व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“युद्ध आपलं नाही, देवाचं आहे”

“युद्ध आपलं नाही, देवाचं आहे”

“युद्ध आपलं नाही, देवाचं आहे”

डब्ल्यू. ग्लेन हाऊ यांच्याद्वारे कथित

गेल्या साठ वर्षांपासून कॅनडातल्या यहोवाच्या साक्षीदारांनी असंख्य खटले लढले आणि जिंकले आहेत. आणि ही गोष्ट कायद्याच्या क्षेत्रातील लोकांच्या नजरेतून सुटलेली नाही. या कायद्याच्या लढाईत माझा देखील सहभाग होता, आणि त्याकरता अलीकडेच मला अमेरिकन कॉलेज ऑफ ट्रायल लॉयर्सतर्फे साहसी वकिलीसाठी पारितोषिक मिळालं. पारितोषिक वितरण समारंभात असं सांगण्यात आलं की, यहोवाच्या साक्षीदारांच्या खटल्यांमध्ये मिळालेल्या विजयाच्या जोरावर सरकारच्या अवाजवी नियमांविरुद्ध लढणं शक्य झालं. कारण अशाच खटल्यांच्या आधारे कॅनडातल्या सर्वांच्या स्वातंत्र्याच्या हक्काला संमती आणि संरक्षणही मिळत होतं. या न्यायालयीन खटल्यांविषयी आणि कायदे क्षेत्रात मी कसा गेलो, तसेच यहोवाच्या साक्षीदारांशी माझी गाठ कशी पडली याविषयी मी तुम्हाला सविस्तर सांगतो.

ही १९२४ सालची गोष्ट आहे. कॅनडातल्या टोरोंटो येथे आम्ही राहत होतो. त्या वेळी जॉर्ज रिक्स हे बायबल विद्यार्थी (तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांना बायबल विद्यार्थी या नावानं ओळखलं जायचं) माझ्या आईवडिलांना एकदा भेटले. माझ्या आईनं रिक्स यांना आत बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. मी तेव्हा पाच वर्षांचा होतो आणि माझा भाऊ ज्यो तीन वर्षांचा.

त्यानंतर लागलीच माझी आई टोरोंटोमधील बायबल विद्यार्थ्यांच्या सभांना जाऊ लागली. १९२९ मध्ये ती पायनियर किंवा पूर्ण-वेळेची सेविका बनली. १९६९ मध्ये तिचे पार्थिव जीवन समाप्त झाले तोवर अर्थात तिच्या मृत्यूपर्यंत ती पायनियरींग करत होती. तिचा निश्‍चय आणि आवेश उल्लेखनीय होता. आणि त्यामुळेच कित्येकांनी सत्य स्वीकारलं होतं.

माझ्या वडिलांचं नाव होतं फ्रँक हाऊ. तसं पाहिलं तर ते शांत स्वभावाचे. पण आईला सभेला, प्रचाराला जाण्यासाठी सुरवातीला त्यांनी विरोध केला. पण आई सहसा सर्किट ओव्हरसियरना घरी बोलवायची तेव्हा ते वडिलांची समजूत घालायचे. एकदा जॉर्ज यंग नावाचे सर्किट ओव्हरसियर घरी येऊन वडिलांशी बोलले. हळूहळू वडिलांचा विरोध थंडावला. बायबल सत्याचा घरात चांगला परिणाम होत असल्याचं त्यांनी पाहिलं, त्यामुळे ते उलट आम्हाला मदत करू लागले. पण, ते स्वतः कधीच साक्षीदार बनले नाहीत.

देवाची सेवा करण्याचा निर्धार

माझं शिक्षण १९३६ साली पूर्ण झालं. त्या वेळी मला आध्यात्मिक गोष्टींमध्ये इतका रस नव्हता. महामंदीचा तो काळ होता. नोकऱ्‍यांची मारामार होती. म्हणून मग मी टोरोंटोच्या विद्यापीठात प्रवेश घेतला. १९४० साली, मी वकील व्हायचं ठरवलं. माझ्या आईला हे अपेक्षितच होतं. मी लहान असताना ती म्हणायची: “वकिलांसारखा वाद घालण्यात याचा पहिला नंबर!”

जुलै ४, १९४० रोजी कॅनडा सरकारने अचानक यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी घातली. तेव्हा मी कायद्याचं शिक्षण घ्यायला सुरवात देखील केली नव्हती. तो माझ्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा क्षण ठरला. या प्रामाणिक लोकांच्या लहानशा गटावर असलेला सरकारचा रोख पाहून यहोवाचे साक्षीदारच येशूचे खरे शिष्य आहेत याची मला खातरी पटली. अगदी येशूने सांगितल्यासारखेच ‘त्याच्या नावामुळे सर्व राष्ट्रे त्यांचा द्वेष करू लागले.’ (मत्तय २४:९) तेव्हाच मी हा निर्धार केला की मी या संघटनेला चालवणाऱ्‍या ईश्‍वरालाच मानणार, त्याचीच सेवा करणार. फेब्रुवारी १०, १९४१ रोजी मी बाप्तिस्मा घेऊन यहोवा देवाला केलेल्या माझ्या समर्पणाची साक्ष दिली.

