व्हिडिओ पाहण्यासाठी

सुरक्षित भवितव्य —तुम्हास कसे लाभेल

सुरक्षित भवितव्य —तुम्हास कसे लाभेल

सुरक्षित भवितव्य—तुम्हास कसे लाभेल

१. तुम्हाला स्वतःकरिता व तुमच्या प्रियजनाकरिता कशा प्रकारची सुरक्षितता आवडेल?

 समाजातील सर्व थरांच्या लोकांना सुरक्षिततेची अतिशय इच्छा असते. खात्रीने तुम्हीही स्वतःकरिता व तुमच्या जिवलग आप्तेष्ठांसाठी तेच इच्छिता. पुढे कधीतरी बरे दिवस येतील अशा नुसत्या आशेपेक्षा अधिक काही मिळावे अशी बहुतेकांची इच्छा असते. सध्या आपल्यापुढे जीवनातील अनेक तातडीचे प्रश्‍न उभे आहेत. आता आणि भवितव्यातही सुरक्षितता देईल असे काही तरी असण्याची अत्यंत गरज आहे. अशी सुरक्षितता शक्य आहे का?

२. (अ) यशया ३२:१७, १८ मध्ये सुरक्षिततेबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते? (ब) तशी परिस्थिती तुम्हालाहि हवीशी वाटते का?

जगाच्या सर्व भागातील व सर्व वंशातील अनेकांना तिच्या शक्यतेबद्दलची खात्री आहे. त्यांना प्रतीत असलेल्या सुरक्षिततेबद्दल देवाच्या एका प्रेरित संदेष्ट्याने लिहिले आहे: “नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फल सर्वकाळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल; आणि माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानांत सुखाश्रमांत राहतील.” (यशया ३२:१७, १८) सध्या जगभरात गोंधळाची परिस्थिती असली तरीही जगाच्या सर्व भागातील हजारो लोक या शांतीपूर्ण सुरक्षिततेचा आनंद लुटत आहेत. तसेच त्यांच्यापाशी याहूनही उत्तम भविष्याची खात्री वाटण्याजोगे कारण आहे. त्यांच्याबरोबर तुम्हीहि या फायद्याचा उपभोग घेऊ शकता.

३. आणखी कशाने मानवाजातीस सुरक्षितता लाभेल असे वचन पवित्र शास्त्र देते? (प्रकटी २१:४, ५)

हे लोक “कोणी त्यास घाबरविणार नाही” अशा जीवित व वित्तहानी तसेच गुन्ह्‌यापासून मुक्‍त अशा भविष्याच्या अपेक्षेत आहेत; आणि ती वेळही अतिशय जवळ आलेली आहे. (मीखा ४:४) आज हयात असलेल्या अनेकांना ‘भूमीवर भरपूर पीक येईल’ व कोणीहि भूकेला राहणार नाही असा दिवस दिसेल, अशा आशेवर विश्‍वास ठेवण्यास त्यांच्याजवळ सबळ कारण आहे. (स्तोत्र ७२:१६) तसेच देव “त्यांच्या डोळ्‌यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. ह्‌यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट हीहि नाहीत. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या” या वचनाची पूर्तता याचि डोळा पाहण्याची आशाहि ते बाळगतात. (प्रकटीकरण २१:३, ४) अशा घटना खरोखरच घडतील अशी खात्री त्यांना कशामुळे वाटते? देवाच्या स्वतःच्या वचनात, पवित्रशास्त्रांत, ह्‌या गोष्टी सांगितलेल्या आहेत.

४. लेखनासाठी मनुष्यांचा उपयोग केला असला तरीहि पवित्रशात्रांतील मजकूर खरोखर देवाकडून आलेला का आहे? (२ तिमथ्यी ३:१६, १७)

पवित्र शास्त्रात दिलेले भविष्यकाळचे निवेदन म्हणजे परिस्थितीच्या निरीक्षणावरून माणसाने काढलेले निष्कर्ष नव्हेत. ते लिहिण्यासाठी जरी माणसांचाच उपयोग केला गेला तरी त्यांचे विचार देवाच्या पवित्र आत्म्याने प्रभावित केलेले होते म्हणून त्यातील संदेश देवाचा आहे. पवित्र शास्त्रातील लिखाणाबद्दल त्यातच म्हटले आहे: “प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रातील कोणत्याहि संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही; कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश संगितला आहे.” (२ पेत्र १:२०, २१) देव हे कसे करू शकला हे आज आपल्याला कळणे कठीण नाही. अंतराळात गेलेल्या माणसांनीहि पृथ्वीवर संदेश पाठविले व ते येथे स्पष्ट मिळाले. मग त्याच्याशी एकमतात असलेल्या विश्‍वासू माणसांना देवाने स्वर्गातून अधिक चांगल्याप्रकारे संदेश पाठविणे शक्य नाही काय? नक्कीच शक्य आहे! याकरिता सुरक्षित भवितव्य प्राप्त करण्याबद्दल पवित्रशास्त्र काय म्हणते ते पाहण्यास आम्ही तुम्हाला पाचारण करीत आहोत.

खरी मदत कोठून मिळेल

५. पैसा व इतर ऐहिक मालमत्तेबाबत कोणता वास्तव दृष्टीकोन ठेवण्यास पवित्रशास्त्र प्रोत्साहन देते? (उपदेशक ७:१२)

जीवनाकडे वास्तविक दृष्टीने पाहण्यास पवित्रशास्त्र आपल्याला मदत करते. आपल्या चिरकाल कल्याणासाठी आपण टिकावू मूल्यावर विश्‍वास ठेविण्याची शिकवण ते आम्हास देते. आज लाखो लोक पैसा व मालमत्तेसारख्या भौतिक गोष्टीवर विसंबून आहेत. पैसा व मालमत्तेला महत्व आहे हे खरेच, पण त्या गोष्टी सर्वात महत्वाच्या नव्हेत हे पवित्र शास्त्र दाखविते. “कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तरी त्याचे जीवन त्यापासून उत्पन्‍न होत नाही” हे चिरंतन सत्य ते आपल्याला सांगते. (लूक १२:१५) मालमत्तेची किंमत कमी होते. ती चोरीला जाते किंवा नाश पावते. चोर लुटांरूकरवी मालकाच्या जिवालाहि धोका संभवतो. त्याअर्थी खरी सुरक्षितता दुसऱ्‍या कशात तरी असली पाहिजे. पण कोठे?

६. मानवी नेत्यांच्या वचनावर आपल्या भावी आशा ठेवणे का अयोग्य आहे?

पुढाऱ्‍यांच्या वचनावर आपल्या आशा–आकांक्षांचे मनोरे रचणारे लोकहि आहेत. तुम्हीहि तसेच करावे का? कोणाहि नेत्याच्या खरे–खोटेपणाचा प्रश्‍न बाजूला ठेऊन पवित्रशास्त्र एकदम मुद्यालाच हात घालते की ते सर्व मरतात, व याची ते आपल्याला आठवण करून देते: “अधिपतीवर भरवसा ठेवू नका, मनुष्यावर भरवसा ठेवू नका. त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही; त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस परत मिळतो; त्याचवेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.” असा सूज्ञ इशारा ते आपल्याला देते. (स्तोत्र १४६:३, ४) जास्तीत जास्त म्हटले तर पुढारी मानवी समाजाच्या थोड्या भागावर काही वर्षापुरताच प्रभाव पाडू शकतात. दूरच्या भवितव्याबद्दल म्हणाल तर जी सुरक्षितता ते स्वत:साठी मिळवू शकत नाहीत ती ते दुसऱ्‍यांना काय देणार?

७. (अ) आपल्याला चिरस्थाई सुरक्षितता खरोखर कोण देऊ शकेल? आणि का? (प्रे. कृत्ये १७:२८) (ब) सुरक्षिततेचा आनंद लुटण्यासाठी आपल्याला कशाची आवश्‍यकता आहे?

पण अशी सुरक्षितता देणारी एक व्यक्‍ति आहे. तो म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माता. पृथ्वीच्या आधीपासून तो अस्तित्वात आहे आणि ह्‌या विसाव्या शतकानंतरहि शतकानुशतके तो असेल. स्तोत्र ९०:२ म्हणते: “अनादिकालापासून अनंतकालापर्यंत तू देव आहेस.” त्याप्रमाणे तो जीवनाचा उगम आहे व जीवन टिकविण्याची क्षमता त्यानेच पृथ्वीला दिली. आपले आताचे सौख्य व भवितव्य त्याच्यावरच अवलंबून आहे हे उघड आहे. त्यामुळे खऱ्‍या सुरक्षिततेचा आनंद लुटण्यासाठी आपले त्याच्याशी असलेले संबंध चांगले असणे आवश्‍यक आहे.

