शास्ते ११:१-४०

  • इफ्ताहला हाकलून दिलं जातं, नंतर पुढारी बनवलं जातं (१-११)

  • इफ्ताह अम्मोनसोबत तर्क करतो (१२-२८)

  • इफ्ताहचा नवस आणि त्याची मुलगी (२९-४०)

    • इफ्ताहची मुलगी आयुष्यभर कुमारी राहिली (३८-४०)

११  इफ्ताह+ एक शूर योद्धा होता. तो गिलाद इथे राहायचा. त्याची आई पूर्वी एक वेश्‍या होती आणि त्याच्या वडिलांचं नाव गिलाद होतं. २  पण गिलादला आपल्या बायकोपासूनही* मुलं झाली. ती मुलं मोठी झाल्यावर त्यांनी इफ्ताहला हाकलून दिलं. ते त्याला म्हणाले: “आमच्या वडिलांच्या मालमत्तेत तुला काहीच वाटा मिळणार नाही. कारण तू परक्या स्त्रीचा मुलगा आहेस.” ३  त्यामुळे इफ्ताह आपल्या भावांपासून पळून गेला आणि टोब नावाच्या प्रदेशात जाऊन राहू लागला. तिथे काही रिकामटेकडी माणसं इफ्ताहला येऊन मिळाली. ते सगळे मिळून शत्रूंवर हल्ला करायचे. ४  काही काळानंतर अम्मोनी लोक इस्राएलविरुद्ध लढायला आले.+ ५  ते इस्राएलशी लढायला आले, तेव्हा गिलाद इथले वडीलजन इफ्ताहला परत आणायला लगेच टोब इथे गेले. ६  ते इफ्ताहला म्हणाले: “ये आणि आमचा सेनापती हो, म्हणजे आम्हाला अम्मोनी लोकांचा सामना करता येईल.” ७  पण इफ्ताह गिलादच्या वडीलजनांना म्हणाला: “माझा द्वेष करून तुम्हीच मला माझ्या वडिलांच्या घरातून हाकलून दिलं होतं ना?+ मग आता का आलात माझ्याकडे? तुमच्यावर संकट आलंय म्हणून?” ८  त्यावर गिलादचे वडीलजन इफ्ताहला म्हणाले: “हो, आमच्यावर संकट आलंय म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. तू जर आमच्यासोबत आलास आणि अम्मोनी लोकांविरुद्ध लढलास, तर गिलादच्या सर्व लोकांचा तू पुढारी होशील.”+ ९  तेव्हा इफ्ताह गिलादच्या वडीलजनांना म्हणाला: “तुम्ही जर अम्मोनी लोकांशी लढण्यासाठी मला घेऊन गेलात आणि यहोवाने त्यांना माझ्या हाती दिलं, तर मीच तुमचा पुढारी होईन!” १०  त्यावर गिलादचे वडीलजन इफ्ताहला म्हणाले: “ठीक आहे, तू जसं म्हणतोस तसंच आम्ही करू. आणि या गोष्टीचा यहोवा आपल्यामध्ये साक्षीदार* आहे.” ११  तेव्हा इफ्ताह गिलादच्या वडीलजनांबरोबर गेला आणि लोकांनी त्याला आपला पुढारी आणि सेनापती बनवलं. मग इफ्ताहने आपलं सगळं म्हणणं मिस्पा+ इथे यहोवापुढे पुन्हा एकदा बोलून दाखवलं. १२  मग इफ्ताहने आपल्या दूतांच्या हातून अम्मोनी+ लोकांच्या राजाला संदेश पाठवला. तो त्याला म्हणाला: “माझ्याशी तुझं काय वैर? तू माझ्या देशावर हल्ला करायला का आलास?” १३  त्यावर अम्मोनी लोकांचा राजा इफ्ताहच्या दूतांना म्हणाला: “कारण इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले,+ तेव्हा त्यांनी आर्णोनपासून+ यब्बोकपर्यंत आणि पार यार्देन नदीपर्यंत असलेला माझा प्रदेश बळकावला.