बायबले बदललं जीवन
बायबले बदललं जीवन
“ते माझ्याशी आदराने वागले.”—ग्वादालूपे बील्यारेआल
जन्म: १९६४
देश: मेक्सिको
पार्श्वभूमी: अनैतिक जीवनशैली
माझं आधीचं जीवन: मी मेक्सिकोच्या हर्मोसिलो शहरात लहानाचा मोठा झालो. आम्ही सात भावंडं होतो आणि एका गरीब वस्तीत राहायचो. मी लहान असतानाच माझे बाबा वारले. त्यामुळे सगळी जबाबदारी आईवरच आली. आमच्याकडे चपला-बुटं घ्यायचेपण पैसे नसायचे. घरखर्चाला हातभार लावायला मी लहान वयातच काम करायला लागलो. आमच्या वस्तीतल्या इतर बऱ्याच कुटुंबांप्रमाणेच आम्हीसुद्धा खूप लहानशा घरात राहायचो.
आई दिवसभर घरी नसायची कारण तिला कामाला जावं लागायचं. त्यामुळे आम्हा मुलांकडे लक्ष द्यायला कोणीच नसायचं. मी ६ वर्षांचा असताना १५ वर्षांचा एक मुलगा माझं लैंगिक शोषण करू लागला. आणि हे बरीच वर्षं चाललं. यामुळे लैंगिक संबंधांबद्दल माझ्या मनात खूप गोंधळ होता. पुरुषांनी एकमेकांशी संबंध ठेवण्यात काहीच चुकीचं नाही असं मला वाटू लागलं. जेव्हा मी डॉक्टरांची आणि पाळकांची मदत घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की यात काहीच गैर नाही आणि अशा भावना येणं स्वाभाविक आहे.
मी १४ वर्षांचा झालो तेव्हा मी ठरवलं की मी समलैंगिक आहे हे आता मी जगापासून लपवणार नाही. पुढच्या ११ वर्षांपर्यंत मी तसंच जीवन जगलो. माझे बऱ्याच पुरुषांसोबत संबंध होते. पुढे मी हेअर स्टाईलिस्टचा कोर्स केला आणि स्वतःचं हेअर सलून सुरू केलं. पण मी खूश नव्हतो. मला बऱ्याच जणांनी धोका दिला आणि यामुळे मी खूप निराश झालो. मला जाणवलं की मी जसं जीवन जगतोय ते बरोबर नाही. माझ्या मनात बऱ्याचदा असा विचार यायचा, की ‘या जगात चांगले आणि भरवशालायक लोक असतील का?’
मला माझ्या बहिणीची आठवण आली. तिने यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करून बाप्तिस्माही घेतला होता. ती जे शिकायची त्याबद्दल ती मला अधूनमधून सांगायची. पण मी दुर्लक्ष करायचो. असं असलं तरी, ती जीवनात किती सुखी आहे आणि तिचं वैवाहिक जीवनसुद्धा किती चांगलं आहे हे पाहून मला फार चांगलं वाटायचं. ते दोघं नवरा-बायको एकमेकांवर प्रेम करतात, एकमेकांचा आदर करतात आणि नेहमी एकमेकांशी समजूतदारपणे वागतात हे मी पाहिलं. मग काही काळाने मीसुद्धा यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागलो. सुरवातीला मी अभ्यास फक्त करायचा म्हणून करत होतो. पण हळूहळू माझी आवड वाढू लागली आणि मग मी मनापासून अभ्यास करू लागलो.
बायबलने जीवन कसं बदललं? एकदा मी साक्षीदारांच्या सभेला गेलो. तो माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता. सहसा लोक माझी टिंगल करायचे पण साक्षीदार माझ्याशी तसं वागले नाहीत. ते माझ्याशी खूप प्रेमाने आणि आदराने वागले. मला खूप बरं वाटलं.
मग पुढे मी त्यांच्या एका संमेलनाला गेलो आणि तेव्हा मी आणखीनच प्रभावित झालो. तिथे खूप साक्षीदार आले होते. माझ्या लक्षात आलं, की माझ्या बहिणीप्रमाणेच हे सगळे लोक नेहमी प्रेमाने आणि आदराने वागतात. माझ्या मनात विचार आला, की मी ज्या चांगल्या आणि भरवशालायक लोकांच्या शोधात होतो ते हेच असावेत. त्यांच्यातलं प्रेम आणि एकी पाहून मला आश्चर्य वाटलं. तसंच, ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बायबलमधून देतात ही गोष्टही मला खूप आवडली. मला जाणवलं, की बायबलमुळेच त्यांच्या जीवनावर इतका चांगला प्रभाव पडलाय. त्यांच्यापैकी एक होण्यासाठी मला स्वतःमध्ये भरपूर बदल करावे लागतील याची मला जाणीव झाली.
