यालाच काही लोक कलियुग असे मानतात.
१४. हिंदू रूढीप्रमाणे या युगाच्या अंताची चिन्हे कोणती?
१४ विष्णू–पुराणात त्याला खालील उत्तर सापडते. “वर्ण व्यवस्था व तदनुरूप वर्तन तसेच सर्व प्रकारचे अधिकार झुगारून दिले जातील . . . द्रव्याच्या अपव्ययाला धर्म समजतील. . . . आपल्या प्रजेचे रक्षण करण्याऐवजी राजे त्यांना लुबाडतील. कर वाढविण्याच्या नावाखाली ते व्यापाऱ्यांचे धन शोषतील. जगाच्या शेवटल्या युगात मानवांचे अधिकार कळेनासे होतील. कोणतीहि मालमत्ता सुरक्षित नसेल. कोणताहि आनंद, कोणताहि उत्कर्ष फार काळ टिकणार नाही.” श्री ए. एल. बाशम म्हणतात, “महाकाव्यात वर्णिल्याप्रमाणे वर्ण–व्यवस्थेचा ऱ्हास, ठरलेल्या मूल्यांचे पतन, सर्व धार्मीक विधींचा अंत व दुष्ट परकीय राजांचा अंमल या गोष्टी कलियुगाच्या शेवटी घडतील.” या २०व्या शतकातील घडामोडींशी हे वर्णन जुळत नाही काय? निरीश्वरवादी विचारसरणीच्या प्रसाराने मानवी शासनावर जहाल व अधार्मिक कल्पनांचा अधिकाधिक परिणाम होऊ लागला आहे. गर्भपात व समसंभोगाला वैधानिक मान्यता तसेच क्रूर दहशतवाद आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास सर्व जगात पसरून वाढीस लागल्याने अस्तित्वात असलेल्या मूल्यांना झुगारून दिले जाऊ लागले आहे.
१५. आजची परिस्थिती रूढ अपेक्षा पूर्ण करते का?
१५ तसेच यांत्रिक उद्योग व तंत्रज्ञान यामुळे समाजातील परंपरागत वर्गांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. औद्योगिक कारखाने, इस्पितळे, वैद्यकीय व्यवसाय, मोठ्या प्रमाणावर चाललेल्या शैक्षणिक संस्था तसेच सार्वजनिक दळणवळण यामुळे सर्व थरातील लोक एकमेकात मिसळतात. अशा रितीने पुराण काळापासून चालत आलेले सामाजिक भेद नाहीसे होऊ लागले. यांत्रिक युगाच्या धावपळीने व प्रभावाने लाखो लोकांनी वेळेच्या अभावी धार्मिक विधी सोडून दिले आहेत व हे असेच होणार हे मान्यहि केले आहे. या सर्व गोष्टी सद्य युगाच्या लवकरच येणाऱ्या अंताच्या निदर्शक आहेत. फक्त कालक्रम हेच याचे एकमेव कारण नव्हे. तर मानवी समाजाच्या एकूण व्यवस्थेच्या ऱ्हासाचा परत न फिरविता येणारा ओघ हेच, देवाने त्याच्या युद्धाची हर्मगिदोनाची—सुरुवात करण्याचे सर्वांत प्रमुख कारण आहे.
१६. (अ) या युगाच्या “शेवटल्या काळा”चे वर्णन पवित्र शास्त्रात कसे केले आहे? (ब) कौटुंबिक जीवनावर काय परिणाम झालेला आहे?
१६ या युगाचा “शेवटला काळ” व त्याची ओळख पटविणारी विशिष्ठ परिस्थिती यांचा पवित्र शास्त्रात २ तिमथ्यी ३:१–५ मध्ये काटेकोर उल्लेख आहे. तो परिच्छेद वाचताना बंडखोर वृत्ती व कौटुंबिक ऱ्हास याकडे अधिक लक्ष द्या: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई–बापांस न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुख–विलासाची आवड धरणारी, सुभक्तिचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी होतील. त्यांच्यापासून दूर राहा.” अशा रितीने, नैसर्गिक अथवा कौटुंबिक प्रेमाची उणीव, आई–वडिलांच्या आज्ञा न मानणे या ‘शेवटल्या काळा’च्या महत्वाच्या खुणा आहेत. समाजाचा मुलभूत घटक जे कुटुंब, तेच मोडकळीला आल्यास सर्व समाजावर त्याचा अपायकारक परिणाम होतो. अधिकाराविषयी अनादर उत्पन्न होतो व बंडखोर वृत्ती वाढीस लागते. ईश्वरी कायद्यांकडे दुर्लक्ष होते व संपूर्ण कुटुंबाची कुटंबे बंडखोर वृत्तीला बळी पडतात.
१७. कोणती परिस्थिती हर्मगिदोन जवळ आल्याची निदर्शक आहे?
१७ गीतेतहि हाच सूर उमटलेला दिसतो. “कुल–क्षये लया जाती कुल–धर्म सनातन, धर्म–नाशे कुळी सर्व अधर्म पसरे मग.” (गीता १:४०) अशा परिस्थितीमुळेच कुरुक्षेत्रावरील युद्ध उद्भवले असे दिसते. त्याहूनहि अधिक महत्वाचे हे की तशीच स्थिती आजच्या आपल्या काळात फैलावलेली असून हा ‘शेवटला काळ’ असल्याची निदर्शक आहे. हर्मगिदोन जवळ आल्याची ती चिन्हे आहेत. आज सत्प्रवृत्तीची आवड धरणारे लोक, दुष्प्रवृत्त लोकांचा नाश करून हर्मगिदोनामधून वाचणाऱ्यांसाठी सुख–शांती आणणाऱ्या, इश्वरी हस्तक्षेपाचे स्वागतच करतील.