+ तो मुकाट्याने मला परत दे.” १४  पण इफ्ताहने पुन्हा आपल्या दूतांच्या हातून अम्मोनी लोकांच्या राजाला संदेश पाठवला, १५  आणि त्याला म्हटलं: “इफ्ताहचं असं म्हणणं आहे: ‘इस्राएलने मवाबी+ लोकांचा किंवा अम्मोनी+ लोकांचा प्रदेश मुळीच बळकावलेला नाही. १६  इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर पडले, तेव्हा ते ओसाड रानातून चालत तांबड्या समुद्रापर्यंत+ आले आणि नंतर कादेश+ इथे पोहोचले. १७  तेव्हा इस्राएलने आपल्या दूतांच्या हातून अदोमच्या+ राजाला असा संदेश पाठवला: “कृपा करून आम्हाला तुझ्या देशातून जाऊ दे.” पण अदोमच्या राजाने त्यांची विनंती मान्य केली नाही. मवाबच्या+ राजालाही त्यांनी असाच संदेश पाठवला, पण त्यानेही त्यांची विनंती ऐकली नाही. त्यामुळे इस्राएली लोक कादेशमध्येच राहिले.+ १८  मग ओसाड रानातून जात असताना इस्राएली लोक अदोम+ आणि मवाब या देशांना वळसा घालून गेले. ते मवाबच्या पूर्वेकडून+ जाऊन आर्णोनच्या प्रदेशात आले आणि तिथे तंबू बांधून राहिले. पण मवाबची सीमा असलेली आर्णोन नदी पार करून, ते मवाबच्या हद्दीत मात्र शिरले नाहीत.+ १९  त्यानंतर इस्राएलने आपल्या दूतांच्या हातून अमोरी लोकांचा राजा सीहोन याला हेशबोनमध्ये असा संदेश पाठवला: “आम्हाला आमच्या प्रदेशात जाता यावं म्हणून कृपा करून आम्हाला तुझ्या देशातून जाऊ दे.”+ २०  पण सीहोनला इस्राएलवर भरवसा नव्हता. त्यामुळे त्याने त्यांना आपल्या प्रदेशातून जाऊ दिलं नाही. उलट, त्याने आपली सगळी माणसं गोळा केली आणि याहस इथे छावणी करून तो इस्राएलशी लढला.+ २१  तेव्हा इस्राएलचा देव यहोवा याने सीहोनला आणि त्याच्या सर्व लोकांना इस्राएलच्या हाती दिलं. इस्राएलने त्यांना हरवलं आणि तिथे राहणाऱ्‍या अमोरी लोकांचा सगळा प्रदेश ताब्यात घेतला.+ २२  अशा प्रकारे, त्यांनी आर्णोनपासून यब्बोकपर्यंत आणि ओसाड रानापासून यार्देन नदीपर्यंत असलेला अमोरी लोकांचा संपूर्ण प्रदेश ताब्यात घेतला.+ २३  इस्राएलचा देव यहोवा यानेच अमोरी लोकांना त्याच्या लोकांपुढून हाकलून दिलं;+ आणि आता तू आम्हाला घालवून द्यायला निघालास? २४  तुझा देव कमोश+ याने जर कोणाचा प्रदेश तुला दिला, तर तो प्रदेश तू ताब्यात घेणार नाहीस का? अगदी तसंच, आमचा देव यहोवा ज्यांना आमच्यापुढून घालवून देतो, त्यांचा प्रदेश आम्ही ताब्यात घेतो.+ २५  मवाबचा राजा सिप्पोर याचा मुलगा बालाक+ यानेसुद्धा कधी इस्राएलशी वाद घातला नाही किंवा इस्राएलशी युद्ध केलं नाही. तू काय त्याच्यापेक्षा मोठा आहेस? २६  इस्राएली लोक गेल्या ३०० वर्षांपासून हेशबोन व त्याच्या आसपासच्या नगरांत,+ अरोएर व त्याच्या आसपासच्या नगरांत, आणि आर्णोनच्या किनाऱ्‍यावर असलेल्या शहरांमध्ये राहत आहेत. मग इतक्या वर्षांत तू त्यांच्याकडून हे प्रदेश परत घेण्याचा प्रयत्न का केला नाहीस?