व्हिडिओ पाहण्यासाठी

धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?

धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?

राज्य वार्ता क्र. ३७

जगभरातील लोकांकरता एक संदेश

धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?

▪ धर्माच्या नावाखाली इतकी दुष्ट कृत्ये का केली जातात?

▪ दुष्ट कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्‍या धर्मांचा अंत केव्हा होईल?

▪ तुमच्या जीवनावर याचा कसा प्रभाव पडेल?

धर्माच्या नावाखाली इतकी दुष्ट कृत्ये का केली जात आहेत?

धर्माच्या नावाखाली आज कितीतरी अपराध केले जात आहेत. हे पाहून तुम्हाला वाईट वाटते का? स्वतःला देवाचे सेवक म्हणवणारे लोकच जेव्हा युद्धे, दहशतवाद, भ्रष्टाचार व इतर दुष्कृत्ये करतात तेव्हा हा अन्याय पाहून तुम्हाला चीड येते का? पण धर्माच्या नावाखाली इतकी दुष्ट कृत्ये का केली जातात?

दोष सर्व धर्मांचा नसून, अशा गैरकृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्‍या धर्मांचा आहे. सबंध जगात ज्याचा एक धार्मिक व्यक्‍ती म्हणून आदर केला जातो त्या येशू ख्रिस्ताने एकदा म्हटले होते, की ज्याप्रकारे “वाईट झाडाला वाईट फळ येते” त्याचप्रकारे असे धर्म लोकांना गैरकृत्ये करण्याचे प्रोत्साहन देतात. (मत्तय ७:१५-१७) धर्माच्या नावाखाली आज कोणत्या वाईट गोष्टी केल्या जात आहेत?

धर्माच्या नावाखाली केली जाणारी दुष्ट कृत्ये . . .

युद्धात व राजकारणात सहभाग घेणे: एशियावीक या बातमीपत्रकाने अलीकडे असे म्हटले: “सबंध आशियात आणि इतरत्रही, सत्तेच्या हव्यासाने झपाटलेले पुढारी स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता अतिशय कपटीपणे लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळत आहेत.” सदर बातमीपत्राने इशारा दिला की असेच चालत राहिले तर लवकरच “जगात अंदाधुंदी माजेल.” अमेरिकेतल्या एका नामवंत धर्मपुढाऱ्‍याने जाहीरपणे म्हटले की “दहशतवाद्यांनी सर्वांची कत्तल करण्याआधी त्यांनाच ठार मारले पाहिजे.” त्याने सुचवलेला उपाय? “प्रभूचे नाव घेऊन त्या सर्वांना उडवून टाका.” पण बायबल अगदी याउलट सांगते. ते म्हणते: “मी देवावर प्रीति करितो, असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे.” (१ योहान ४:२०) बंधूच काय, येशूने तर म्हटले की “आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा.” (मत्तय ५:४४) तुम्हाला असे किती धर्म माहीत आहेत की ज्यांचे सदस्य युद्धात भाग घेतात?

खोट्या शिकवणुकींचा प्रसार करणे: बहुतेक धर्मांत असे शिकवले जाते की मानवांमध्ये एक अदृश्‍य आत्मा असतो आणि देहाचा मृत्यू झाल्यानंतरही हा आत्मा जिवंत राहतो. या शिकवणुकीच्या आधारावर, बरेच धर्म आत्म्याच्या शांतीकरता निरनिराळे विधीसंस्कार करण्याच्या नावाखाली लोकांकडून भरमसाट पैसा उकळतात. पण बायबलची शिकवण वेगळी आहे. बायबल सांगते की “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतांस तर काहीच कळत नाही.” (उपदेशक ९:५) येशूने शिकवले की मृतांचे पुनरुत्थान होईल, अर्थात, त्यांना पुन्हा जिवंत केले जाईल. पण जर मानवाच्या ठायी अमर आत्मा आहे, तर त्यांना पुन्हा जिवंत करणे निरर्थक ठरेल. (योहान ११:११-२५) तुमचाही धर्म, आत्मा अमर आहे असे शिकवतो का?

लैंगिक दुराचरणावर पांघरूण घालणे: पाश्‍चात्त्य देशांमध्ये, कित्येक ख्रिस्ती पंथांत समलिंगी पुरुष व स्त्रियांना पाळक म्हणून नियुक्‍त केले जाते. बरेच पंथ समलिंगी स्त्रीपुरुषांना लग्न करण्याची परवानगी दिली जावी म्हणून सरकारवर दबाव आणतात. एरवी लैंगिक अनैतिकतेची निंदा करणाऱ्‍या चर्चेसमध्येही, लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्‍या पाळकांच्या गैरकृत्यांवर पांघरूण घातले जाताना दिसते. पण बायबल याविषयी काय शिकवते? बायबलमध्ये अगदी स्पष्ट सांगितले आहे की “स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका! जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, पुरुषवेश्‍या (पुरुष जे समलिंगी संबंधास तयार होतात), समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष . . . यांपैकी कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत.” (१ करिंथकर ६:९, १०, ईझी टू रीड व्हर्शन) तुम्हाला अशा धर्मांविषयी माहीत आहे का, की ज्यांत लैंगिक गैरकृत्ये खपवून घेतली जातात?