१८. “शेवटल्या काळा” बद्दल कोणते प्रश्न उद्भवतात?
१८ या २०व्या शतकात ‘शेवटला काळ’ आला आहे म्हटल्यावर तुम्ही सहाजिकच विचाराल, की, त्याची सुरुवात कधी झाली? शिवाय त्याची कालमर्यादा किती? हर्मगिदोन आपल्याच हयातीत लढले जाऊन लायक असल्यास आपण त्यातून वाचू हे आपल्याला कसे कळणार? हेही विचारावेसे वाटेल. पवित्रशास्त्रातील मत्तयाच्या २४व्या अध्याय वरील आपला उहापोह आपण जारी ठेवल्यास त्यातून आपल्याला अधिक बोध होईल. “या गोष्टी केव्हा होतील व आपल्या येण्याचे आणि या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” या त्याच्या प्रश्नाची तुम्हाला आठवण असेलच.
१९, २०. (अ) कोणत्या घटना “वेदनांचा आरंभ” असल्याचे पवित्र शास्त्राचे भाकित आहे? (ब) सध्याच्या युगाचा “शेवटला काळ” इ.स. १९१४ मध्ये सुरु झाला असे का म्हणता येते?
१९ उत्तरादाखल भविष्यवाणी पुढे म्हणते: “राष्ट्रांवर राष्ट्र व राज्यांवर राज्य उठेल. आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. पण या सर्व गोष्टी वेदनांचा आरंभ होत. आणि अनीति वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल.” (मत्तय २४:७, ८, १२) या २०व्या शतकामध्ये ‘वेदनांचा आरंभ’ असा कोणत्या वर्षाचा तुम्ही निर्देश कराल? १९१४ मध्ये सुरु झालेल्या पहिल्या महायुद्धाने तीव्र होत जाणाऱ्या क्लेशांची मालिका सुरु केली हे खरे नाही काय? १९१४ च्या पुढे, युद्धांमुळे, आधी कधीहि नव्हे असे लाखो लोकांना दुःख, क्लेश व मृत्यू आले. मृत्यु युद्धामुळे आले नसतील तर अन्न टंचाईने आले. आणि दुष्काळाने नसतील तर भूमिकंप, रोगांच्या साथी, बंडखोरी, दहशतवाद यांमुळे लोक मृत्यु पावले. आज बहुजन समाजात देव व शेजाऱ्यांबद्दलच्या प्रीतिचा लोप झाला आहे. मानवजातीच्या आजपर्यंतच्या इतिहासात इतक्या थोडक्या काळात अशा तऱ्हेने क्लेश व निरीश्वरवाद कधीहि एकवटलेले नव्हते!
२० खरोखर, १९१४ या वर्षी इतिहासाला एक नवे—अद्वितीय—वळण लागले! एका वृत्तपत्राच्या अग्रलेखात नुकतेच म्हटले होते: “१९१४च्या आधीच्या सुवर्णयुगाचा अनुभव घतलेल्याशिवाय इतर कोणालाहि त्या व ह्या काळातील दुःखद बदल कळणार नाहीत.” याचाच अर्थ, १९१४ मध्ये या युगाचा ‘शेवटला काळ’ सुरु झाला.
२१. या “शेवटल्या काळा”ची कालमर्यादा किती आहे, व हर्मगिदोनाचे युद्ध अत्यंत जवळ का असले पाहिजे?
२१ या ‘शेवटल्या काळा’ची कालमर्यादा केवढी असेल? पवित्र शास्त्र उत्तरते: “तसेच तुम्हीहि या सर्व गोष्टी पहाल तेव्हा तो जवळ, दाराशीच, आहे असे समजा, मी तुम्हास खचित सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.” (मत्तय २४:३३, ३४) दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे, ‘ज्यांची संख्या घटत आहे’ व ज्यांनी या दुःखकारक परिस्थितीची सुरुवात पाहिली, अशी १९१४च्या पिढीची माणसे देवाचे हर्मगिदोनाचे युद्ध धडकेल तेव्हा हयात असतील. यास्तव ‘शेवटला काळ’ १९१४ मध्ये हयात असलेल्या पिढीच्या आयुर्मर्यादेतच सीमित आहे. समस्त घटना प्रत्यक्षपणे पाहाणाऱ्यांची ती पीढी आता वयस्क झालेली—सत्तरीच्या पुढे गेलेली आहे. याचाच अर्थ हर्मगिदोनाच्या युद्धाला तोंड लागण्याचा दिवस अत्यंत जवळ येऊन ठेपलेला आहे. संपूर्ण जगात सत्प्रवृत्तीची आवड धरणारे अनेक लोक देवाच्या अटळ युद्धाची सुरुवात होण्याच्या दृष्टीने तयारीत आहेत.
२२. दुष्ट लोकांचा नाश केव्हा होईल, या बद्दल पवित्र शास्त्र व गीता काय म्हणतात?
