व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलने बदललं जीवन

मी फक्‍त स्वतःसाठी जगत होतो

मी फक्‍त स्वतःसाठी जगत होतो
  • जन्म: १९५१

  • देश: जर्मनी

  • पार्श्‍वभूमी: गर्विष्ठ आणि फक्‍त स्वतःचा विचार करणारा

माझं आधीचं जीवन

मी लहान होतो, तेव्हा आमचं कुटुंब पूर्व जर्मनीच्या लाइपसिक शहराजवळ राहायचं. या शहरापासून चेक आणि पोलिश सीमा जवळच होत्या. सहा वर्षांचा असताना बाबांच्या कामामुळे आम्ही जर्मनी सोडून आधी ब्राझील आणि मग एक्वाडॉरला राहायला गेलो.

मी १४ वर्षांचा झालो तेव्हा माझ्या आईबाबांनी मला जर्मनीमधल्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं. आईबाबा माझ्यापासून दूर दक्षिण अमेरिकेमध्ये राहत असल्यामुळे मला स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागायची. त्यामुळे मी फक्‍त स्वतःपुरता विचार करायला लागलो. माझ्या वागण्याचा इतरांवर काय परिणाम होईल याचा मी कधी विचारच करत नव्हतो.

मी १७ वर्षांचा होतो तेव्हा माझे आईबाबा जर्मनीत परत आले. सुरुवातीला काही दिवस मी त्यांच्यासोबतच राहिलो. स्वतःच्या मनाप्रमाणे वागायचा माझा स्वभाव असल्यामुळे मला माझ्या आईबाबांसोबत एकाच छताखाली राहायला कठीण जात होतं. त्यामुळे १८ वर्षांचा झाल्यावर मी घर सोडलं.

मला नेहमी प्रश्‍न पडायचा की जीवनाचा नेमका उद्देश काय आहे. आणि त्यामुळे मी खूप अस्वस्थ व्हायचो. मी वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनशैलींचं आणि वेगवेगळ्या संस्थांच्या कामांचं निरीक्षण केलं. शेवटी माझ्या लक्षात आलं की या कशातच अर्थ नाही. आणि म्हणून मी ठरवलं की लोकांनी या सुंदर पृथ्वीचा नाश करण्याआधी सगळं जग फिरायचं.

मी जर्मनी सोडलं आणि मोटरसायकल घेऊन प्रवासाला निघालो. मला आफ्रिकेला जायचं होतं. पण माझ्या मोटरसायकलमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे मला परत युरोपला यावं लागलं. याच्या काही दिवसांनंतर मी पोर्तुगालच्या एका समुद्रकिनाऱ्‍यावर फिरत होतो. तेव्हा मी ठरवलं की मी मोटरसायकलऐवजी बोटीने पुढचा प्रवास करीन.

त्याच दरम्यान माझी भेट तरुण मुलामुलींच्या एका ग्रुपशी झाली. ते अट्‌लांटिक महासागराचा प्रवास करण्याच्या तयारीत होते. त्याच ग्रुपमध्ये मला लॉरी भेटली आणि पुढे आमचं लग्न झालं. सगळ्यात आधी आम्ही कॅरिबियन बेटांवर गेलो. मग काही दिवस प्वेर्त रिको इथे मुक्काम केल्यावर आम्ही परत युरोपला गेलो. आम्ही अशी एक बोट शोधत होतो, जिच्यात काही बदल करून ती प्रवासासाठी आणि राहण्यासाठीही वापरता येईल. पण तीन महिने प्रयत्न केल्यावर आमचा हा बेत फिसकटला. कारण मला जर्मनीच्या सैन्यात भरती व्हावं लागलं.

मी एक वर्ष तीन महिने जर्मन नौसेनेत होतो. याच दरम्यान लॉरी आणि माझं लग्न झालं. जग फिरायचं आमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढच्या प्रवासाची तयारी करू लागलो. मी सैन्यात जायच्या काही काळाआधी आम्ही एका बोटीचा सांगाडा विकत घेतला होता. नंतर हळूहळू आम्ही त्या सांगाड्याची अशी एक बोट तयार केली जिच्यात आम्हाला राहता येईल आणि प्रवासही करता येईल. याच बोटीतून जगातली सुंदर ठिकाणं पाहायचं आम्ही ठरवलं. यादरम्यान, म्हणजे मी सैन्य सोडल्यावर आणि आमचं बोटीचं काम चालू असताना आमची भेट यहोवाच्या साक्षीदारांशी झाली. आम्ही त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करू लागलो.

बायबलने जीवन कसं बदललं?

सुरुवातीला मला वाटलं की मला जीवनात फार काही बदल करायची गरज नाही. कारण आमचं रीतसर लग्न झालं होतं आणि माझी सिगरेटची सवयही मी केव्हाच सोडली होती. (इफिसकर ५:५) आणि राहिली गोष्ट आमच्या जग फिरायच्या स्वप्नाची, तर त्यात काही चुकीचं नाही असं मला वाटत होतं. कारण देवाच्या सृष्टीचं निरीक्षण करण्यासाठी अख्खं आयुष्य घालवण्यात काय गैर आहे?

पण खरं पाहिलं तर मला बरेच बदल करावे लागणार होते. खासकरून माझ्या स्वभावात. मला स्वतःवर खूप गर्व होता आणि मला कोणाचीही गरज नाही असं मला वाटायचं. माझ्याकडे जी काही कौशल्यं होती आणि मी जे काही मिळवलं होतं, त्याच्या पलीकडे मी कधीच विचार करत नव्हतो. मी फक्‍त स्वतःसाठी जगत होतो.