अशा प्रकारचे वाईट फळ उत्पन्‍न करणाऱ्‍या धर्मांचे भविष्य काय आहे? येशूने असा इशारा दिला होता: “ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते.” (मत्तय ७:१९) होय, वाईट गोष्टींना प्रोत्साहन देणाऱ्‍या धर्मांना, वाईट फळे उत्पन्‍न करणाऱ्‍या झाडाप्रमाणे तोडून, नष्ट केले जाईल! पण हे कसे आणि केव्हा घडेल? बायबलमध्ये प्रकटीकरणाच्या पुस्तकातील १७ व १८ अध्यायांत, भविष्याविषयी सांगणाऱ्‍या एका दृष्टान्ताचे वर्णन केले आहे. या दृष्टान्तातच या प्रश्‍नांची उत्तरे सापडतात.

दुष्ट कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्‍या धर्मांचा अंत कसा होईल?

डोळ्यासमोर हे चित्र उभे करा. एक वेश्‍या एका अक्राळविक्राळ श्‍वापदाच्या पाठीवर बसलेली आहे. या श्‍वापदाला सात डोकी आणि दहा शिंगे आहेत. (प्रकटीकरण १७:१-४) ही वेश्‍या कोणाला चित्रित करते? तिचे “पृथ्वीवरच्या राजांवर” वर्चस्व आहे. ती जांभळ्या रंगाची मोलवान वस्त्रे घालते, सुगंधी धूपद्रव्यांचा उपयोग करते आणि तिच्याजवळ अमाप धनसंपत्ती आहे. शिवाय, तिने तिच्या चेटकाने ‘सर्व राष्ट्रांना ठकविले आहे.’ (प्रकटीकरण १७:१८; १८:१२, १३, २३) बायबल आपल्याला हे समजण्यास मदत करते की ही वेश्‍या एक जगव्याप्त धर्मसंस्था आहे. ती कोणत्याही एका धर्माला नव्हे, तर नासकी फळे उत्पन्‍न करणाऱ्‍या म्हणजेच वाईट गोष्टींना प्रोत्साहन देणाऱ्‍या सर्व धर्मांना चित्रित करते.

ही वेश्‍या ज्या श्‍वापदावर बसलेली आहे ते श्‍वापद जगातल्या राजकीय सत्तांचे प्रतीक आहे. * (प्रकटीकरण १७:१०-१३) वाईट गोष्टींना प्रोत्साहन देणारे खोटे धर्म या राजकीय श्‍वापदाच्या पाठीवर बसले आहेत. याचा अर्थ ते त्याच्या निर्णयांवर प्रभाव पाडण्याचा आणि त्याला आपल्याला वाटेल त्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतात.

पण, लवकरच एक आश्‍चर्यकारक घटना घडणार आहे. “जी दहा शिंगे व जे श्‍वापद तू पाहिले ती कलावंतिणीचा द्वेष करितील व तिला ओसाड व नग्न करितील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील.” (प्रकटीकरण १७:१६) जगातल्या राजकीय सत्ता खोट्या धर्मांवर हल्ला करून त्यांचा समूळ नाश करतील! सर्वांना धक्का बसेल इतक्या अचानकपणे हे पाऊल उचलण्यात येईल. पण या राजकीय सत्ता असे करण्यास का प्रवृत्त होतील? बायबलमधील प्रकटीकरण या पुस्तकात याचे उत्तर सापडते: “देवाने आपली इच्छा पूर्ण करण्याचे त्यांच्या अंतःकरणात घातले.” (प्रकटीकरण १७:१७, पं.र.भा.) हो, वाईट गोष्टींना प्रोत्साहन देणाऱ्‍या धर्मांनी देवाच्या नावाखाली आजपर्यंत जी घृणित कृत्ये केली आहेत त्या सर्वांचा तो त्यांच्याकडून हिशोब घेईल. या धर्मांनी ज्या राजकीय सत्तांशी सलगी केली होती त्यांच्याच हातून या धर्मांचा नाश घडवून आणण्याद्वारे देव आपल्या परिपूर्ण न्यायबुद्धीने ही कारवाई करेल.