८. (अ) देव कशा प्रकारच्या व्यर्क्‍तिचा शोध घेतो? (ब) मग त्या अपेक्षा पूर्ण करण्यास आपली व्यक्‍तिशः कशाची तयारी असावी? (मत्तय ७:२१–२३)

कसल्यातरी धार्मिक गोष्टीना जीवनात स्थान दिले की पुरे—असा याचा अर्थ आहे का? असा निष्कर्ष काढण्यात मोठीच चूक होईल. देव ज्यांना त्याच्याशी चांगले संबंध ठेवू देतो ते एका विशिष्ट प्रकारचे लोक आहेत. कसल्या प्रकारचे? पवित्रशास्त्र म्हणते: “खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील . . . कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” (योहान ४:२३, २४) तुम्ही देवाची उपासना “खरेपणाने” करणाऱ्‍यापैकी आहात का? “सत्यस्वरूप देवाने” पवित्रशास्त्रात जे जे सांगितले आहे त्याच्याशी आपल्या श्रद्धा जुळतात का, याची तुम्ही परिक्षा केली आहे का? (स्तोत्र ३१:५) ती करण्याची तुमची तयारी आहे का? वस्तुस्थितीशी, सत्याशी–फारकत असलेल्या शिकवणी व चालीरितीमुळे कोणाचाच चिरंतन फायदा होत नाही. त्यांच्यामुळे लोक वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात, व लोकांना चुकीच्या मार्गाना लावितात. सत्य जाणून घेण्याची खरोखर इच्छा असल्यास व सत्यानुसार आपल्या जीवनात योग्य ते बदल करण्याची तयारी असल्यासच खऱ्‍या सुरक्षिततेबरोबर येणारे समाधान मिळू शकते. त्यातील एक अत्यंत महत्वाचे सत्य म्हणजे देवाचे स्वतःचे व्यक्‍तिमत्व ओळखणे.

९, १०. (अ) देवाचे व्यक्‍तिगत नाव काय आहे? (ब) आपल्या मित्राला देवाच्या नावाची खात्री पटण्यासाठी तुम्ही कोणते शास्त्रवचन दाखवाल? (क) काही अनुवादकांनी ते नाम कशा रितीने लपविले आहे? (स्तोत्र ११०:१)

तुम्हाला त्याचे व्यक्‍तिगत नांव माहित आहे का? ते “देव” “प्रभू” किंवा “परमेश्‍वर” असे नाही. जसे “श्रीयुत” आणि “राजा” या पदव्या आहेत तसेच त्या संज्ञाहि पदव्या आहेत. तथापि (१६११ मध्ये भाषांतरीत) ऑथराईज्ड व्हर्शननुसार स्तोत्र ८३:१८ म्हणते: “तू केवळ तूच यहोवा ह्‌या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळून येईल.” हे नाव माणसांनी देवाला दिलेले नाही. यशया ४२:८ मध्ये देव स्वतःविषयी म्हणतो: “मी यहोवा आहे, हे माझे नाम आहे.” (अमेरिकन स्टँडर्ड एडिशन रिव्हाईज्ड व्हर्शन ऑफ द बायबल इ.स. १९०१ मध्ये प्रकाशित नुसार) मूळ इब्री शास्त्रवचनांचे काही अनुवाद हे नाव “याव्हे” असे देतात; काही नुसते “LORD” हा शब्द वापरतात. त्यात पहिले “एल” अक्षर कॅपिटल असते व इतर अक्षरे लहान कॅपिटल्समध्ये असतात. अशारीतीने त्यांच्या अनुवादापेक्षा मूळ भाषिक ग्रंथात काही तरी अधिक असल्याचे ते दर्शवितात.

१० उदाहरणार्थ, तुमच्या पवित्र शास्त्र प्रतीत स्तोत्रसंहितेमधील ८:९ ही ओवी पाहा. कॉमन बायबल (कॅथोलिक व प्रॉटेस्टंट धर्मनेत्यांनी पुरस्कारिलेले व १९७३ मध्ये प्रकाशित) मध्ये लिहिले आहे: “O LORD, our Lord, how majestic is thy name in all the earth!” या एकाच ओवीतील “लॉर्ड” या दोनवेळा आलेल्या शब्दासाठी वापरलेल्या वेगवेगळ्‌या टाईपकडे लक्ष द्या. प्रथम कॅपिटल “एल’ नंतर लहान कॅपिटल अक्षरे वापरली आहेत. परंतु नंतर मात्र एल कॅपिटल असला तरी त्यानंतरची अक्षरे लहान टाईपमध्ये आहेत. (हीच ओळ न्यु अमेरिकन बायबल या कॅथोलिक अनुवादात, स्तोत्रसंहिता ८:१० येथे सापडते.) इतर भाषांतरात मात्र काहीहि न लपविता “हे यहोवा आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाम किती थोर आहे,” असा अनुवाद आढळतो.

११. (अ) देवाचे नाव माहीत असणे व वापरणे खरेच महत्वाचे आहे का? (प्रे. कृत्ये १५:१४) (ब) यहोवावर आपली प्रीती असेल तर व्यक्‍तिशः ते नाम कसे वापरले पाहिजे? (यशया ४३:१०)

११ देवाचे व्यक्‍तिगत नाव न वापरल्यामुळे ती पवित्र शास्त्रप्रत जास्तीत जास्त लोकांना आवडेल अशी काही भाषांतरकारांची कल्पना असेल. पण, मूळ भाषेतील ग्रंथात इतर कोणत्याहि नावापेक्षा जास्तवेळा उल्लेखिलेले नाव लपविण्यात त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येतो का? लोकांना आपले नाव माहीत असावे अशी खऱ्‍या देवाची इच्छा आहे. मिसराच्या प्राचीन राजाला देवाने तत्काळ न मारता दया का दाखविली ते कळविण्यास देवाने मोशेला सांगितले. त्याला का जिवंत ठेवले होते बरे? “मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव साऱ्‍या पृथ्वीवर प्रकट व्हावे” असे देवाने म्हटले. (निर्गम ९:१६) आपण आदराने देवाचे नाव घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्याला सत्याची चाड असेल तर यहोवा देवाचे—खऱ्‍या देवाचे—उपासक असल्याचे सांगण्यास आपण कचरणार नाही.

१२. उपासनेत मूर्तींचा उपयोग केल्यास देव त्याकडे कोणत्या दृष्टीकोणातून पाहतो? (स्तोत्र ११५:३–८; अनुवाद ७:२५)

१२ तसेच देवाची ज्या गोष्टींना मान्यता नाही अशा गोष्टीबरोबर त्याचे नाव न जोडण्याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. “देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे,” हे लक्षात ठेवा. (योहान ४:२४) “देव आत्मा आहे” ही गोष्ट आपण जाणली व त्याची उपासना “आत्म्याने” म्हणजे आध्यात्मिक रितीने आपण केली तर आपण देवाचे प्रतिनिधीत्व करण्यास भौतिक वस्तुंचा उपयोग करणार नाही. “देवाला कोणीहि कधीच पाहिले नाही” असे योहान म्हणतो. (योहान १:१८) त्यामुळे त्याचे चित्र किंवा मूर्ती बनविणे शक्यच नाही. जी मूर्ती बघु शकत नाही, बोलू शकत नाही, जिला ऐकू येत नाही व आपल्या उपासकाला मदत करण्यासाठी बोटहि उचलू शकत नाही ती जिवंत देवाचे योग्य प्रतिनिधित्व करू शकत नाही. काही मूर्ती देवाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बनविल्या जात नाही हेहि खरे आहे. पण प्रश्‍न असा आहे की त्यांच्याकडे भक्‍तिच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते का? दहा आज्ञा देताना ह्‌या कारणास्तव, मूर्ती बनवू नये असे देवाने स्पष्टपणे सांगितले: “आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, . . . त्यांच्या पाया पडू नको, किंवा त्यांची सेवा करू नको.” (निर्गम २०:४, ५) यहोवाला पसंत नसलेल्या वस्तूचा उपयोग करण्यापेक्षा, देव जसा आहे तशी त्याची ओळख करून घेण्यात आपली सत्यप्रियता आपल्याला उपयोगी पडेल.

१३. (अ) यहोवा कशाप्रकारचा देव आहे? (ब) त्याचे कोणते गुण तुम्हाला मनापासून आवडतात?