खरं तर मला पायनियर व्हायचं होतं. पण जॅक नेथन (त्या काळी कॅनडातल्या प्रचार कार्याचे नेतृत्त्व करणारे बांधव) यांनी मला माझं कायद्याचं शिक्षण पूर्ण करायला सांगितलं. म्हणून मग मी माझं शिक्षण पूर्ण केलं. मे १९४३ साली मी पदवीधर झालो आणि त्यानंतर मी पायनियरींग करू लागलो. ऑगस्टमध्ये मला कॅनडातल्या वॉच टावर संस्थेच्या शाखा दफ्तराकडून बोलावणं आलं. यहोवाच्या साक्षीदारांच्या कोर्टातील खटले सोडवण्यासाठी त्यांना माझी मदत हवी होती. त्याच्या पुढच्या महिन्यात कॅनडाच्या ओन्टारियो येथे मी बॅरिस्टर झालो.

कायद्याच्या आधारे सुवार्तेचा बचाव

दुसरं महायुद्ध पेटलं होतं. कॅनडातल्या यहोवाच्या साक्षीदारांवर अद्यापही बंदी होती. सापडेल त्या यहोवाच्या साक्षीदारांना उगाचच तुरुंगात टाकलं जात होतं. मुलांना शाळेतून काढण्यात आलं. ती ध्वजवंदन करत नाहीत किंवा राष्ट्रगीत गात नाहीत म्हणून त्यांना त्यांच्या आईवडिलांपासून दूर दुसऱ्‍यांच्या घरात ठेवलं जातं होतं. स्टेट ॲण्ड साल्व्हेशन: द जेहोवाज विटनेसेस ॲण्ड देअर फाईट फॉर सिव्हील राईट्‌स (सरकार आणि तारण: यहोवाच्या साक्षीदारांचा मूलभूत हक्कांसाठी संघर्ष) या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक विल्यम कॅपलन म्हणाले की, “साक्षीदारांची जाहीरपणे निर्भर्त्सना केली जात होती; त्यांना कायदेशीरपणे तसेच बेकायदेशीरपणे जाचण्यात येत होतं. तसेच, युद्धादरम्यान देशभक्‍तीच्या भावनेने पेटलेल्या निर्दयी लोकांनीही त्यांना छळलं.”

बंदी उठवण्यात यावी म्हणून साक्षीदार बरेच प्रयत्न करत होते, पण सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडत होते. अचानक ऑक्टोबर १४, १९४३ रोजी बंदी उठवण्यात आली. पण तरीही साक्षीदारांची तुरूंग व मजुरी छावण्यांतून सुटका झाली नव्हती; मुलांना सार्वजनिक शाळांमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. वॉच टावर संस्थेवरील आणि आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थ्यांच्या संघटनेवरील (टोरोंटोमधील आपल्या मालमत्तेची मालकी असलेले मंडळ) बंदी कायम होती.

एकोणीसशे त्रेचाळीस सालाच्या शेवटी, कॅनडाचे शाखा सेवक पर्सी चॅपमन आणि मी वॉच टावर संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष नेथन नॉर आणि संस्थेचे उपाध्यक्ष व वकील हेडन कव्हिंग्टन यांच्याशी सल्लामसलत करायला न्यूयॉर्कला गेलो. बंधू कव्हिंग्टन कायद्याच्या मामल्यांमध्ये फार अनुभवी होते. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात त्यांनी ४५ पैकी चक्क ३६ खटले जिंकले होते.

कॅनडातल्या साक्षीदारांना खूपच सहनशक्‍ती दाखवावी लागली. १९४४ साली टोरोंटोमधील शाखेच्या जमिनीचा सरतेशेवटी ताबा मिळाला आणि बंदी येण्याआधी तेथे काम करणारे बांधव पुन्हा एकदा तेथे येऊ शकले. १९४५ मध्ये, ओन्टारियो प्रांताच्या सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलं की, धार्मिक किंवा नैतिक कारणांमुळे जर मुलांनी एखाद्या कार्यक्रमात भाग घेतला नाही तर त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात येऊ नये. शाळांमधून बाहेर काढण्यात आलेल्या सर्व मुलांना पुन्हा शाळेत प्रवेश द्यावा असा न्यायालयाने आदेश दिला. शेवटी, १९४६ मध्ये कॅनडाच्या सरकारने मजुरीच्या छावण्यांमधील साक्षीदारांची सुटका केली. हे खटले धैर्याने, निग्रहाने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून लढायला बंधू कव्हिंग्टनने मला शिकवलं.

