रूथ १:१-२२

  • अलीमलेखचं कुटुंब मवाब देशात राहायला जातं (१, २)

  • नामी, अर्पा आणि रूथ विधवा होतात (३-६)

  • रूथ ही नामीला आणि देवाला एकनिष्ठ राहते (७-१७)

  • नामी रूथसोबत बेथलेहेमला परत येते (१८-२२)

 इस्राएलमध्ये न्यायाधीश शासन* करायचे त्या काळात+ तिथे दुष्काळ पडला. तेव्हा यहूदा इथल्या बेथलेहेममधून+ एक माणूस आपल्या बायकोला आणि दोन मुलांना घेऊन मवाब+ देशात राहायला गेला. २  त्याचं नाव अलीमलेख* होतं. त्याच्या बायकोचं नाव नामी* आणि त्याच्या मुलांची नावं महलोन* आणि खिल्योन* अशी होती. ते एफ्राथाचे, म्हणजे यहूदा इथल्या बेथलेहेमचे राहणारे होते. ते सगळे मवाब देशात येऊन तिथे राहू लागले. ३  काही काळाने नामीचा नवरा, अलीमलेख याचा मृत्यू झाला. आता फक्‍त नामी आणि तिची दोन मुलंच मागे राहिली होती. ४  पुढे त्या मुलांनी मवाबी मुलींशी लग्न केलं; एकीचं नाव अर्पा, तर दुसरीचं नाव रूथ.+ ते जवळपास दहा वर्षं तिथे राहिले. ५  मग महलोन आणि खिल्योन यांचाही मृत्यू झाला. नामीने आता नवऱ्‍यासोबत आपल्या दोन मुलांनाही गमावलं होतं. ६  पुढे नामीने ऐकलं, की यहोवाने* आपल्या लोकांना अन्‍नधान्य देऊन पुन्हा आशीर्वाद दिला आहे. तेव्हा ती आणि तिच्या सुना मवाबमधून परत जायला निघाल्या. ७  नामीने आपलं राहण्याचं ठिकाण सोडलं. आपल्या सुनांसोबत यहूदाला जात असताना, ८  ती त्यांना म्हणाली: “तुम्ही आपापल्या माहेरी परत जा. तुम्ही जसं माझ्यावर आणि माझ्या मुलांवर प्रेम केलं, तसंच यहोवाही तुमच्यावर एकनिष्ठ प्रेम करो.+ ९  यहोवाच्या आशीर्वादाने तुमची पुन्हा लग्नं व्हावीत आणि तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच माझी इच्छा आहे.”+ मग तिने त्यांचे मुके घेतले आणि त्या मोठ्याने रडू लागल्या. १०  पण त्या दोघी सारख्या तिला म्हणत राहिल्या: “नाही, आम्ही नाही जाणार, आम्हीही तुमच्यासोबत तुमच्या लोकांकडे येऊ.” ११  तेव्हा नामी म्हणाली: “माझ्या मुलींनो, परत जा; माझ्यासोबत का येता? तुमच्याशी लग्न करायला आता काय मला मुलं होणार आहेत?+ १२  नाही मुलींनो, तुम्ही जा. वय झाल्यामुळे आता माझं लग्न होऊ शकत नाही. आणि जरी आज माझं लग्न झालं आणि मला मुलंही झाली, १३  तरी ती मोठी होईपर्यंत तुम्ही वाट पाहणार आहात का? त्यांच्यासाठी तुम्ही लग्न न करता राहाल का? नाही! नाही मुलींनो! यहोवाचा हात माझ्याविरुद्ध उठलाय.+ पण यामुळे तुम्हाला दुःख सहन करावं लागतंय, आणि याचं मला खूप वाईट वाटतंय.” १४  मग त्या पुन्हा रडू लागल्या. त्यानंतर अर्पाने आपल्या सासूचा मुका घेतला आणि ती निघून गेली. पण रूथ नामीला सोडून जायला तयार नव्हती. १५  म्हणून नामी तिला म्हणाली: “बघ, तुझी जाऊ तिच्या लोकांकडे आणि तिच्या देवांकडे परत गेली आहे. तूही तिच्यासोबत जा.” १६  पण रूथ म्हणाली: “तुम्हाला सोडून परत जायला मला सांगू नका. तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन, तुम्ही जिथे राहाल तिथे मी राहीन. तुमचे लोक माझे लोक होतील आणि तुमचा देव माझा देव होईल.+ १७  जिथे तुमचा मृत्यू होईल तिथेच माझा मृत्यू होईल, आणि तिथेच मला पुरलं जाईल. मृत्यूशिवाय जर दुसऱ्‍या कोणत्याही कारणामुळे मी तुमच्यापासून वेगळी झाले, तर यहोवा मला कठोर शिक्षा करो.” १८  रूथचा निर्णय पक्का आहे हे पाहून नामीने तिला समजावण्याचं सोडून दिलं. १९  मग त्या दोघी बेथलेहेमला+ जायला निघाल्या. त्या तिथे पोहोचताच पूर्ण शहरात त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली. तिथल्या स्त्रिया म्हणू लागल्या: “ही नामीच आहे ना?” २०  पण ती त्यांना म्हणाली: “मला नामी* म्हणू नका, मला ‘मारा’* म्हणा. कारण सर्वशक्‍तिमान देवाने मला फार दुःख दिलंय.+ २१  मी गेले तेव्हा माझ्याकडे सगळं काही होतं, पण यहोवाने मला रिकाम्या हाती परत पाठवलंय. जर यहोवाच माझा विरोधी झालाय आणि सर्वशक्‍तिमान देवानेच जर माझ्यावर संकटं आणलीत, तर मग मला नामी का म्हणता?”+ २२  अशा प्रकारे, नामी आपल्या मवाबी सुनेसोबत, रूथसोबत मवाब+ देशातून परत आली. त्या बेथलेहेमला आल्या तेव्हा जवाची कापणी नुकतीच सुरू झाली होती.+

तळटीपा

शब्दशः “न्याय.”
म्हणजे “माझा देव राजा आहे.”
म्हणजे “प्रिय असलेली.”
कदाचित “अशक्‍त होणं; आजारी पडणं” या अर्थाच्या हिब्रू शब्दावरून.
म्हणजे “कमजोर; संपण्याच्या मार्गावर असलेला.”
म्हणजे “प्रिय असलेली.”
म्हणजे “कडू.”