ख्रिस्ती जीवन
मुलांनो, आपल्या मम्मी-पप्पांशी मनमोकळेपणे बोला
मुलांनो, तुम्ही आपल्या मम्मी-पप्पांना मनातल्या गोष्टी का सांगितल्या पाहिजे? (नीत २३:२६) कारण यहोवाने त्यांना तुमची काळजी घ्यायची आणि तुम्हाला मार्गदर्शन द्यायची जबाबदारी दिली आहे. (स्तो १२७:३, ४) पण जर तुम्ही तुमच्या चिंता आणि मनातल्या भावना त्यांना सांगितल्या नाहीत तर त्यांना तुम्हाला मदत करता येणार नाही. तसंच, ते अनुभवातून जे शिकलेत ते तुम्हाला कळणार नाही. सगळ्या गोष्टी मम्मी-पप्पांना सांगणं गरजेचं आहे का? नेहमीच गरजेच नाही. पण काही गोष्टी त्यांच्यापासून लपवून त्यांना फसवणं नक्कीच चुकीचं आहे.—नीत ३:३२.
आपल्या मम्मी-पप्पांशी बोलण्यासाठी तुम्ही काय करू शकता? नीट बोलता येईल अशी वेळ निवडा. जर असं करणं शक्य नसेल, तर तुम्ही पत्रातून आपल्या भावना त्यांना सांगू शकता. समजा तुमच्या मम्मी-पप्पांना तुमच्याशी अशा विषयावर बोलायचं आहे ज्यावर तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं नाही, तर काय? हे लक्षात ठेवा, की तुमच्या मम्मी-पप्पांना खरंच तुम्हाला मदत करायची आहे! तुमचे मम्मी-पप्पा तुमचे शत्रू नाही, तर मित्र आहेत. आपल्या मम्मी-पप्पांशी बोलण्यासाठी तुम्ही आता जी मेहनत घ्याल त्याचा तुम्हाला कायमचा फायदा होईल.—नीत ४:१०-१२.
माझे किशोरवयातले दिवस—मी मम्मी-पप्पांसोबत कसं बोलू शकतो? हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेले प्रश्न विचारा:
-
एस्तेर आणि पारतिक यांना कोणत्या गोष्टीची जाणीव झाली?
-
येशूच्या उदाहरणातून तुम्ही काय शिकू शकता?
-
तुमच्या मम्मी-पप्पांनी तुमच्यासाठी काय-काय केलंय?
-
मम्मी-पप्पांशी बोलण्यासाठी बायबलची कोणती तत्त्वं तुम्हाला मदत करतील?