क्यूबेकचा लढा

आतापर्यंत कॅनडाच्या जवळजवळ सर्व भागांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या स्वातंत्र्याला मान्यता मिळाली होती. मात्र फ्रेंच लोकांचं वर्चस्व असलेल्या क्यूबेकच्या कॅथलिक प्रांतामध्ये अद्याप तसं स्वातंत्र्य नव्हतं. गेल्या ३०० हून अधिक वर्षांपासून या प्रांतावर थेट रोमन कॅथलिक चर्चचं नियंत्रण होतं. शाळा, दवाखाने आणि इतर सुविधा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्याच ताब्यात होत्या. इतकेच काय तर, क्यूबेकच्या संसदेतील अध्यक्षांच्या खुर्चीसोबत कॅथलिक कार्डिनलसाठी एक राखीव जागा ठेवली जात होती!

पंतप्रधान आणि मुख्य सरकारी वकील मॉरीस ड्यूप्लेसे हे क्यूबेकचे हुकूमशाहच होते. इतिहासकार झेरार पेलट्ये यांच्या मते क्यूबेकचं राज्य म्हणजे, “लबाडी, अन्याय, भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर, संकुचित आचारविचार असलेल्यांचे वर्चस्व आणि मूर्खपणाचे राज्य” होतं. ड्यूप्लेसेने रोमन कॅथलिक कार्डिनल व्हिलेनुव्ह यांच्याशी हात मिळवून आपला जम बसवला.

क्यूबेकमध्ये १९४० च्या दशकाच्या सुरवातीला ३०० साक्षीदार होते. कॅनडाहून आलेले अनेकजण येथे पायनियरींग करत होते; माझा भाऊ ज्योसुद्धा त्यांच्यापैकी होता. क्यूबेकमध्ये प्रचारकार्याचा वेग वाढला तसे तेथील पोलिस पाळकवर्गाच्या दबावाखाली येऊन साक्षीदारांचा छळ करू लागले. ते साक्षीदारांना वारंवार अटक करू लागले आणि चुकीचे व्यापारी कायदे लावून आपल्या धार्मिक कार्यहालचालींवर आरोप करू लागले

मला टोरोंटोहून क्यूबेकला इतक्यांदा जावं लागायचं की शेवटी मला क्यूबेकमध्येच राहून तिथल्या बांधवांसाठी वकिली करणाऱ्‍या गैर-साक्षीदार वकिलांना मदत करायची नेमणूक देण्यात आली. दररोज माझं सगळ्यात पहिलं काम म्हणजे आदल्या दिवशी किती जणांना अटक केलीय ते पाहायचं आणि मग कोर्टात जाऊन त्यांच्या जामिनाची व्यवस्था करायची. जामीन देण्याकरता फ्राँक राँकरेली नावाचे एक श्रीमंत बांधव सदैव तयार असायचे.

एकोणीसशे चव्वेचाळीस ते १९४६ च्या दरम्यान कायद्याचे उल्लंघन करण्याच्या आरोपाखाली भरलेल्या खटल्यांची संख्या ४० पासून चक्क ८०० झाली! एकीकडे अधिकारी साक्षीदारांना अटक करत होते आणि छळत होते तर दुसरीकडे कॅथलिक पाळकवर्ग जमावांना चेतवून साक्षीदारांवर हल्ले करवत होते.

नोव्हेंबर २ आणि ३, १९४६ रोजी या घटनांची चर्चा करण्यासाठी मॉन्ट्रियल येथे एक खास सभा भरवण्यात आली. बंधू नॉर यांनी शेवटचं भाषण दिलं; त्याचं शीर्षक होतं, “आम्ही काय करावं?” याचं उत्तर त्यांनी दिलं तेव्हा उपस्थित असलेल्या सर्वांना फार आनंद झाला. क्यूबेक्स बर्निंग हेट फॉर गॉड ॲण्ड ख्राइस्ट ॲण्ड फ्रिडम इज द शेम ऑफ ऑल कॅनडा (देव आणि ख्रिस्ताप्रती क्यूबेकचा त्वेष आणि कॅनडासाठी स्वातंत्र्य एक कलंक आहे) असं शीर्षक असलेली चार पानी हस्तपत्रिका त्या सभेत रिलीज करण्यात आली. क्यूबेकमधील यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध केलेले सगळे कारनामे त्यात उघड केले होते—पाळकांनी चेतवलेले दंगे, पोलिसांचा निर्दयीपणा, अटक तसेच सामूहिक हिंसा हे सगळं कोणी, कधी, कोठे केलं याची सविस्तर माहिती त्या हस्तपत्रिकेत दिली होती. १२ दिवसांनंतर सबंध कॅनडात त्या पत्रिकेचं वितरण होऊ लागलं.

