व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पोर्नोग्राफी—निर्धोक छंद?

पोर्नोग्राफी—निर्धोक छंद?

बायबलचा दृष्टिकोन

पोर्नोग्राफी—निर्धोक छंद?

व्हिक्टोरियन पुरात्त्ववेत्ते पॉम्पेईच्या प्राचीन अवशेषांचे जसजसे पद्धतशीर उत्खनन करीत गेले तसतशा धक्कादायक गोष्टी उजेडात येऊ लागल्या. अस्ताव्यस्त विखुरलेले अनेक सुरेख गिलावचित्रे व कलाकुसरींबरोबर पुष्कळ उन्मादक चित्रे व मूर्ती सापडल्या. या सनसनाटी वस्तू पाहून धक्का बसल्यामुळे अधिकाऱ्‍यांनी त्या गुप्त संग्रहालयात ठेवून दिल्या. त्यांनी, पोर्नी आणि ग्राफोस या ग्रीक शब्दांवरून अशा उन्मादक चित्रांचे वर्गीकरण करण्यासाठी “पोर्नोग्राफी” हा शब्द बनवला, ज्याचा अर्थ “वेश्‍यांविषयीचे लेखन” असा होतो. आज, पोर्नोग्राफीची व्याख्या “लैंगिक सुख मिळावे म्हणून पुस्तके, चित्रे, पुतळे, चलचित्रे वगैरेद्वारे केले जाणारे लैंगिक वर्तनाचे चित्रण,” अशाप्रकारे केली जाते.

आजकालच्या दिवसांत, पोर्नोग्राफी अगदी सर्वत्र आहे आणि बहुतेक आधुनिक समाजांनी तिला मान्यता दिली आहे असे दिसते. पूर्वी पोर्नोग्राफी केवळ कुप्रसिद्ध सिनेमांमध्ये किंवा वेश्‍यावस्तीच्या भागात पाहायला मिळायची पण आता ती पुष्कळ समाजांमध्ये सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. एकट्या अमेरिकेत पोर्नोग्राफीचे वार्षिक उत्पन्‍न ४८० अब्जापेक्षा अधिक आहे!

काही समर्थकांचे म्हणणे आहे, की पोर्नोग्राफी निरस विवाहात रस आणण्याचा एक मार्ग आहे. एका लेखिकेने म्हटले: “पोर्नोग्राफी तुम्हाला कल्पना करायला प्रेरणा देते. लैंगिक सुख कसे मिळवायचे याबद्दल तुम्हाला सूचना देते.” इतरांचे म्हणणे आहे, की पोर्नोग्राफीमुळे तुम्ही लैंगिक गोष्टींबद्दल अगदी उघडपणे चर्चा करू शकता. वेंडी मॅकएलरॉय नामक लेखिका म्हणते: “पोर्नोग्राफीमुळे स्त्रियांचा फायदा होतो.”

परंतु सर्वच याजशी सहमत नाहीत. पोर्नोग्राफीचा संबंध बहुतेकदा अनेक हानीकारक परिणामांशी व मनोवृत्तींशी जोडला जातो. काही लोकांचे म्हणणे आहे, की पोर्नोग्राफीचा संबंध, स्त्रियांविरुद्ध व मुलांविरुद्ध केला जाणारा बलात्कार व इतर प्रकारच्या हिंसा यांजशी आहे. एका पाठोपाठ एक असे अनेक खून ज्याने केले तो कुविख्यात टेड बंडी कबूल करतो, की त्याला “हिंसक पोर्नोग्राफी पाहायची तीव्र इच्छा व्हायची.” तो पुढे म्हणतो: “एखाद्या व्यक्‍तीचा हा स्वभाव लगेच दिसून येत नाही किंवा ती एक गंभीर समस्या आहे असे समजले जात नाही. . . . पण ही आवड . . . हिंसक लैंगिक स्वभावाच्या गोष्टींकडे वळते. हिंसक पोर्नोग्राफी पाहण्याची इच्छा ही हळूहळू कशी वाढत जाते हे मी ठासून सांगू इच्छतो. ही कमी कालावधीत निर्माण होणारी इच्छा नाही.”

आज पोर्नोग्राफीच्या अमाप साहित्यावर होणाऱ्‍या अंतहीन वादविवादामुळे तुम्ही कदाचित विचार कराल, की ‘बायबल या विषयावर काही मार्गदर्शन देते का?’

सेक्सविषयी बायबल उघडपणे बोलते

बायबलमध्ये लैंगिक गोष्टींबद्दल अगदी उघडपणे व स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. (अनुवाद २४:५; १ करिंथकर ७:३, ४) शलमोनाने सल्ला दिला: “तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस. . . . तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. (नीतिसूत्रे ५:१८, १९) लैंगिक संबंध आणि कोणत्या मर्यादेत ते राखले पाहिजेत याबद्दल बायबलमध्ये स्पष्ट सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले आहे. विवाहबाह्‍य लैंगिक संबंध निषिद्ध आहेत. तेव्हा, सर्व प्रकारच्या विकृत लैंगिक गोष्टी निषिद्ध आहेत.—लेवीय १८:२२, २३; १ करिंथकर ६:९; गलतीकर ५:१९.

