व्हिडिओ पाहण्यासाठी

शांतीदायक नवीन जगातील जीवन

शांतीदायक नवीन जगातील जीवन

शांतीदायक नवीन जगातील जीवन

या पत्रिकेच्या मुखपृष्ठावरील चित्र बघा. तुमच्या मनात कोणत्या भावना येतात? या चित्रात दिसणारी शांती, आनंद व समृद्धता तुम्हाला हवीहवीशी वाटत नाही का? होय, नक्कीच वाटते. तथापि, अशाप्रकारची परिस्थिती खरीच अस्तित्वात येईल की हे नुसते स्वप्न किंवा काल्पनिक विचार आहेत?

पुष्कळ लोकांना असेच वाटते. युद्धे, गुन्हे, उपासमार, आजार, वार्धक्य या काहींचा उल्लेख करता येईल अशा गोष्टी आज वास्तवता बनल्या आहेत. तरीसुद्धा आशा बाळगण्याजोगे कारण आहे. भवितव्याकडे दृष्टीक्षेप टाकून बायबल “ज्यामध्ये धार्मिकता वास करते असे नवे आकाश व नवीन पृथ्वी ह्‍यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत” असे भाष्य करते.—२ पेत्र ३:१३; यशया ६५:१७.

बायबलमध्ये नमूद असणारे हे “नवे आकाश” व “नवी पृथ्वी”, नवे भौतिक आकाश आणि नवी वास्तविक पृथ्वी नाही. या पार्थिव पृथ्वी व आकाशाला परिपूर्ण बनविण्यात आले होते आणि ते सर्वकाळ टिकून राहील असे बायबल म्हणते. (स्तोत्रसंहिता ८९:३६, ३७; १०४:५) तद्वत, “नवी पृथ्वी” म्हणजे पृथ्वीवर जिवंत राहणारा धार्मिक लोकांचा समाज तसेच “नवे आकाश” म्हणजे पृथ्वीवरील या लोकांच्या समाजावर प्रभुत्व करणारे परिपूर्ण स्वर्गीय राज्य वा सरकार असा याचा अर्थ आहे. पण अशी ही “नवी पृथ्वी” किंवा नवे वैभवी जग शक्य आहे असे खरेच मानता येईल का?

अशी ही मनोरम परिस्थिती देवाने पृथ्वीसाठी उद्देशिलेल्या देवाच्या मूळ उद्देशाचा भाग होती हे विचारात घ्या. त्याने पृथ्वीवरील एदेन नंदनवनात पहिल्या मानवी दांपत्याला ठेवले व त्यांना एक अद्‌र्भित कार्यभाग सोपून दिला: “फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेत आणा.” (उत्पत्ती १:२८) होय, त्यांनी मुलांना जन्म द्यावा व त्यांचे ते नंदनवन ओघाओघाने पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यापर्यंत पसरवावे असा देवाचा त्यांच्याकरता उद्देश होता. तथापि, त्यांनी नंतर देवाची अवज्ञा करण्याचे निवडले व त्याद्वारे सर्वकाळ जिवंत राहण्यासाठी अपात्र असल्याचे सिद्ध केले तरीही देवाचा तो मूळचा उद्देश बदलला नाही. तो नवीन जगात पूर्ण व्हावयाला हवाच!—यशया ५५:११.

तुम्ही प्रभूची प्रार्थना किंवा “आमच्या स्वर्गातील पित्या” ही प्रार्थना म्हणता व त्यामध्ये देवाचे राज्य यावे अशी विनंती करता त्यावेळी तुम्ही त्याचे स्वर्गीय सरकार येऊन त्याने या पृथ्वीतील दुष्टता झाडून टाकून नव्या जगावर राज्य करावे असेच प्रार्थित असता. (मत्तय ६:९, १०) देव त्या प्रार्थनेचे जरूर उत्तर देईल हा आत्मविश्‍वास आम्हाला बाळगता येईल कारण त्याच्या वचनात हे अभिवचन आहे: “नीतीमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्रसंहिता ३७:२९.

देवाच्या नव्या जगातील जीवन

आपल्या लोकांनी या पृथ्वीवर आनंद उपभोगावा असे देवाने आरंभाला उद्देशिले होते त्याच्या अनुषंगाने देवाचे राज्य अतुलनीय आशीर्वाद पृथ्वीतलावर आणून सर्व काही चांगले करुन दाखवील. तेव्हा द्वेष व अहंभाव राहणारच नाहीत आणि पृथ्वीवर असणारा प्रत्येक जण दुसऱ्‍याचा खरा मित्र असेल. बायबलमध्ये देव अभिवचन देतो की तो “पृथ्वीच्या दिगंतापर्यंत लढाया बंद करील.” “यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.”—स्तोत्रसंहिता ४६:९; यशया २:४.