१३ त्याचे गुणच इतके चांगले आहेत की ते नीतिमत्तेची आवड असणाऱ्‍यांचा विश्‍वास संपादन करतात. त्याची अमर्याद शक्‍ति व कोणाहि माणसापेक्षा अतिशय प्रगल्भ बुद्धीमत्ता, यासारखे त्याचे गुण त्याच्या भौतिक निर्मितीतून दृगोचर होतात. सायंकाळची शोभा, पक्षांचे मधुर संगीत, फुलांचा सुगंध, आपल्या जिव्हेवरील अनेक रूचि ह्‌या सर्वातून देवाचे मानवावरील प्रेम दिसून येते असे तुम्हाला वाटत नाही का? पण पवित्रशास्त्र देवाबद्दल या सर्वाहून अधिक काही सांगते. ते दाखविते की यहोवा न्यायाला उचलून धरतो; तसाच तो दयाळू, व विचारी आहे. पवित्र शास्त्र देवाचे वर्णन अशा रीतीने करते: “यहोवा, यहोवा, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्‌यांची क्षमा करणारा, पण (अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा.” (निर्गम ३४:६, ७) तसेच देवाचा प्राचीन इस्त्राएल राष्ट्राशी झालेला अनेक शतकांचा व्यवहारहि पवित्र शास्त्रात सांगितलेला आहे. त्या व्यवहारातून देवाचे गुण विशेष ठळकपणे नजरेत भरतात. त्याचप्रमाणे, “देव पक्षपाती नाही . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत, तो त्याला मान्य आहे.” हे देखील सिद्ध होते. (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) सर्व प्रकारच्या लोकांचे त्याच्याशी चांगले संबंध असावे असे त्याला वाटते. आणि त्याच्या शक्यतेची तरतूदहि त्याने केली आहे.

१४. यहोवावर मनापासून विश्‍वास ठेवल्यास त्या व्यक्‍तिच्या जीवनावर कसा परिणाम होतो? (नीतिसुत्रे ३:५, ६)

१४ देवाच्या स्वभावाच्या अनेक पैलूंची ओळख झाल्यामुळे काय होते? त्याला देवाच्या “नावाचे” महत्व जास्त चांगले पटू लागते. तो देवावर विश्‍वास ठेवतो—देवाच्या मताप्रमाणे वागतो व त्यामुळे दवापासून मिळणाऱ्‍या संरक्षणाचा अनुभव घेतो. नीतिसुत्रे १८:१० मध्ये म्हटल्याप्रमाणे: “यहोवाचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यात धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो.”

१५. (अ) आपले भवितव्य यहोवावर का अवलंबून आहे? (ब) प्रत्येक व्यक्‍तिला कोणत्या महत्वाच्या प्रश्‍नाला तोंड द्यावे लागेल? (अनुवाद ३०: १९, २०)

१५ त्या सरंक्षणात व्यक्‍तिच्या भवितव्याचा समावेश होतो. खरोखरी, सबंध मानवजातीचे भवितव्य यहोवावर अवलंबून आहे. का बरे? कारण त्याने ही पृथ्वी निर्माण केली व तीवर वसणारे सर्व; जीवनास आवश्‍यक गोष्टीकरिता त्याने केलेल्या तरतुदीवर अवलंबून आहेत. त्याच्या लोकांसाठी सुरक्षित व आनंदी जीवनाची तरतूद करण्याचा त्याचा हेतू त्याने पवित्र शास्त्रांत मांडला आहे. पृथ्वीवरील किंवा स्वर्गातील कोणीहि त्याच्या हेतूपूर्ततेत आडकाठी आणू शकत नाही. अर्थात त्या हेतूमुळे आपल्या विचार स्वातंत्र्यावर घाला येत नाही. आमच्या मताला डावलून आमचे भविष्य निश्‍चित केलेले नसेल. पण ते आपल्यासमोर एका महत्वाच्या निर्णयास उभे करते: यहोवाने आपल्यासाठी जे सर्व केले आहे व पुढेही करील त्याची जाणीव होऊन आपण आपले जीवन त्याच्या इच्छेनुरूप घालवू का? एखाद्याच्या अविश्‍वासामुळे, यहोवा हाच खरा देव आहे, या वस्तुस्थितीत बदल होणार नाही. तसेच त्यामुळे यहोवाच्या हेतूमध्येहि बदल होत नाही. परंतु त्या उदात्त हेतूमुळे त्या व्यक्‍तिचा फायदा होईल किंवा नाही हे मात्र निश्‍चित होईल. खरे म्हणजे जीवन किंवा मृत्यु एवढेच पर्याय आहेत.

असुरक्षितता मनुष्यजीवन का विफल करते

१६. आज कोणकोणत्या गोष्टीमुळे जीवन असुरक्षित झाले आहे?

१६ यहोवाच्या हेतूमुळे खरी सुरक्षितता कशी मिळते याची गुणग्राहकता ओळखण्याकरिता, आजचे जीवन कशामुळे असुरक्षित झाले आहे ह्‌याची आपण प्रथम स्वतःस हितकारक आठवण देऊ. प्रेमाचा अभाव, कायद्याची उपेक्षा, दुसऱ्‍यांच्या मालमत्तेविषयी बेपर्वाई, स्वतःच्या ध्येय पूर्तीसाठी असत्य व अत्याचार तसेच आजारपण व अपरिहार्य मृत्यु यांच्याकडेहि कानाडोळा करता येणार नाही. स्वतःच्या व इतरांच्या अनुभवावरून, या सर्व गोष्टींचा मनुष्यजीवनावर काय परिणाम होतो हे आपल्याला माहीतच आहे. पण हे सर्व कोठून आले? याचे उत्तर पवित्रशास्त्रात सापडते.

१७. आरंभीला कोणकोणत्या गोष्टींनी आदाम व हव्वा यांच्या सुरक्षिततेमध्ये भर घातली होती? (उत्पत्ती १:३१; २:८, १५)

१७ पवित्र शास्त्रांतील पहिलेच पुस्तक आपल्याला सांगते की यहोवाने आदाम व हव्वा—या आमच्या मुळपालकांना घडविले तेव्हां त्याचे काम फार चांगले होते. ज्यामुळे आजारपण यावे अशी कोणतीच चूक त्याच्या घडणीत नव्हती. तर अनंतकाळ जगण्याची आशा त्यांच्यापुढे होती. देवाने वात्सल्याने एदेनमध्ये एक बाग—नंदनवन—त्यांना वसतीस्थान—घर—म्हणून दिले. उदरनिर्वाहाकरिता त्या बागेत देवाने उदारपणे, बी धारण करणारी झाडे–झुडपे व फलदायी वृक्ष भरपूर दिले होते. जलचर, पक्षी व प्राणी या सर्वावर सत्ता चालवून पृथ्वीची मशागत करून, ती वसवून, सबंध पृथ्वीचे रूपांतर करण्याची आज्ञा देऊन देवाने त्याच्या जीवनाला योग्य ती दिशा दिली होती. अशा वातावरणात सुरक्षितता नैसर्गिक होती. पण त्या सुरक्षिततेचा अबाधित उपभोग घ्यावयाचा असल्यास, त्यांच्याकडून काही गोष्टींची अपेक्षा होती.

१८. (अ) त्यांची सुरक्षितता अबाधित राहण्याकरिता आदाम व हव्वा यांच्यापासून काय अपेक्षित होते? (ब) यहोवाने त्यांच्या आज्ञाधारकतेची परिक्षा कशी केली? आणि ही बाब महत्वाची का होती? (लूक १६:१०)

१८ देवाशी असलेल्या संबंधात त्यांना स्वतःच्या पायरीची जाणीव असण्याची जरूर होती. पृथ्वी व तिच्यावरील सर्व गोष्टीवर त्यांच्या उत्पन्‍नकर्त्याचा हक्क होता. त्यामुळे त्यांचा उपयोग कसा करावा हे ठरविण्याचा त्याला हक्क होता. जीवनाचे दान सशर्त होते. म्हणजे त्याच्या प्रेमळ स्वर्गीय पित्याशी प्रेमाने आज्ञाधारक राहण्याच्या अटीवरच आदाम व हव्वेला जीवनाचा आनंद लुटत राहण्यास मुभा होती. या आवश्‍यकतेच्या गांभिर्यावर जोर देण्यासाठी यहोवाने पुरुषाला अशी आज्ञा केली: “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा. पण बऱ्‍यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्पत्ति २:१६, १७) मनुष्याला देवाची सत्ता मान्य आहे हे त्याच्या आज्ञाधारकपणामुळे सिद्ध होईल; अवज्ञेने देवाच्या योग्य इच्छेचा अव्हेर केला असा अर्थ होईल. या कायद्यामुळे माणसाला कष्ट पडणार नव्हते किंवा त्याला आवश्‍यक गोष्टींचा तुटवडा पडणार नव्हता. पण त्यामुळे एक साधी परिणामकारक परीक्षा, तो ज्या परिस्थितीत रहात होता तिला योग्य अशीच होती. तीमुळे, त्यांच्या स्वर्गीय पित्यावरील त्याचे प्रेम दाखविण्याची संधी आदाम व हव्वेला मिळाली होती.

१९. (अ) आदाम व हव्वेच्या पापामुळे व त्यानंतर असुरक्षितता आणणाऱ्‍या कोणत्या गोष्टी अस्तित्वात आज्या? (ब) रोमकरांस पत्र ५:१२ मध्ये सांगितल्याप्रमाणे आदामाच्या सर्व वंशजावर त्याचा कसा परिणाम झाला?