या नाशातून तुम्हाला सुरक्षित बचावायचे असेल तर तुम्ही काय केले पाहिजे? देव आपल्या दूताकडून अशी आज्ञा देतो: “माझ्या लोकांनो, तिच्यामधून निघा.” (प्रकटीकरण १८:४) वाईट गोष्टींना प्रोत्साहन देणाऱ्‍या धर्मांतून बाहेर पडण्याची हीच वेळ आहे! पण बाहेर पडून तुम्ही जाणार कोठे? नास्तिकवादाकडे वळू नका, कारण देवावर विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांचेही भविष्य अंधकारमय आहे. (२ थेस्सलनीकाकर १:६-९) तेव्हा आश्रयाचे एकच स्थान आहे, अर्थात, खरा धर्म. पण खरा धर्म कोणता हे तुम्ही कसे ओळखू शकता?

खरा धर्म कसा ओळखाल?

खऱ्‍या धर्मात कोणती चांगली फळे दिसून आली पाहिजेत?—मत्तय ७:१७.

खरा धर्म . . .

प्रीतीबद्दल केवळ उपदेश करत नाही तर ती आचरणात आणतो: खरे उपासक या “जगाचे” नाहीत. त्यांच्यामध्ये जातीभेद, वर्णभेद किंवा सांस्कृतिक भेदभाव नाहीत, तर त्यांची “एकमेकांवर प्रीति” आहे. (योहान १३:३५; १७:१६; प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) एकमेकांचा जीव घेण्याऐवजी ते एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असतात.—१ योहान ३:१६.

देवाच्या वचनावर भरवसा ठेवतो: मानवी ‘संप्रदाय’ व ‘मनुष्याचे नियम, शास्त्र म्हणून’ शिकवण्याऐवजी खऱ्‍या धर्माचे सिद्धान्त देवाच्या वचनावर अर्थात बायबलवर आधारित आहेत. (मत्तय १५:६-९) का? कारण ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्‍वरप्रेरित’ आहे व “सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍याकरिता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६)

कौटुंबिक नाती दृढ करतो आणि शुद्ध नैतिक आचरणाला प्रोत्साहन देतो: खऱ्‍या धर्मात पतींना “आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति” करण्यास शिकवले जाते. पत्नींना “आपल्या पतीची भीड” राखायला मदत केली जाते आणि मुलांना ‘आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहण्याचे’ प्रशिक्षण दिले जाते. (इफिसकर ५:२८, ३३; ६:१) शिवाय, ज्यांना अधिकाराची पदे दिली जातात त्यांच्याकडून निष्कलंक व अनुकरणीय नैतिक आचरणाची अपेक्षा केली जाते.—१ तीमथ्य ३:१-१०.

हे मापदंड पूर्ण करणारा कोणता धर्म आहे का? दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान नात्सी सत्तेने केलेल्या हजारो ज्यूंच्या संहाराच्या संदर्भात, २००१ साली प्रकाशित करण्यात आलेल्या हॉलोकॉस्ट पॉलिटिक्स या पुस्तकात असे म्हटले आहे: “यहोवाचे साक्षीदार ज्या सिद्धान्तांचा प्रचार व त्यांचे अनुसरण करतात तेच इतर लोकांनीही केले असते, तर हा हॉलोकॉस्ट (मानवसंहार) टळला असता आणि जगात पुन्हा कधीही कोठेही जातिसंहार घडला नसता.”

ही अतिशयोक्‍ती नाही. यहोवाचे साक्षीदार आज २३५ देशांत, बायबलमधील नीतिनियमांविषयी केवळ उपदेशच करत नाहीत तर, जीवनात त्यांचे पालन करतात. देवाची उपासना स्वीकारयोग्य पद्धतीने करण्याकरता देव तुमच्याकडून काय अपेक्षा करतो हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? मग, हे जाणून घेण्यास मदत करण्याची यहोवाच्या साक्षीदारांना विनंती करावी असे आम्ही आपल्याला प्रोत्साहन देऊ इच्छितो. योग्य पाऊल उचलण्याची हीच वेळ आहे. उशीर लावू नका. दुष्ट कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्‍या सर्व धर्मांचा अंत जवळ आहे!—सफन्या २:२, ३.

यहोवाचे साक्षीदार बायबलवर आधारित ज्या संदेशाचा प्रचार करतात, त्याविषयी अधिक माहिती मिळवण्याची तुमची इच्छा असल्यास खालील पत्त्यावर त्यांच्याशी संपर्क साधावा.

□ कोणत्याही बाध्यतेविना कृपया मला जागृत राहा! या पत्रिकेसंबंधी अधिक माहिती पाठवावी.

□ विनामूल्य गृह बायबल अभ्यासासंबंधी कृपया माझ्याशी संपर्क साधावा.

[तळटीप]

^ परि. 17 या विषयावर सविस्तर स्पष्टीकरण यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! या पुस्तकात सापडेल.

[३ पानांवरील संक्षिप्त आशय]

दुष्ट कृत्यांना प्रोत्साहन देणारे धर्म “पृथ्वीवरच्या राजांवर” वर्चस्व करतात

[३ पानांवरील संक्षिप्त आशय]

‘माझ्या लोकांनो, तिच्यामधून निघा’