शिवाय, लैंगिक संबंधाविषयी ज्या मर्यादा आहेत त्याबाबतीतही बंधने व आदर दाखवण्याची अपेक्षा केली जाते. प्रेषित पौलाने लिहिले: “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे.” (इब्री लोकांस १३:४) हा सल्ला, पोर्नोग्राफीचा उद्देश आणि संदेश याच्या अगदी उलट आहे.

पोर्नोग्राफी सेक्सचा विपर्यास आहे

एका आदरणीय विवाहात, एखाद्या स्त्री व पुरूषातील सुंदर व जवळीकीच्या प्रेमाची अभिव्यक्‍ती म्हणून सेक्सला सादर करण्याऐवजी पोर्नोग्राफी सेक्सचा अनादर करते, त्याला विकृत रूप देते. प्रेमरहित व विकृत सेक्सला, मजेशीर व हवाहवासा दाखवला जातो. यात इतरांबद्दल कसलाही आदर न बाळगता स्वतःचीच वासना तृप्त करण्यावर जोर दिला जातो.

स्त्रिया, पुरूष आणि मुले केवळ लैंगिक सुख देणाऱ्‍या भोग्य वस्तू आहेत अशा प्रकारे त्यांना चित्रित केले जाते. एक अहवाल म्हणतो: “अवाजवी अपेक्षा बाळगून एखाद्याच्या शरीराच्या सुडौलतेवरून सौंदर्याचा दर्जा ठरवला जातो. अनामिका, संधीच्या शोधात असलेल्या, पुरूषांसाठी बनवण्यात आलेल्या पोकळ सेक्स खेळण्या, पैशासाठी व मनोरंजनासाठी आपले वस्र उतरवणाऱ्‍या आणि शरीरप्रदर्शन करणाऱ्‍या अशा प्रकारे स्त्रियांना दाखवल्याने, स्त्रियांनाही समानतेने, आदराने व मानवतेने वागवले पाहिजे हा संदेश दिला जात नाही.”

याउलट, पौलाने लिहिले, “प्रीति . . . अयोग्य रीतीने वागत नाही, ती स्वार्थी नाही.” (१ करिंथकर १३:५, ईझी-टू-रीड व्हर्शन) पुरूषांनी “आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी,” आणि त्यांना लैंगिक सुख देणाऱ्‍या भोग्य वस्तू न समजता “त्यांना मान” दिला पाहिजे, असा सल्ला बायबल देते. (इफिसकर ५:२८; १ पेत्र ३:७) इतर लोकांची लैंगिकरीत्या उत्तान चित्रे सतत पाहणारा पुरूष किंवा स्त्री खरोखरच योग्य रीतीने वागत असतो/असते का? तो किंवा ती खरोखरच आदर दाखवत असतो/असते का? प्रेम वाढवण्याऐवजी पोर्नोग्राफी आत्म-केंद्रितपणा, स्वार्थीपणा यालाच प्रेरणा देते.

विचार करण्याजोगे आणखी एक कारण आहे. केवळ सुरवातीलाच उत्तेजक ठरणाऱ्‍या कोणत्याही अनुचित वासनेप्रमाणेच पोर्नोग्राफी पाहण्याची इच्छा देखील कालांतराने सामान्य व नेहमीची होऊन जाते. एक लेखक म्हणतो: “कालांतराने, [पोर्नोग्राफी पाहणाऱ्‍यांना] अधिक उघड व असामान्य साहित्य हवेसे वाटू लागते. . . . ते आपल्या सोबत्याला अतिशय विचित्र लैंगिक कार्ये करायची गळ घालतात . . . यामुळे प्रेम दाखवण्याची त्यांची खरी क्षमता देखील नाहीशी होते.” तेव्हा, हा निर्धोक छंद वाटतो का? परंतु पोर्नोग्राफी टाळण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे.

बायबल आणि वासना

लैंगिक वासना जागृत करण्याविषयी विचार करणे चुकीचे किंवा घातक नाही असे पुष्कळांचे म्हणणे आहे; परंतु बायबल याजशी सहमत नाही. ते स्पष्टपणे सांगते, की आपण कोणत्या गोष्टींवर विचार करतो आणि कसे वागतो यांत एक स्वाभाविक संबंध आहे. ख्रिस्ती शिष्य याकोब याने लिहिले: “प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहांत पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते.” (याकोब १:१४, १५) येशूने म्हटले: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.”—मत्तय ५:२८.

याकोब आणि येशू या दोघांनी दाखवल्याप्रमाणे, मानव आंतरिक इच्छेच्या आवेगात कार्य करतात. या इच्छांना खतपाणी मिळते तेव्हा त्या कालांतराने माणसाला पछाडून टाकतात. वासनेने पछाडलेल्या व्यक्‍तीला तिचा प्रतिकार करायला खूप कठीण जाते व कालांतराने ती वासना अनावर होऊन त्या व्यक्‍तीला कार्य करण्यास भाग पाडते. त्यामुळे, आपण आपले मन ज्या गोष्टींनी भरतो त्या गोष्टींचा, आपण सरतेशेवटी कोणते कार्य करतो यावर जबरदस्त प्रभाव पडू शकतो.