१९ पवित्र शास्त्रातील उत्पत्तिच्या तिसऱ्‍या अध्यायात सांगितल्याप्रमाणे त्यांना त्यात अपयश आले. देवाले “खाऊ नका” असे सांगितलेल्या झाडावरील एक फळ त्यांनी हेतुपुरस्सर खाल्ले. त्या मानवी जोडप्याने तोपर्यत जी अनुभविली त्या सुरक्षिततेचा अंत झाला. आजच्या असुरक्षिततेस कारणीभूत असलेल्या सर्व गोष्टी त्यावेळी प्रथमच अस्तित्वात आल्या. आता तेथे देवाविषयीच्या प्रेमाचा अभाव, त्याच्या कायद्याविषयी अनास्था व त्याच्या मालमत्तेबद्दल बेपर्वाई ही सर्व होती. देवाची इतराजी झाल्यामुळे आदाम व हव्वेला एदेनमधून हाकलून देण्यात आले. बागेच्या बाहेर काईनासह त्याचे अनेक वंशज हिंसेच्या मार्गाने गेले व त्यामुळे त्याचे अधिकच अधःपतन झाले. देवाच्या कायद्याचे ज्यांनी हेतुपुरस्सर उल्लंघन केलेले नाही त्यांनाही त्यांच्या शरिरात अनुवंशिक पापाचे परिणाम जाणवतात. रोमकरांस लिहिलेल्या पत्राप्रमाणे (५:१२) “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वानी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशाप्रकारे मरण पसरले.”

२०. (अ) एदेनमधील बंड कोणापासून सुरू झाले? (प्रकटी. १२:९) (ब) तो दियाबल सैतान कसा झाला? (याकोब १:१४, १५)

२० बंडाची सुरवात आदाम अथवा त्याच्या पत्नीने केली नाही हे लक्षात ठेविले पाहिजे. हव्वेशी बोलणाऱ्‍या एका “सर्पा”चा उल्लेख पवित्र शास्त्र करते ज्याने खोटे बोलून तिला देवाची आज्ञा मोडण्याची गळ घातली. खरोखरचा साप बोलू शकत नाही हे तितकेच खरे! पवित्र शास्त्रात पुढे त्या सर्पामागील शक्‍ति एका अदृश्‍य आत्म्याची होती हे स्पष्ट केले आहे. या आत्मिक प्राण्याची निर्मिती त्याने दुष्ट बनावे म्हणून केली नव्हती. पण मनुष्याप्रमाणेच देवाच्या या पुत्रालाही विचारस्वातंत्र्य होते—आपल्या गुणांचा कसा वापर करावा याची निवड करण्याची क्षमता होती. पण अयोग्य इच्छा अंतःकरणात घोळत ठेविल्यामुळे त्याला गर्व चढला, व इतर प्राणीमात्रांनी देव म्हणून त्याची उपासना करावी असे त्याला वाटू लागले. हा हेतू साध्य करण्यासाठी त्याने जो मार्ग अवलंबिला त्यामुळे त्याने स्वतःला देवाचा विरोधक—सैतान—आणि निंदक—दियाबल बनविले.

२१. (अ) हव्वेशी बोलताना संतानाने काय दावा केला? (ब) सैतानाने दिलेज्या सल्ल्यानुसार वागून तिचे भले का झाले नाही?

२१ सुरवातीलाच प्रश्‍न विचारतच तो हव्वेजवळ आला आणि नंतर “तुम्ही खरोखर मरणार नाही; कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल” असे म्हणून त्याने देवाच्या विरुद्ध भाषण केले. (उत्पत्ति ३:१–५) स्त्रीला जे माहीत होते त्यापेक्षा हे तिला जास्त बरे वाटले. पण त्यावर विश्‍वास ठेवून तिला जादा सुरक्षितता मिळाली का? अवज्ञेत तिच्याशी सहभागी होऊन तिच्या पतीचा वैयक्‍तिक फायदा झाला का? नाही. ते सर्व खोटे होते. त्यांच्या मरणामुळे आणि आजपर्यंत माणसे मरत आहेत त्यावरुन हे निर्णायकतेत सिद्ध झाले.

२२. (अ) त्यावेळी एदेनमध्ये कोणते महत्वाचे प्रश्‍न उभे राहिले? आणि मानव जातीच्या सुरक्षिततेवर त्याचा काय परिणाम झाला? (ब) इयोबाच्या काळी आणखी कोणता आरोप करण्यात आला व त्याचा गर्भित अर्थ काय? (इयोब १:७-१२; २:१-५)

२२ त्यावेळी एदेनमध्ये काही महत्वाचे प्रश्‍न उदयास आले व त्यांचा सबंध सृष्टीवर परिणाम होणार होता. देवाच्या सत्यतेला आव्हान देण्यात आले. त्यामुळे त्याच्या राज्य करण्याच्या हक्काची व नैतिकतेची शंका उपस्थित झाली. स्वतःच्या हाती सत्ता घेऊन, काय बरे व काय वाईट याचे प्रमाण स्वतःच ठरवून, आपले निर्णय आपणच घेतल्याने माणसाचे भले होईल असे सुचविण्यात आले. सैतानाच्या बंडामुळे तसेच देवाशी एकनिष्ठ राहण्यात पहिल्या मनुष्याला आलेले अपयश यामुळे देवाचे इतर बुद्धीमान पुत्र काय करतील या विषयी प्रश्‍न उत्पन्‍न झाला. देवाशी कोणी एकनिष्ठ राहील का? नंतर इयोबाच्या काळी सैतानाने आरोप केला की, जे देवाची सेवा करितात ती प्रेमामुळे नव्हे तर स्वार्थापोटी केली जाते. “इयोब देवाचे भय काय फुकट बाळगतो?” असा सवाल सैतानाने केला. (इयोब १:९) त्यांची परीक्षा घेतली तर कोणीही यहोवाच्या सत्तेशी एकनिष्ठ राहणार नाही असा सैतानाचा दावा होता. या वादाचा निकाल लागल्याशिवाय मानवाला पूर्ण सुरक्षितता मिळणे शक्य नाही. नीतिमत्तेची चाड असणाऱ्‍या सर्वांचे समाधान होईल अशा रीतीने हे वाद मिटतील हे यहोवाला माहीत होते. त्याची जाणीव ठेऊनच त्याने तरतूदी पुरविल्या.

सुरक्षित भवितव्य शक्य करणाऱ्‍या तरतूदी

२३. (अ) आपल्या मुळ माता–पित्यांना शिक्षा सांगताना यहोवाने आपल्याकरिता काय शक्यता राखून ठेवली? (२ पेत्र ३:९) (ब) मानवजातीच्या भविष्याची तरतूद कोणाभोवती गुंफलेली आहे?

२३ देवाविरुद्ध बंड केल्यामुळे आपल्या पहिल्या पालकांना शिक्षा झाली तेव्हा यहोवा, त्यांच्या न जन्मलेल्या संततीला विसरला नव्हता. ईश्‍वरी सत्तेखाली आम्ही राहावे किंवा नाही, याची प्रत्येकाला निवड करता यावी म्हणून त्याने वात्सल्याने एक उद्देश निर्मिला. तो उद्देश, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याभोवती गुंफलेला आहे.

२४. (अ) मानव बनण्याआधी येशू कोणते जीवन जगत होता? (ब) आपण त्याला देव किंवा देवाच्या बरोबरीचा का मानू नये? (योहान १७:३)

२४ स्वर्गीय परिस्थितीत यहोवाने याच पुत्राला सर्वप्रथम निर्माण केले. पवित्र शास्त्र म्हणते: “आकाशात व पृथ्वीवर असलेले . . . सर्व त्याच्याद्वारे निर्माण झाले.” (कलसै १:१५–१७) परंतु देवाने ठरविलेल्या वेळी त्याच्या पुत्राने आपले स्वर्गीय वैभव बाजूस सारले व चमत्काराद्वारे तो एक मानव म्हणून पृथ्वीवर जन्माला आला. या जन्माबद्दल पूर्वभाकीत सांगण्यास पाठविलेल्या गॅब्रिएल देवदूताने असे म्हटले नाही की, जन्मणारे मूल देव असेल तर त्याऐवजी त्याने “देवाच्या पुत्राच्या” जन्माची घोषणा केली. (लूक १:३५) येशूने स्वतः देव असल्याचा दावा केला नाही; उलट सैतानाला स्वतःची उपासना झालेली हवी होती. तसे येशूने केले नाही. त्याने प्रामाणिकपणे म्हटलेः “माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.” (योहान १४:२८) सत्यप्रीय देवाशी चांगला संबंध ठेवायचा आहे तर, देवाच्या पुत्रालाच, देव अथवा त्याच्या बरोबरीचा ठरवून चुकीने संबोधिणे योग्य नव्हे.

२५. मनुष्यप्रकृतीतहि कठीण परिक्षामध्ये येशूने स्वतःची निष्ठा टिकविल्यामुळे काय साधले?

