व्हिडिओ पाहण्यासाठी

सर्व लोक कधी एकमेकांवर प्रीती करतील का?

सर्व लोक कधी एकमेकांवर प्रीती करतील का?

राज्य वार्ता क्र. ३५

सर्व लोक कधी एकमेकांवर प्रीती करतील का?

शेजाऱ्‍याबद्दलची प्रीती थंडावली आहे

लाखो लोकांना लाचार, दुःखी व निराधार असल्यासारखे वाटते. व्यापार करण्याचे थांबवलेल्या एका महिलेने म्हटले: ‘माझ्या शेजारी राहणाऱ्‍या एका विधवेने एका संध्याकाळी माझं दार वाजवलं व मला म्हणाली की तिला एकटं एकटं वाटतंय. मी तिला सभ्यतेने पण सरळ सांगून टाकलं की मला बिलकुल वेळ नाहीए. त्रास दिल्याबद्दल क्षमा मागून ती निघून गेली.’

दुःखाची गोष्ट अशी, की त्याच रात्री त्या विधवेने आत्महत्या केली. यातून मी “अतिशय कठीण धडा” शिकले, असे त्या स्त्रीने म्हटले.

शेजाऱ्‍याबद्दलच्या प्रीतीच्या उणीवेमुळे बहुधा दुःखद परिणाम उद्‌भवतात. युगोस्लाव्हियाचा पूर्वी भाग असलेल्या बोस्निया व हर्जेगोव्हिना येथील जातीय झगड्यांदरम्यान दशलक्षांपेक्षा अधिक लोकांना आपली घरे सोडण्यास भाग पडले व हजारो हजारोंना आपल्या जिवांस मुकावे लागले. कोणामुळे? “आमच्या शेजाऱ्‍यांमुळे. आम्ही त्यांना ओळखत होतो,” असे तिच्या गावातून हाकलून लावलेल्या एका मुलीने दुःखाने सांगितले.

र्‌वांडात लाखो लोकांची कत्तल त्यांच्याच शेजाऱ्‍यांनी केली. द न्यूयॉर्क टाईम्स म्हणते, “हुतू आणि तुत्सी एकत्र [राहत], एकमेकांशी विवाह करत, कोण कुणाचा किंवा हुतू कोण आणि तुत्सी कोण याची कुणालाही पर्वा नव्हती. मग अचानक एक वादळ उठले आणि कत्तली होऊ लागल्या.”

याचप्रमाणे, इस्राएलमध्ये यहुदी आणि अरबी लोक शेजारी शेजारी राहत असूनही पुष्कळ जण एकमेकांचा द्वेष करतात. हीच परिस्थिती, आयर्लंडमधील अनेक कॅथलिक व प्रोटेस्टंट आणि इतर राष्ट्रांतील अनेक लोकांच्या बाबतीत आहे. प्रीतीची इतकी उणीव पूर्वी इतिहासात केव्हाही नव्हती.

शेजाऱ्‍याबद्दलची प्रीती थंडावण्यामागचे कारण काय?

आपला सृष्टीकर्ता याचे उत्तर देतो. त्याचे वचन अर्थात बायबल आपण ज्या दिवसांत जगत आहोत त्यांना ‘शेवटला काळ’ संबोधते; हा असा काळ आहे जेव्हा लोक “ममताहीन” होतील असे बायबल भविष्यवाणी सांगते. या ‘कठीण दिवसांविषयी’ ज्याला शास्त्रवचनांमध्ये ‘युगाची समाप्ती’ असेही संबोधण्यात आले आहे, येशू ख्रिस्ताने भाकीत केले, की “पुष्कळांची प्रीति थंडावेल.” (तिरपे वळण आमचे.)—२ तीमथ्य ३:१-५; मत्तय २४:३, १२.

यास्तव, आज दिसत असणारी प्रीतीची उणीव, आपण या जगाच्या शेवटल्या दिवसांमध्ये जगत असल्याच्या पुराव्यातील एक भाग आहे. पण, अभक्‍त लोकांच्या या जगाचा लवकरच नाश होऊन त्याची जागा प्रीतीने शासन करणारे एक धार्मिक नवे जग घेईल ही आनंदाची गोष्ट आहे.—मत्तय २४:३-१४; २ पेत्र २:५; ३:७, १३.

सर्व लोक एकमेकांवर प्रीती करण्यास व एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहण्यास शिकतील असा मोठा बदल शक्य आहे हा विश्‍वास बाळगण्यासाठी आपल्याकडे खरोखरच कारण आहे का?

शेजाऱ्‍याबद्दल प्रीती—एक सत्य

“माझा शेजारी कोण?” असे पहिल्या शतकातील एका वकिलाने येशूला विचारले. तेव्हा, ‘तुझे सहयहुदी,’ असे उत्तर येशू आपल्याला देईल असे त्याला वाटले असावे यात काहीच शंका नाही. पण, शेजारधर्माला जागणाऱ्‍या शोमरोन्याच्या गोष्टीत येशूने दाखवले की इतर राष्ट्रांचे लोकही आपले शेजारी आहेत.—लूक १०:२९-३७; योहान ४:७-९.

देवावर प्रीती करण्याच्या आज्ञेपाठोपाठ शेजाऱ्‍यावरील प्रीतीने आपल्या जीवनावर नियंत्रण करावे यावर येशूने जोर दिला. (मत्तय २२:३४-४०) पण, कोणत्याही लोकसमूहाने आपल्या शेजाऱ्‍यांवर खरोखरची प्रीती केली आहे का? प्राचीन ख्रिश्‍चनांनी केली! इतरांबद्दल असलेल्या प्रीतीमुळे ते नावाजलेले होते.—योहान १३:३४, ३५.