२२ हर्मगिदोन कधी होईल त्या नेमक्या वर्षाचे भाकीत करता येईल काय? नाही. पवित्र शास्त्र म्हणते: ‘त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही. स्वर्गातील दिव्यदूतांस नाही, पुत्रालाहि नाही.” (मत्तय २४:३६) गीताहि त्याविषयी कांही सांगत नाही. फक्त म्हणते: “गळूनि जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना, अधर्म उठतो भारी तेव्हा मी जन्म घेतसे. राखावया जगी संतां, दुष्टा दूर करावया, स्थापावया पुन्हां धर्म, जन्मतो मी युगी युगी.” (गीता ४:७, ८) म्हणून अनेकांचा विश्वास आहे की धर्माचा ऱ्हास होऊन अर्धम वाढीस लागला की ईश्वरी हस्तक्षेप होतोच. दुष्टजनांविषयी देवाने आपल्या निर्णयाची अमलबजावणी करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे!
हर्मगिदोनाची ऐतिहासिक चुणूक
२३. कोणती ऐतिहासिक घटना हर्मगिदोनाची चुणूक दाखविते?
२३ हर्मगिदोनाच्या वेळी कशाची अपेक्षा करावी याची चुणूक इतिहास आपल्याला देतो. ती म्हणजे नोहाच्या युगात झालेला जलप्रलय. संपूर्ण जगात या एका ऐतिहासिक जगव्याप्त पुराच्या ९० वेगवेगळ्या कथा आहेत. हा पूर म्हणजे जलप्रलय असे हिन्दू मानतात. जल म्हणजे पाणी व प्रलय म्हणजे नाश. म्हणून जलप्रलय याचा अर्थ पाण्याने झालेला नाश. जलप्रलयात सर्व जीवांचा नाश झाला असा समज आहे. परंतु मनूला त्याच्या देवाने कृपा दाखविली. मनू व इतर सात ऋषी असे एकूण आठ जण वाचविण्यासाठीं, देवाने त्याला एक तारू बांधण्यास सांगितले. प्रलय ओसरल्यावर ते तारू उत्तरेकडील एका पर्वतावर उतरले. मग, मनू तारवातून बाहेर आला आणि बाहेर आल्यावर त्याने आपल्या देवाला सद्ययुगातील पहिला यज्ञ केला. मनू हा मानवजातीचा पहिला विधीकार–कायदे बनविणारा—झाला असे मानले जाते इतकेच नव्हे तर पौराणिक कथानुसार, एकामागून एक येणाऱ्या प्रत्येक वंशाच्या जनकाचे नांवही मनू होते.
२४, २५. पवित्र शास्त्रातील जलप्रलयाचा वृत्तांत व प्रलयाची हिंदू दंतकथा यामध्ये कोणते साम्य आहे?
२४ एका पौराणिक कथेप्रमाणे विष्णू देवाने मनूला इशारा देऊन वाचविले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, विष्णू या नावातील ‘व’ उपसर्ग काढल्यास इश–नूः असा शब्द मिळतो. खास्दी भाषेत त्याचा अर्थ “नोहा नावाचा माणूस” “विश्रांती घेणारा माणूस” असा होतो. हिंदू रूढीनुसार सागरावर तरंगत असलेल्या शेष नावाच्या वेटोळे घातलेल्या नागावर विष्णू ‘विश्रांती’ घेत असतो असे मानतात. “शेष” याचा अर्थ ‘शिल्लक राहिलेले.’ आणि अभ्यासकांच्या मते प्रत्येक युगाच्या शेवटी होणाऱ्या जगाच्या नाशानंतरच्या अवशेषांचे प्रतीक म्हणजे शेष नाग होय. ही पौरणिक कथाही पवित्र शास्त्रातील जलप्रलय, तारू व त्यातील लोकांचा उल्लेख करते, हे उघड आहे.
२५ मनू हे ज्याचे मूर्त स्वरूप आहे अशा, जलप्रलयातून वाचलेल्या, सद्याच्या युगाचे आद्य जनक असलेल्या, पहिला विधिकार बनलेल्या, प्रलयानंतर पहिला यज्ञ करणाऱ्या पौरणिक व्यक्तिमुळे पवित्रशास्त्रामधील नोहाच्या आयुष्यातील अनेक घटनांना पुष्टी मिळते. (उत्पत्ती ६:८, १३–२२; ८:४, उत्पत्ती ८:१८–९:७; १०:३२ पडताळा.) शिवाय हिंदू धर्मातील जलप्रलयाचा वृतांत व पवित्र शास्त्रातील प्रेरित इतिहास यातील काही महत्वाचे मुद्दे समान आहेत. उदाहरणार्थ (१) मोजक्या लोकांच्या बचावासाठी योजलेला मार्ग (२) जगातील इतर सर्व जीवांचा पाण्याने नाश (३) मानवजातीच्या बीजाचे रक्षण.
२६. (अ) पृथ्वीवरील, जलप्रलयाआधीच्या परिस्थितीचे वर्णन पवित्रशास्त्र कसे करते? (ब) ऐतिहासकि जलप्रलय व देवाचे हर्मगिदोन युद्ध या दोहोतील कोणती परिस्थिती एक सारखी आहे?
२६ हर्मगिदोनाची ही ऐतिहासिक चुणूक या बद्दल पवित्रशास्त्र म्हणते: “नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलायाच्या पूर्वीच्या दिवसात, नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खात–पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते; आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांस समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.” (मत्तय २४:३७–३९) याचा अर्थ, त्या ऐतिहासिक प्रलयाशी संबंधित असलेली परिस्थिती व हर्मगिदोनात संपणारी आजची जगाची स्थिती यामध्ये साम्य असेल. ते असे (१) पृथ्वी व त्यावरील प्राणी वाचतील; (२) नैसर्गिक जीवनाच्या दैनंदिन व्यवहारात गढून गेल्यामुळे बहुतांश लोकांना आपल्या काळाचे गांभिर्य लक्षातच येणार नाही; (३) हर्मगिदोनसंबंधी इश्वरी इशाऱ्याकडे बहुतेक माणसे ध्यान देणार नाहीत; (४) यास्तव, हर्मगिदोनात बहुतांश माणसे नष्ट होतील; व (५) फक्त मोजक्याच माणसांना देवाची कृपा प्राप्त होऊन ती “सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाई”तून वाचतील. (प्रकटी १६:१४) त्यामुळे सूज्ञांनी देवाच्या युद्धाबद्दलचा हा संदेश व त्यातून कसे वाचावे याचा अधिक अभ्यास करावा हे ओघानेच आले.