२५ त्याला आधी कधीहि न आलेले अनुभव येशूने पृथ्वीवर अनुभविले. स्वर्गात त्याच्या पित्याची इच्छा अनुसरण्यात तो कधीहि कमी पडला नाही. परंतु पृथ्वीवर एक माणूस म्हणून, वेदना व अकारण अपमान सोसूनहि तो देवाशी एकनिष्ठ राहील का? परिक्षा घेतल्यास कोणीहि—हा ज्येष्ठ पुत्र देखील एकनिष्ठ राहणार नाही हे शाबीत करण्याचा सैतानाचा ठाम निर्धार झाला होता. मार्गदर्शनासाठी देवाच्या वचनांचा आधार घेऊन, मोहाला दूर लोटताना त्यातून वचने उद्धृत करुन येशू देवाच्या वचनाला निष्ठेने धरून राहिला. वाममार्गाकडे वळण्याकरिता आलेला दबाव खंबीरपणे दूर करताना तो म्हणाला: “सैताना चालता हो कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘यहोवा तुझा देव ह्‌याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.’” (मत्तय ४:१०) आदामापेक्षा कितीतरी अधिक कठीण परिक्षांना तोंड देऊन येशू ख्रिस्ताने मरेपर्यंत यहोवाच्या सत्तेशी निष्ठा दाखविली. अशा रितीने, सैतानाने खोट्या आरोपांनी फासलेला यहोवाच्या नामावरील काळिमा येशूने धुतला. परिक्षाना कसे तोंड द्यावे, यहोवाच्या सत्तेशी निष्ठा कशी व्यक्‍त करावी हे स्वतःच्या उदाहरणाने येशूने आम्हाला शिकविले.

२६. पूर्ण मनुष्य म्हणून येशूने अर्पण वाहिल्यामुळे आणखी काय मिळाले; आणि त्यामुळे आपल्याला कशाची शक्यता उपलब्ध झाली आहे? (१ तिमथ्यी २:३–६)

२६ तथापि देवाच्या पुत्राने, उत्तम उदाहरण घालून देण्यापेक्षाहि अधिक काही केले आहे. “पुष्कळांच्या मुक्‍तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास” येशू आला होता हे त्याने स्वतः सांगितले आहे. (मार्क १०:४५) पाप आणि त्यापासून येणाऱ्‍या अस्वास्थ्य व मरणापासून मानवजातीची सुटका व्हावयाची असेल तर या खंडणीची अत्यंत जरूर होती. देवाच्या नियमानुसार आदामाच्या हातून निसटलेल्या अव्यंग व परिपूर्ण जीवनाशी जुळणारे परिपूर्ण जीवनच अशी खंडणी देऊ शकत होते. आदामाच्या कोणत्याहि वंशजाला आपल्या अपूर्णतेमुळे ती भरता येत नव्हती. यहोवा देवाने प्रेमळपणाने ती पुरविली. त्याने स्वतःचा पुत्र पृथ्वीवर पाठविला. मग येशूच्या मरणानंतर देवाने त्याला पुन्हा जिवंत केले–मनुष्य नव्हे तर एक आत्मिक व्यक्‍ति म्हणून उठविले. आणि सर्व मानवजातीसाठी खंडणी म्हणून देवाने येशूच्या पूर्ण (अव्यंग) मानवी जीवनाची किंमत स्वीकारली. यामुळे आदामाने जे घालविले ते परत मिळविण्याचा आपला मार्ग मोकळा झाला. पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालीक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) जर आपण देवाच्या पुत्रावर विश्‍वास ठेवला, त्याची शिकवण घेतली व त्याप्रमाणे आपले जीवन घालविले तर आपल्यासाठी उदात्त भवितव्याची शक्यता निर्माण होते.

२७. (अ) राजकीय घडामोडीत येशूने का भाग घेतला नाही? (योहान १८:३६) (ब) राज्यसत्तेबद्दल कोणता दृष्टीकोन ठेवण्यास येशूने आपल्या शिष्यांना शिकविले? (मत्तय २२:१७–२१)

२७ यहोवाने येशूला राज्यात दिलेल्या भूमिकेची जाणीव ठेवणे याचाहि त्या विश्‍वासात समावेश होतो. येशूने त्याच्या वेळच्या राजकारणात भाग घेतला नाही. कोणतीहि मानवी सत्ता यहोवाच्या सत्तेला मानत नाही हे त्याला ठाऊक होते. अशा राज्यकर्त्यांच्या ठायी देवाविषयी कांहीहि कल्पना असोत, चांगल्या व वाईटाच्याबाबतीत ते स्वतःचे नियम ठरवीत होते. अशा रितीने त्यांनी कबुली दिली किंवा दिली नाही तरी ते देवाच्या वैऱ्‍याच्या–सैतानाचा कित्ता गिरवीत होते. याच सैतानाची “जगाचा अधिकारी” अशी ओळख पवित्र शास्त्र करून देते. (योहान १४:३०) जोवर मानवी सरकारांना अस्तित्वात राहण्याची परवानगी देव देतो तोवर त्याच्या शिष्यांनी कर भरावा व नियमांचे पालन करावे असे येशूने त्यांना शिकविले. तथापि सर्व मानवजातीवर सत्ता गाजविणारे स्वर्गीय नीतिमान सरकार देवाचे राज्य—हीच सुरक्षित भवितव्याची आशा आहे हे त्याने स्पष्ट केले. म्हणून त्याने त्यांना देवाला अशी प्रार्थना करण्यास शिकविले: “तुझे राज्य येवो; जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्या राज्याच्या नियमांना अनुसरून जीवन घालविण्याचा येशूने त्यांना उपदेश केला; आणि “राज्याची ही सुवार्ता” सर्वत्र राहणाऱ्‍या लोकांना सांगण्यासाठी त्याने त्यांना नेमिले.—मत्तय ६:१०; २४:१४.

२८. देवाचे राज्य म्हणजे काय व त्याविषयी आपण आपली आस्था कशी प्रकट करू शकतो? (मत्तय ६:३३)

२८ ते राज्य म्हणजे यहोवाची इच्छा पूर्ण करण्याचे साधन होय. ते सर्व बुद्धीमान प्राणीमात्रांना यहोवाच्या अधिपत्याखाली एकत्र करील. ज्यांनी यहोवाच्या सत्तेशी निष्ठा सिद्ध केली आहे अशा पृथ्वीवरील व्यर्क्‍तिचाही त्या स्वर्गिय राज्यात समावेश होईल. त्यांना “लहान कळप” असे संबोधले आहे. (लूक १२:३२) “पृथ्वीवरून विकत घतलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार,” एवढीच त्यांची मर्यादित संख्या आहे, असे पवित्र शास्त्रातील शेवटचे पुस्तक दाखविते. (प्रकटी १४:१, ३) परंतु देवाचा पुत्र येशू हाच राजसत्ता दिलेल्यातील प्रमुख आहे. प्रेरित संदेशाप्रमाणे यहोवाने “सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभूत्व, वैभव व राज्य ही दिली.” (दानिएल ७:१३, १४) त्या ईश्‍वरी व्यवस्थेला अनुसरून आपण आपले जीवन व्यतीत करावे हे आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. जे याला नकार देतील त्यांना इतरांच्या सुरक्षिततेस बाधा आणण्याची कायमची मुभा राहणार नाही.

२९. (अ) मानवी सत्ता किती काळ अस्तित्वात आहे आणि आता ती फार काळ का टिकणार नाही? (यिर्मया १७:५) (ब) याचा सैतानाकरिता काय अर्थ होईल? (क) मानवी अधिपत्याचे काय होईल? (ड) दुष्ट लोकांचे काय होईल? (इ) यहोवाच्या अधिपत्याकडे दुर्लक्ष करणाऱ्‍यांचे काय होईल? (२ थेस्स. १:६–९)

२९ एदेनमधील बंडापासनू सहा हजार वर्षे मानवी सत्तेची फळे मानवांना चाखायला मिळाली. त्यामुळे मोठा अनर्थ झाला आहे. सहाजिकच, देवाच्या न्यायाची वेळ ह्‌याच पीढीत होईल असे पवित्र शास्त्र दाखविते. मानवाच्या मुख्य वैऱ्‍याचे—सैतान–दियाबलाचे—काय होईल? तो व त्याच्या पिशाच्च सोबत्यांचे कार्य बंद होईल. त्यांना “अथांग डोहात” टाकून दिले जाईल. मानवजातीला फसविणे त्यांना अशक्य होईल. (प्रकटी २०:१–३) देवाच्या न्यायाचा मानवी सत्तांवर काय परिणाम होईल? पवित्र शास्त्र सांगते. ते राज्य “या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यास नष्ट करील; व ते सर्वकाळ टिकेल.” (दानिएल २:४४) असत्य बोलणारे, चोर व हिंसक लोकांचे काय होईल? “दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधिशील पण त्याचा पत्ता लागणार नाही.” (स्तोत्र ३७:१०) यहोवाच्या राज्यसत्तेकडे जे बेपर्वाईने दुर्लक्ष करतात त्यांचे काय होईल? नोहाच्या काळी “जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यास समजले नाही.” आता देव न्याय करण्यासाठी आपल्या पुत्राला सांगेल तेव्हाहि तसेच होईल.—मत्तय २४:३९.