एकदा मी येशूचा डोंगरावरचा उपदेश वाचत होतो. (मत्तय, अध्याय ५-७) तिथे येशू सुखी राहण्याबद्दल जे बोलत होता, ते वाचून मी तर गोंधळातच पडलो. जसं की, तो म्हणाला, की जे भुकेले आणि तहानलेले आहेत ते सुखी आहेत. (मत्तय ५:६) पण एखादी भुकेली किंवा तहानलेली व्यक्‍ती सुखी कशी काय असू शकते हे मला समजलं नाही. पुढे जसजसं मी बायबलचा अभ्यास करत गेलो, तसतसं मला कळालं की आपल्या सर्वांमध्ये देवाच्या मार्गदर्शनाची एक भूक असते. पण ही भूक भागवण्यासाठी आधी आपण हे नम्रपणे कबूल केलं पाहिजे, की आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. आता मला येशूच्या या शब्दांचा अर्थ समजलाय, “ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे ते सुखी आहेत.”​—मत्तय ५:३.

जर्मनीमध्ये बायबलचा अभ्यास सुरू केल्यानंतर, लॉरी आणि मी आधी फ्रान्स आणि नंतर इटलीला राहायला गेलो. जिथेजिथे आम्ही गेलो, तिथेतिथे आम्हाला यहोवाचे साक्षीदार भेटले. त्यांचं एकमेकांवर जे मनापासून प्रेम होतं आणि त्यांच्यात जी एकता होती, ती मी जगात दुसरीकडे कुठेच पाहिली नव्हती. यहोवाचे साक्षीदार जगभरात असले तरी ते एका मोठ्या कुटुंबासारखे आहेत याची मला खातरी पटली. (योहान १३:३४, ३५) मग काही काळातच मी आणि लॉरी बाप्तिस्मा घेऊन यहोवाचे साक्षीदार बनलो.

बाप्तिस्म्यानंतरही मी माझ्या स्वभावात बदल करतच राहिलो. लॉरी आणि मी ठरवलं होतं, की आफ्रिकन समुद्रकिनाऱ्‍यावरून प्रवास करत अट्‌लांटिक महासागर पार करायचा आणि मग अमेरिकेला जायचं. तो प्रवास मी कधीच विसरू शकणार नाही. आमच्या आजूबाजूला नजर जाईल तिथपर्यंत मैलोन्‌मैल पाणीच पाणी होतं. आणि त्या अथांग सागरात एका लहानशा बोटीत आम्ही दोघंच होतो. त्या वेळी मला जाणीव झाली की आपल्या महान निर्माणकर्त्यासमोर खरंतर मी काहीच नाही. समुद्रावरचा प्रवास करताना माझ्याजवळ भरपूर मोकळा वेळ होता. कारण करायला असं विशेष काही नव्हतं. म्हणून मी तासन्‌तास बायबल वाचायचो. येशूच्या पृथ्वीवरच्या जीवनाचे अहवाल मला खूप आवडले. तो सर्व बाबतींत परिपूर्ण होता. आपण कल्पनाही करू शकत नाही, इतकी कौशल्यं आणि क्षमता त्याच्याकडे होत्या. पण तरी त्याने कधीच स्वतःकडे लोकांचं लक्ष वेधलं नाही. तो फक्‍त स्वतःसाठी जगला नाही, तर त्याने नेहमी आपल्या स्वर्गातल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे जगायचा प्रयत्न केला.

मला जाणीव झाली की मी माझ्या जीवनात देवाच्या राज्याला पहिलं स्थान दिलं पाहिजे

येशूच्या उदाहरणावर मी जितका जास्त विचार करत गेलो, तितकीच मला जाणीव झाली की मला माझ्या जीवनात अजून काही बदल करायची गरज आहे. पूर्वी मी फक्‍त मला आवडणाऱ्‍या गोष्टी करायचो आणि उरलेल्या वेळात देवाची सेवा करायचो. पण आता मला जाणीव झाली की मी माझ्या जीवनात देवाच्या राज्याला पहिलं स्थान दिलं पाहिजे. (मत्तय ६:३३) अमेरिकेला पोहोचल्यावर आम्ही ठरवलं की आता इथेच राहायचं, आणि जास्तीत जास्त वेळ देवाच्या सेवेत घालवायचा.

मला झालेला फायदा

पूर्वी जेव्हा मी फक्‍त स्वतःसाठी जगत होतो, तेव्हा माझ्या जीवनाला दिशाच नव्हती. पण आता मला जीवनात सगळ्यात चांगलं मार्गदर्शन मिळालंय. (यशया ४८:१७, १८) तसंच माझ्या जीवनाला एक दिशाही मिळाली आहे. आज मी देवाची उपासना करतोय आणि इतरांनाही त्याच्याबद्दल शिकून घ्यायला मदत करतोय.

बायबलच्या सल्ल्याचं पालन केल्यामुळे आमच्या विवाहाचं बंधन आणखी मजबूत झालंय. आम्हाला मिळालेला आणखी एक आशीर्वाद म्हणजे आज आमची मुलगीही यहोवाची सेवा करत आहे.

आमच्या जीवनाचा प्रवास नेहमीच सोपा नव्हता. बरेच चढउतार आले. पण यहोवाने आम्हाला कधीच सोडलं नाही. म्हणून आम्ही ठरवलंय, की पुढेही नेहमी त्याच्यावर भरवसा ठेवायचा आणि त्याची सेवा करतच राहायची.​—नीतिवचनं ३:५, ६.