कोण वाचतील?
२७. हर्मगिदोनाच्या युद्धातून वाचण्यासाठी आपल्याला कशाची माहिती असावयास हवी?
२७ सूज्ञ वर्तन व यश यासाठी सत्य ज्ञान मिळविण्याचा सल्ला अर्जुनाला मिळाला. गीतेमध्ये म्हटले आहे: “सेवा करूनि ते जाण, नम्रभावे पुसूनिया; ज्ञानोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुज.” (गीता ४:३४) असा उपदेश अर्जुनाला होण्यापूर्वी पवित्र शास्त्रात सफन्या २:३ मध्ये म्हटले आहे: “पृथ्वीवरील सर्व नम्र जनांनो, यहोवाच्या न्यायानुसार चालणाऱ्यांनो, त्याचा आश्रय करा, म्हणजे कदाचित् यहोवाच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.” हर्मगिदोन यहोवाचे युद्ध आहे म्हणून यहोवा व त्याच्या नीतिमत्तेविषयी जे लोक नम्रतेने ज्ञान प्राप्त करून घेतात तेच हर्मगिदोनातून वाचतील. परंतु यहोवा आहे तरी कोण? त्याच्याविषयीचे ज्ञान आपल्याला कसे प्राप्त होऊ शकेल?
२८. ऋग्वेदात देवाच्या ओळखीबद्दल कोणता प्रश्न विचारला आहे?
२८ वर सांगितल्याप्रमाणे गीतेमध्ये ज्ञानाचे महत्व दाखवून दिलेले आहे. धार्मीक ज्ञानाला हिंदूमध्ये नेहमीच अनन्यसाधारण आदर दाखविलेला आहे. वेद या शब्दाचा अर्थच ज्ञान असा आहे. म्हणून चार वेदांमध्ये ज्ञान सांठविले आहे असे मानले जाते. हिंदूमधील ज्ञानाचा सर्वप्रथम ग्रंथ ऋग्वेद होय. याचा बराचसा भाग इ.स.पू. १००० ते ५०० वर्षे यामध्ये संकलित केला असावा, असे म्हणतात. त्याच्या उत्तरांगात ऋग्वेद कर्त्या ऋषींना देवाच्या व्यक्तिमत्वाविषयी कुतुहल वाटू लागले. म्हणून १०व्या मंडलातील १२१वे सूक्त “अज्ञात देवाला” संबोधून लिहिलेले आहे त्यातील प्रत्येक ऋचेच्या शेवटी, “अशा कोणत्या देवाला आम्ही हवी द्यावा?” असा प्रश्न विचारलेला आहे. उदाहरणार्थ, ९वी ऋचा म्हणते: “पृथ्वीचा जन्मदाता, ज्याने स्वर्ग उत्पन्न केला, जो सत्धर्माचा परिपालक आहे, त्याने मला त्रास देऊ नये. ज्याने विपुल आणि आश्चर्यकारक उदके निर्माण केली अशा कोणत्या देवाला आम्ही हवी द्यावा?”
२९. कांही प्राचीन हिंदूनी देवाविषयी काय जाणले होते?
२९ ऋग्वेदातील या प्रश्नाचे खरे उत्तर काय आहे? वैदिक कवींनीं अजाणतेपणाने ज्याला भक्ति अर्पण केली असा स्वर्ग व पृथ्वी यांचा जन्मदाता कोण आहे? शेकडो वर्षांच्या धार्मीक उत्क्रांतीनंतर भगवद् गीता या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करताना म्हणते: “पवित्र तू पर–ब्रह्म थोर ते मोक्ष–धाय तू आत्मा नित्य अ–जन्मा तू विभु देवादि दिव्य तू देव–देवा, जगन्नाथा.” (गीता १०:१२, १५) म्हणजेच कांही प्राचीन हिंदूनी जाणले होते की देवांतील पहिला, देवाधिदेव असा फक्त एकच अनादि–अनंत सर्वश्रेष्ठ देव आहे.
३०-३२. (अ) देवाचा अनादि–अनंत गुण डॉ. राधाकृष्णन यांनी कोणत्या शब्दात वर्णिला आहे? (ब) याच शब्दांत पवित्र–शास्त्राने कोणाला संबोधिले आहे?
३० ब्रम्हाच्या अनादि–अनंत गुणधर्माचे स्पष्टीकरण करताना सुप्रसिद्ध तत्ववेत्ते श्री. स. राधाकृष्णन म्हणतात “‘मी आहे तसा आहे’ एवढेच आपल्याला म्हणता येईल.” अशा रितीने ब्रम्हाचा अनादि–अनंत गुणधर्म व पवित्र–शास्त्रातील देवाच्या यहोवा या नावाची व्याख्या, यांची डॉ. राधाकृष्णन यांनी सांगड घातली आहे. पवित्र–शास्त्रातील निर्गम ३:१३, १४ मध्ये म्हटले आहे: “तेव्हा मोशे देवाला म्हणाला, ‘पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हांकडे पाठविले आहे. असे मी इस्राएल वंशजांकडे जाऊन त्यांस सांगितले असता त्याचे नाव काय असे ते मला विचारतील. तेव्हा मी त्यांना काय सांगू?’ देव मोशेला म्हणाला: ‘मी आहे तो आहे’ तू इस्राएल वंशजांस सांग, ‘मी आहे’ याने मला तुम्हांकडे पाठविले आहे.’”—ऑथोराइज्ड व्हर्शन.