त्यानंतर लगेचच ड्यूप्लेसेने यहोवाच्या साक्षीदारांशी “गयावया न करता युद्ध” करायचं जाहीरपणे घोषित केलं. पण हे आमच्याच फायद्याचं ठरलं. त्याने क्यूबेक्स बर्निंग हेट ही हस्तपत्रिका वितरित केल्याने राजद्रोहाचा आरोप लावला जाईल असं घोषित केलं. राजद्रोहाचा आरोप फार गंभीर असल्याकारणाने हा गुन्हा क्यूबेकमधील कोर्टांऐवजी कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल झाला असता. रागाच्या भरात ड्यूप्लेसेने या परिणामाचा विचारच केला नाही. नंतर त्याने फ्राँक राँकरेली (जे आम्हाला जामीन द्यायचे) यांचा मद्याचा वापर करण्याचा परवाना रद्द करण्याचा व्यक्‍तिशः आदेश दिला. बंधू राँकरेली यांच्या रेस्टॉरंटमध्ये वाईन विकता येत नसल्याने त्यांचं रेस्टॉरंट काही महिन्यातच बंद पडलं; यामुळे त्यांचं भारी नुकसान झालं.

यानंतर अधिकाधिक साक्षीदारांची अटक होऊ लागली. आता ८०० खटल्यांऐवजी १,६०० खटले जमा झाले होते. त्यामुळे वकील आणि न्यायाधीश तक्रार करू लागले. तेव्हा आम्ही त्यांना सोपा उपाय सांगितला: तुम्ही जाऊन पोलिसांना सांगा की ख्रिश्‍चनांना अटक करण्यात वेळ घालवण्याऐवजी खऱ्‍या गुन्हेगारांना अटक करा. म्हणजे तुमच्या समस्या आपोआपच सुटतील!

मॉन्ट्रियल येथील ए. एल. स्टेन आणि क्यूबेक शहरातले सॅम एस. बॉर्ड या दोन धाडसी यहुदी वकिलांनी आमच्या बाजूने खटले लढून आम्हाला बरीच मदत केली. विशेषतः, मी १९४९ साली क्यूबेकमध्ये बॅरिस्टर होईपर्यंत त्यांनी आम्हाला साथ दिली. कॅनडाचे नंतरचे पंतप्रधान पायर एलीयट ट्रुडू यांनी लिहिलं की, क्यूबेकमधील यहोवाचे साक्षीदार “निंदा, छळ आणि द्वेषाचे बळी ठरले होते; परंतु त्यांनी कायद्याची मदत घेऊन चर्च, सरकार, राष्ट्र, पोलिस आणि जनमताविरुद्ध लढा दिला.”

माझा भाऊ ज्यो याला दिलेल्या वागणुकीवरून क्यूबेकमधील कोर्टांचा अन्यायीपणा दिसून येतो. त्याच्यावर शांती भंग करण्याचा आरोप लावला होता. न्यायाधीश झॉन्‌ मरस्ये यांनी ज्योला ६० दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. जास्तीत जास्त तेवढीच शिक्षा ते देऊ शकत होते. मग एकदम खवळून ते ज्योवर आरडले: “तुला जन्मठेपच द्यायला हवी!”

एका वृत्तपत्राच्या मते, मरस्ये यांनी क्यूबेकच्या पोलिसांना “प्रत्येक ज्ञात असलेल्या तसेच संशयित साक्षीदाराला पाहता क्षणीच अटक करा” असा आदेश दिला होता. त्यांच्या अशा वागणुकीमुळे क्यूबेक्स बर्निंग हेट या हस्तपत्रिकेबाबतीत केलेले आरोप त्यांच्यावरच उलटत होते. क्यूबेक सोडून कॅनडातील काही वृत्तपत्रांमध्ये खालील बातम्या झळकल्या: “क्यूबेकमध्ये काळोख्या काळाचे पुनरागमन” (द टोरोंटो स्टार), “इन्क्विझिशनचे पुनरागमन” (द ग्लोब ॲण्ड मेल), “किळसवाणी हुकूमशाही” (द गॅझेट, ग्लेस बे, नोव्हा स्कॉटिया).

राजद्रोही नसल्याची सफाई

एकोणीसशे सत्तेचाळीस साली, एमे बुशे यांचा राजद्रोहाचा खटला चौकशीसाठी सर्वात पहिला होता. त्यामध्ये मी श्री. स्टेन यांना मदत केली. एमे यांनी आपल्या घराच्या आसपासच्या क्षेत्रात काही पत्रिका वाटल्या होत्या. एमेच्या चौकशीत आम्ही असं सिद्ध करून दाखवलं की, क्यूबेक्स बर्निंग हेट या पत्रिकेत कोणतीही खोटी माहिती नव्हती. फक्‍त, यहोवाच्या साक्षीदारांवर केलेल्या अत्याचारांचे वर्णन धिक्कारात्मक भाषेत करण्यात आलं होतं. आम्ही दाखवून दिलं की, अत्याचार करणाऱ्‍यांविरुद्ध कोणतेही आरोप लावलेले नाहीत. एमेने फक्‍त या पत्रिका वाटल्यामुळे त्याला दोषी ठरवलं गेलं होतं. चौकशीतून हेच दाखवून दिलं गेलं की, सत्य सांगणं हा गुन्हा आहे!

