काळजी वाहणारा देव आहे?
काळजी वाहणारा देव आहे?
१, २. (अ) पहिल्या परिच्छेदात मांडलेले प्रश्न तुम्ही कधी विचारले होते का? (ब) कोणती परिस्थिती असे प्रश्न विचारण्यास लोकांना प्रवृत्त करते?
देव अस्तित्वात असेल तर, त्याने आतापर्यंत लोकांवर अनेक संकटे का येऊ दिली? त्याला जर खरोखरच आपली काळजी असेल तर दुष्टाई आणि हाल–अपेष्टांना, त्याने मोकळीक का दिली?
२ सर्वत्र, विचारवंत माणसे असेच प्रश्न विचारतात आणि त्याला कारणहि तसेच आहे. भयंकर युद्धे, दुष्काळ, गरीबी, गुन्हे, रोगराई यांनी शतकानुशतके मानवजातीचे अनन्वित हाल केले आहेत. अन्याय व जुलुमहि बऱ्याच दुःखाला कारणीभूत आहेत. त्याचप्रमाणे पूर व भूकंप यासारख्या आपत्तींनीहि असेच दुःख आणले आहे. अनेकदा स्वतःची चूक नसताहि अजाण व्यर्क्तिना दुःख सोसावे लागते. आम्हावर जे गुदरते त्याची देवाला मुळीच काळजी नाही असा या सर्वांचा अर्थ आहे का? या सर्व त्रासांपासून मुक्त जीवन मनमुराद जगता येईल अशा चांगल्या जगाची आशा आहे का?
३. या प्रश्नांची उत्तरे शोधणे योग्य का आहे?
३ अशा प्रश्नांना प्रामाणिक व समाधानकारक उत्तरे मिळाली पाहिजेत. “आपण दुःख सोसावे अशी देवाची इच्छा आहे” किंवा “या गोष्टी आपल्याला कळत नाहीत” अशी उत्तरे प्रामाणिक किंवा समाधानकारकहि नाहीत. ज्याअर्थी देव इतके अद्र्भित विश्व निर्माण करू शकतो, त्या अर्थी मानवात एवढा गोंधळ माजू देण्यासहि त्याला सबळ कारण जरूर असेल. असा हा देव, त्याने दुष्टाई का चालू दिली हे त्याच्या स्वतःच्या मानवी निर्मितीला सांगण्याएवढी काळजी बाळगणार नाही का? त्याच्यात तशी शक्ति असल्यास योग्य वेळीच ही सर्व वाईट परिस्थिती सुधारणे हे त्याच्या बाबतीत सूज्ञपणाचे ठरणार नाही. काय? शक्य असल्यास, आपल्या मुलांसाठी कोणताही प्रेमळ पिता तेच करील. मग सर्वशक्तिमान, सर्व–ज्ञानी आणि प्रेमळ देव, पृथ्वीवरील आपल्या मुलांसाठी कांही उणे ठेवणार नाही.
सर्वोत्तम उत्तर कोण देऊ शकेल?
४. देव दुष्टाईला परवानगी का देतो हे आपणास योग्यपणे कोण सांगू शकेल?
४ दुष्टाईला देवाने दिलेल्या परवानगीबाबतच्या प्रश्नांची नीट उत्तरे कोण देऊ शकेल? समजा, एखाद्या चुकीबद्दल तुमच्यावर आरोप आला तर त्याबाबतीत इतर काय म्हणतील तेच लोकांनी ऐकावे असे तुम्हाला वाटेल का? किंवा ज्याला खरे जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांच्या मनातील शंकाकुशंका निस्तरण्यासाठी तुम्ही स्वतःचे म्हणणे मांडाल? दुष्टाईला वाव देण्याबाबत देवाला सहसा दोष दिला जातो. त्याने दुष्टाईला परवानगी का दिली ते त्यालाच माहित असल्याने त्याला आपली बाजू मांडू देणे न्याय्य नव्हे काय? या बाबतीत मानवाकडून उत्तराची अपेक्षा ठेवल्याने कधीहि समाधान होणार नाही, कारण बहुधा त्याच्या कल्पना परस्पर विरोधी असतात.
५. पवित्रशास्त्राचा लेखक देव आहे असे मानणे व्यवहार्य आहे का? (२ पेत्र १:२१; हबक्कूक २:२)
५ देवाने उत्तरे कोठे दिली आहेत? कोणत्या घटना घडल्या व का हे आपल्याला सांगण्यासाठी देवाने फक्त एकाच उगमाची योजना केली आहे. ते उगमस्थान म्हणजे पवित्रशास्त्र होय. ते म्हणते: “प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित आहे.” (२ तिमथ्यी ३:१६) यात आश्चर्य वाटण्यासारखे कांहीहि नाही, कारण देवाजवळ हे अद्र्भित विश्व निर्माण करण्याची शक्ति आहे तर नक्कीच तो एका पुस्तकाचे संपादकत्व करू शकतो. अदृष्य लहरींमार्फत साधा माणूसहि आवाज, कल्पना आणि चित्रे तुमच्या रेडिओ किंवा टेलिव्हिजनपर्यंत पोहोचवू शकतो. मग सर्वशक्तिमान देवाला, आपले विचार विश्वासू माणसांपर्यंत पोहोचविणे व ते विचार त्या माणसांमार्फत नीट लिहवून घेणे मुळीच कठीण नाही. यासाठी प्रेषित पौल विश्वासाने म्हणू शकला: “तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसाचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि वास्तविक ते तसेच आहे.”—१ थेस्सलनीकाकरास २:१३.
६. पवित्रशास्त्र किती मागचा इतिहास सांगते व त्यामुळे आपल्याला त्यातून काय माहिती मिळू शकते? (लूक १:१–४ तसेच लूक ३:२३–३८ पहा)
६ पवित्र शास्त्राचा तुम्ही खोलवर अभ्यास केला नसेल. पण आज अस्तित्वात असलेला कालमापन केलेला संपूर्ण ऐतिहासिक वृत्तांत त्यात सामावलेला आहे ही माहिती तुम्हाला आवडेल. पहिल्या शतकातील लूक (तो एक वैद्य होता) या इतिहासकाराला नासोरी येशूची वंशावळ टप्प्या–टप्प्याने नावांसह पहिल्या माणसापर्यंत, ४००० वर्षे मागे पर्यंत शोधता आली. पवित्र शास्त्र मानवाच्या अस्तित्वाच्या आरंभापर्यंत मागे जात असल्याने दुष्टाईला जबाबदार कोण, देवाने त्याला परवानगी का दिली, व त्यावर कसा इलाज केला जाईल हे सर्व ते आपल्याला सांगू शकते.
दोष देवाचा आहे का?
७. चुका होतात तेव्हा दोष कोणाला द्यावा?
७ गुन्हा इतर कोणी केला व दोष तुम्हाला दिल्यास, तुम्हाला ते कसे वाटेल? तुम्हाला तो अन्याय वाटेल. गुन्हेगाराला शिक्षा व निरापराध्याची दोषापासून मुक्तता झाल्यासच न्यायाची पूर्ति होते. एखाद्या मोटार चालकाने थांबण्याच्या इषाऱ्याकडे दुर्लक्ष केले व तो अपघातात सापडला तर दोष कायद्याचा नव्हे. एखाद्या व्यक्तिने खादाडपणा केला व अति सेवनाने तो आजारी पडला तर धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा तो दोष नव्हे. चांगले पालन पोषण केल्यावरहि एखादा तरुण घर सोडून गेला व वडिलांचे मार्गदर्शन झिडकारून गोत्यात आला तर त्याच्या वडिलांना दोष देता येणार नाही. मग मानवाने चुका केल्यास, स्वर्गीय पित्याला, देवाला का दोष द्यावा? ज्याची चूक आहे त्याला—गुन्हेगाराला—दोष द्यायला नको का?
