व्हिडिओ पाहण्यासाठी

या जगाचा बचाव होईल का?

या जगाचा बचाव होईल का?

या जगाचा बचाव होईल का?

जगाचा अंत होण्याबद्दल इतके बोलणे कोणत्याही पिढीने ऐकले नसेल. अण्वस्त्राद्वारे जगाचा संपूर्ण नाश होईल अशी भिती पुष्कळांना वाटते. अनेकांना वाटते की प्रदुषणामुळे जगाचा नाश होईल. काहीजन असा विचार करतात की आर्थिक गोंधळ मानव वंशजास एकमेकांविरुद्ध उठवेल.

या जगाचा खरचं अंत होईल का? जर झाला, तर त्याचा काय अर्थ होईल? जगाचा पूर्वी कधी असा अंत झाला होता का?

एका जगाचा अंत—दुसऱ्‍याची स्थापना

होय, एका जगाचा नाश जरूर झाला होता. नोहाच्या दिवसातील दुष्टाईने ओतप्रोत भरलेल्या जगाचा विचार करा. पवित्र शास्त्र याचे स्पष्टीकरण देताना म्हणतेः “तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला.” तसेच पवित्र शास्त्र हे देखील सांगते की, “त्याने [देवाने] प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्‍तांच्या जगावर जलप्रलय आणिला, आणि नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्‍याचे सात जणांसह रक्षण केले.”—२ पेत्र २:५; ३:६.

त्या जगाच्या नाशाचा अर्थ काय होत होता व काय होत नव्हता याकडे लक्ष द्या. मानवजातीचा शेवट असा याचा अर्थ झाला नाही. जागतिक प्रलयातून नोहा व त्याच्या कुटुंबाचा बचाव झाला. तसेच पृथ्वी ग्रहाचा व सुंदर तारकांमय आकाशाचाही बचाव झाला होता. केवळ “अभक्‍तांच्या जगाचा,” दुष्ट व्यवस्थिकरणाचा नाश घडला.

अखेरीस, नोहाची संतती जसजशी वाढली तसतशी दुसऱ्‍या जगाची वाढ झाली. तेच दुसरे जग किंवा व्यवस्थिकरण आज आमच्या दिवसापर्यंत अस्तित्वात आहे. याचा इतिहास युद्ध, गुन्हेगारी, व हिंसाचार याने भरलेला आहे. आता, या जगाचे काय होईल? याचा बचाव होईल काय?

या जगाचे भवितव्य

नोहाच्या दिवसातील जगाला नाशाला सामोरे जावे लागले हे सांगितल्यानंतर पवित्र शास्त्र अहवाल पुढे म्हणतोः “आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत.” (२ पेत्र ३:७) खरे पाहता, दुसरा एक पवित्र शास्त्र लेखक स्पष्टीकरण देतो, त्याप्रमाणेः “हे जग [आता अस्तित्वात असणारे] नाहीसे होत आहे.”—१ योहान २:१७.

पवित्र शास्त्र असे म्हणत नाही की खरोखरची पृथ्वी व तारकांमय आकाश नाहीसे होईल, आणि तसे ते नोहाच्या दिवसातही नाहीसे झाले नव्हते. (स्तोत्रसंहिता १०४:५) तर, हे जग, त्याचे “आकाश,” म्हणजे सैतानी प्रभावाखालील राजकीय सत्ता, व “पृथ्वी,” म्हणजे मानवी समाज, यांचा जणू काय अग्नीने नाश होईल. (योहान १४:३०; २ करिंथकर ४:४) प्रलयापूर्वीच्या जगाप्रमाणेच या व्यवस्थिकरणाचा विनाश होईल. या जगाचा अंत होण्याआधी जे काही घडणार आहे ते स्पष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्ताने “नोहाच्या दिवसा”तील परिस्थितीचा उदाहरणादाखल उल्लेख केला.—मत्तय २४:३७-३९.

खरे पाहता, येशूने नोहाच्या दिवसासंबंधी जे सांगितले ते त्याच्या शिष्यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचेही उत्तर होते कीः “आपल्या येण्याचे व ह्‍या जगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” (मत्तय २४:३, किंग जेम्स्‌ व्हर्शन) ह्‍या जगाचा शेवट होणार आहे हे येशूच्या शिष्यांना माहीत होते. मग ह्‍या होणाऱ्‍या भावी गोष्टीने ते भयभीत झाले का?

याच्या विरुद्ध, येशूने जगाचा शेवट जवळ येत असताना घडणाऱ्‍या घटनांविषयी सांगितले तेव्हा, त्याने त्यांना ‘त्यांचा मुक्‍तिसमय जवळ आला आहे’ असे सांगून आनंद करण्याचे उत्तेजन दिले. (लूक २१:२८) होय, ही सैतान व त्याच्या दुष्ट व्यवस्थिकरणापासून सुटका होऊन शांतीमय नवीन जगात प्रवेश मिळणार!—२ पेत्र ३:१३.

पण या जगाचा अंत केव्हा होईल? त्याच्या “येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे” कोणते “चिन्ह” येशूने दिले?

“चिन्ह”

“येणे” यासाठी भाषातंरीत केलेला ग्रीक शब्द रोसिʹआ, आहे व याचा अर्थ “उपस्थिती” म्हणजेच, समक्ष असणे असा आहे. यास्तव, “चिन्ह” दिसताच ख्रिस्त लगेच येईल असा याचा अर्थ होत नाही तर त्याचे परतणे घडले असून तो उपस्थित आहे असा अर्थ होतो. तसेच त्याने स्वर्गीय राजा या नात्याने अधिपत्य अदृश्‍यरित्या सुरु केले व त्याच्या शत्रूंचाही तो लवकरच अंत करील असा याचा अर्थ होतो.—प्रकटीकरण १२:७-१२; स्तोत्रसंहिता ११०:१, २.