क्यूबेकच्या कोर्टांमध्ये ३५० वर्षांपूर्वी ‘राजद्रोहाबद्दल’ जो दृष्टिकोन होता त्याचीच अंमलबजावणी केली जात होती. त्यानुसार, सरकारची टीका करणाऱ्‍या व्यक्‍तीवर राजद्रोह केल्याचा आरोप लावला जाऊ शकत होता. ड्यूप्लेसेनेसुद्धा आपल्या शासनाची टीका कोणाला करता येऊ नये म्हणून हेच स्पष्टीकरण राहू दिलं होतं. परंतु, १९५० साली आम्ही सर्वोच्च न्यायालयापुढे असा मुद्दा मांडला की, आधुनिक लोकशाहीत राजद्रोह म्हणजे हिंसा चेतवणं किंवा सरकारविरुद्ध बंड करणं; तेव्हा कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयाने आमचा हा मुद्दा मान्य केला. क्यूबेक्स बर्निंग हेट यात कोणत्याही प्रकारे लोकांना चेतवण्यात आलं नव्हतं; म्हणून कायद्याच्या दृष्टीनं तो भाषा स्वातंत्र्याचा एक योग्य प्रकार होता. या एकाच निर्णयामुळे सगळेच्या सगळे १२३ खटले जिंकल्यासारखेच होते! ती घटना अविस्मरणीय होती आणि यहोवाने विजय मिळवून दिल्याचे मी स्वतः अनुभवलं.

प्रतिबंधाविरुद्ध लढा

क्यूबेक शहरामध्ये, पोलिस प्रमुखांकडून परवानगी मिळाल्याशिवाय साहित्य वाटता येत नाही असा एक पोटकायदा होता. पण ही तर थेट बंदी केल्यासारखं होतं म्हणून ते धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन होतं. याच पोटकायद्यामुळे लॉर्ये सोमुर (तेव्हाचे प्रवासी पर्यवेक्षक) यांना तीन महिन्याचा तुरुंगवास झाला तसेच त्यांच्यावर इतर अनेक आरोपही करण्यात आले.

सन १९४७ मध्ये, क्यूबेक शहरात यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध हा पोटकायदा लागू केला जाऊ नये म्हणून बंधू सोमुरच्या नावाने तक्रार नोंदवण्यात आली. क्यूबेकमधील कोर्टांनी आमच्या विरोधात निर्णय दिला; मग कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयात अपील केलं. ऑक्टोबर १९५३ साली, त्या न्यायालयातील सर्व नऊ न्यायाधीशांसमक्ष खटल्याची सुनावणी (ही सुनावणी सात दिवस चालली) झाल्यानंतर आमच्या विनंतीनुसार हा कायदा रद्द करण्यात आला. छापील बायबल संदेशांचे जाहीर वितरण करणं हा यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिस्ती उपासनेचा मूलभूत भाग आहे आणि म्हणून कायद्याच्या दृष्टीने त्यावर प्रतिबंध घालता येत नाही हे न्यायालयानं ओळखलं.

तर अशाप्रकारे, बुशे प्रकरणातून यहोवाचे साक्षीदार जे काही म्हणत होते ते सर्व कायद्याच्या दृष्टीने योग्य ठरलं; आणि सोमुर प्रकरणाच्या निर्णयावरून ते कसं आणि कुठं म्हटलं जावं हे ठरवलं गेलं. सोमुर प्रकरणाच्या विजयामुळे पोटकायद्यांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून भरलेले १,१०० हून अधिक खटले रद्द करण्यात आले. त्याशिवाय, मॉन्ट्रियल येथील ५०० आरोप देखील पुराव्या अभावी मागे घेण्यात आले. मग काय, एक एक करून सगळे आरोप धुडकावण्यात आले आणि क्यूबेकमध्ये साक्षीदारांविरुद्ध एकही खटला उरला नाही!

ड्यूप्लेसेचा अखेरचा डाव

आता कोणत्याही नियमांच्या आधारे यहोवाच्या साक्षीदारांचा विरोध करणं शक्य नव्हतं तेव्हा जानेवारी १९५४ मध्ये, ड्यूप्लेसेने क्र. ३८ हा नवीन कायदा काढला; प्रसारमाध्यमाने या कायद्याचे वर्णन ‘यहोवाच्या साक्षीदारांचा विरोध करणारा कायदा’ असं केलं. त्या कायद्यानुसार “टीकात्मक किंवा अपमानजनक” भाषा बोलण्याचा कोणा व्यक्‍तीचा हेतू आहे असा कोणाला संशय जरी आला तरी तक्रार देता येऊ शकत होती आणि त्यासाठी पुरावा देण्याचीही गरज नव्हती. तशी तक्रार आल्यावर, ड्यूप्लेसे स्वतः महान्याय प्रतिनिधी असल्यामुळे आरोपीला जाहीरपणे काही म्हणण्यास मनाई करू शकत होता. सदर कायद्यानुसार एका व्यक्‍तीविरुद्ध हुकूम काढल्यावर साहजिकच त्या व्यक्‍तीच्या चर्चच्या सगळ्याच लोकांना ते लागू होईल. शिवाय, त्या चर्चचे सर्व बायबल आणि धार्मिक साहित्य जप्त करून नष्ट केलं जाईल आणि त्याची सर्व उपासनास्थळं निकाल लागेपर्यंत बंद ठेवली जातील. आणि तो निकाल कधी लागेल त्याचं काही निश्‍चित नव्हतं.