३१ याहून अधिक अचूक असलेल्या न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स या भाषांतरात निर्गम ३:१४, १५ मध्ये म्हटले आहे: “देव मोशेला म्हणाला, ‘मी शाबीत करीन तसा मी आहे.’ तो पुढे म्हणाला, ‘तू इस्राएल वंशजांस सांग, मी शाबीत करीन याने मला तुम्हाकडे पाठविले आहे.’ पुन्हा एकदा देव मोशेला म्हणाला:
३२ “इस्राएल लोकांस तू सांग की तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव यहोवा, याने मला तुम्हांकडे पाठविले आहे. हेच माझे सनातन नांव आहे. याच नांवाने पिढयान्पिढ्या माझे स्मरण होईल.”
३३. यहोवा देवाचे गुण कोणते आहेत?
३३ यास्तव असे वाटते की ‘मी आहे तसा आहे’ असे अनादि अनंत ब्रम्हाचे वर्णन करतांना, डॉ. राधाकृष्णन सर्वश्रेष्ठ ब्रम्ह व पवित्र शास्त्रातील यहोवा देव, हे एकच आहेत असे सुचवीत आहेत. ब्रम्हाची व यहोवाची कांही गुणवैशिष्ठयें एकच आहेत हे खरे. उदाहरणार्थ, इ.स.पू. ५ ते ३ऱ्या शतकांत लिहिलेल्या गीतेतील “देवाधिदेव” असा ब्रम्हाचा उल्लेख, इ.स.पू. १५व्या शतकात (१४७३) लिहिलेल्या पवित्रशास्त्र वृत्तांताचा प्रतिध्वनी आहे. अनुवाद १०:१७ मध्ये म्हटले आहे: “कारण तुमचा देव यहोवा हा देवाधिदेव, प्रभूंचा प्रभू, महान्, पराक्रमी व भययोग्य देव असून तो कोणाचा पक्षपात करीत नाही. किंवा लांच घेत नाही.”
३४. स्वर्ग व पृथ्वी यांची निर्मिती कोणी केली?
३४ यहोवा हे देवाने स्वतःला दिलेले नांव आहे. पवित्र शास्त्र यहोवा देवाला उत्पत्तीचे श्रेय देते. “आकाश व पृथ्वी उत्पन्न झाली तेव्हाचा उत्पत्तिक्रम हा आहे, जेव्हा यहोवा देवाने आकाश व पृथ्वी ही केली” (उत्पत्ती २:४) यावरून, यहोवा हाच ‘स्वर्ग व पृथ्वीचा जन्मदाता’ आहे.
३५. (अ) जलप्रलयातून वाचलेल्या आपल्या पूर्वजांनी कोणत्या देवाला यज्ञ केला? (ब) मग ऋग्वेदातील त्या प्राचीन प्रश्नाचे उत्तर काय आहे?
३५ ज्याने जलप्रलय घडवून आणला, व दुष्टांचा नाश करून आठ सत्शील जीवांचे रक्षण केले तो यहोवाच होता. पवित्र शास्त्र म्हणते: “मग यहोवाने नोहाला सांगितले, ‘तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल. कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस. अजून सात दिवसांचा अवकाश आहे. मग मी चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पर्जन्य पाडणार. आणि मी केलेले सर्वकांही भूतलावरून नाहीसे करणार तेव्हा नोहाने यहोवाच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले.” (उत्पत्ती ७:१, ४, ५) आजची मानवजात त्या आठ नीतिमान व्यक्तिचे वंशज असल्याने आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. व त्या प्राचीन पूर्वजांचे उत्तम उदाहरण अनुसरले पाहिजे. मुक्तिदायक अशा तारवातून बाहेर आल्यानंतर त्यांनी यहोवा देवालाच कृतज्ञतेने यज्ञ केला होता, याची येथे नोंद घेतली पाहिजे. तो वृत्तांत सांगतो: “नंतर नोहाने यहोवासाठी वेदी बांधली. आणि सर्व शुद्ध पशू व सर्व शुद्ध पक्षी यातले कांही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले. यहोवाने त्याचा सुवास घेतला.” (उत्पत्ती ८:२०, २१) “अशा कोणत्या देवाला आम्ही हवी द्यावा?” या ऋग्वेदातील प्राचीन प्रश्नाचे खरेखुरे उत्तर येथे आहे.
३६. (अ) हर्मगिदोनाच्या युद्धामध्ये कोणाचे रक्षण होईल? (ब) त्यांना जरूर ती माहिती कशी मिळेल?
