१ इतिहास २२:१-१९

  • मंदिराच्या बांधकामासाठी दावीदने केलेली तयारी (१-५)

  • दावीद शलमोनला सूचना देतो (६-१६)

  • शलमोनला मदत करण्याची अधिकाऱ्‍यांना आज्ञा (१७-१९)

२२  मग दावीद म्हणाला: “याच ठिकाणी खऱ्‍या देवाचं, यहोवाचं मंदिर बांधलं जाईल आणि इथेच इस्राएली लोकांसाठी होमार्पणाची वेदीसुद्धा बांधली जाईल.”+ २  नंतर दावीदने इस्राएल देशात राहणाऱ्‍या विदेशी लोकांना एकत्र जमवण्याचं फर्मान काढलं.+ मग त्याने त्यांच्यावर, खऱ्‍या देवाचं मंदिर बांधण्यासाठी दगड फोडून त्यांना आकार देण्याचं काम सोपवलं.+ ३  तसंच, दावीदने दरवाजांच्या खिळ्यांसाठी व जोडपट्ट्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात लोखंड जमा केलं. आणि वजन करता येणार नाही इतकं तांबंही त्याने जमा केलं.+ ४  याशिवाय, मोजता येणार नाहीत इतकी देवदाराची लाकडंसुद्धा+ त्याने जमा केली. कारण, सीदोन+ आणि सोर इथल्या लोकांनी+ अतिशय मोठ्या प्रमाणात दावीदला देवदाराची लाकडं आणून दिली होती. ५  मग दावीद म्हणाला: “माझा मुलगा शलमोन वयाने लहान आहे व त्याला अनुभवसुद्धा नाही.+ आणि यहोवासाठी जे मंदिर बांधायचंय ते इतकं भव्य असलं पाहिजे,+ की त्याच्या सौंदर्याची चर्चा सर्व देशांत व्हायला हवी+ आणि त्याची कीर्ती सगळीकडे पसरायला हवी.+ म्हणून मी शलमोनसाठी तयारी करून ठेवीन.” त्यामुळे दावीदने आपल्या मृत्यूच्या आधी, मंदिराच्या बांधकामासाठी फार मोठ्या प्रमाणात सामान गोळा केलं. ६  मग दावीदने आपल्या मुलाला, शलमोनला बोलावून घेतलं आणि त्याला इस्राएलचा देव यहोवा याच्यासाठी एक मंदिर बांधायची आज्ञा दिली. ७  दावीद त्याला म्हणाला: “माझी मनापासून अशी इच्छा होती, की मी माझा देव यहोवा याच्या नावाच्या गौरवासाठी एक मंदिर बांधावं.+ ८  पण यहोवाकडून मला असा संदेश मिळाला, की ‘तू पुष्कळ रक्‍तपात केलास, आणि मोठमोठी युद्धं लढलास. तू माझ्यासमोर पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात रक्‍त सांडलंस. म्हणून माझ्या नावाच्या गौरवासाठी तू मंदिर बांधणार नाहीस.+ ९  पण पाहा! तुला एक मुलगा होईल.+ तो शांतिप्रिय असेल आणि मी त्याला त्याच्या आसपासच्या सगळ्या शत्रूंपासून विसावा देईन.+ त्याचं नाव शलमोन*+ असेल. आणि त्याच्या शासनकाळात मी इस्राएल देशाला सुखशांती देईन.+ १०  तोच माझ्या नावाच्या गौरवासाठी एक मंदिर बांधेल.+ तो माझा मुलगा होईल आणि मी त्याचा पिता होईन.+ मी इस्राएलमध्ये त्याचं राजासन स्थापन करून ते कायमचं स्थिर करीन.’+ ११  तर आता माझ्या मुला, यहोवा तुझ्यासोबत असो. आणि त्याने तुझ्याबद्दल जसं म्हटलं, त्याप्रमाणे तुझा देव यहोवा याचं मंदिर बांधण्यात तू यशस्वी होवो.+ १२  यहोवा तुला इस्राएलवर अधिकार देईल तेव्हा त्याने तुला सुज्ञता आणि समंजसपणा द्यावा.+ म्हणजे तुझा देव यहोवा याच्या नियमांप्रमाणे तू चालत राहशील.+ १३  यहोवाने मोशेद्वारे इस्राएलला जे कायदे आणि नियम दिले होते,+ त्यांचं जर तू काळजीपूर्वक पालन केलंस तर तू यशस्वी होशील.+ हिंमत धर आणि खंबीर हो. घाबरून जाऊ नकोस किंवा भिऊ नकोस.+ १४  बघ, मी फार मेहनत करून यहोवाच्या मंदिरासाठी १,००,००० तालान्त* सोनं आणि १०,००,००० तालान्त चांदी जमवली आहे. आणि तांबं व लोखंड तर इतक्या मोठ्या प्रमाणात जमा केलंय,+ की त्यांचं वजन करणंही शक्य नाही. यांशिवाय, मी दगड व लाकडंही तयार ठेवली आहेत.+ पण तू त्यांत आणखी भर घाल. १५  इतकंच नाही तर तुझ्याकडे गवंडी,+ सुतार, दगड फोडणारे आणि सर्व प्रकारची कौशल्याची कामं करणारे पुष्कळ कारागीर+ आहेत. १६  आणि वजन करता येणार नाही इतकं सोनं, चांदी, तांबं आणि लोखंडही आहे.+ तर आता ऊठ आणि काम सुरू कर. यहोवा तुझ्याबरोबर असो.”+ १७  मग दावीदने इस्राएलच्या सर्व अधिकाऱ्‍यांना आपला मुलगा शलमोन याला मदत करायची आज्ञा दिली. तो म्हणाला: १८  “तुमचा देव यहोवा तुमच्याबरोबर आहे आणि त्याने तुम्हाला सर्व बाजूंनी शांती दिली आहे. त्याने या देशातल्या सगळ्या रहिवाशांना माझ्या हाती दिलंय आणि हा देश यहोवाच्या व त्याच्या लोकांच्या अधीन झालाय. १९  तर आता, तुमचा देव यहोवा याची पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने उपासना करण्याचा निश्‍चय करा.+ आणि खरा देव यहोवा याचं मंदिर बांधायला सुरुवात करा;+ म्हणजे यहोवाच्या नावाच्या गौरवासाठी बांधण्यात येणाऱ्‍या या मंदिरात+ यहोवाच्या कराराची पेटी आणि खऱ्‍या देवाला समर्पित असलेली पवित्र भांडी आणता येतील.”+

तळटीपा

“शांती” या अर्थाच्या हिब्रू शब्दापासून.
एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.