पालकांची भूमिका
आजच्या समाजात मुलांचे संगोपन करून त्यांना संतुलित प्रौढ व्यक्ती बनविणे, हे निश्चितच सोपे काम नाही.
यशस्वी पालक समजल्या जाणाऱ्या पालकांच्या सर्वेक्षणाचे परिणाम अमेरिकेच्या मानसिक आरोग्य संस्थेने केले—त्यांची मुले २१ वर्षांपेक्षा मोठी होती, “सर्व मातबर प्रौढ होते आणि त्यांनी त्यांच्या समाजात स्वतःचे एक चांगले स्थान तयार केल्याचे दिसत होते.” या पालकांना असे विचारण्यात आले: ‘तुमच्या अनुभवानुसार, तुम्ही इतर पालकांना कोणता सर्वोत्तम सल्ला द्याल?’ बहुतेक पालकांकडून हीच
उत्तरे मिळाली: ‘भरभरून प्रेम करा,’ ‘उभारणीकारक शिस्त लावा,’ ‘त्यांच्यासोबत वेळ घालवा,’ ‘तुमच्या मुलांना चूक काय आणि बरोबर काय याची पारख करायला शिकवा,’ ‘परस्परांप्रती आदरभाव वाढवा,’ ‘त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घ्या’ ‘भाषणबाजी करण्याऐवजी त्यांना मार्गदर्शन द्या,’ आणि ‘वास्तववादी दृष्टिकोन बाळगा.’तथापि, संतुलित तरुण तयार करण्यात केवळ पालकांचाच वाटा असतो असे नाही. या कामात त्यांच्या शिक्षकांचीही महत्त्वाची भूमिका आहे. एका अनुभवी शैक्षणिक सल्लागाराने म्हटले: “बौद्धिकरीत्या, शारीरिकरीत्या आणि भावनात्मकरीत्या चांगल्या प्रकारे विकास झालेले जबाबदार तरुण तयार करण्याच्या कार्यात पालकांची मदत करणे, हाच तर औपचारिक शिक्षणाचा मुख्य हेतू आहे.”
म्हणून पालकांचे आणि शिक्षकांचे समान लक्ष्य आहे—अशाप्रकारचे तरुण बनविणे जे पुढे प्रगल्भ आणि संतुलित प्रौढ होतील, जीवनाचा आनंद लुटतील आणि त्यांच्या समाजात स्वतःचे एक स्थान बनवू शकतील.
सहकर्मी, प्रतिस्पर्धी नव्हे
तथापि, शिक्षकांना सहकार्य देण्यात पालक उणे पडतात तेव्हा मात्र समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ, काही पालक त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे काहीही लक्ष देत नाहीत; इतर पालक शिक्षकांसोबत स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतात. ह्या परिस्थितीवर चर्चा करणाऱ्या एका फ्रेंच नियतकालिकाने असे म्हटले: “आता मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी केवळ शिक्षकांवरच राहिलेली नाही. आपली मुले कोणत्याही किंमतीवर यशस्वी झाली पाहिजेत, अशी मनसा बाळगणारे पालक शालेय पुस्तकांच्या नावाने शंख करतात, शिक्षण पद्धतींमध्ये चुका शोधतात, टिका करतात आणि मुलांना कमी गुण मिळताच आकाश पाताळ एक करतात.” पालकांच्या अशा वर्तणुकीमुळे शिक्षकांच्या अधिकारात उगाच ढवळाढवळ होऊ शकते.
जेव्हा पालक शिक्षकांना सहकार्य करतात, त्यांच्या मुलांमध्ये उत्साहाने आणि मदत करण्याच्या तयारीने आस्था घेतात तेव्हा मुलांना अधिक लाभ होतो, असे यहोवाच्या साक्षीदारांचे मत आहे. अशाप्रकारचे सहकार्य विशेषतः याकरता महत्त्वाचे आहे कारण शिक्षक या नात्याने काम करणे हल्ली अतिशय अवघड झालेले आहे.
आजच्या शालेय समस्या
शाळा म्हणजे समाजाचे दर्पण; समाजात बोकाळलेल्या समस्यांपासून शाळा काही सुटल्या नाहीत. गतवर्षांदरम्यान सामाजिक समस्यांत मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे. संयुक्त संस्थानांतील एका शाळेचे वर्णन करताना द न्यूयॉर्क टाईम्सने असे म्हटले: “विद्यार्थी वर्गात झोपा काढतात, विचित्र गोष्टी लिहून रंगवलेल्या शाळेच्या दालनांत ते एकमेकांना धमक्या देतात, अभ्यासू विद्यार्थ्यांची कुचंबणा करतात. . . . सर्वच विद्यार्थ्यांना समस्या आहेत, कुणाला तान्ह्या बाळांची काळजी घ्यावी लागते, कुणाला तुरुंगवासात असलेल्या पालकांशी संपर्क ठेवायचा असतो तर कुणाला टोळीयुद्धांपासून स्वतःचा बचाव करायचा असतो. कोणत्याही दिवशी पाहिले तर एकूण विद्यार्थ्यांच्या उपस्थितीपैकी एक पंचमांश विद्यार्थी अनुपस्थित असतात.”
शाळांतील हिंसाचाराची वाढती आंतरराष्ट्रीय समस्या खास चिंतेचे कारण आहे. पूर्वी, अधूनमधून भांडणे झालीच तर त्यावेळी धक्काबुक्की होत असे, पण अलीकडे मात्र गोळीबार आणि चाकुसुऱ्यांशिवाय वार्ताच होत नाही. हत्यारे अगदी सहज मिळू लागली आहेत, हल्लेही गंभीर झाले आहेत आणि मुले लगेचच आणि कोवळ्या वयातच हिंसाचारी बनू लागली आहेत.
निःसंशये, प्रत्येक देशात अशाप्रकारची गंभीर परिस्थिती नाही. तथापि, जागतिकरित्या अनेक शिक्षक फ्रेंच साप्ताहिक ल पुवाँ यात उल्लेख केलेल्या परिस्थितीला तोंड देत आहेत: “शिक्षकांविषयीचा आदर राहिलेला नाही; त्यांच्याकडे नावापुरताही अधिकार नाही.”
अधिकाराबद्दलच्या अशाप्रकारच्या अनादराचा सर्व मुलांना धोका आहे. यास्तव, यहोवाचे साक्षीदार त्यांच्या मुलांमध्ये अधिकाराविषयी आज्ञाधारकपणा आणि आदर बिंबवण्याचा प्रयत्न करतात; आजच्या शालेय जीवनात बहुतेकवेळा या गुणांची कमी असते.