८. वाईट गोष्टीबद्दल देवाला दोष दिल्यास कोणती विसंगती निर्माण होते?
८ त्याशिवाय आणखी कांही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. जर उपासमारीसाठी देवाला आपण दोष दिला तर अनेक देशात विपुल धनधान्य पिकविणाऱ्या सुपीक शेतांसाठी व बागांसाठी आपण कोणाला धन्यवाद द्यावेत? आजारांसाठी देवाला दोष दिला तर आपल्या शरिरातील उपजत रोग प्रतिबंधक व्यवस्थेसाठी कोणाला धन्यवाद द्यावे? शहरातील झोपडपट्यांसाठी आपण देवाला दोष दिला तर उत्तुंग पर्वत, स्वच्छ सरोवरे, सुंदर वृक्ष व मोहक फुलांसाठी कोणाला धन्यवाद द्यावे? जगाच्या समस्यांबद्दल देवाला दोष दिला व मग पृथ्वीवरच्या चांगल्या गोष्टींबद्दल धन्यवाद दिले तर तो मोठा विरोधाभास होईल हे उघड आहे. प्रेमळ देव एकाच वेळी चांगल्या व वाईट गोष्टीला चालना देत नाही.
९. माणसांच्या हातून चुका घडत असल्याने देवच अस्तित्वात नाही असे म्हणणे तर्काला धरून आहे का? (यशया ४५:१८)
९ देव अस्तित्वातच नाही असे म्हटल्याने प्रश्न आणखीनच बिकट होतो. ही पृथ्वी व तिच्यावरील जीवसृष्टी आपोआप झाली असे मानणे म्हणजे वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे होय. जीवन टिकवून ठेवण्याची धारणा कोणत्याही घरापेक्षा पृथ्वीवर अधिक चांगली आहे; आणि प्रत्येक घर बनविण्यास एक बुद्धिमान योजक व गवंडी लागतोच. मग हवा, पाणी व जमिनीच्या, जीवन टिकवून धरणाऱ्या अधिक चांगल्या व्यवस्था असलेल्या पृथ्वीचे काय? “प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्व काही बांधणारा देवच आहे” हे पवित्रशास्त्राचे विधान तर्कशुद्ध आहे. (इब्री ३:४) माणसे वाईट गोष्टी करतात त्याअर्थी देव अस्तित्वात नाही असे काही लोक म्हणतात हे खरे. परंतु ही गोष्ट जणू इमारतीत राहणारी माणसे वाईट गोष्टी करतात. म्हणजे त्या इमारतीला बांधणारा कोणी नसावा असे म्हटल्यासारखे आहे. त्याचप्रमाणे, एखादी व्यक्ति चुका करत असली तर तिला बापच नसावा असेहि म्हटल्यासारखे ते होईल.
१०. दुष्टाईचा दोष बहुतांशी कोणाला दिला पाहिजे?
१० मानवजातीवर आलेल्या या घोर आपत्तीचा दोष कोणाचा? बराचसा दोष लोकांचा स्वतःचा आहे. माणसाचा अप्रामाणिकपणा आणि वैफल्यामुळे गुन्हे घडतात. माणसाच्या गर्व व स्वार्थामुळे, विभक्त विवाह, द्वेष, व वर्णभेद संभवतात. माणसाच्या चूका व बेदरकार वृत्तीमुळे प्रदूषण व घाण पसरते. माणसाच्या मगरूरी व मूर्खपणामुळे युद्धे होतात व जेव्हा देशांतील सर्व लोक राजकीय पुढाऱ्यांना आंधळेपणाने युद्धांत पाठिंबा देतात तेव्हा होणाऱ्या अपेष्टांना कारणीभूत होणाऱ्या दोषात त्यांचाहि वाटा असतो. गरीबी व अन्नाचा तुटवडा मुळात माणसाचा निष्काळजीपणा व लोभातून निर्माण झालेला आहेत. विचार करा: दरवर्षी शस्त्रास्त्रांवर जगात २,००,००० कोटी डॉलर्स खर्च होतात. हाच पैसा धान्य पिकविण्यासाठी, धान्याचे समान वाटप करण्यासाठी व चांगली घरे बांधण्यासाठी खर्च केल्यास किती साध्य होऊ शकेल याची कल्पना करा.
११. आपापल्या देशांच्या सैन्यासाठी पुरोहित प्रार्थना करीत असतील तर त्या देशांच्या लढायांबद्दल देव दोषी ठरतो का? (यशया १:१५; नीतिसूत्रे २८:९)
११ धर्माच्या नावाखाली केलेल्या दुष्कृत्यांचा दोषहि देवावर लादता येणार नाही. उदाहरणार्थ, आपापल्या देशाच्या लढाईत, त्या त्या देशासाठी पुरोहित देवाच्या आशीर्वादांसाठी प्रार्थना करतात. कित्येकदा, एकमेकांना ठार करणारे सैनिक, विरुद्ध पक्षाचे असले तरी एकाच धर्माचे असतात! अशा वेळी देवाला दोष देता येणार नाही, कारण त्यांच्या कृतीचा तो धिक्कार करतो. तो म्हणतो की त्याच्यावर अंतःकरणपूर्वक प्रीति करणाऱ्यांची ‘आपसांत एकमेकांवर प्रीति असेल.’ (योहान १३:३४, ३५) त्यांच्यामध्ये अशाप्रकारची प्रीति नसेल तर देव म्हणतो: “काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला”; त्याच्यासारखे ते लोक असतात. (१ योहान ३:१०–१२) युद्धांमध्ये अथवा तथाकथित धर्मबाह्य वर्तन करणाऱ्यांच्या चौकशांमध्ये देवाच्या नावाने माणसांना ठार करणे हे, खोट्या देवांना लहान मुलाचे बळी देण्याच्या प्राचीन प्रथेसारखेच आहे. सर्वसमर्थ देव म्हणतो या गोष्टींविषयी, “मी आज्ञा केली नव्हती, ती माझ्या मनातहि आली नव्हती.”—यिर्मया ७:३१.
१२. धार्मिक पुरोहितांना पवित्रशास्त्रात “ढोंगी” का म्हटले आहे? (मत्तय १५:७–९)
१२ धर्म–पुरोहितांची राजकारणातील ढवळाढवळ; त्यांचा युद्धांना असलेला पाठिंबा, आणि देवच जगातल्या हाल–अपेष्टांना कारणीभूत आहे अथवा, तो खरोखरीच्या नरकात लोकांना जाळतो अशासारख्या खोट्या शिकवणी, या सर्वांचा विचारवंतांना व देवाला तिटकारा आहे. देवाच्या आज्ञेविरुद्ध वागणाऱ्या व शिकवणाऱ्या धर्मगुरूंना देवाच्या वचनांत “ढोंगी” संबोधिलेले आहे. त्यांना उद्देशून देवाच्या वचनात असेहि म्हटले आहे: “तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहां; त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आंत मेलेल्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. तसे तुम्हीहि बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आंत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहा.” (मत्तय २३:२७, २८) येशूने तर ढोंगी धर्मगुरूंबद्दल म्हटले: “तुम्ही आपला बाप सैतान ह्या पासून झाला आहा.”—योहान ८:४४.