सबंध पृथ्वी ही हळुवारपणे उद्यानासारख्या नंदनवनमय स्थितीत आणली जाईल. बायबल म्हणते: “अरण्य व रूक्ष भूमि ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमळाप्रमाणे फुलेल. . . . कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील. जेथे मृगजळ दिसते तेथे तलाव होईल, तृषित भूमीचे ठिकाणी उपळते झरे होतील.”—यशया ३५:१, ६, ७.

पृथ्वीवरील नंदनवनात आनंदी राहण्याचे हरएक कारण असेल. अन्‍नाचा तुटवडा आहे म्हणून उपासमार सोसावी लागत आहे असे कधीही होणार नाही. “भूमी आपला उपज देईल,” असे बायबल म्हणते. (स्तोत्रसंहिता ६७:६; ७२:१६) प्रत्येकाला आपल्या श्रमाचे फळ मिळेल कारण निर्माणकर्त्याचे हे अभिवचन आहे: “ते . . . द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. . . . ते लावणी करतील व फळ दुसरे खातील असे व्हावयाचे नाही.”—यशया ६५:२१, २२.

लोक, घरांची टंचाई आहे म्हणून मोठमोठ्या इमारतीत कोंबल्याप्रमाणे राहात आहेत वा झोपड्या उभारून राहात आहेत असे दृश्‍य देवाच्या नव्या जगात दिसणार नाही. कारण देवाने असे उद्देशिलेले आहे: “ते घरे बांधून त्यात राहतील . . . ते घरे बांधतील व त्यांत दुसरे राहतील . . . असे व्हावयाचे नाही.” शिवाय “त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाही,” असेसुद्धा बायबल म्हणते. (यशया ६५:२१–२३) अशाप्रकारे लोकांना फलदायी व समाधान देणारे काम असेल. जीवन कंटाळवाणे वाटणार नाही.

काही काळातच देवाचे राज्य, एदेनात प्राण्यांमध्ये आपसात तसेच प्राणी व मानव यांच्यामध्ये शांतीप्रिय नाते नांदत होते त्याचीही पुनर्स्थापना करील. बायबल म्हणते: “लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल. वासरू, तरूण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील; त्यांस लहान मूल वळील.”—यशया ११:६–९; होशेय २:१८.

याखेरीज, या नंदनवनमय पृथ्वीवर सर्व आजार व शारीरिक अपंगत्व सुद्धा बरे केले जाईल याचा जरा विचार करा! “मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही,” अशी देवाचे वचन आपल्याला खात्री देते. (यशया ३३:२४) “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील, यापुढे मरण हे नाही, शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत, कारण पूर्वीच्या गोष्टी सरल्या आहेत.”—प्रकटीकरण २१:४.

ते तुम्हासाठी कसे शक्य होईल

धार्मिकतेच्या नव्या जगातील जीवनासंबंधाने देवाने दिलेल्या अभिवचनांमुळे तुमचे अंतःकरण नक्कीच हेलावले असणार. या आशीर्वादांची पूर्ति होणे अशक्य आहे असे काही म्हणतील तरी ती आमच्या प्रेमळ देवाच्या दृष्टीने अशक्य अशी नाही.—स्तोत्रसंहिता १४५:१६, मीखा ४:४.

अर्थातच, आम्हाला पृथ्वीवरील भावी नंदनवनात सदासर्वदा जगायचे आहे तर त्याविषयीच्या काही गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. येशूने देवास प्रार्थना करताना यापैकीची महत्वपूर्ण गरज याप्रकारे बोलून दाखविली: “सार्वकालिक जीवन हेच आहे की जो तूच एकच खरा देव त्या तुझे व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताविषयीचे ज्ञान त्यांनी संपादावे.”—योहान १७:३.

अशाप्रकारे आपल्याला देवाच्या नव्या जगात जगण्याची खरीच इच्छा आहे तर प्रथमतः आम्ही देवाची इच्छा काय आहे ते शिकून घेऊन त्याप्रमाणे कृती आचरली पाहिजे. कारण ही सत्य वस्तुस्थिति आहे की, हे “जग व त्याची वासना नाहीशी होत आहे; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा” जे आशीर्वाद आमचा प्रेमळ निर्माणकर्ता आणणार आहे त्यांचा उपभोग चिरकालपणे घेण्यासाठी “सर्वकाळ राहील.”—१ योहान २:१७.

अन्यथा सूचित केले नसल्यास येथे वापरलेले बायबल भाषांतर द होली बायबल मराठी—आर. व्ही. हे आहे.