गलतीकर यांना पत्र ५:१-२६

  • ख्रिस्ती स्वातंत्र्य (१-१५)

  • पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालणं (१६-२६)

 आपल्याला हे स्वातंत्र्य मिळावं म्हणून ख्रिस्ताने आपल्याला मुक्‍त केलं. त्यामुळे, स्थिर उभे राहा+ आणि स्वतःला पुन्हा एकदा दासत्वाच्या जोखडात* अडकवून घेऊ नका.+ २  मी पौल तुम्हाला सांगतो, की तुम्ही सुंता केली, तर ख्रिस्ताचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.+ ३  तसंच, सुंता करणाऱ्‍या प्रत्येक पुरुषाला मी अशी साक्ष देतो, की त्याने संपूर्ण नियमशास्त्राचं पालन करणं आवश्‍यक आहे.+ ४  नियमशास्त्राद्वारे नीतिमान ठरवलं जाण्याचा प्रयत्न करणारे तुम्ही,+ ख्रिस्तापासून वेगळे झाला आहात. त्याच्या अपार कृपेपासून तुम्ही दुरावला आहात. ५  पण आम्ही पवित्र शक्‍तीच्या* मदतीने, विश्‍वासाद्वारे मिळणारं ते नीतिमत्त्व प्राप्त करण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत, ज्याची आम्ही आशा धरली होती. ६  कारण ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असलेल्यांसाठी सुंता* करण्याला किंवा न करण्यालाही काही महत्त्व नाही;+ तर प्रेमाद्वारे कार्य करणारा विश्‍वास महत्त्वाचा आहे. ७  तुम्ही आजपर्यंत चांगलं धावत होता.+ मग, सत्याचं पालन करत राहण्यापासून तुम्हाला कोणी अडवलं? ८  अशा प्रकारची शिकवण,* ज्याने तुम्हाला बोलावलं त्याच्याकडून नक्कीच नाही. ९  थोडंसं खमीरसुद्धा पिठाच्या संपूर्ण गोळ्याला फुगवतं.*+ १०  प्रभूसोबत ऐक्यात असलेल्या तुमच्याबद्दल मला खातरी आहे,+ की तुम्ही माझ्यापेक्षा वेगळा विचार करणार नाही. पण जो तुम्हाला त्रास देतो,+ मग तो कोणी का असेना, त्याला योग्य दंड मिळेल. ११  बांधवांनो, मी जर अजूनही सुंतेबद्दल प्रचार करत असेन, तर मग अजूनही माझा छळ का केला जात आहे? मी खरंच तसं करत असतो, तर वधस्तंभामुळे* कोणाला अडखळण झालं नसतं.+ १२  मी तर म्हणतो, की तुमच्यामध्ये गोंधळ माजवायचा प्रयत्न करणाऱ्‍या माणसांनी स्वतःला नपुंसक करून घ्यावं. * १३  बांधवांनो, तुम्हाला स्वतंत्र होण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. पण, या स्वातंत्र्याचा उपयोग आपल्या शारीरिक वासना पूर्ण करण्यासाठी करू नका,+ तर प्रेमाने एकमेकांचे दास व्हा.+ १४  कारण, “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम कर,”+ या एकाच आज्ञेत सबंध नियमशास्त्र पूर्ण* होतं. १५  पण जर तुम्ही एकमेकांशी भांडत असाल* आणि एकमेकांना फाडून खात असाल,+ तर सांभाळून राहा, कारण अशाने तुम्ही एकमेकांचा सर्वनाश कराल.+ १६  मी म्हणतो, पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालत राहा,+ म्हणजे तुम्ही शारीरिक वासना पूर्ण करणारच नाही.+ १७  कारण शरीराची वासना ही पवित्र शक्‍तीच्या विरोधात आणि पवित्र शक्‍ती शरीराच्या विरोधात आहे. हे दोन्ही एकमेकांच्या विरोधात आहेत; त्यामुळे, ज्या गोष्टी करण्याची तुमची इच्छा असते, नेमक्या त्याच गोष्टी तुम्ही करत नाही.+ १८  शिवाय, जर तुम्ही पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालत असाल, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. १९  आता शरीराची कामं तर अगदी स्पष्ट आहेत; ती म्हणजे, अनैतिक लैंगिक कृत्यं,*+ अशुद्धपणा, निर्लज्ज वर्तन,*+ २०  मूर्तिपूजा, भूतविद्या,*+ वैर, भांडणं, हेवेदावे, रागाने भडकणं, मतभेद, फुटी, वेगवेगळे पंथ निर्माण करणं, २१  ईर्ष्या, दारुडेपणा,+ बेलगाम मौजमस्ती* आणि अशाच इतर गोष्टी.+ मी आधी दिला होता, तसाच पुन्हा एकदा तुम्हाला या गोष्टींबद्दल इशारा देतो, की अशा गोष्टी करत राहणारे देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत.+ २२  याउलट, पवित्र शक्‍तीचं फळ म्हणजे प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा,+ विश्‍वास, २३  सौम्यता, आत्मसंयम.+ अशा गोष्टींविरुद्ध कोणताही नियम नाही. २४  शिवाय, जे ख्रिस्त येशूचे आहेत, त्यांनी आपल्या शरीराला त्याच्या सगळ्या वासनांसोबत आणि इच्छांसोबत वधस्तंभावर खिळलं आहे.+ २५  जर आपण पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे जगत असू, तर ती आपल्याला जसा मार्ग दाखवेल त्याप्रमाणे आपण सुव्यवस्थितपणे चालत राहू या.+ २६  आपण अहंकारी+ किंवा आपसात स्पर्धेची भावना उत्पन्‍न करणारे+ किंवा एकमेकांबद्दल ईर्ष्या बाळगणारे होऊ नये.

तळटीपा

किंवा “जुवात.”
किंवा “अशा प्रकारचं मन वळवणं.”
किंवा “आंबवतं.”
किंवा “स्वतःचं खच्चीकरण करावं; षंढ बनावं,” म्हणजे ज्या नियमशास्त्राचं ते समर्थन करत आहेत त्याचं पालन करायला ते योग्य राहणार नाहीत.
किंवा कदाचित, “नियमशास्त्राचं सार आहे.”
किंवा “एकमेकांना चावत असाल.”
ग्रीक पोर्निया.  शब्दार्थसूची पाहा.
ग्रीक, ॲसेल्गेया.  शब्दार्थसूची पाहा.
किंवा “रंगेल पार्ट्या.”