व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या मुलांमध्ये खरी ख्रिस्ती मूल्ये बिंबवण्याचा यहोवाचे साक्षीदार प्रयत्न करतात

आदरणीय नैतिक मूल्ये

आदरणीय नैतिक मूल्ये

संपूर्ण इतिहासात, धाडसी स्त्रीपुरुषांनी समकालीन लोकांच्या विचारांच्या विरुद्ध भूमिका घेतली आहे. त्यांनी राजकीय, धार्मिक आणि जातीय जुलूम सहन केला आहे, स्वतःच्या विश्‍वासाचे समर्थन करताना त्यांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

आरंभीचे ख्रिस्ती खूपच धैर्यशील होते. पहिल्या तीन शतकांदरम्यान कडा छळ होत असताना, सम्राटाची उपासना करण्यास नकार दिल्याने त्यांच्यातील बहुतेक जणांना विधर्मी रोमकरांनी जीवे मारले. काहीवेळा, आखाड्यामध्ये एक वेदी तयार केली जात असे. स्वातंत्र्य प्राप्त करण्याकरता ख्रिश्‍चनांना केवळ एक गोष्ट करावी लागत असे, ती म्हणजे सम्राट ईश्‍वरीय अवतार आहे हे कबूल करण्यासाठी चिमूटभर धूप जाळणे. यास आपली मान्यता असल्याचे व्यक्‍त करण्यासाठी मोजक्याच जणांनी हातमिळवणी केली. बहुतेक जणांनी विश्‍वास त्यागण्याऐवजी मरणाला जवळ करणे पसंत केले.

आधुनिक काळातील यहोवाच्या साक्षीदारांनी राजकीय तटस्थतेच्या बाबतीत अशाचप्रकारची भूमिका घेतली आहे. उदाहरणार्थ, नात्सीवादाचा विरोध करत असताना त्यांच्या दृढ भूमिकेची इतिहासात नोंद आहे. दुसऱ्‍या महायुद्धाआधी आणि त्यादरम्यान, तटस्थता राखल्यामुळे तसेच “हाइल हिटलर” न म्हटल्यामुळे जवळजवळ एक चतुर्थांश जर्मन साक्षीदारांना प्रामुख्याने छळ छावण्यात आपला जीव गमवावा लागला. लहान मुलांची त्यांच्या साक्षीदार पालकांपासून जबरदस्तीने ताटातूट करण्यात आली. दबावातही, ही लहान मुले दृढ राहिली आणि इतरांनी त्यांच्यावर ज्या अशास्त्रवचनीय शिकवणी लादण्याचा प्रयत्न केला होता त्यांमुळे ती भ्रष्ट झाली नाहीत.

ध्वजवंदन

आज यहोवाचे साक्षीदार सामान्यपणे अशाप्रकारच्या कटू छळाचे लक्ष्य नाहीत. तथापि, जेव्हा आमचे लहानगे साक्षीदार त्यांच्या पूर्ण विचारांती घेतलेल्या निर्णयामुळे ध्वजवंदनासारख्या देशभक्‍तीपर कार्यांत सहभागी होत नाहीत तेव्हा काहीवेळा त्यांच्याविषयी विपरीत ग्रह होतो.

“कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा”—मत्तय २२:२१

यहोवाच्या साक्षीदारांच्या मुलांना शिकवण्यात येते, की त्यांनी इतरांना ध्वजवंदन करण्यापासून रोखू नये कारण तो एक वैयक्‍तिक निर्णय आहे. तथापि, यहोवाच्या साक्षीदारांचा निर्णय ठाम आहे: ते कोणत्याही  देशाच्या ध्वजाला वंदन करत नाहीत. निश्‍चितच अनादर करण्याच्या उद्देशाने ते असे करत नाहीत. ते कोणत्याही देशात राहत असले तरी तेथील देशाच्या ध्वजाचा ते आदर करतात  आणि हा आदर त्या देशाचे नियम पाळण्याद्वारे ते दाखवतात. ते कोणत्याही प्रकारच्या सरकारविरोधी चळवळीत सहभागी होत नाहीत. किंबहुना, साक्षीदार हे मान्य करतात, की सध्याचे मानवी सरकार ‘देवाची व्यवस्था’ आहे, देवाने त्यांस परवानगी दिली आहे. म्हणून कर देण्याद्वारे आणि अशाप्रकारच्या ‘वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना’ आदर दाखवण्याद्वारे ते स्वतःला ईश्‍वरीय आज्ञेच्या अधीन असल्याचे समजतात. (रोमकर १३:१-७) हे ख्रिस्ताच्या प्रसिद्ध विधानाच्या एकवाक्यतेत आहे: “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा.”—मत्तय २२:२१.