नियम क्र. ३८ हा १५ व्या शतकात टॉर्कमाडाच्या स्पॅनिश इन्क्विझिशनमध्ये तयार केलेल्या नियमाची नक्कल होती. त्या वेळी, आरोपी आणि त्याच्या साथीदारांचे सर्व नागरी अधिकार काढून घेतले जात होते. तेसुद्धा अपराध केल्याचा कोणताही पुरावा नसताना! नियम क्र. ३८ बद्दलही प्रेस्सने असं जाहीर केलं की, तिथल्या पोलिसांना यहोवाच्या साक्षीदारांचे सर्व राज्य सभागृह बंद करण्याची आणि त्यांचे बायबल व इतर साहित्य जप्त करून नष्ट करण्याची सूचना देण्यात आली होती. हे ऐकल्यावर यहोवाच्या साक्षीदारांनी त्या प्रांतामधून आपलं सर्व धार्मिक साहित्य त्या भागातून हलवलं. परंतु, जाहीर प्रचार थांबवला नाही. पण फक्‍त ते स्वतःचे बायबल सोबत घेत.

जानेवारी २८, १९५४ रोजी तो नियम कायदा बनला. जानेवारी २९ रोजी, क्यूबेकमधील कोर्टात यहोवाच्या साक्षीदारांच्या वतीने कार्यवाही दाखल करायला मी सकाळी ९ वाजताच हजर झालो. ड्यूप्लेसेने तो कायदा अंमलात आणण्याआधीच तो लागू केला जाऊ नये असा कायमचा आदेश मिळवण्यासाठी मी तेथे गेलो होतो. पण न्यायाधीशाने मला तात्पुरता आदेश दिला नाही कारण नियम क्र. ३८ अद्याप लागू करण्यात आला नव्हता. परंतु, सरकारने त्याचा वापर करायचा प्रयत्न केला तर मी त्यांच्याकडे मदतीसाठी येऊ शकतो अशी त्यांनी मला हमी दिली. न्यायाधीशांची ही हमी तात्पुरत्या हुकूमासारखीच होती कारण ड्यूप्लेसेने तो कायदा अंमलात आणताच त्याला रोखण्यात येणार होतं!

पोलिस या कायद्यानुसार काही पाऊल उचलतात का हे पाहण्याकरता आम्ही एक आठवडा थांबलो. पण काहीच झालं नाही! मग मी असंच तपासून पाहायचं ठरवलं. व्हिक्टोरिया डगलुक (नंतर स्टील) आणि हेलन डगलुक (नंतर सिमकॉक्स) या दोन पायनियर बहिणींना ड्यूप्लेसेच्याच गावात अर्थात ट्रॉइस-रिव्हेरस येथे साहित्यासहित घरोघरी पाठवण्यात आलं. पुन्हा काहीच झाले नाही. बहिणी तेथे प्रचार करत असताना मी येथे लॉर्ये सोमुर यांना पोलिसांना फोन करायला पाठवून दिलं. त्यांनी स्वतःची ओळख न देता पोलिसांकडे तक्रार केली की, यहोवाचे साक्षीदार प्रचार करत होते पण ड्यूप्लेसेचा नवीन कायदा लागू केला जात नव्हता.

तेव्हा फोन उचललेल्या अधिकाऱ्‍याने म्हटलं “होय ठाऊक आहे. तसा नियम काढला होता पण दुसऱ्‍याच दिवशी यहोवाच्या साक्षीदारांनी आमच्याविरुद्ध आदेश काढला म्हणून आम्ही काही करू शकत नाही.” लगेच आम्ही आमचे साहित्य पुन्हा एकदा क्यूबेकमध्ये आणलं. दहा वर्षे हा खटला वरच्या न्यायालयांमध्ये जात राहिला पण आमच्या प्रचारकार्यात कसलाही खंड पडला नाही.