१३. (अ) माणसांनी, धर्मगुरुंनी, केलेल्या चुकांबद्दल देवाला दोष देता येईल का? (ब) मग कोणते प्रश्न उभे राहतात?
१३ माणसांनी स्वतः केलेल्या चुकांबद्दल देवाला दोषी धरता येणारच नाही, तसेच देवाची सेवा करीत असण्याचा दावा करणाऱ्या परंतु सत्य न बोलणाऱ्या व न पाळणाऱ्या धार्मिक पुढाऱ्यांनी पाठिंबा दिलेल्या चुकांबद्दलहि देवाला दोषी ठरविता येणार नाही. मग देवाने मानवजातीला जसे बनविले त्यातच कांही उणे राहिले असेल का?
निर्दोष आरंभ
१४. देवाने आपल्या पहिल्या पालकांचा आरंभ कसा केला हे सांगा. (उत्पत्ती १:२६–३१; २:७–९, १५)
१४ उत्पत्ती पुस्तकाचे पहिले दोन अध्याय वाचल्यावर, देवाने पुरुष व स्त्री घडविली तेव्हा त्यांच्यांत कांहीहि दोष नव्हता हे स्पष्ट होते. आजार व मरणाचा त्यांना कधीही त्रास होणार नाही अशा अव्यंग शरीर व मनासह त्यांना देवाने निर्मिले. सुंदर फुले, हिरवीगार वनराई व फुलदायी वृक्ष असलेली एक सुंदर बाग त्यांचे वसतीस्थान होते. तेथे कशाचीहि कमतरता नव्हती. उलट सगळ्याचीच विपुलता होती. त्याचप्रमाणे देवाने आपल्या प्रथम माता–पित्यासमोर मन रमेल असे काम व प्रोत्साहन मिळेल असे ध्येयहि ठेवले होते. त्या बागेच्या सीमा सबंध पृथ्वी व्यापून टाकण्याइतक्या वाढविण्याबद्दल देवाने त्यांना आज्ञा केली. कांही काळाने, त्यांना झालेल्या अव्यंग मुलांची त्यांना या कामात मदत झाली असती. अशा रितीने कालांतराने मानवजात, पृथ्वीवर नंदनवनात राहणारी अशी झाली असती. त्यांनी सार्वकालिक जीवन उपभोगिले असते. तसेच प्राणीहि त्यांच्या सत्तेखाली राहिले असते.
१५. मानवी पूर्णतेचा अर्थ काय होतो व कसा होत नाही?
१५ मग हा अनर्थ झाला कसा? देवानेच मुळात मानवजात सदोष निर्मिली का? तसे मुळीच नाही. कारण अनुवाद ३२:४ देवाबद्दल म्हणते: “त्याची कृती परिपूर्ण आहे.” परंतु मानवी परिपूर्णतेचा अर्थ पहिल्या मानवी दांपत्याला सर्व माहिती होती, ते कांहीही करू शकत होते किंवा त्यांच्या हातून चुका होणे शक्य नव्हते असा नव्हता. परिपूर्ण प्राणिमात्रांनाहि मर्यादा घालणाऱ्या गोष्टी असतात. उदाहरणार्थ, कांही भौतिक मर्यादा होत्या. त्यांनी अन्न खाल्ले नसते, पाणी प्याले नसते, हवेचा श्वास घेतला नसता तर ते मेले असते. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचे उल्लंघन करून उंचावरून उडी मारून, इजा न होण्याची अपेक्षा करू शकत नव्हते. त्याचप्रमाणे त्यांना मानसिक मर्यादा होत्या. त्यांना अनुभव कांहीच नसल्यामुळे त्यांना बरेच शिकावयाचे होते हे उघड आहे. पण त्यांनी कितीहि ज्ञान मिळविले तरी त्यांच्या निर्मात्याइतके ज्ञान त्यांना कधीच होऊ शकणार नव्हते. त्यामुळे परिपूर्ण असूनहि मानवजातीत असल्यामुळे त्यांच्यावर मर्यादा पडल्या होत्या. परिपूर्णतेचा अर्थ एवढाच की ते योग्य घडविले होते, त्यांच्यात शरिरीक अथवा मानसिक न्यून नव्हते.
१६. मानवी स्वातंत्र्य कोणत्या मर्यादेच्या चौकटीत नीटपणे कार्यक्षम ठरणार होते? (१ पेत्र २:१६)
१६ त्याचप्रमाणे देवाने मानवाला स्वतंत्र नैतिक अधिकार असलेला निर्मिला होता. तो प्राण्यांप्रमाणे उपजत प्रवृत्तीने वागणारा नव्हता. आणि अशा स्वातंत्र्याची तुम्हाला नक्कीच किंमत वाटते. तुम्ही काय करावे यावर प्रत्येक क्षणाला कोणीतरी हुकुमत गाजवावी हे तुम्हाला आवडणार नाही. परंतु ते स्वातंत्र्य अमर्याद नव्हते, तर सापेक्ष होते. देवाच्या नियमाच्या चौकटीपुरते ते मर्यादित होते. सर्व मानवजातीचे हित लक्षांत ठेवून बनविलेले ते नियम साधे आणि थोडे असतील. त्याच्या नियमांचा आदर केल्याने मानवाला अनंत फायदे होतील हे देवाला माहीत असल्याने, ते नियम त्यांनी पाळावे या त्याच्या आदेशातून त्याचे मानवांवरील प्रेमच दिसून येते. देवाचा व त्याच्या नियमांचा अनादर केल्याने त्यांच्या सुखात अडचणी निर्माण होणार होत्या, त्याने काही भले होणार नव्हते, उलट खात्रीने संकटच ओढावणार होते. कारण त्यांचा अव्हेर केल्यास ते नक्कीच मरतील असा इशारा देवाने आदाम व हव्वेला दिला होता. (उत्पत्ती २:१७) यास्तव, जिवंत राहण्यास त्यांना अन्न खाण्याची, पाणी पिण्याची व श्वासोच्छ्वास करण्याचीच फक्त गरज होती असे नव्हे तर देव व त्याच्या नियमांच्या मार्गदर्शनाचीहि त्यांना तेवढीच गरज होती.
१७. मानवाने देवावर अवलंबून राहण्याचे दुसरे महत्वाचे कारण कोणते? (स्तोत्र १४६:३; यिर्मया १७:५–९)
१७ देवावर अवलंबून राहण्यास आपल्या पहिल्या माता–पित्यांना आणखी एक महत्वाचे कारण होते. ते कारण म्हणजे देवाच्या मदतीशिवाय स्वतंत्रपणे स्वतःचा कारभार चालविता येईल अशा रितीने मानवाची निर्मिती केलेली नव्हती. देवाने त्यांना तसा अधिकार वा तशी कुवत दिली नव्हती. पवित्रशास्त्रात म्हटल्याप्रमाणे: “मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही; पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) यासाठीच पवित्रशास्त्र असेही म्हणते: “जो आपल्या हृदयावर भरवसा ठेवतो तो मूर्ख.”—नीतिसूत्रे २८:२६.