पण एखादा कदाचित असे विचारेल, ‘यहोवाचे साक्षीदार ध्वजवंदन करून त्यास आदर का देत नाहीत?’ त्याचे कारण आहे, की साक्षीदार ध्वजवंदनाला उपासनेचे कृत्य समजतात आणि केवळ देवच उपासनेस पात्र आहे; देवाशिवाय इतर कोणत्याही व्यक्‍तीची अथवा वस्तूची उपासना करण्यास त्यांचा विवेक त्यांना परवानगी देत नाही. (मत्तय ४:१०; प्रेषितांची कृत्ये ५:२९) यास्तव, शिक्षक जेव्हा त्यांच्या विश्‍वासाचा आदर करतात आणि साक्षीदार मुलांना त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करण्यास अनुमती देतात तेव्हा साक्षीदार त्यांचे आभार मानतात.

ध्वजवंदन उपासनेशी संबंधित आहे, असा विश्‍वास ठेवणाऱ्‍यांमध्ये केवळ यहोवाचे साक्षीदार नाहीत, ही आश्‍चर्याची गोष्ट नाही; खालील विवेचनांवरून हे दिसून येते:

“सुरवातीला ध्वजाकडे जवळजवळ पूर्णपणे धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले जात असे. . . . राष्ट्रीय ध्वजांना पावित्र्य प्राप्त होण्यासाठी नेहमीच  धर्माची मदत घेण्यात आली आहे, असे दिसून येते.” (तिरपे वळण आमचे.)—एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका.

“क्रूसाप्रमाणेच ध्वजही पवित्र आहे. . . . राष्ट्रीय ध्वजालेखी मानवी मनोवृत्तीशी संबंधित कायदेकानून कडक आणि स्पष्ट शब्दांचा उपयोग करतात, उदाहरणार्थ ‘ध्वजाची सेवा,’ . .  . ‘ध्वजाबद्दल असणारी श्रद्धा.’ ‘ध्वजाची भक्‍ती.’” (तिरपे वळण आमचे.)—दि एन्सायक्लोपीडिया अमेरिकाना.

“ख्रिश्‍चनांनी . . . [रोमी] सम्राटाच्या देवत्वासाठी बळी देण्यास नकार दिला—जे आज सामान्यपणे ध्वजवंदन करण्याकरता राजनिष्ठेची शपथ घेण्यास नकार देण्यासारखे आहे.”—डॅनिएल पी. मॅनिक्स यांचे दोज अबाऊट टू डाय (१९५८), पृष्ठ १३५.

बॅबिलोनी राजा, नबुखद्‌नेस्सर याने स्थापन केलेल्या मूर्तीला दंडवत करण्यास तीन हिब्रू तरुणांनी नकार दिला

पुन्हा एकदा, यहोवाचे साक्षीदार ध्वजवंदनास नकार देण्याद्वारे कोणत्याही सरकारचा किंवा त्याच्या शासनकर्त्यांचा अनादर करण्याचा हेतू मनी बाळगत नाहीत. गोष्ट इतकीच आहे, की ते राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्‍या कोणत्याही प्रतिमेला दंडवत किंवा त्यास वंदन करणे याअर्थी त्याची उपासना करणार नाहीत. बायबल काळातील तीन हिब्रू तरुणांनी घेतलेल्या भूमिकेप्रमाणे आपली भूमिका आहे, असे साक्षीदार समजतात; बॅबिलोनी राजा, नबुखद्‌नेस्सर याने दूरा नामक मैदानात स्थापन केलेल्या मूर्तीला दंडवत करण्यास या तरुणांनी नकार दिला होता. (दानीएल, अध्याय ३) तर मग, इतरजण वंदन करतात आणि राजनिष्ठेची प्रतिज्ञा घेतात तेव्हा बायबल-प्रशिक्षित विवेकाने वागावे, असे यहोवाचे साक्षीदार त्यांच्या मुलांना शिकवतात. यास्तव, ते शांतपणे आणि आदराने सहभागी होण्यापासून दूर राहतात. अशाचप्रकारच्या कारणांमुळे, राष्ट्रगीत गायले किंवा वाजवले जाते तेव्हा साक्षीदार मुले त्यात सहभागी होत नाहीत.

पालकांचा अधिकार

अलीकडच्या दिवसांत, बहुतेक देश या गोष्टीचा आदर करतात, की आपल्या विश्‍वासाच्या सुसंगतेत मुलांना धार्मिक शिक्षण देण्याचा अधिकार पालकांना आहे. सर्व धर्म या अधिकाराचे समर्थन करतात आणि कॅथलिक चर्चमध्ये अद्यापही बंधनकारक असलेल्या धर्मनियमातून हे स्पष्ट होते: “मुलांना जीवन दिल्यामुळे त्यांना शिक्षण देणे, हे पालकांचे आद्य कर्तव्य आहे आणि असे करण्याचा त्यांना अधिकार आहे; यामुळे पालकांकरता हे अत्यावश्‍यक आहे, की त्यांनी प्रामुख्याने त्यांच्या मुलांना चर्चच्या धर्मतत्त्वांनुसार ख्रिस्ती शिक्षण प्रदान करावे.”—धर्मनियम २२६.