३०. यहोवाच्या अधिपत्यावर निष्ठा व्यक्‍त करणाऱ्‍यासाठी त्याचा अर्थ काय होईल? (प्रकटी ७:९, १०, १३, १४)

३० परंतु ज्यांनी यहोवाच्या राज्यसत्तेशी निष्ठा शाबीत केली आहे त्यांचे काय? देवाच्या नीतिमान नवीन व्यवस्थेत त्यांचा प्रवेश होईल. याचा जीवनावर काय परिणाम होतो त्याचे एक उदाहरण देवाच्या प्राचीन इस्राएलांशी झालेल्या दळणवळण संबंधातून दिसून येतो. देवाने मोशेला संदेश देण्यास सांगितल्याप्रमाणे “तुमचा देव यहोवा तुम्हाला जो देश वतन करून देत आहे त्या देशात वस्ती कराल, आणि तुमच्या चोहोकडल्या सर्व शत्रूपासून त्याने तुम्हाला विसावा दिल्यामुळे तुम्ही निर्भय राहाल.” (अनुवाद १२:१०) राजा शलमोनाच्या कारकीर्दीतील परिस्थितीबद्दल म्हटले आहे: “दानापासून (दक्षिणेतील) बैर–शेब्यापर्यंत सारे यहुदी व इस्राएल आपापली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्‍यांच्या खाली . . . राहत होते.” (१ राजे ४:२५) देवाच्या नियमांना अनुसरून प्रत्येक कुटुंबाला मशागत व गुजराण करण्यासाठी आपापली जमीन होती. देवाच्या आज्ञेत राहिल्यामुळे त्याचे आशिर्वाद मिळत आणि त्याच्या वचनाप्रमाणे योग्य समयी पाऊस पाठविण्याचाहि त्यात समावेश होता. (अनुवाद ११:१३–१५) त्याकाळी सबळ आर्थिक सुरक्षितता होती.

३१. स्तोत्र ७२ मध्ये वर्णिलेल्याप्रमाणे, देवाच्या राज्यात सुरक्षिततेस पोषक अशी कोणती परिस्थिती संपूर्ण जगभरात असेल?

३१ केवळ ऐतिहासिक वृत्तांत म्हणून नव्हे तर आपल्या उत्तेजनार्थ ह्‍याची नोंद पवित्र शास्त्रांत झालेली आहे. यहोवाने सर्व पृथ्वीवर राजा म्हणून नेमलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र शास्त्र: “शलमोनापेक्षा थोर असा एक,” असे संबोधिते. शलमोनाच्या कारकीर्दीतील यहुदा व इस्राएलातील परिस्थितीपेक्षाहि उत्तम परिस्थिती सबंध पृथ्वीवर ख्रिस्ताच्या कारकीर्दीत होईल. ७२ वे स्तोत्र याचे सुंदर वर्णन असे करते: “त्याच्या कारकीर्दीत नीतिमान उत्कर्ष पावो; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असो. समुद्रापासून समुद्रापर्यंत, आणि त्या नदीपासून (फरात) पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो. जुलूम व जबरदस्ती ह्‍यांच्यापासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील, आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्‍त अमोल ठरेल. भूमीत भरपूर पीक येवो; पर्वतांच्या शिखरावर ते डोलो.” (स्तोत्र ७२:७, ८, १४, १६) एकाने येशूला राज्य मिळाल्यावर त्याचे स्मरण ठेविण्याची विनंती केली. त्याकाळी येशूने त्याच्या उत्तरात वर्णन केल्याप्रमाणे परिस्थिती असेल. येशू त्याला म्हणाला: “तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील.”—लूक २३:४३.

३२. (अ) या उदात्त तरतूदींचा फायदा मृत व्यर्क्‍तिनाही मिळणे कसे शक्य होईल? (ब) पुनरूत्थित व्यक्‍ति कोठून परत येतील? (यहेज्केल १८:४; इयोब १४:१३)

३२ आदामाकडून वारशाने अपूर्णत्व मिळाल्यामुळे जे मेले आहेत त्यांचा तेव्हा विसर पडणार नाही. देवाच्या पुत्राने दिलेल्या बलिदानाच्या खंडणीचा त्यांनाहि फायदा मिळतो. पवित्र शास्त्र सांगते: “नीतिमानांचे व अनीतिमानांचेहि पुनरूत्थान होईल.” (प्रे.कृत्ये २४:१५) याचा अर्थ काय? पवित्रशास्त्र म्हणते: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतास काहीच कळत नाही.” (उपदेशक ९:५) ते त्यांच्या कबरेत निर्जीव असतात. त्यामुळे, पुन्हा जिवंत होणे असा पुनरूत्थानाचा अर्थ आहे. येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय जीवन मिळविणारा “लहान कळप” सोडून इतर सर्व लोक पृथ्वीवर चिरकाल जगण्याच्या आशेसह येथे मनुष्यप्रकृतीत जिवंत होतील.

३३. (अ) रोग व मृत्यु कशाच्या योगे काढून टाकण्यात येतील? (मार्क २:१–१२) (ब) यहोवाने सुरक्षित भवितव्याकरिता केलेल्या या तरतूदीचा फायदा व्यक्‍तिशः मिळावा असे तुम्हाला वाटते का?

३३ मानवी समाजाच्या नुतनीकरणाचा तो काळ असेल. स्वर्गीय राज्याच्या कारकीर्दीत विश्‍वास ठेवणाऱ्‍या प्रत्येकाला येशूच्या बलिदानाचा फायदा देऊन पाप व त्यांचे परिणाम धुवून टाकले जातील. या गोष्टीचा मानवजातीवर कसा परिणाम होईल हे येशूने, तो पृथ्वीवर असतानच दाखवून दिले होते. अंधाला दृष्टी देणे, तसेच अपंगाला बरे करणे या सारखी सर्व प्रकारची दुखणी त्याने बरी केली. देवाच्या नवीन व्यवस्थिकरणात असे आशीर्वाद मिळविलेले लोक या पृथ्वीवर असतील. ईश्‍वरी वचन म्हणते: “तो त्यांच्या डोळ्‌यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. ह्‌यापुढे मरण नाही. शोक, रडणे व कष्ट हीहि नाहीत. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटी. २१:४) होय, जीवन असुरक्षित करणाऱ्‍या सर्व गोष्टी संपतील. हे किती उदात्त भवितव्य!

३४. आताहि खरी सुरक्षितता उपभोगता येते का?

३४ परंतु सुरक्षिततेने मिळणाऱ्‍या सर्वच गोष्टी भविष्यासाठी राखून ठेविलेल्या नाहीत. आताही अनेक गोष्टींचा उपभोग घेतो येतो.

आज उपभोगता येणारी सुरक्षितता

३५. येथे सांगितलेल्या कोणत्या गोष्टीमुळे बरीच व्यक्‍तिगत सुरक्षितता लाभते?

३५ जीवनात बाकीची परिस्थिती कशी का असेना ज्याला रोजची भाकरी आणि पुरेसे कपडे आहेत तो बराच सुरक्षित आहे; यावर अनेकांचे एकमत होईल. तो ज्याच्यात मिसळतो त्यांचे एकमेकांवर खरे प्रेम असेल तर त्या सुरक्षिततेला जास्त बळकटी येते. शिवाय, भवितव्यात काय आहे हे त्याला माहीत असेल तर त्यामुळे असुरक्षिततेची भावना अधिकाधीक कमी होईल. परंतु बहुतांशी लोक अशी सुरक्षितता उपभोगतांना दिसत नाहीत. देवाने दिलेले सुरक्षिततेचे वचन फक्‍त भविष्यकाळातच खरे होईल असा त्याचा अर्थ आहे का? की या वचनावर विश्‍वास ठेवून त्याप्रमाणे वागल्यास, लोकांना आजहि सुरक्षितता मिळू शकेल? एकत्रितरित्या काही व्यक्‍ति आज तसे करीत आहेत का?