दुष्टपणाचा आरंभ कसा झाला?
१८. आपल्या प्रथम पालकाच्या बाबतीत काय चूक झाली? (याकोब १:१४, १५; स्तोत्र ३६:९)
१८ अशा रीतीने चांगली सुरुवात होऊनही कोठे बिघाड झाला? यात, की आपल्या प्रथम माता–पित्यांनी चुकीची निवड करण्यासाठी आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग केला. देवाच्या अधिपत्याखाली राहण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या मनास मानेल त्याप्रमाणे वागावयाचे ठरविले. स्त्रीला तर वाटले की ते “देवासारखे बरे–वाईट जाणणारे” होतील. (उत्पत्ती ३:५) स्वतःच्या विचार शक्तिवर विसंबून, काय बरे व काय वाईट हे स्वतः ठरवावे असे त्यांना वाटले. अशा विचारसरणीमुळे पुढे किती हानी होईल याची त्यांना जाणीव झाली नाही. देव सत्यप्रतिज्ञ असल्याने नेमके तेच झाले. (तीत १:२) देवाचे अधिपत्य झुगारल्यामुळे, विजेवर चालणाऱ्या पंख्याचे प्लग काढल्यामुळे जे होते, तसेच झाले. त्याला मिळणारी शक्ति खंडित झाल्यामुळे पंख्याचा वेग कमी होतो व थोड्या वेळाने तो थांबतो. त्याचप्रमाणे पहिले मानवी दांपत्य त्यांच्या जीवनदात्यापासून, यहोवापासून दुरावल्यामुळे हळुहळू खंगत गेले व देवाने आधीच इशारा दिल्याप्रमाणे ते मरण पावले.
१९. संपूर्ण मानवजात अपूर्ण का जन्मली? (रोम ५:१२)
१९ मुले होण्याआधीच आमच्या मूळ पालकांनी देवाविरुद्ध बंड पुकारल्यामुळे पहिले मूल होण्यापूर्वीच त्यांच्यात व्यंग निर्माण झाले. आदाम व हव्वा एखाद्या सदोष साच्याप्रमाणे बनले. त्याच्यापासून निर्माण झालेले सर्वच सदोष झाले. आता स्वतःपाशी असलेले—सदोष शरीर व मनच—ते आपल्या मुलांना देऊ शकले. जीवन व परिपूर्णता टिकविणाऱ्या मूळ स्त्रोतापासून—यहोवा देवापासून—अलग झाल्यामुळे ते आता परिपूर्ण राहिले नव्हते. यासाठीच रोमकरांस लिहिलेल्या पत्रातील ५:१२ प्रमाणे त्यावेळेपासून जन्मलेले सर्वच अपूर्ण (सदोष) झाले व आजार, वृद्धापकाळ व मृत्यूकडे ते झुकलेले आहेत. पण याचा दोष देवाला देता येणार नाही. अनुवाद ३२:५ म्हणते: “हे बिघडले आहेत. हे त्यांचे पुत्र नव्हेत, हा त्यांचा दोष आहे.” तसेच उपदेशक ७:२९ म्हणते: “देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे.”
२०. थोड्या लोकांच्या चुकांमुळे अनेकांना त्रास कसा होतो?
२० फक्त दोन व्यर्क्तिच्या अवज्ञेमुळे सर्वांना असे दुःखद परिणाम भोगावे लागणे व्यवहार्य आहे का? इमारतीच्या बांधकामात फक्त एका माणसाने सुरक्षिततेच्या एखाद्या नियमाबाबतीत निष्काळजीपणा केल्याने अनेक लोकांच्या जीवावर बेतते हे आपल्याला माहीतच आहे. एखाद्या धरणाविषयी असाच निष्काळजीपणा केल्याने तो बांध फुटून मोठी हानी करणारा पूर येऊ शकतो. सरकारातील एक उच्चपदस्थाच्या अगदी एका भ्रष्टाचारामुळे, लाखो लोकांना हानी पोहोचेल अशा दुर्वर्तनाची साखळीच सरकारी नोकरांत निर्माण होते. कुटुंबामध्ये, आई–वडिलांच्या चुकीच्या निवडीमुळे (धोरणामुळे) त्यांच्या मुलांना भयंकर दुष्परिणाम भोगावे लागतात. आपल्या पहिल्या पालकांनी चुकीची निवड केली. त्याचा परिणाम म्हणून सबंध मानवजातीवर अपूर्णत्व व अनर्थ कोसळले.
२१. देवाने का मृत्यूदंड उचलून धरला व तरीही त्याचा दयाळूपणा कसा प्रदर्शित झाला?
२१ देवाचा कायदा व सचोटी त्यात गुंतलेली असल्यामुळे कायदा अमलात न आणून त्याच्या उल्लंघनाकडे दुर्लक्ष करणे त्याला शक्य नव्हते. त्याने या बाबतीत काहीच कृती केली नाही तर त्याच्याविषयी व त्याच्या कायद्याविषयी लोकांना कसला आदर वाटेल? स्वतः बनविलेले नियम न पाळणाऱ्या अथवा कांही लोकांना शिक्षा न करता ते मोडण्याची मोकळीक देणाऱ्या सत्ताधाऱ्यांबद्दल आपल्याला आदर वाटतो का? याकरिता देवाने आधीच सांगितलेली अवज्ञेबद्दलची शिक्षा अमलात आणली. ती म्हणजे मृत्यू. परंतु त्याने दयाळूपणाने त्या पहिल्या जोडप्याला मुले होऊ दिली. त्या दयेची जाण आपण ठेवली पाहिजे कारण त्याशिवाय आपला जन्म झालाच नसता आणि आदाम व हव्वेच्या चुकीमुळे आपण अपूर्ण असलो तरी मरण्यापेक्षा जिवंत असणेच आपण जास्त पसंत करीत नाही काय?
२२. दुष्टाईचा बराचसा दोष आणखी कोणाकडे जातो? (मत्तय ४:१–११; इफिस ६:१२)
२२ मग, दुष्टाईची सुरुवात पूर्णपणे माणसांपासून झाली असा याचा अर्थ आहे का? नाही, त्यात ह्यापेक्षा जास्त गोवलेले आहे. देवाने बुद्धीवान प्राणी म्हणून फक्त माणसाचीच निर्मिती केली नाही; त्या आधी त्याने स्वर्गात अगणित बुद्धिमान पुत्रांची—आत्मिक व्यर्क्तिची—निर्मिती केली होती. त्यांना स्वतंत्र नैतिक अधिकार असला तरी जिवंत राहण्यासाठी त्यांना देवाचे योग्य व चांगले कायदे पाळणे आवश्यक होते. परंतु अशा आत्मिक व्यर्क्तिपैकी एक, चुकीच्या कल्पनांचा विचार करू लागला. जेव्हा एखादी व्यक्ति चुकीच्या गोष्टींचे सतत चिंतन करू लागते तेव्हा शेवटी त्याच्या हातून ती कृतीत उतरण्यापर्यत मजल येते. या आत्मिक व्यक्तिचे तसेच झाले. त्याने स्वतःच्या मनांतील महत्वाकांक्षा इतकी वाढविली की देवाच्या कृतींना आव्हान देण्यापर्यंत त्याची मजल गेली. त्याने आदामाच्या बायकोला—हव्वेला सांगितले की त्यांनी देवाशी आज्ञाधारक राहिलेच पाहिजे असे नाही आणि वर तो म्हणाला: “तुम्ही खरोखर मरणार नाही.” (उत्पत्ती ३:४) जीवन व सौख्यासाठी देवावर अवलंबून राहण्याच्या जरुरीबद्दल त्याने शंका काढली. उलट अवज्ञेमुळे त्यांची परिस्थिती अधिक सुधारेल व त्यामुळे ते देवासारखे होतील असे त्याने म्हटले. अशारीतीने त्याने देवाच्या सत्यतेबद्दल शंका व्यक्त केली. देवाच्या कायद्यांबद्दल योग्य–अयोग्यतेबद्दल प्रश्न उपस्थित करून त्याने देवाच्या अधिपत्याचा मार्ग संशयास्पद ठरविला—म्हणजे देवाच्या अधिपत्याचा हक्कच संशयास्पद ठरविला. त्यामुळे त्याला सैतान—म्हणजे विरोधक व दियाबल—म्हणजे निंदक म्हटले गेले.