खरंतर मला माझं जीवन अगदी पूर्णपणे बदलावं लागलं. कारण मी पुरुष असूनही माझं वागणं-बोलणं, कपडे, हेअरस्टाईल बायकांसारखं होतं. आणि हे सगळं मला बदलावं लागणार होतं. तसंच ज्यांच्यासोबत माझी मैत्री होती त्यांच्याशीही मला संबंध तोडावे लागणार होते. माझे हे पूर्वीचे मित्र माझी टिंगल करायचे आणि म्हणायचे, “काय गरज आहे स्वतःला बदलायची? जसं चाललंय तसंच चालू दे. कशाची कमीए तुला? हा बायबल अभ्यासाचा नाद सोडून दे.” मला जर काही सगळ्यात कठीण गेलं असेल, तर ते होतं माझी अनैतिक जीवनशैली सोडणं.
पण मला याची खात्री होती की हे मोठे बदल करणंही अशक्य नाही. कारण बायबलमध्ये असलेल्या १ करिंथकर ६:९-११ या वचनांतले शब्द माझ्या मनाला भिडले होते: “अनीतिमान माणसं देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत हे तुम्हाला माहीत नाही का? फसू नका. अनैतिक लैंगिक कृत्यं करणारे, मूर्तिपूजक, व्यभिचारी, पुरुषवेश्या, समलैंगिक कृत्यं करणारे पुरुष, . . . देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत. तुमच्यापैकी काही जण पूर्वी असे होते. पण तुम्हाला धुऊन शुद्ध करण्यात आलं आहे.” यहोवाने त्या काळातल्या लोकांना स्वतःमध्ये बदल करायला जशी मदत केली, तशीच त्याने मलासुद्धा मदत केली. हे खरंय की यासाठी बरीच वर्षं लागली आणि मला खूप संघर्षही करावा लागला. पण साक्षीदारांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि प्रेमामुळे मला खूप-खूप मदत झाली.
मला झालेला फायदा: आज मी देवाला आवडेल असं जीवन जगतोय. माझं लग्न झालंय आणि माझी पत्नी आणि मी आमच्या मुलाला बायबलच्या तत्त्वांप्रमाणे जीवन जगायला शिकवतोय. माझं ते आधीचं जीवन मी पूर्णपणे सोडून दिलंय आणि आज मला यहोवाने भरभरून आशीर्वाद दिले आहेत. मी मंडळीत वडील म्हणून सेवा करतोय आणि मी इतरांनाही देवाच्या वचनातलं सत्य शिकून घ्यायला मदत करू शकलो. मी स्वतःत जे बदल केले ते पाहून माझ्या आईला इतका आनंद झाला, की तीसुद्धा बायबल अभ्यास करायला तयार झाली आणि आता तिचा बाप्तिस्मासुद्धा झालाय. तसंच, माझी एक बहीण जी अनैतिक जीवन जगत होती तीसुद्धा बायबलचा अभ्यास करून यहोवाची साक्षीदार बनली आहे.
मी पूर्वी कसा होतो हे ज्यांना माहीत आहे, त्यांच्यापैकीही काही जण आता मान्य करतात की मी जे बदल केले ते योग्यच होते. पण मला माहीत आहे हे सगळे बदल मी का करू शकलो. मी पुष्कळ तज्ज्ञांची मदत घ्यायचा प्रयत्न केला होता, पण मला त्यांच्याकडून नेहमी चुकीचाच सल्ला मिळाला. पण मला खरी मदत केली, ती यहोवानेच. कित्येकदा मला वाटायचं की आपण कोणत्याच लायकीचे नाही. पण यहोवाने माझं मन पाहिलं. तो माझ्याशी प्रेमाने आणि धीराने वागला. इतक्या अद्भुत, बुद्धिमान आणि प्रेमळ देवाने माझ्यासारख्या व्यक्तीकडे लक्ष दिलं आणि मला मदत केली. खरंतर, यामुळेच माझं जीवन बदललं!