३६. (अ) कोणत्या परिस्थितीत, आत्ताच रोजची भाकर व पुरेसे वस्त्र पुरवीन असे देव म्हणतो? (ब) अशी सुरक्षितता कोण उपभोगतात व त्यांना या गरजेच्या वस्तु कशा मिळतात? (इफिस ४:२८)

३६ यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या, ख्रिश्‍चन लोकांना, देवाचे वचन सत्य असल्याचे आढळून आले आहे, व त्याप्रमाणे आचरण केल्यास आजमितीसही उत्तम फायदे होतात—याचा त्यांनी अनुभव घेतला आहे. आपल्या जीवनात आध्यात्मिक गोष्टींना योग्य महत्व दिल्याने हे फायदे मिळतात. पृथ्वीवरील प्रत्येकाचा आध्यात्मिक गोष्टीकडे कल असो वा नसो, त्याला नैसर्गिक संपत्तीचा फायदा होतोच, परंतु देवाच्या सेवेला प्रथम स्थान देणाऱ्‍यांच्या कल्याणाकडे देव अधिक लक्ष देतो असे पवित्र शास्त्र दाखविते. आपल्या शिष्यांचा विश्‍वास दृढ करण्यासाठी, येशू म्हणाला: “काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्‌या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याचे नीतीमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:३१–३३) जीवनाला आवश्‍यक अशा ऐहिक “ह्‍याही सर्व गोष्टी” त्यांना कशा मिळतात? ख्रिश्‍चन मंडळ्‌या त्यांना आर्थिक मदत देत नाहीत. उलट ते सर्व स्वखुशीने काम करतात. आणि यहोवाचे राज्य व त्याची नीतिमत्ता यांना लोक जेव्हा सर्वांत अधिक महत्व देतात तेव्हा जीवनावश्‍यक गोष्टी मिळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला तो सुयश देतो. “आमची रोजची भाकर आज आम्हास दे” या त्यांच्या प्रार्थनेला तो फळ देतो. (मत्तय ६:११) जगाच्या सध्याच्या परिस्थितीत देव त्याच्या सेवकांना ऐहिक सुबत्तेचे वचन देत नाही. पण अत्यंत गरजेच्या गोष्टी त्यांना मिळतील याची तो खात्री देतो. आणि तशा त्या मिळतील असे करणारा त्याच्या सारखा दुसरा कोणीही नाही.

३७. (अ) कोणत्या प्रकारच्या आचार–विचारांनी असुरक्षिततेचा उदय होतो? (ब) तशाप्रकारच्या व्यक्‍तिमध्ये मुळात कोणत्या गुणांचा अभाव असतो? (क) अशी प्रीति कोठे सापडेल असे येशू म्हणाला?

३७ ऐहिक गरजा पुरविणारा देव आजच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाची अशी दुसरी गोष्टही पुरवितो. आपल्या सहकाऱ्‍यांचे आपल्याशी संबंध चांगले नसतील तर फक्‍त जीवनाच्या ऐहिक गरजा भागल्याने माणूस सुरक्षित व समाधानी होत नाही—याची तुम्हाला चांगली जाणीव असेल. लोकांच्या खोटेपणाने व फसवणूकीने, दुसऱ्‍यांच्या भावना जहरी शब्दांनी दुखावल्यामुळे; आर्थिक बळ, कातडीचा रंग, राष्ट्रीयत्व यावरून दुसऱ्‍यांचा लहान–मोठेपणा ठरविल्यामुळे किंवा अंतस्थ स्वार्थी हेतूने वरून “सद्‌भाव” दाखविल्याने असुरक्षिततेचा उदय होतो. अशा लोकांमध्ये प्रेमाचा—दुसऱ्‍याच्या कल्याणाच्या निस्वार्थी तळमळीचा—मोठाच अभाव असतो. थोडक्या व्यक्‍तिमध्ये नव्हे तर एका संपूर्ण समाजात अशा प्रकारचे प्रेम खरोखर सापडेल का? ते शक्य आहे, अशी येशूने आपल्याला खात्री दिली. तो म्हणाला: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” या काळीही असे लोक असतील हे त्याला माहीत होते. कारण त्या आपल्या शिष्यांना येशू म्हणाला: “पाहा युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्याबरोबर आहे.”—योहान १३:३५; मत्तय २८:२०.

३८. अशी प्रीति करणाऱ्‍यांना ओळखण्यास पवित्रशास्त्र आपली कशी मदत करते? (१ योहान ४:२०, २१)

३८ तुमच्या सभोवतालच्या लोकांत अशा प्रेमाचा अभाव असेल तर त्याचा इतरत्र शोध करावा लागेल. पवित्र शास्त्रांत १ ले योहान ४:८ येथे आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते: “जो प्रीति करीत नाही तो देवाला ओळखीत नाही कारण देव प्रीति आहे.”—म्हणून जे लोक “देवाला ओळखतात” त्यांच्यामध्येच अशी प्रीति सापडू शकेल. सर्व धार्मिक लोकांमध्ये तशी प्रीति सापडेल असा याचा मुळीच अर्थ नाही, कारण अशी वस्तुस्थिती नाही याची तुम्हालाही माहिती आहे. परंतु सत्य देव यहोवाला ओळखणाऱ्‍या, त्याच्या नावाला मान देणाऱ्‍या व त्याच्या इच्छेला अनुसरून आपले जीवन जगणाऱ्‍या लोकांत ती प्रीति तुम्हाला सापडेल. अशांच्या सहवासाचे फायदे उघडच आहेत.

३९. अशा लोकांच्याबरोबर नुसते राहण्याशिवाय सुरक्षितता व जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी त्या व्यक्‍तिला काय करणे शक्य आहे?

३९ यामुळे जगातील बेबंद लोकांच्या कारवायाच्या दुष्परिणामापासून एखाद्याची सुटका खचितच होत नाही. तरीही त्याने व्यक्‍तिशः आपण देवावर अवलंबून असल्याचे कबुल केले व पवित्र शास्त्रात सांगितलेले चांगल्या–वाईटा बद्दलचे देवाचे नियम स्विकारले तर त्याचा मोठा फायदा होईल. डोकेदुखी व दुःख देणाऱ्‍या कार्यात गुंतण्यापासून तो बचावतो. नीतिसूत्र १:३३ मध्ये म्हटल्याप्रमाणे: “जो माझे [म्हणजे, इश्‍वरी ज्ञान] ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भिती नसल्यामुळे स्वस्थ असतो.” आपल्या उत्पन्‍नकर्त्याच्या इच्छेप्रमाणे त्या व्यक्‍तिने आपले जीवन घालविल्यास त्या जीवनास अर्थ प्राप्त होतो. अनेकांप्रमाणे वैफल्य अनुभविण्याऐवजी देवाचे राज्य हाच मानवजातीच्या असंख्य समस्यावरचा उपाय आहे हे शिकविण्यात इतरांना मदत करण्यात जो आनंद मिळतो त्यात ती व्यक्‍ति सहभागी होऊ शकते. स्वतः येशू ख्रिस्ताने याबाबतीत भाकीत केले होते. तो म्हणाला: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४.

४०. यहोवाच्या साक्षीदारांना भविष्यकाळाबद्दल काय वाटते व का? (लूक २१:२८–३२)

४० या प्रचार कार्यात सहभागी होणारे भविष्याला भीत नाहीत. पवित्र शास्त्राचा अभ्यास केल्यामुळे व त्यावर विश्‍वास ठेवल्यामुळे भविष्यात काय आहे याची त्यांना माहिती आहे. जगातील दुःखद घडामोडीमुळे वैफल्य येण्याऐवजी, या सर्व गोष्टींत त्यांना पवित्र शात्रातील अंतसमयीच्या भाकीतांची पूर्तता दिसून येते. लवकरच, आपल्याच पिढीत देवाची न्याय्य सत्ता अव्हेरणाऱ्‍या व आपल्या सोबत्यांच्या जीवनातील आनंदाचा विचका करण्यास टपलेल्या सर्वांचा देव नाश करणार आहे हे ते जाणून आहेत. “ज्यामध्ये नीतिमत्व वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्‍यांची, त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहात आहो.” या पवित्रशात्रांत २ पेत्र ३:१३ मध्ये दिलेल्या वचनाची पूर्तता होण्याची मोठ्या विश्‍वासाने वाट पाहून आहेत.

४१, ४२. (अ) काळजीने ग्रासलेल्या जगात राहूनहि, यहोवाचे साक्षीदार आताहि बरीच सुरक्षितता का अनुभवू शकतात? (ब) यहोवाचे साक्षीदार अनुभवीत असलेली सुरक्षितता तुम्हालाहि हवीशी वाटते का?

४१ “आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना” करणारे यहोवा देवाचे जे ख्रिस्ती उपासक तेच सध्या अशा प्रकारची सुरक्षितता उपभोगीत आहेत. यहोवाच्या नीतिमान प्रमाणांना शिरोधार्य मानल्यामुळे व ती आपल्या जीवनात आचरल्यामुळे हा फायदा होतो, यशया ३२:१७, १८ मध्ये सांगितल्याप्रमाणे “नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फळ सर्वकाळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल; आणि माझे लोक शांत स्थळी, निर्भय वस्तिस्थानात व सुखाश्रमात राहतील.” ते यहोवाच्या सार्वभौमत्वाला निष्ठावंत पाठिंबा दर्शवितात. चांगले काय व वाईट काय याचे प्रमाण ते स्वतः ठरवित नाहीत. ते जगाच्या समस्या स्वतःच सोडविण्याचा प्रयत्न करीत नाहीत. येशू ख्रिस्ताच्या हाती त्याच्या राज्याची सत्ता देण्याची जी प्रेमळ तरतूद यहोवाने केली आहे, तिचा ते कृतज्ञतेने स्विकार करतात व तिला पाठींबा देतात.