तिला आतापर्यंत मुभा का देण्यात आली?
२३, २४. ह्या वादविषयांचा निकाल लागण्यास वेळ का लागेल?
२३ देव कितीतरी बलवान असल्याने सुरुवातीलाच या मानवी व आत्मिक बंडखोराचा नायनाट करू शकला असता. पण त्यामुळे परिस्थितीचा समाधानकारक अंत झाला नसता. का बरे? कारण देवाच्या बलाला आव्हान देण्यात आलेले नव्हते. उपस्थित केलेले वादविषय नैतिक होते. त्यातला महत्वाचा विषय होता: बंडाळीचा मार्ग यशस्वी ठरेल का? देवाला झुगारणारे सरकार सबंध मानवजातीला अक्षय फायदे मिळवून देऊ शकेल का? मानवांवर देवाने अधिपत्य केल्यास त्यांचा फायदा होईल की त्यांचे स्वतःचे सरकार जास्त हितकारक ठरेल? देवाने आपल्या सुज्ञानाआधारे हे ताडले की हे आणि इतर उपस्थित केलेले वाद मिटविण्यास बराच कालावधी लागेल. यामुळेच त्यांना आपल्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक व वैज्ञानिक अंगांचा उच्चांक संपादन करण्याची भरपूर संधी मिळेल अशी ठराविक मुदत देवाने दिली.
२४ ती मुदत फक्त कांही दिवसांची किंवा थोड्या वर्षांची असणे शक्य नव्हते. सर्व शंका निरसन होण्यापलिकडे वादाचे उत्तर सिद्ध होण्यास बऱ्याच पिढ्यांचा काळ लागणार होता. फक्त दोनच माणसे गोवलेली असताना न्यायलयीन खटले बरेच दिवस, बरेच महिने, चालतात. देवाच्या अधिपत्याविषयी उत्पन्न झालेले महत्वाचे वाद, अर्धवट तडजोडीने नव्हे तर पूर्णपणे सुटले पाहिजेत. अशा रितीने भविष्यात, हे वाद पुन्हा पुन्हा उपस्थित व्हावयाची गरज राहणार नाही. प्रेमळ देव कायमची तोडच मान्य करील. त्याबद्दल आपल्यालाही आनंदच वाटेल. कारण फक्त अशी तोड काढल्यानेच स्वर्गातील व पृथ्वीवरील देवाच्या कुटुंबाला अनंत शांती व सुरक्षिततेचा मार्ग खुला होईल.
२५. भौतिक प्रगति झाली तरी मानवाच्या देवाविरुद्ध स्वतंत्र विचारी मार्गामुळे त्याला खरी शांति व सौख्यता लाभली का?
२५ हे वाद प्रथम उपस्थित झाले तेव्हापासून आता जवळ जवळ ६००० वर्षे झाली आहेत. देवाच्या अधिपत्यापासून विभक्त झाल्याचे फळ काय आले? सर्व प्रकाराची सरकारे, सर्व प्रकारच्या समाज व्यवस्था, सर्व प्रकारच्या आर्थीक व्यवस्था आणि सर्व प्रकारच्या सांप्रदायिक धर्माचे अनुभव घेऊन झाले परंतु कशानेही खरी शांती, सुरक्षितता व अक्षय आंनद व आरोग्य मिळाले नाहीत. एकट्या दुसऱ्या महायुद्धांत पांच कोटी लोक प्राणास मुकल्यावर भौतिक प्रगतीची बढाई कोण कशी मारणार? ज्या अग्निबाणांनी माणूस चंद्रावर पाठविला त्यांचाच उपयोग माणसाचा नायनाट करणाऱ्या अण्विक शस्त्रास्त्रांसाठी केल्यावर त्याला प्रगती कशी म्हणायची? लाखो—करोडो लोक भुकेने व दारिद्र्याने पिडलेले असताना तेथे चंद्रावर माणसे चालली तर त्यात कसली प्रगती? मतभेदांमुळे कुटुंब उध्वस्त झाले असेल, घटस्फोटांचे प्रमाण सतत वाढत असेल, आजूबाजूच्या वस्तीत गुन्हेगारीची भिती वाढत असेल, प्रदूषण व झोपडपट्या वाढत असतील, आर्थिक मंदीमुळे लाखो बेकार होत असतील; दंगे, मुलकी लढाया आणि क्रांत्या या वार्षिक घटना माणसाच्या घरावर व जीवनावर सांवट आणत असतील तर सुखसोयींनीं सुसज्ज घरात राहण्याचा आनंद कसा मिळणार?
२६. दिलेल्या वेळाने मानवाने देवाविरुद्ध मिळविलेल्या स्वातंत्र्याबाबत काय उघड झाले आहे? (स्तोत्र १२७:१)
२६ संयुक्त राष्ट्रांचे पंत सचिव कर्ट वाल्डहाईम यांनी म्हटल्याप्रमाणेच ही वस्तुस्थिती आहे: “भौतिक प्रगती असूनही मनुष्य जीवन आजच्या इतके असुरक्षित कधीच नव्हते.” a एन्व्हिरॉन्मेंटल एथिक्स् या पुस्तकात म्हटले आहे: “शुद्ध हवेत श्वास करण्यास, शुद्ध पाणी पिण्यास व उपयोगात आणण्यास तसेच सभोवतालच्या निसर्गाचा उपभोग घेण्यास मानव निर्मिला होता. त्याने आपल्या सभोवतालचा प्रदेश पार बदलून टाकला व आता बदललेल्या परिस्थितीस अनुरूप असा बदल स्वतःमध्ये करता येत नाही असे त्यास दिसून आले आहे. तो मानवजातीच्या मृत्यूदंडाची तयारी करीत आहे.” b खरोखर, दुष्टाईला दिलेल्या ह्या मोठ्या कालावधीमुळे, देवाच्या मार्गदर्शनाशिवाय स्वतःचे व्यवहार नीट हाताळण्याच्या कुवतीसह माणसाची निर्मिती झाली नव्हती हे सिद्ध व्हावे. मानवी अपयशाचा सहा हजार वर्षांचा पुरावा असल्याने मानवाला वेगवेगळ्या मार्गाचा प्रयोग करून पाहण्यास वेळ मिळाला नाही असा आरोप देवावर कोणीहि करू शकणार नाही. देवाविरूद्धचे बंड अत्यंत अनर्थकारक आहे असे सिद्ध करण्यास हा दिलेला वेळ पुरेसा आहे.