आणि आज? ख्रिस्तासारख्या प्रीतीचे आचरण कोणी करतो का? एन्सायक्लोपिडीआ कॅनडियन याने असे निरीक्षण केले: “यहोवाच्या साक्षीदारांचे कार्य, येशू आणि त्याच्या शिष्यांनी आचरलेल्या मूळ ख्रिस्ती विश्‍वासाचे पुनर्जीवन व पुनःस्थापना आहे . . . ते सर्व बांधव आहेत.”

याचा काय अर्थ होतो? हाच की, यहोवाचे साक्षीदार वंश, राष्ट्रीयत्व किंवा जातीय पार्श्‍वभूमीमुळे आपल्या शेजाऱ्‍यांचा द्वेष करीत नाहीत. किंवा ते कोणाची कत्तलही करणार नाहीत कारण त्यांनी लाक्षणिकरीत्या आपल्या तलवारी मोडून त्यांचे फाळ व भाल्यांच्या कोयत्या केल्या आहेत. (यशया २:४) वास्तविक पाहता, साक्षीदार त्यांच्या शेजाऱ्‍यांना मदत करण्यात पुढाकार घेणारे म्हणून नावाजलेले आहेत.—गलतीकर ६:१०.

म्हणूनच तर कॅलिफोर्नियाच्या सेक्रमेन्टो युनियन या अग्रलेखाने पुढीलप्रमाणे नोंद केली: “सर्व जग यहोवाच्या साक्षीदारांच्या तत्त्वांप्रमाणे चालले असते तर रक्‍तपात आणि द्वेषाचा केव्हाच अंत झाला असता व प्रीतीचे राज्य असते, एवढेच म्हणणे पुरे आहे.” हंगेरीच्या रिंग नामक नियतकालिकातील एका लेखकाने म्हटले: “मी या निष्कर्षावर पोहंचलो आहे की पृथ्वीवर केवळ यहोवाचे साक्षीदारच असते तर युद्धे नाहीशी झाली असती आणि पोलिसांना फक्‍त वाहतुकीच्या नियंत्रणाचे व पासपोर्ट काढून देण्याचे काम राहिले असते.”

परंतु, सर्व लोकांनी एकमेकांना प्रीती दाखवयाची आहे तर एक मोठा, विश्‍वव्यापी बदल होणे आवश्‍यक आहे हे आपल्याला कबूल करावे लागेल. तो बदल कसा येईल? (कृपया मागील पृष्ठ पाहा.)

सर्व लोक एकमेकांवर प्रीती करतील तेव्हा

येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना, एक नाट्यमय बदल लवकरच घडणार असल्याचे दाखवते. डोंगरावरील प्रसिद्ध प्रवचनात येशूने आपल्याला प्रार्थना करावयास शिकवले: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”—मत्तय ६:१०.

देवाचे राज्य काय आहे? स्वर्गातून शासन करणारे ते एक वास्तविक सरकार आहे. म्हणूनच त्याला “स्वर्गाचे राज्य” असे म्हटले आहे. “शांतीचा अधिपति,” येशूला त्याच्या पित्याने या राज्याचा शासक म्हणून नियुक्‍त केले आहे.—मत्तय १०:७; यशया ९:६, ७; स्तोत्र ७२:१-८.

देवाचे राज्य आल्यावर या द्वेषयुक्‍त जगाचे काय होईल? ‘ते राज्य’ जगाच्या सर्व भ्रष्ट सरकारांचे “चूर्ण करून त्यांस नष्ट करील.” (दानीएल २:४४) बायबल म्हणते: ‘जग नाहीसे होत चालले आहे. पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.’—१ योहान २:१७.

देवाच्या नवीन जगाबद्दल बायबल म्हणते: “नीतिमान्‌ पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:९-११, २९; नीतिसूत्रे २:२१, २२) किती वैभवी काळ असेल तो! “ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.” (प्रकटीकरण २१:४) मृतजण पुन्हा जिवंत होतील आणि संपूर्ण पृथ्वीचे एका खऱ्‍याखुऱ्‍या परादीसमध्ये रूपांतर होईल.—यशया ११:६-९; ३५:१, २; लूक २३:४३; प्रेषितांची कृत्ये २४:१५.

देवाच्या नव्या जगात जगण्याकरता, आपण एकमेकांवर प्रीती केली पाहिजे, देवही आपल्याला हेच करायला शिकवतो. (१ थेस्सलनीकाकर ४:९) एक पौर्वात्य बायबल विद्यार्थी म्हणाला: “बायबल अभिवचन देते त्याप्रमाणे सर्व लोक एकमेकांवर प्रीती करण्यास शिकलेले असतील त्या काळाची मी आतुरतेने वाट पाहत आहे.” देव त्याचे अभिवचन पूर्ण करील याची आपण खात्री बाळगू शकतो! देव म्हणतो: “मी बोलतो . . . ते शेवटास नेतो.”—यशया ४६:११.

पण देवराज्यातील आशीर्वादांचा आनंद तुम्हाला लुटायचा आहे तर, संपूर्ण जगभरात कोट्यवधी लोकांप्रमाणे तुम्हालाही बायबलचे ज्ञान घेतले पाहिजे. (योहान १७:३) देव आपल्याकडून काय अपेक्षितो? नामक ३२ पानी माहितीपत्रक तुम्हाला साहाय्य करील. मागील पानावरील कूपन भरून नजीकच्या पत्त्यावर पाठवून एक प्रत मिळवा.

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

Sniper and funeral in Bosnia: Reuters/Corbis-Bettmann