इतरांविषयी आस्था बाळगण्यास मुलांना उत्तेजन देण्यात येते

यहोवाचे साक्षीदार यापेक्षा जास्त अपेक्षा करत नाहीत. आपल्या मुलांची चिंता करणारे पालक या नात्याने ते त्यांच्या मुलांमध्ये खरी ख्रिस्ती मूल्ये बिंबवण्याचा प्रयत्न करतात आणि शेजाऱ्‍यांवर प्रेम करण्याचे तसेच इतरांच्या मालमत्तेचा आदर करण्याचे त्यांच्या मनावर ठसवतात. प्रेषित पौलाने इफिसमधील ख्रिश्‍चनांना दिलेल्या सल्ल्यानुसार करण्याची त्यांची इच्छा आहे: “पालकांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर ख्रिस्ती शिस्त व शिक्षण यांत त्यांना वाढवा.”—इफिसकर ६:४, टुडेज इंग्लिश व्हर्शन.

धार्मिकरीत्या विभाजित घरे

काही कुटुंबांमध्ये दोघांपैकी केवळ एक पालक यहोवाचा साक्षीदार आहे. अशाप्रकारच्या परिस्थितीमध्ये साक्षीदार पालकाला याची जाणीव असू द्यावी, की साक्षीदार नसलेल्या पालकाला देखील त्याच्या धार्मिक विश्‍वासांनुसार मुलांना शिक्षण देण्याचा अधिकार आहे. वेगवेगळे धार्मिक दृष्टिकोन जाणल्यामुळे मुलांवर फारसा वाईट परिणाम होणार नाही. a खरे तर, प्रत्येक मुलाला हा निर्णय घ्यायचा आहे, की ते कोणत्या धर्माचे पालन करतील. स्वाभाविकपणे, सर्व तरुण त्यांच्या पालकांच्या धार्मिक तत्त्वांनुसार चालण्याची निवड करत नाहीत, मग ते यहोवाचे साक्षीदार असोत अगर नसोत.

विवेकस्वातंत्र्याविषयी मुलांचा अधिकार

तुम्ही हे सुद्धा जाणून घेण्यास हवे, की यहोवाचे साक्षीदार एखाद्या व्यक्‍तीच्या ख्रिस्ती विवेकाला देखील फार महत्त्व देतात. (रोमकर, अध्याय १४) सन १९८९ मध्ये, संयुक्‍त राष्ट्रसंघाने अंगीकार केलेल्या बाल अधिकाराच्या नियमाने हे मान्य केले, की मुलांना “वैचारिक, विवेकी आणि धार्मिक स्वातंत्र्याचा” अधिकार आहे आणि त्यांच्यावर “प्रभाव पाडणाऱ्‍या अशा कोणत्याही बाबीविषयी आणि कामकाजाविषयी मोकळेपणाने स्वतःचे मत व्यक्‍त करण्याचा आणि त्यांच्या मतांची इतरांनी दखल घेण्याचा” मुलांना अधिकार आहे.

कोणतीही दोन मुले एकसारखी नसतात. यास्तव, तुम्ही तर्कसंगतपणे अशी अपेक्षा करू शकता, की साक्षीदारांची मुले किंवा दुसरे विद्यार्थी विशिष्ट कार्यक्रमांत आणि शाळेच्या कार्यांच्या संबंधित जे निर्णय घेतील त्यांत काही तफावत ही असणारच. तुम्ही सुद्धा विवेकी स्वतंत्रतेच्या तत्त्वाशी सहमत आहात, असा आमचा विश्‍वास आहे.

a संमिश्र विश्‍वास असलेल्या घरांतील मुलांविषयी, अर्वाचीन जगात यहुदी मुलांना मोठे करणे  (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात पी.एच.डी. झालेले स्टिव्हन कार रुबेन म्हणतात: “नकार, संभ्रम, गुप्तता आणि धार्मिक वादविषयांना टाळणे, अशाप्रकारच्या प्रवृत्त्या पालकांच्या जीवनात असतात तेव्हा मुले संभ्रमित होतात. जेव्हा पालक त्यांचे स्वतःचे विश्‍वास, मूल्ये आणि सणासुदींच्या रीतीरिवाजांविषयी खरेपणाने, प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे बोलतात तेव्हा मुले धार्मिक क्षेत्रात सुरक्षिततेच्या आणि आत्मयोग्यतेच्या भावनेने मोठी होतात; त्यांच्या आत्मसन्मानाच्या विकासासाठी आणि जगात आपले काय स्थान आहे, याची जाण राखण्यासाठी हे फार निर्णायक आहे.”