३६ स्वर्ग व पृथ्वीचा देव यहोवाच हर्मगिदोनाच्या युद्धाद्वारे या दुष्ट युगाचा अंत करील. यहोवा देवाला खऱ्या अर्थाने ओळखणारे व त्याच्या नावाशी तसेच व्यक्तिमत्वाशी ज्यांची सश्रद्ध जवळीक आहे ते सर्व हर्मगिदोनातून त्या नंतरच्या शुद्ध भूमीवर पदार्पण करतील. पवित्र शास्त्र म्हणते: “‘जो कोणी यहोवाचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.’ तर, ज्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यानी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्यांवाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? ‘चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम आहेत!’ असा शास्त्रलेख आहे.” (रोमकर १०:१३–१५) याकरता स्वर्गाचा देव यहोवा व त्याचा मानवजातीविषयीचा हेतू यांची माहिती आपण करून घेण्याची नितांत आवश्यकता आहे.
३७. (अ) “अंत” होण्याआधी काय घडले पाहिजे? (ब) आज ते कार्य कशा रीतीने केले जात आहे?
३७ याच कारणास्तव हर्मगिदोन युद्धाच्या इशाऱ्याचा संदेश व त्यातून वाचण्याची सुवार्ता यांचा, यहोवाचे साक्षीदार आज सर्व जगभर प्रचार करीत आहेत. या युगाच्या अगदी अंत काळी जागतिक प्रचार–कार्य होईल असे भविष्य हर्मगिदोन जवळ आल्याचे चिन्ह म्हणून सांगितले होते. पवित्र शास्त्रातील मत्तय २४:१४ पुन्हा वाचू या: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” सध्या २०० पेक्षा अधिक देशांमध्ये व १६० पेक्षा अधिक भाषांमध्ये, यहोवाचे साक्षीदार या अतिशय महत्वाच्या कार्यात गुंतलेले आहेत. आणि आता हे जीवनप्रदायक कार्य तुमच्या दारापर्यंत येऊन ठेपलेले आहे.
हर्मगिदोनानंतर काय?
३८. परंपरागत समजुतीप्रमाणे कलीयुगानंतर काय होते?
३८ कलियुगानंतर कृतयुग येते अशी सर्वसाधारण श्रद्धा आहे. कृतयुग हा ‘सुवर्णकाल’ मानला जातो. जगात कोठेहि दुष्प्रवृत्ती नसते. आणि सर्व मानवजात फक्त एकाच देवाची भक्ति करते. यालाच सत्ययुग—जेथे असत्याला थारा नाही—असेहि म्हणतात.
३९. (अ) नवीन समाज व्यवस्था उत्तम रीतिने सुरू होण्यास लागणारे कोणते गुण त्या वाचलेल्या लोकांमध्ये असतील? (ब) जागतिक सदाचरणामुळे कोणती परिस्थिती निर्माण होईल?
३९ हर्मगिदोनातून वाचलेले लोक नवीन मानवी समाजव्यवस्थेचे संस्थापक व सुनीतिची अतूट आवड धरणारे असतील. हर्मगिदोन पृथ्वीवरील सर्व अनीतिचा नाश करील. मानवजातीला नव–जीवनाचा आरंभ करून देईल. यालाच अनुलक्षून देवाचे वचन म्हणते: “ज्यामध्ये नीतमत्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पहात आहोत.” (२ पेत्र ३:१३) पृथ्वीवर राहणाऱ्यांची शारीरिक व मानसिक पापे, अपूर्णता व दौर्बल्य दूर करण्यासाठी यहोवा देव, त्यानेच योजलेल्या बलिदानाच्या तरतुदीचे फायदे त्यांना लागू करील व शेवटी नंदनवनमय पृथ्वीतील जीवनाचा हक्क पुनर्स्थापित केला जाईल. दारिद्र्य, भाववाढ, उपासमार, निर्वासितावस्था, गजबजलेल्या झोपडपट्या, विद्रूप करणारा महारोग, दुर्बल करणारे इतर रोग, बालमृत्यू वा इस्पितळे या सर्व गोष्टीं नाहीशा होतील. वेठबिगारी, हमाली, बेकारी, भिकारी, जातिभेद व विषमता नसतील. या उलट उत्तम स्वास्थ्य, चिरतारूण्य, उत्तम अन्नाची रेलचेल, समाधानकारक काम व सुरक्षित वातावरण असेल.
४०-४२. (अ) अन्न (ब) आजारपण व मरण (क) घरे (ड) व्यवसाय (इ) वन्यप्राणी यांविषयी नवीन युगात कोणती स्थिती असेल?
४० यशया संदेष्ट्याने दिलेली कांही आनंददायक आश्वासने पवित्रशास्त्रात तुम्ही स्वतः वाचून पहा. तो म्हणतो, “सेनाधीश यहोवा या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची व राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे. सर्व लोकांस झाकून टाकणारे झांकण, सर्व राष्ट्रांस आच्छादून टाकणारे आच्छादन तो या डोंगरावरून उडवून देत आहे. तो मृत्यू कायमचा नाहीसा करितो. प्रभू यहोवा सर्वाच्या चेहऱ्यावरील अश्रू पुशितो. तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करितो. कारण यहोवा स्वतः हे बोलला आहे.” “तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.”—यशया २५:६–८; ३५:५, ६.
४१ यशयाने असेहि म्हटले की, “पहा, मी (यहोवा) नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करतो. पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात रहाणार नाही. ते घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील व त्यांत दुसरे राहतील, ते लावणी करतील व फळ दुसरे खातील असे व्हावयाचे नाही. कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल. व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत. संकट तात्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत. कारण यहोवाने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे. व त्यांची मुले त्यांच्या जवळ राहतील. त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन, ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेन, असे होईल.”—यशया ६५:१७, २१–२४.
४२ “तेव्हा लांडगा व कोकरू एकत्र चरतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. सर्पाचे खाणे धूळ होईल. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत. नासधूस करणार नाहीत. असे यहोवा म्हणतो.”—यशया ६५:२५.