लैंगिक कल्पना, आपण करत असलेल्या देवाच्या उपासनेत थेट व्यत्यय आणू शकतात. म्हणूनच पौलाने लिहिले: “तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ—ह्‍याला मूर्तिपूजा म्हणावे—हे जिवे मारा.”—कलस्सैकर ३:५.

पौल येथे लैंगिक वासनांची तुलना लोभाशी अर्थात आपल्याजवळ नसलेल्या गोष्टीबद्दल फाजील इच्छा करण्याशी करतो. * लोभ एकप्रकारची मूर्तीपूजाच आहे. का? कारण, लोभी व्यक्‍ती, तिला हव्या असलेल्या गोष्टीला इतर गोष्टींच्या तुलनेत वरचे स्थान देते; म्हणजे देवाच्या आधी तिला स्थान देते. पोर्नोग्राफी, एखाद्या व्यक्‍तीकडे नसलेल्या गोष्टींबद्दल कुवासना निर्माण करते. “तुम्हाला दुसऱ्‍याचे लैंगिक जीवन हवे असते. . . . तुमच्याकडे जे नाही केवळ त्याचाच एक विचार सतत तुमच्या मनात घोळत राहतो. . . . आपल्याला ज्याची हाव असते, त्याची आपण उपासना करू लागतो,” असे एका धार्मिक लेखकाने म्हटले.

पोर्नोग्राफी भ्रष्ट करते

“जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‌गुण . . . त्यांचे मनन करा,” असा आर्जव बायबल करते. (फिलिप्पैकर ४:८) आपले डोळे व मन पोर्नोग्राफीने भरवणारी व्यक्‍ती पौलाच्या आर्जवाला नाकारत असते. पोर्नोग्राफी अश्‍लील आहे, कारण त्यात सर्वात गुप्त व खासगी कृत्ये चवाठ्यावर निर्लज्जपणे दाखवली जातात. ती घृणास्पद आहे कारण ती लोकांचा अनादर करते, त्यांना माणसांपेक्षा हीन दर्जा देते. त्यात प्रेमळपणा नाही कारण त्यातून कोमलता किंवा काळजी दिसून येत नाही. पोर्नोग्राफी केवळ स्वार्थी वासनेला बढावा देते.

अनैतिक व कामुक कृत्ये अनावश्‍यकपणे दाखवून पोर्नोग्राफी, ‘वाइटाचा द्वेष करण्याच्या’ एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीच्या प्रयत्नांना कमकुवत बनवते. (आमोस ५:१५) ती पाप करण्यास प्रवृत्त करते आणि हे पौलाने इफिसकरांना दिलेल्या या उत्तेजनाच्या अगदीच विपरित आहे: “पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्‍यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये, तसेच अमंगळपण बाष्कळ गोष्टी . . . ह्‍यांचाहि उच्चार न होवो, ती उचित नाहीत.”—इफिसकर ५:३, ४.

पोर्नोग्राफीला निश्‍चितच निरुपद्रवी म्हणता येणार नाही. ती शोषण करणारी व भ्रष्ट आहे. तिच्यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात, लैंगिक जवळीक प्रदर्शित करणाऱ्‍या स्वाभाविक इच्छेच्याऐवजी, दुसऱ्‍यांचे लैंगिक कार्य पाहून विकृत आनंद मिळवण्याची इच्छा एखाद्याला होते. त्यामुळे त्याचे मन दूषित होते, त्याची आध्यात्मिकता बिघडते. पोर्नोग्राफी पाहणाऱ्‍या लोकांची मनोवृत्ती स्वार्थी, हावरट अशी होते; हे लोक, इतरांकडे आपल्या वासना तृप्त करणाऱ्‍या भोगवस्तू असे पाहायला शिकतात. चांगले करण्याचे व शुद्ध विवेक बाळगण्याचे त्यांचे प्रयत्न यांमुळे फोल ठरतात. सर्वाहून महत्त्वाचे म्हणजे, यांमुळे देवाबरोबरच्या घनिष्ठ नातेसंबंधात बाधा येऊ शकते किंवा तो नाहीसा देखील होऊ शकतो. (इफिसकर ४:१७-१९) होय, पोर्नोग्राफी एक भयंकर साथ आहे जी आपण टाळलीच पाहिजे.—नीतिसूत्रे ४:१४, १५. (g०२ ७/८)

[तळटीप]

^ पौल येथे नैसर्गिक लैंगिक इच्छा—आपल्या वैवाहिक जोडीदाराबरोबर लैंगिक संबंध राखण्याची नैसर्गिक इच्छा याबद्दल येथे बोलत नव्हता.

[२० पानांवरील चित्र]

पोर्नोग्राफी पाहणाऱ्‍या व्यक्‍तीचा विरुद्धलिंगी व्यक्‍तीबद्दलचा दृष्टिकोन विकृत होतो