कोर्टाकडून मिळवलेल्या हुकूमाव्यतिरिक्‍त नियम क्र. ३८ राज्यशासनाला अनुसरून नसल्याचं जाहीर करावं म्हणून आम्ही खूप प्रयत्न केला. हा नियम यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला एक आडकाठीच आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही एक धाडसी पाऊल उचलायचं ठरवलं—ड्यूप्लेसेलाच एक कोर्टाचे साक्षीसमन्स पाठवायचं आणि त्याला चौकशीसाठी यायला लावून पुरावा द्यायला लावायचा. तसे आम्ही केले. मग मी अडीच तास त्याची उलट तपासणी केली. “यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध गयावया न करता युद्ध” करायचं आणि नियम क्र. ३८ मुळे क्यूबेकमध्ये यहोवाच्या साक्षीदारांचे नामोनिशाण मिटवण्याची त्याची वाक्यं मी वारंवार बोलून दाखवत होतो. तेव्हा तर तो माझ्यावर खेकसलाच आणि म्हणाला: “तू फार उद्धट माणूस आहेस!”

त्यावर मी शांतपणे म्हणालो, “मिस्टर ड्यूप्लेसे कोणाचा स्वभाव कसा आहे हे जर इथं आपण बोलणार असतो तर मलाही काही बोलावंसं वाटेल. पण आपण इथं त्याविषयी नाही तर कामाविषयी बोलत आहोत. म्हणून माझ्या आधीच्या प्रश्‍नाचं उत्तर तुम्ही का दिलं नाहीत हे कृपया कोर्टाला सांगाल का?”

एकोणीसशे चौसष्ठ साली, मी कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयात नियम क्र. ३८ बद्दल कारणमीमांसा केली होती. पण हा नियम राज्यशासनाला अनुसरून नाही असा निकाल द्यायला त्यांनी नकार दिला कारण तो कायदा कधी लागू केलेलाच नव्हता. पण तोपर्यंत ड्यूप्लेसेचे निधन झालं. आणि नियम क्र. ३८ला काही अर्थ राहिला नाही. तो नियम यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध किंवा इतर कोणाही विरुद्ध कधीच वापरण्यात आला नाही.

एकोणीसशे एकोणसाठ साली, ड्यूप्लेसेचा मृत्यू होण्याच्या काही काळाआधी, कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला बंधू राँकरेली यांचा मद्यविक्रीचा परवाना बेकायदेशीरपणे रद्द केल्याबद्दल नुकसान भरपाई करायचा आदेश दिला. तेव्हापासून क्यूबेकचे लोक फार मनमिळाऊ बनले आहेत. १९४३ साली तेथे ३०० साक्षीदार होते पण आज एका सरकारी आकडेवारीनुसार तेथे ३३,००० साक्षीदार आहेत. सध्या यहोवाचे साक्षीदार हे त्या प्रांतातला चवथा सर्वात मोठा धार्मिक गट आहे. यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांच्याविरुद्ध जे खटले जिंकले, तसेच सेवेत भरघोस यश मिळवलं ते अर्थात कोणा मनुष्याच्या प्रयत्नांमुळे नाही. मला याचा प्रत्यय आला आहे की, यहोवाने विजय मिळवून दिला कारण युद्ध आपलं नाही, देवाचं आहे.—२ इतिहास २०:१५.

सर्वकाही बदलले

एकोणीसशे चोपन्‍न साली, इंग्लंडच्या मार्गारेट बिगल नावाच्या एका पायनियरबरोबर माझं लग्न झालं. मग आम्ही दोघं मिळून पायनियरींग करू लागलो. मी कॅनडात आणि अमेरिकतही यहोवाच्या साक्षीदारांचे खटले लढत राहिलो. शिवाय, युरोप आणि ऑस्ट्रेलियातल्या काही खटल्यांसाठी मी सल्लागार होतो. मार्गारेट मला सेक्रेटरीसारखी होती आणि कित्येक वर्षं तिनं मला खूप मदत केली. १९८४ साली, मी आणि मार्गारेट कॅनडा शाखेत पुन्हा एकदा आलो आणि तिथलं लीगल डिपार्टमेंट (कायदा विभाग) पुन्हा कार्यरत झालं. मग १९८७ मध्ये मार्गारेटला कर्करोग झाला आणि त्यातच तिचा दुःखद मृत्यू झाला.

एकोणीसशे एकोणसत्तर साली माझ्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर माझा भाऊ ज्यो आणि त्याची पत्नी एल्सी (या दोघांनीही वॉच टावर बायबल गिलियड प्रशालेतून प्रशिक्षण घेतले होते; ते नवव्या वर्गातले होते.) यांनी माझ्या वडिलांना त्यांच्यासोबत राहायची व्यवस्था केली. वडिलांचा मृत्यू होईपर्यंत म्हणजे १६ वर्षे ते त्यांच्याचकडे होते. अशाप्रकारे ही जबाबदारी उचलून त्यांनी मला पूर्ण-वेळेच्या कार्यात राहायला मदत केली. मी त्यांचा सदा आभारी राहीन.