+ २७  मी तुझ्याविरुद्ध काहीही चुकीचं केलेलं नाही. पण तू मात्र माझ्यावर हल्ला करून अन्याय करत आहेस. तर आता सगळ्यात मोठा न्यायाधीश यहोवाच+ इस्राएली लोकांचा आणि अम्मोनी लोकांचा न्याय करो.’” २८  पण इफ्ताहने पाठवलेला हा संदेश अम्मोनी लोकांच्या राजाने धुडकावून लावला. २९  मग यहोवाची पवित्र शक्‍ती* इफ्ताहवर आली+ आणि तो गिलादच्या व मनश्‍शेच्या प्रदेशातून गिलादमधल्या मिस्पे+ इथे गेला. तिथून तो अम्मोनी लोकांचा सामना करायला पुढे गेला. ३०  इफ्ताहने यहोवाला एक नवस केला.+ तो म्हणाला: “तू जर अम्मोनी लोकांना माझ्या हाती दिलंस, ३१  तर मी विजयी होऊन सुखरूप परत येईन, तेव्हा माझ्या घराच्या दारातून जो कोणी मला भेटायला सर्वात आधी बाहेर येईल तो तुझा, यहोवाचा होईल.+ आणि मी त्याला होमार्पण म्हणून अर्पण करीन.”+ ३२  मग इफ्ताह अम्मोनी लोकांशी लढायला गेला आणि यहोवाने त्यांना त्याच्या हाती दिलं. ३३  त्याने अरोएरपासून मिन्‍नीथपर्यंत, आणि पुढे थेट आबेल-करामीमपर्यंत अतिशय मोठ्या प्रमाणावर त्यांची कत्तल केली; आणि २० शहरांवर कब्जा मिळवला. अशा प्रकारे इस्राएली लोकांपुढे अम्मोनी लोक हरले. ३४  शेवटी इफ्ताह मिस्पामध्ये+ आपल्या घरी परत आला, तेव्हा पाहतो तर काय! त्याची मुलगी डफ वाजवत आणि नाचत त्याला भेटायला बाहेर येत होती. ती त्याची एकुलती एक मुलगी होती. तिच्याशिवाय त्याला दुसरा मुलगा किंवा मुलगी नव्हती. ३५  तिला पाहताच त्याने दुःखी होऊन आपले कपडे फाडले आणि तो म्हणाला: “माझ्या मुली, तू मला दुःखाच्या खाईत लोटलंस! तुला आता माझ्यापासून दूर पाठवावं लागेल. मी यहोवाला शब्द दिलाय आणि मला तो परत घेता येणार नाही.”+ ३६  पण ती त्याला म्हणाली: “बाबा, तुम्ही यहोवाला शब्द दिलाय ना, मग तो नक्की पूर्ण करा. तुम्ही जे वचन दिलंय त्याप्रमाणे माझ्या बाबतीत करा.+ कारण यहोवाने तुमच्यासाठी तुमच्या शत्रूंचा, अम्मोनी लोकांचा बदला घेतलाय.” ३७  पुढे ती आपल्या वडिलांना म्हणाली: “माझी फक्‍त एकच विनंती आहे: मला दोन महिन्यांचा वेळ द्या. मी माझ्या मैत्रिणींसोबत डोंगरांवर जाईन आणि शोक करीन. कारण आता मी लग्न करू शकणार नाही.”* ३८  त्यावर तो म्हणाला: “जा!” आणि त्याने तिला दोन महिन्यांसाठी पाठवून दिलं. तेव्हा ती आपल्या मैत्रिणींसोबत डोंगरांवर गेली आणि आपल्याला आयुष्यभर कुमारीच राहावं लागणार या गोष्टीसाठी तिने शोक केला. ३९  दोन महिन्यांनंतर ती आपल्या वडिलांकडे परत आली. मग तिच्या वडिलांनी तिच्याबद्दल केलेला नवस पूर्ण केला.+ तिने कधीच कोणत्या पुरुषासोबत संबंध ठेवले नाहीत. आणि इस्राएलमध्ये अशी प्रथा पडली,* की ४०  दरवर्षी चार दिवस इस्राएलमधल्या मुली गिलादी इफ्ताहच्या मुलीची प्रशंसा करण्यासाठी* तिच्याकडे जातील.

तळटीपा

असं दिसतं, की त्याला आणखी एक बायको असावी.
शब्दशः “ऐकणारा.”
शब्दशः “आता मी कुमारीच राहीन.”
किंवा “नियम बनला.”
किंवा “मुलीला प्रोत्साहन देण्यासाठी.”