दुष्टाईचा लवकरच अंत होईल
२७. देवाने किती मोठा बदल घडवून आणण्याचे ठरविले आहे? (नीतिसूत्रे २:२१, २२; रोम. १६:२०)
२७ सध्याची परिस्थिती सुधारण्याची, मानवजातीला, अत्यंत गरज आहे. आपल्याला, एका अगदी नवीन व्यवस्थेची गरज आहे. समाजशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम यांनी म्हटल्याप्रमाणे “गेली ६००० वर्षे असलेली ही व्यवस्था काढून मुळात नवीन व्यवस्था आणल्यासच” c समाजातील वाईट गोष्टी सुधारतील. देवाच्या मनात अगदी तेच आहे! त्याने मंजूर केलेला कालावधी संपला की सध्याच्या संपूर्ण दुष्ट व्यवस्थेचा व तीच पसंत करणाऱ्यांचा नायनाट करण्याची देवाने खात्री दिली आहे. “सर्व दुर्जनांचा तो नाश करील.”—स्तोत्र १४५:२०.
२८. आपण हयात असलेल्या काळाला पवित्रशास्त्र काय संबोधिते व का? (२ तिमथ्यी ३:१–५, १२, १३; मत्तय २४:३–१४)
२८ हे कधी घडेल? लवकरच, कारण १९१४ मधील पहिल्या महायुद्धापासून मानवजातीवर जी संकटे ओढवत आहेत ती ‘शेवटच्या काळाची’ चिन्हे होत, असे देवाच्या वचनावरून दिसून येते. पवित्र शास्त्राने भकित केले होते की या “शेवटच्या काळी” जागतिक युद्धे, वाढती गुन्हेगारी, दुष्काळ, रोगराई, विषयासक्ती, नास्तिकता, धार्मीक दांभिकपणा व सामाजिक ऱ्हास व इतर अनेक घटना घडतील. वाईट परिस्थिती सहन करण्याची देवाची वेळ संपेल तेव्हाची ही पिढी आहे हे स्पष्ट करणारी ही चिन्हे असतील ती बोटांच्या ठशांच्या रेघांसारखी असतील, कारण त्यावरून ओळख पटविता येते. सध्या सर्व पृथ्वीवर अंमल चालविणाऱ्या परिस्थितीचा अंत खरोखर आपल्याच काळात होईल असे भाकित येशूने केले होते.
२९. सध्याच्या व्यवस्थिकरणाचा अंत नजिक आहे हे आपण कसे जाणतो?
२९ १९१४ मधील ‘शेवटच्या काळाची’ सुरूवात पाहणाऱ्या लोकांच्या पिढीबद्दल येशूने असेही म्हटले: “मी तुम्हास खचित सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.” (मत्तय २४:३४) याचा अर्थ म्हणजे १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा जिवंत असलेले काही लोक सध्याच्या दुष्ट व्यवस्थेचा अंत पहाण्यास हयात असतील. पहिल्या महायुद्धाची ती पिढी आता बरीच जुनी होत आहे. दुष्टाईचा अंत नजीक आल्याचा तोच मोठा व सबळ पुरावा आहे.
३०. सध्या पृथ्वीवर सत्ता चालविणाऱ्या मानवी व्यवस्थांचे काय होईल? (सफन्या ३:८; यशया १:२८)
३० अंत येईल तेव्हा देव आपली प्रचंड शक्ती दाखवील व माणसांच्या व्यवहारात उघड हस्तक्षेप करील. त्याला विरोध करणाऱ्या सर्व मानवी संस्था चिरडल्या जातील. दानिएलाच्या भकितात अध्याय २:४४ मध्ये म्हटले आहे: “त्या राजांच्या आमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील त्याचा कधी भंग होणार नाही, त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकून राहील.” सर्व तापदायक मानवी व्यवस्था निपटून काढल्यावर, देवाचे राज्य सर्व ताबा आपल्या हाती घेईल.
३१. संपूर्ण मानवजातीला देव कोणते सरकार देईल? (मत्तय ६:९, १०)
३१ यास्तव, देवाचे अधिपत्य एका नवीन, स्वर्गीय सरकारामार्फत, देवाच्या राज्यामार्फत चालेल. याच सरकाराला येशूने आपल्या शिकवणीत महत्त्वाचे स्थान दिले होते; आणि योग्यवेळी तेच सबंध पृथ्वीवर आपला अंमल चालवील असे भाकित त्याने केले. देवाच्या मागदर्शनाखाली स्वर्गातून त्याचा कारभार होत असल्याने स्वार्थी माणसांमुळे त्यात भ्रष्टाचार शिरण्याचा मुळीच संभव नाही. राज्याधिकार जेथे मुळात हवा होता, तथेच—स्वर्गात, देवाजवळ—असेल. देवाच्या अधिपत्याचा अंमल पृथ्वीवर असल्यावर “जगात राहणारे धार्मिकता शिकतील” असे तो वचन देतो. (यशया २६:९) खोटे धर्मच नसल्याने त्यांच्यामुळे कोणी चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत. यहोवा देव व त्याच्या उद्देशांविषयी सर्वांना शिक्षण दिले जाईल. त्यामुळे “सागर जसा जलपूर्ण आहे तशी यहोवाच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल” हे वचन अक्षरशः खरे होईल.—यशया ११:९.
एक नीतिमान नवीन व्यवस्थीकरण
३२. देवाच्या राज्याच्या अधिपत्याखाली केवढी शांती असेल? (यशया २:२–४)
३२ देवाच्या राज्याच्या अंमलाखाली धार्मिक लोकांचा अगदी नवीन समाज निर्माण होईल. त्या नवीन व्यवस्थेत, देवाच्या कृतीतून, त्याला आपल्याबद्दल वाटणारी कळकळ व्यक्त होईल. उदाहरणार्थ, लढायांमुळे मानवाच्या शांती व सुखात पुन्हा कधीहि बाधा येणार नाही. का बरे? कारण या सध्याच्या दुष्ट व्यवस्थिकरणाच्या अंतामधून जे वाचतील त्यांना आधीच शांतीच्या मार्गाचे शिक्षण मिळालेले असेल, त्यामुळे नव्या समाजाची सुरूवात शांततामय असेल. त्यानंतर त्या नवीन व्यवस्थिकरणात जे येतील त्यांनाहि देवाच्या इच्छेनुसार कृती करण्याचे तेच शिक्षण देण्यात येईल. त्यामुळेच, देव “दिगंतापर्यंत लढाया बंद करितो” हे पवित्र शास्त्रातील वचन खात्रीने पूर्ण होईल. (स्तोत्र ४६:८,९) ती शांती किती परिपूर्ण असेल? देवाचे भविष्यवादित वचन सांगते: “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील, ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:११.
३३. पृथ्वीत कोणता बदल घडून येईल?