४३, ४४. (अ) आपल्या मृत पूर्वजांचे काय होईल व ते कसे घडेल? (ब) या अद्र्भित वरदानात कोण सहभागी होतील?
४३ एवढेच नव्हे तर देव मृत व्यक्तिचीहि आठवण करील. कालनिद्रा घेत असलेले सर्व वंशाचे व धर्माचे लाखो लोक पुन्हा जिवंत होतील. हा काहीं पुनर्जन्म वा आत्म्याचे स्थलांतर नसेल. तर आपल्या अचूक स्मृतीने सर्वसमर्थ देव प्रत्येकाला पूर्वीचे व्यक्तिमत्व व सवयीं यांनी युक्त अशा शरीरासह निर्माण करील. त्यामुळे त्यांच्या प्रियजानांना ते पुन्हा ओळखू येतील. तो आनंद किती अवर्णनीय असेल! ईश्वरी व्यवस्थेच्या चौकटीत उत्तम पुनर्वसनाची संधी पुनरूत्थान झालेल्यांना मिळेल. पवित्र शास्त्र दुर्दम्य विश्वास प्रकट करून म्हणते: “या विषयी आश्चर्य करू नका. कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील. आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरूत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरूत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.”—योहान ५:२८, २९.
४४ तुम्हाला हवी–हवीशी वाटतील अशीच ही आश्चर्ये नाहीत काय? तुम्हीहि मन:पूर्वक अशीच इच्छा बाळगीत नाही का? तुम्हाला व्यक्तिशः या आनंदात व वरदानात सहभागी होता येईल. लवकरच येणाऱ्या हर्मगिदोनाच्या युद्धातून जे वाचतील त्यांना हे आशीर्वाद मिळतील.
४५, ४६. ही वचने विश्वासार्ह आहेत याची आपल्याला खात्री कशी वाटते?
४५ पण हर्मगिदोनानंतरच्या जगाबद्दलची ही आश्वासने खात्रीलायक आहेत का? हर्मगिदोन कपोलकल्पित नाही, याची आपल्याला कशी खात्री करता येईल? कारण तो प्राचीन जलप्रलय कपोल–कल्पित नव्हता. मानव कपोलकल्पित नाही वा मानवाचा निर्माता देवहि कपोलकल्पित नाही! शिवाय देव सत्यप्रतिज्ञ असल्याने या आश्वासनाबद्दल आपल्याला खात्री बाळगता येते. (तीत. १:२) विचार करा. आपल्या प्रेमळ माता–पित्यांवर लहान मुलांचा का विश्वास असतो? सर्वसाधारणपणे आपल्या माता–पित्याच्या प्रेमळपणाविषयीं लहान मुलांच्या मनात कोणीहि संशय उत्पन्न करू शकत नाही. आपल्या माता–पित्याच्या आश्वासनांवर अविश्वास दाखविण्याचे लहान मुलांना कारणच नसते. त्यांच्या माता–पित्यांच्या तरतुदीवरच त्यांचे आजवरचे आयुष्य गेलेले नसते का? म्हणूनच मानवी तत्वज्ञान व आश्वासनांचा आजवरचा फोलपणा लक्षात घेऊन देवाच्या मानवावरील प्रीतीवरचा विश्वास भंगू देऊ नका. देवाच्या आश्वासनांविषयी आशा धरणे गैर नव्हे. हर्मगिदोनाचे युद्ध घडवून आणून नवीन व्यवस्थेची स्थापना करण्यास लागणारे ज्ञान, शक्ति व इच्छा फक्त एकट्या यहोवा जवळच आहेत. तो तशी समाधानकारक हमीही देतो:
४६ “‘देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण नाही. शोक, रडणे व कष्ट हीहि नाहीत. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.’ तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, ‘पहा, मी सर्व नवीन करतो.’ तो म्हणाला, ‘लिही, कारण ही वचने विश्वासनीय व सत्य आहेत.’”—प्रकटीकरण २१:३–५. इब्रीयास ६:१८ पडताळून पहा.
४७. देवाच्या नव्या व्यवस्थेच्या चिरंतनतेच्या आड येऊ शकणार नाही असा काळाचा कोणता गुणधर्म आहे?
४७ पण या सर्व चांगल्या गोष्टी किती काळ टिकतील? काही लोक म्हणतात तसे फक्त पुढच्या युगापर्यंत, कालचक्रापर्यंतच का? पण असे का असावे? काळ चक्राप्रमाणे फिरत नसून त्याला एकच दिशा असते—पुढची. काळ ही एक भाववाचक संज्ञा आहे. त्यामध्ये अस्तित्वात असलेल्या गोष्टींवर त्याचा कांहीहि परिणाम होत नाही. एखाद्या विशिष्ट युगाची वैशिष्ठ्ये त्यातील बुद्धिमंत शक्तिमुळे उत्पन्न होतात. म्हणून जेव्हा सर्व दुष्ट शक्ति कायमच्या नाहीशा होतील तेव्हा सर्व भावी काळात फक्त सत्प्रवृत्त शक्तिच शिल्लक राहतील.
४८. नवीन व्यवस्थेची कालमर्यादा कशावर अवलंबून आहे?
४८ सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या युगाची कालमर्यादा कुठल्यातरी विश्वव्यापी स्वयंचलित घडयाळावर नव्हे तर देवाच्या इच्छेवर अवलंबून आहे. तेव्हा या उत्तम गोष्टी किती काळ टिकतील या माहितीच्या शोधात असल्यास, ‘पृथ्वी व मानव जातीविषयी देवाची काय इच्छा आहे?’ असाच प्रश्न आपण जणू विचारीत आहोत.