खटले चालूच

आता काही वर्षांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांचे कायदेशीर लढे पूर्वीसारखे राहिले नाहीत. पुष्कळसे खटले, जमीनजुमले ताब्यात घेण्याबाबत आणि राज्य सभागृभांसाठी किंवा संमेलन गृहांसाठी परवाने काढण्याबाबत होते. इतर खटले मुलांचा ताबा घेण्याविषयी होते. अशा खटल्यांमध्ये साक्षीदार नसलेले आई किंवा वडील धार्मिक कारणांमुळे मुलांचा ताबा पूर्णतः आपल्याकडे घेण्याचा किंवा साक्षीदार असलेल्या आई किंवा वडिलांनी त्यांचे धार्मिक विश्‍वास मुलांवर लादू नयेत अशी बंदी घालण्याचा प्रयत्न करत असत.

लिंडा मॅनिंग या अमेरिकी वकील काही काळासाठी कायदेशीर बाबींमध्ये मदत देण्यासाठी १९८९ साली कॅनडात आल्या. त्या वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये आमचं लग्न झालं आणि तेव्हापासून आतापर्यंत आम्ही आनंदानं सेवेत टिकून आहोत.

एकोणीसशे नव्वदच्या दशकात, आमच्या कॅनडा शाखेतल्या एका वकील बांधवाला आणि मला एक संविधानिक खटला हाताळण्यासाठी जपानमध्ये पाठवण्यात आलं. तिथल्या शाळेच्या नियमांनुसार एका विद्यार्थ्याला मार्शल आट्‌र्समध्ये भाग घेणं आवश्‍यक होतं. परंतु मार्शल आट्‌र्समध्ये भाग न घेण्याचं त्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून आम्ही खटला लढला आणि आम्हाला विजय मिळाला. तसेच एका प्रौढ व्यक्‍तीला रक्‍त संक्रमण नाकारण्याचा अधिकार आहे यासंबंधीचा एक खटलाही आम्ही जिंकलो.

मग १९९६ आणि १९९७ मध्ये, सिंगापूर येथे यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध बंदी आल्यामुळे जे खटले निर्माण झाले त्यासाठी मला आणि लिंडाला पाच महिने सिंगापूरमध्ये सेवा करण्याचा सुहक्क लाभला. ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिल्यामुळे आणि बायबल किंवा धार्मिक साहित्य जवळ बाळगल्यामुळे दोषी ठरवलेल्या ६४ जणांचा (स्त्री, पुरुष आणि युवकांचाही) मी वकील होतो. यातल्या एकाही खटल्यात आम्हाला विजय मिळाला नाही, पण यहोवाने त्याच्या विश्‍वासू सेवकांना एकनिष्ठतेने आणि आनंदाने टिकून राहण्यास कशी मदत केली हे आम्ही पाहिले.

संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञ

आता माझं वय ८० आहे. पण अजूनही माझी तब्येत ठणठणीत आहे आणि मला यहोवाच्या लोकांच्या वतीने खटले लढायला संधी मिळते म्हणून मला आनंद होतो. कोर्टात जायला आणि सत्याची बाजू घ्यायला मी आजही सदोदित तयार असतो. कॅनडात १९४० साली ४,००० साक्षीदार होते पण आता १,११,००० साक्षीदार आहेत; ही वाढ मला पाहायला मिळाली त्याचा मला फार आनंद होतो. लोक बदलतात, घटनाही बदलतात पण यहोवा मात्र आपल्या लोकांना सातत्याने पुढे नेत असतो; आध्यात्मिकरित्या त्यांची प्रगती होत राहील याची खात्री करत असतो.

तरीही समस्या येतातच; परंतु यहोवाचं वचन अशी हमी देतं: “तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार तुजवर चालणार नाही.” (यशया ५४:१७) मी ५६ हून अधिक वर्षं पूर्ण वेळेच्या सेवेत, ‘सुवार्तेसंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात’ घालवली आहेत. इतक्या वर्षांच्या अनुभवातून यशयाच्या वरील भविष्यवाणीच्या खरेपणाची मी साक्ष देऊ शकतो!—फिलिप्पैकर १:७.

[१७ पानांवरील चित्र]

माझा धाकटा भाऊ आणि आई-वडिलांबरोबर

[१७ पानांवरील चित्र]

हेडन कव्हिंग्टन, कायदा सल्लागार

[१७ पानांवरील चित्र]

नेथन नॉर यांच्यासमवेत

[१८ पानांवरील चित्र]

ड्यूप्लेसे कार्डिनल व्हिलेनुव्हपुढे गुडघे टेकून

[चित्राचे श्रेय]

Photo by W. R. Edwards

[१८, १९ पानांवरील चित्रे]

फ्राँक राँकरेली

[चित्राचे श्रेय]

Courtesy Canada Wide

[१९ पानांवरील चित्रे]

एमे बुशे

[२२ पानांवरील चित्र]

माझ्यासोबत काम करणारे वकील, जॉन बर्न्स आणि माझी पत्नी लिंडा