४२ ते उपभोगीत असलेल्या सुरक्षितेत तुम्हाला सहभागी व्हावयाचे आहे काय? तुम्हाला ते शक्य आहे.

त्याबद्दल तुम्हाला काय करावे लागेल

४३. यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य–सभागृहात गेल्याने तुम्हाला काय पाहता येईल?

४३ अशी सुरक्षितता उपभोगणाऱ्‍यांच्या संगतीत राहणे ही त्यातली पहिली पायरी होय, यामुळे तुम्ही, ज्याच्या शोधात होता ते हेच काय हे तुम्ही स्वतः पाहू शकता. यहोवाचे साक्षीदार तुमच्या जवळपासच्या राज्य सभागृहातील सभांना उपस्थित राहण्यास तुम्हाला हार्दिक निमंत्रण देत आहेत. त्या सभामध्ये कोणतेहि धार्मिक विधी अथवा वर्गणी गोळा केलेली तुम्हाला आढळणार नाही. त्याऐवजी देवाच्या वचनावरील अर्थपूर्ण चर्चा तसेच त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम यांची चर्चा केली जाते. “प्रिती व सत्कर्म करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. कित्येकांच्या चालीप्रमाणे, आपण आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा.” असा सल्ला पवित्र शास्त्र देते. (इब्री १०:२४, २५) राज्य सभेत तुम्हाला ही वृत्ती दिसून येईल.

४४. (अ) राज्य–सभागृहातील इतरांच्या जीवनातील सुरक्षितता तुम्हालाहि उपभोगावयाची असल्यास तुम्हाला कशाची निकड आहे? (ब) आपल्यापैकी कोणीच असा संबंध का गृहित धरू शकत नाही, पण तो कसा मिळविता येतो?

४४ अशा सभांना उपस्थित राहिल्याने ते उपभोगीत असलेली सुरक्षितता तुम्हाला जाणवेल, आणि त्यांची संगत तुम्हाला जरूर आवडेल. परंतु ती सुरक्षितता व्यक्‍तिशः तुम्ही उपभोगण्यासाठी अधिक काही करणे निकडीचे आहे. यहोवाशी, त्याला पसंत पडण्यासारखे तुमचे संबंध असण्याचे अत्यंत जरूरीचे आहे. तुमचे सध्याचे स्वास्थ्य व भवितव्य त्याच्यावरच अवलंबून आहेत. हे संबंध आपणापैकी कोणीहि नुसताच गृहित धरून चालणार नाही. जन्मतः आपला देवाशी तसा संबंध नव्हता. आपण सर्व पापी आदामाचे वंशज आहोत, त्यामुळे देवापासून फारकत झालेल्या कुटुंबात आपण जन्मलो. यहोवाची मेहरबानी मिळविण्यासाठी आपला त्याच्याशी समेट होण्यास हवा आणि देवाच्या पुत्राच्या बलिदानाच्या तरतूदीवरील आपल्या विश्‍वासाच्या आधारावरच असा समेट शक्य आहे. येशूने स्वतः म्हटल्याप्रमाणे: “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.”—योहान १४:६.

४५. (अ) जीवनाबद्दल आपण प्रथम कोणत्या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे, व आपले जीवन कसे घालविले पाहिजे? (प्रकटी ४:११) (ब) यहोवाला संतोषविण्याकरिता आपली त्याच्याविषयीची भावना कशी असली पाहिजे? (क) पाण्यात बुडवून बाप्तिस्मा घेणे महत्वाचे का आहे व बाप्तिस्म्याच्या तयारी आधी कशाची गरज आहे? (मत्तय २८:१९, २०)

४५ आपल्या जीवनासाठी आपण देवाचे ऋणी आहोत व देवाच्या आज्ञेप्रमाणे आपले जीवन अनुसरण्यास कसूर करणे हे चूक आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. भूतकाळात आपले जीवन देवाच्या इच्छेप्रमाणे न अनुसरल्याचा आपल्याला मनःपासून पश्‍चाताप होत असेल तर तो चुकीचा मार्ग सोडून आपण परत फिरू व देवाच्या इच्छेला अनुसरून आपले जीवन घालवू. येशूने म्हटल्याप्रमाणे त्याच्या शिष्यांनी, “स्वतःचा त्याग करावा,” या गोष्टीचाही त्यात समावेश होतो. (मत्तय १६:२४) असे करणारा देवाच्या इच्छेकडे दुर्लक्ष करून फक्‍त आपल्या स्वार्थी इच्छा तृप्त करण्यासाठी आपले जीवन स्वतःच्या मर्जीनुसार जगण्याचा “हक्क” असल्याचा दावा करीत नाही. त्याऐवजी तो देवाच्या पुत्राने मार्गदर्शन केल्याप्रमाणे देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास स्वतःस वाहून घेतो. तसे करणे योग्य असल्यानेच तो करतो. तसेच यहोवा सर्व काही चांगल्या व नीतिमान उद्देशासाठी करतो व आपण नीतिमतेचा आदर करीत असल्यास देव जे काही करतो त्यापासून आपला फायदाच होईल याची त्याला खात्री पटली असते, तो खरोखर “संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तिने,” यहोवावर प्रीती करत असतो. (मार्क १२:२९, ३०) स्वच्छेने हे बंधन स्वीकारल्यामुळे येशू ख्रिस्ताला अनुसरून व त्याच्या शिकवणीच्या आज्ञार्थ, सार्वजनिकरित्या पाण्यात बुडवून बाप्तिस्मा घेण्यास तो स्वतःस सादर करतो. देवाच्या वचनात सांगितलेल्या या एकाच मार्गांने आपण सत्य देवाशी योग्य संबंध प्रस्थापित करू शकतो, व त्याचे सेवक उपभोगित असलेल्या सुरक्षिततेत सहभागी होऊ शकतो.

४६. यहोवा आमचा अधिपती असावा ही आवड आपण कशी दाखवू शकू?

४६ त्यानंतर सैतानाने पुरस्कारिलेल्या ‘स्वातंत्र्याच्या’ मार्गाचा तुम्ही खरोखर त्याग केला आहे, चांगले काय व वाईट काय याचे प्रमाण तुम्ही स्वतः ठरवू इच्छत नाही, यहोवाची सत्ता तुम्हाला खरोखरच हवी आहे याचा प्रत्यय तुम्ही सतत देणे अतिशय महत्वाचे आहे. नीतिसुत्रे ३:५, ६ मध्ये म्हटल्याप्रमाणे: “तू अगदी मनापासून यहोवावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” असे आचरण तुम्हाला ठेवावे लागेल. होय, तो खऱ्‍या व चिरस्थाई सुरक्षिततेच्या वाटेकडे तुमचे मार्गदर्शन करील.

४७. यहोवाच्या प्रेमळ तरतूदी मनापासून स्विकारणाऱ्‍यांना कोणती सुरक्षितता लाभते?

४७ मानवजातीसाठी यहोवाने केलेल्या प्रेमळ तरतूदी मनापासून स्वीकारणाऱ्‍यावर किती उदंड आशीर्वाद येतात! त्याच्या अधिपत्याखाली खंबीरपणे उभे राहिल्यास त्यांना आज संरक्षण मिळते व भविष्यकाळाबद्दल ते निःशंक बनतात. शिवाय यहोवाच्या दयेमुळे व त्याच्या प्रामाणिकपणामुळे ते सर्व येशू ख्रिस्ताच्या अधिपत्याखालील त्याच्या राज्यात मिळणाऱ्‍या संपूर्ण समाधानात व सुरक्षिततेत सहभागी होतील.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[४ पानांवरील चित्रं]

आज हयात असलेल्या लोकांना असा एक दिवस दिसेल जेथून पुढे उपासमार राहणार नाही

[७ पानांवरील चित्रं]

स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्मात्यावर आमचे भवितव्य अवलंबून आहे

[१३ पानांवरील चित्रं]

मानवी जीवन आज असुरक्षिततेने का बाधले आहे ते पवित्र शास्त्रातील आमच्या पहिल्या पालकांच्या अहवालावरून दिसून येते

[२२ पानांवरील चित्रं]

देवाच्या राजवटीखाली गुन्हेगारीचा अंत, स्वतःचे जीवन आणि भौतिक मालमत्ता नष्ट होण्याचा धोका नाहीसा झालेला दिसेल

[२४ पानांवरील चित्रं]

आजार व मृत्युचे उच्चाटन झाल्याचे, तसेच पूर्वी वारलेले आमचे प्रियजन परत जीवंत होऊन परततील याचे अभिवचन देवाचे वचन देते