३३ त्याशिवाय, त्या नवीन व्यवस्थिकरणात रहाणारे लोक, देवाच्या मूळ उद्देशाप्रमाणे, पृथ्वीचे सुंदर बागेत रूपांतर करतील. मानवजातीसाठी ते किती समाधानकारक काम असेल! सुखलोकाची पुनर्स्थापना झाल्यावर तळी, नद्या, समुद्र, डोंगर, पर्वत, पठारे, दऱ्या–खोरी, सुंदर फुले, झाडे व वृक्ष तसेच सर्व प्रकारच्या प्राण्यांचा त्या लोकांना पुरेपूर आनंद लुटता येईल. अन्नधान्याचा तुटवडा पुन्हा कधी भासणार नाही, कारण “भूमीने आपला उपज दिला आहे; देव, आमचा देव आम्हाला आशीर्वाद देईल. होय, “भूमीत भरपूर पीक येईल; पर्वतांच्या शिखरावर ते डोलतील.”—स्तोत्र ६७:६; ७२:१६.
३४. कोणते शरिरीक स्वास्थ्य मिळेल?
३४ अनंत शांती व धान्याच्या विपुलतेबरोबर तेजःपुंज स्वास्थ्यही येईल. देवाने मनुष्याची निर्मिती केलेली असल्याने अपंगांना बरे करण्यासाठी, अंधांना दृष्टी देण्यासाठी व बहिऱ्यांना श्रवणशक्ति देण्यासाठी काय करावे आजारपण, वृद्धापकाळ व मृत्यू यांचा नायनाट कसा करावा हे कोणत्याही वैद्यापेक्षा त्याला अधिक चांगले कळते. येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना, या सर्व गोष्टी करण्याची देवाची शक्ती त्याने छोट्या प्रमाणात चुणक म्हणून दाखवून दिली. पवित्रशास्त्र सांगते: “लाकांचे थव्यांवर थवे त्याच्याकडे आले; त्यांच्या बरोबर लंगडे, व्यंग, आंधळे, मुके व दुसरे पुष्कळजण होते, त्यांना त्यांनी त्याच्या पायाशी आणून ठेविले आणि त्याने त्यांना बरे केले. मुके बोलतात, व्यंग धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात हे पाहून लोकसमुदायाला आश्चर्य वाटले.”—मत्तय १५:३०, ३१.
३५, ३६. मृतांना देवाच्या राज्यात राहण्याची संधी कशी मिळेल? (योहान ५:२८, २९; लूक ७:११–१५)
३५ येशूने, त्याच्या शेजारी वधस्तंभावर खिळलेल्या माणसाला “तू माझ्याबरोबर नंदनवनात असशील” असे म्हणताना पृथ्वीतलावरील नंदनवनाचा उल्लेख केला. (लूक २३:४३) परंतु तो माणूस मेला. मग तो नंदनवनात कसा येऊ शकेल? देवाला आपल्याबद्दल किती कळकळ आहे ते दाखविणाऱ्या त्याच्या दुसऱ्या एका तरतुदी द्वारे—मृतांच्या पुनरुत्थानाद्वारे. प्रे.कृत्ये २४:१५ येथे पवित्रशास्त्र म्हणते: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरूत्थान होईल.” पृथ्वीवर असताना येशूने मृतांना उठवून, त्याच्या राज्यात देवाची शक्ति काय करील याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
३६ पुनरूत्थानाच्या कल्पनेवर विश्वास ठेवणे तुम्हाला जड वाटते का? परंतु सध्यादेखील तुम्ही दुरदर्शनवरील कार्यक्रमात बऱ्याच काळाआधी जिवंत राहिलेल्या व्यक्ति पाहू शकता. तुम्ही त्यांचे आवाज ऐकता, त्यांच्या कृती पाहता व त्यांच्या गुणविषेशांचीहि नोंद करता. जर क्षुद्र माणूस अशा गोष्टी टेलिव्हिजनच्या पट्टीवर जपून ठेवू शकतो तर सर्वबाबतीत सर्वांत बुद्धिमान असलेल्या देवाला, ज्याचे पुनरूत्थान करावयाचे त्या प्रत्येक माणसाचे व्यक्तिमत्व व गुणविशेषत्व बारकाव्यासह लक्षात ठेवणे मुळीच कठीण नाही. हे त्याने केलेले आहे व अशा मृतांना तो जीवनासाठी पुन्हा उठवील. अशा रितीने त्यांनाहि देवाच्या नवीन व्यवस्थिकरणात जीवनाचा आनंद लुटण्याची संधी मिळेल. कबरा रिकाम्या करून, अनुवंशिक रोग, वृद्धावस्था व मृत्यूपासून त्यांना बरे करून देव “मृत्यू कायमचा नाहीसा करील.” (यशया २५:८) अशा रितीने माणसे अनंतकाळ जगू शकतील!
३७. अन्यायाने लोकांना झालेल्या त्रासाची भरपाई करून त्याहूनही जास्त सुख देव देईल असे का म्हणता येईल?
३७ आतापर्यंत चालत आलेली वाईट परिस्थिती, त्याच्या राज्यामार्फत, देव पूर्णपणे बदलून टाकील. भूतकाळात भोगाव्या लागलेल्या हालअपेष्टा, भरून काढण्यापेक्षाहि जास्त प्रमाणावर आपल्यावर आशीर्वादांचा वर्षाव अनंतकाळापर्यंत करून तो आपली किती काळजी वाहतो, हे देव दाखवून देईल. सध्याच्या अडचणी लक्षात राहिल्याच तर त्यांच्या आठवणी फार फार अंधुक असतील. देवाचे वचन म्हणते: “मी नवे आकाश (मानवातीवरील एक नवे स्वर्गीय सरकार) व नवी पृथ्वी (धार्मिक मानवी समाज) निर्माण करतो. पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत. त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत. परंतु जे मी उत्पन्न करतो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा.” (यशया ६५:१७, १८) एवढे उत्तम आशीर्वाद भविष्यात असल्यामुळे, पवित्रशास्त्र, देव “त्यांच्या डोळयांचे सर्व अश्रू पुसून टाकील” असे का म्हणते ते तुम्हाला कळेलच. आणि का नाही बरे? कारण “ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्टही नाहीत. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:४.
देवाला काळजी आहे—आपल्याला आहे का?
३८. आपल्या नवीन व्यवस्थिकरणात देवाला कशाप्रकारच्या व्यक्ति हव्या आहेत? (स्तोत्र ३७: ३७, ३८)
३८ लवकरच दुष्टाईचा अंत करून देव एक सुंदर नवीन व्यवस्था आणील यावरूनच देवाला आपली काळजी आहे हे स्पष्ट दिसते. परंतु आपल्याला देवाची कदर आहे का? जर आपल्याला ती असेल तर आपण ती दाखविली पाहिजे. आपण त्यासाठी काय केले पाहिजे? पवित्रशास्त्र म्हणते: “जग व त्याची वासना नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ याहोन २:१७) त्याच्या इच्छेप्रमाणे वागणारी व त्याच्या नीतिमान अधिपत्याखाली राहणारी अशा प्रकारची माणसे देवाला त्याच्या नवीन व्यवस्थिकरणात हवी आहेत. त्याचे नियम पाळणारी व “नवी पृथ्वी” राहण्यास सुखकारक करण्यासाठी झटणारी अशी ही माणसे असतील. देवाच्या अधिपत्याला विरोध करणारे लोक त्रासाला कारणीभूत असतील. त्यामुळे त्यांना तेथे राहण्याची मुभा असणार नाही.