येशूने “चिन्ह” म्हणून केवळ एकच घटना दिलेली नाही. त्याने पुष्कळ जागतिक घटना व परिस्थितींचा उल्लेख केला. पवित्र शास्त्र लेखकांनी ज्याला “शेवटला काळ” म्हटले आहे त्याच कालावधीत या सर्व घटना घडतील. (२ तीमथ्य ३:१-५; २ पेत्र ३:३, ४) येशूने भाकित केल्याप्रमाणे “शेवटल्या काळा”ला चित्रीत करणाऱ्‍या काही गोष्टी विचारात घ्या.

“राष्ट्रांवर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल.”  (मत्तय २४:७) आधुनिक काळातील युद्ध पूर्वी कधीही नव्हते इतके प्रचंड आकारमान घेत आहे. एका इतिहासकाराने निरीक्षलेः “पहिले जागतिक महायुद्ध [१९१४ला सुरु झालेले] हे पहिले ‘सार्वत्रिक’ युद्ध होते.” तथापि, दुसरे महायुद्ध सर्वात हानीकारक युद्ध ठरले. आणि अशाप्रकारे युद्धाने पृथ्वीची नासधूस करणे चालूच ठेवले आहे. होय, येशूचे शब्द किती नाट्यमय रितीने पूर्णत्वाला पोंहचले!

“जागोजागी दुष्काळ होतील.”  (मत्तय २४:७) पहिल्या महायुद्धानंतर लगेच इतिहासातील सर्वात मोठ्या दुष्काळाची सुरुवात झाली. दुसऱ्‍या महायुद्धानंतर भयानक अन्‍नटंचाई उद्‌भवली. प्रत्येक वर्षाला १कोटी ४०दशलक्ष मुलांचा बळी घेऊन पृथ्वीवरील जनसंख्येच्या पंचमांश लोकांवर उपासमारीच्या आपत्तीचा परिणाम होतो. खरेच, “अन्‍नाची टंचाई” जरुर भासते!

“भूमिकंप होतील.”  (लूक २१:११) मागील शतकातील सरासरी पाहता, १९१४पासून प्रत्येक वर्षी दहाच्या पटीने लोक भूमिकंपात मृत्युमुखी पडत आहेत. त्यातील मोठ्या घटनांतील काहींचा विचार कराः १९२०, चीन मध्ये, २,००,०००ठार झाले; १९२३, जपान मध्ये, ९९,३०० जखमी झाले; १९३९, तुर्की मध्ये, ३२,७०० जणांची प्राणहानी झाली; १९७०, पेरु मध्ये, ६६,८०० मृत्युमुखी पडले; आणि १९७६, चीनमध्ये जवळजवळ २,४०,००० (किंवा काही माहितीप्रमाणे, ८,००,०००) इतकी प्राणहानी झाली. खरेच, “मोठे भूमिकंप”!

“जागोजागी मऱ्‍या येतील.”  (लूक २१:११) पहिल्या जागतिक महायुद्धानंतर लगेच, २कोटी १०लक्ष लोक स्पॅनिश फ्लू च्या साथीने मरण पावले. सायन्स डायजेस्ट अहवाल देतोः “इतका कडक व झटकन घडून येणारा मृत्यूचा तडाखा संपूर्ण इतिहासात कधीही घडला नव्हता.” तेव्हापासून हृदयाचे रोग, कर्करोग, एडस्‌ व अशाप्रकारच्या अनेक साथींनी हजारो लाखो लोकांना मृत्यूमुखी पाडले.

“अनीतित वाढ.”  (मत्तय २४:१२) १९१४ पासून आमचे जग गुन्हेगारी व हिंसाचाराचे जग म्हणून ओळखले जाऊ लागले. पुष्कळ भागात तर दिवसादेखील रस्त्याने जाणे कोणालाही सुरक्षिततेचे वाटत नाही. रात्रीच्या वेळेसही लोक आपल्या घरांना कुलुपे लावून व संरक्षणासाठी लोखंडी जाळीचे दरवाजे लावून असतात, रात्री बाहेर जाण्यास त्यांना भय वाटते.

आणखी खूप गोष्टी शेवटल्या दिवसात घडतील असे भाकीत केले होते, व त्यांची पूर्णताही होत आहे. याचा हा अर्थ आहे की जगाचा अंत जवळ आला आहे. पण आंनदाची गोष्ट म्हणजे त्यातून बचावणारे आहेत. “जग नाहीसे होत आहे,” असे म्हटल्यानंतर पवित्र शास्त्र अभिवचन देते कीः “देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१७.

यास्तव, आम्हाला देवाची इच्छा जाणून घेऊन त्याप्रमाणे वागण्याची आवश्‍यकता आहे. तरच आम्ही देवाच्या नव्या व्यवस्थिकरणात अनंतकालीक आशीर्वादांचा आनंद लुटण्यासाठी या युगाच्या अंतापासून वाचू शकतो. पवित्र शास्त्र अभिवचन देते की त्यावेळीः “देव. . .[लोकांच्या] डोळ्यांचे ‘सर्व अश्रु पुसून टाकील;’ ह्‍यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट ही नाहीत.”—प्रकटीकरण २१:३, ४.

अन्यथा सूचित केले नसल्यास येथे वापरलेले बायबल भाषांतर द होली बायबल मराठी—आर. व्ही. हे आहे.

[६ पानांवरील चित्र श्रेय]

Photo Credits: Airplane: USAF photo. Child: WHO photo by W. Cutting. Earth quake: Y. Ishiyama, Hokkaido University, Japan.