४९. भविष्याबद्दल देवाच्या इच्छेची माहिती आपल्याला कोठे सांपडते? फक्त त्याच ग्रंथापासून आपल्याला आणखी कोणती माहिती मिळते?
४९ याचे उत्तर आपल्याला धार्मिक ग्रंथापैकी एकात तरी मिळेल काय? होय. पण फक्त पवित्र शास्त्रातच. “अशा कोणत्या देवाला आम्ही हवी द्यावा?” या ऋग्वेदाच्या प्रश्नाचे उत्तर देवाने पवित्र शास्त्रात दिले आहे. सर्व सृष्टीच्या निर्मात्याचे नाव यहोवा आहे हे पवित्र शास्त्रच आपल्याला सांगते. देवाचा मानवाशी झालेला सर्व व्यवहार फक्त पवित्र शास्त्रातच विस्तृतपणे सापडतो. आपल्या काळातील शेवटल्या काळातील परिस्थितीचे सुस्पष्ट चित्र रेखाटणारा पवित्र शास्त्र हा एकमेव ग्रंथ आहे; आणि भविष्याबद्दल देवाची इच्छा काय आहे ते पवित्र शास्त्रच आपल्याला विषद करते.
५०. देवाच्या इच्छेचे ज्ञान आपल्याला भविष्याचा कोणता अद्र्भित दृष्टीकोन देते?
५० यहोवा देवाची इच्छा खरोखर अद्र्भित आहे. पवित्र शास्त्रानुसार त्याची इच्छा अशी आहे की, एखाद्या युगापुरतीच नव्हे तर चिरकाल टिकणारी नीतिमान व्यवस्था स्थापन होईल; आणि आपणा सर्वांना त्या योजनेचे फायदे घेण्याची संधी त्याने दिलेली आहे. (स्तोत्रसंहिता ३७:१०, ११, २७–२९) देवाशी इमानदार राहण्यामुळे ज्यांना त्यांच्या कुटुंबियांनी वाळीत टाकले आहे अशांबद्दल पवित्र शास्त्र म्हणते त्यांना ‘ह्या काळी पुष्कळ पटींनी [आप्त–स्वकीय] व येणाऱ्या युगात [पृथ्वीवरील नंदनवनात] सार्वकालिक जीवन” मिळणार आहे.—लूक १८:२९, ३०; हबक्कूक २:१४.
५१. मानवजातीला खरा न्याय व समाधान केवळ कोणत्या एकमेव साधनाने मिळेल?
५१ कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर बराच इतिहास घडून गेला आहे. या काळामध्ये माणसाच्या सुखाला अनेक लढायांमुळे गालबोट लागले आहे. तसेच अन्यायाचे उच्चाटन करून शांती स्थापन करण्याचे ह्या काळातील मानवाचे प्रयत्न बहुतांशी निष्फळ ठरलेले आहेत. मानवी प्रयत्नांनी अढळ शांती व सुख लाभलेले नाही, असे खेदाने म्हणावे लागते. ते का? कारण फक्त पवित्र शास्त्रात लाभणारा यहोवाचा सल्ला अनुसरल्यानेच अशा गोष्टी प्राप्त होऊ शकतात. तर मग आता तुम्ही काय कराल?
५२. यहोवाच्या, हर्मगिदोन युद्धाच्या वेळी दृष्टीआड होण्यासाठी, आज तुम्ही काय केले पाहिजे?
५२ ‘यहोवाचा आश्रय’ घेण्याचे व ‘धार्मिकता आणि नम्रता’ अवलंबण्याचे आमंत्रण तुम्ही स्वीकाराल का? त्याचा स्वीकार केल्यास “कदाचित् यहोवाच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.” तुम्ही या आमंत्रणाचा स्वीकार करावा व “सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाई”तून हर्मगिदोनातून—सहीसलामत वाचावे अशी आमची देवाजवळ प्रार्थना आहे.—सफन्या २:३; प्रकटीकरण १६:१४, १६.
[तळटीपा]
a विनोबा भावे यांच्या “गीताई” मधून.
[अभ्यासाचे प्रश्न]
[१४ पानांवरील चौकट/चित्रं]
सर्व एका पिढीत
१९१४
जागतिक युद्ध
हिंसक गुन्हे
व्यापक दुष्काळ
रोगांच्या साथी
जागतिक प्रदूषण
या व्यवस्थेचा अंत
[६ पानांवरील चित्रं]
हर्मगिदोन, पृथ्वीला झाडून–पुसून स्वच्छ करणारे जगव्याप्त युद्ध असेल
[८ पानांवरील चित्रं]
मानव जातीला जीवित ठेवण्यासाठी, देवाने लायक गणलेले लोक, हर्मगिदोनातून वाचतील
[१३ पानांवरील चित्रं]
१९१४ पासून हर्मगिदोनच्या युद्धाची चिन्हे दिसू लागली
[१८ पानांवरील चित्रं]
हिंदू रूढीनुसार बचावाचे साधन—शेषशायी विष्णू
[१९ पानांवरील चित्रं]
पवित्र शास्त्रातील जलप्रलय—हर्मगिदोनाची झलक
[२५ पानांवरील चित्रं]
यहोवाच्या साक्षीदारांचे संपूर्ण जगभर चाललेले, जीवदानाचे प्रचार कार्य, या युगाचा अंत दर्शविते