३९. तुम्हाला अनंत जीवन हवे असल्यास तुम्ही कसला शोध केला पाहिजे? (नीति २:१–६)
३९ देवाच्या नवीन नीतिमान व्यवस्थिकरणात रहावे असे तुम्हाला वाटते का? मग जीवनासाठी देवाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या प्रथम जाणून घेतल्या पाहिजेत. हे फारच कठीण वाटते का? उद्यानासारख्या जागेतील सुंदर घर तुम्हाला विनामूल्य देऊ केले तर ते मिळविण्याची पात्रता कशी येईल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही थोडा वेळ खर्च करणार नाही का? देवाची वचने याहून कितीतरी अधिक देऊ करते—उद्यानासारख्या पृथ्वीवर अनंत जीवन. जर देवाची इच्छा काय आहे त्याचा आपण शोध घेऊन त्याप्रमाणे केले तर पवित्रशास्त्र म्हणते: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू, जो एकच खरा देव त्या तुझे व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताचे ज्ञान त्यांनी संपादित करावे.”—योहान १७:३.
४०. त्याशिवाय पवित्रशास्त्र आताहि कोणते फायदे करून देते? (२ तिमथ्यी ३:१६, १७)
४० पवित्रशास्त्रातून शिकल्याने, तुम्हाला व तुमच्या सबंध कुटुंबाला आजच्या कठीण दिवसांत पदोपदी अत्यंत आवश्यक असे व्यावहारिक मार्गदर्शनही मिळेल. शिवाय सध्याची परिस्थिती इतकी वाईट का आहे व भविष्यात काय आहे हे कळल्याने मानसिक शांतताहि लाभते. सर्वात महत्वाचे म्हणजे “त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे” असे कळल्याने देवाबद्दल तुमच्या मनात खरे प्रेम उत्पन्न होते.—इब्री ११:६.
४१. यहोवाचे साक्षीदार तुम्हाला विनामूल्य कोणती मदत करतील?
४१ देवाच्या नव्या व्यवस्थिकरणात त्याने ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्याबद्दल माहिती मिळविण्यास, यहोवाचे सांक्षीदार आनंदाने व विनामूल्य मदत करतील. देवाबद्दल व पवित्रशास्त्राबद्दल तुमच्या मनात इतरहि प्रश्न असतीलच. तुमच्या घरीच व तुमच्या पवित्रशास्त्रावरून याबद्दल चर्चा करण्यास यहोवाच्या साक्षीदारांना आनंद वाटेल. मग स्वतःचा स्वतंत्र मार्ग चोखाळण्यापेक्षा अथवा अपूर्ण मानवांच्या विचारसरणीवर अवलंबून राहण्यापेक्षा आज उपलब्ध असलेल्या सर्वतोपरी उत्तम माहितीद्वारे मार्गदर्शित होण्याचा तुम्हाला लाभ होईल. वेळ सरली नाही तोवर देववचनातील प्रेरित उपदेश सांगतो त्याप्रमाणे “देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा . . . कारण तो तुमची काळजी घेतो.”—१ पेत्र ५:६, ७.
[तळटीपा]
a न्यूयॉर्क टाइम्स्, नोव्हेंबर ६, १९७२, पान ५.
b एन्व्हिरॉन्मेंटल एथिक्स् संपादक, डोनाल्ड आर स्कॉबी, १९७१, पान १७.
c न्यूयॉर्क पोस्ट, मार्च ३०, १९७४, पृ. ३५.
[अभ्यासाचे प्रश्न]
[२२ पानांवरील तक्ता]
(भाग को असल रूप में देखने के लिए प्रकाशन देखिए)
सर्व एकाच पिढीमध्ये
१९१४
विश्व युद्ध
अधिक अकाल
रोग का संक्रामान
हिंसक अपराध
भूमण्डलीय दुषित वातावरण
इस रीति–रिवाज का अन्त
[६ पानांवरील चित्रं]
मानवाच्या गरिबी व गलिच्छपणासाठी देवाला दोष दिला. . .
[७ पानांवरील चित्रं]
. . . तर, पृथ्वीच्या सौंदर्यासाठी व सुपीक शेतांसाठी
कोणास धन्यवाद द्यावेत?
[९ पानांवरील चित्रं]
जीवन जगविण्यास कोणत्याहि घरापेक्षा पृथ्वी अधिक संपन्न आहे
[९ पानांवरील चित्रं]
प्रत्येक घर बांधणारा कोणीतरी असतोच, मग पृथ्वीला घडविणारा खचितच असणार!
[१३ पानांवरील चित्रं]
मानवाला सर्वकालासाठी सुखोपभोग घेता येईल अशा पृथ्वीव्याप्त नंदनवनाची रचना करावी असा देवाचा उद्देश होता असे पवित्र शास्त्र सांगते
[१४ पानांवरील चित्रं]
पंख्याला मिळणारी शक्ति खंडित झाली की त्याचा वेग कमी होतो व थांबतो. त्याप्रमाणे देवापासून दुरावल्यामुळे मावजातीचा ऱ्हास झाला
[१६ पानांवरील चित्रं]
सुरक्षिततेच्या क्षुल्लक बाबीकडे दुर्लक्ष केल्यास मोठे धरणही कोसळते; आपल्या पहिल्या पालकांनी देवाच्या कायद्याचा भंग केल्यावर दुष्टाई व यातनांच्या पुराला आरंभ झाला
[१९ पानांवरील चित्रं]
फक्त दोन व्यक्ती गोवलेल्या असल्या तरी न्यायलयीन खटल्याला बरेच दिवस लागतात. देवाच्या अधिपत्याविषयी उत्पन्न झालेले वाद पूर्णपणे व कायमचे मिटवावयास बराच कालावधी हवा
[२४ पानांवरील चित्रं]
देव “लढाया बंद करतो” त्यामुळे त्याच्या नव्या व्यवस्थिकरणात युद्धे नसणार
[२५ पानांवरील चित्रं]
मानवजातीला उपासमारीच्या यातना परत कधीही भासणार नाहीत
[२५ पानांवरील चित्रं]
देवाच्या आशीर्वादाने पृथ्वीवर भरपूर पीक येईल
[२६ पानांवरील चित्रं]
तारुण्य व परिपूर्ण आरोग्यात प्राप्त असणाऱ्या जोम आणि उत्साहात वृद्धांना परतविले जाईल
[२७ पानांवरील चित्रं]
देवाच्या स्मृतितील सर्वांना परत जिवंत केले जाईल; व ते आपल्या प्रियजनांना भेटतील
[२९ पानांवरील चित्रं]
देवाच्या राज्यात जीवन इतके आनंदमय असेल की आज आपल्याला अन्यायामुळे सहन कराव्या लागणाऱ्या हालअपेष्टा भरून काढण्यापेक्षाही अधिक आनंद उपभोगता येईल.
[३१ पानांवरील चित्रं]
सुखदायी परिसरातील जीवन तुम्हाला बहाल केल्यास ते कसे मिळविता येईल हे तुम्ही जाणून घेणार नाही का? देवाचे नवे व्यवस्थिकरण तर यापेक्षा कितीतरी अधिक देते पण त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही कसे सिद्ध होऊ शकतो ते ठरविण्यासाठी वेळ देण्यास हवा