व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हर्बल उपचार तुमच्याकरता फायदेकारक असू शकतात का?

हर्बल उपचार तुमच्याकरता फायदेकारक असू शकतात का?

हर्बल उपचार तुमच्याकरता फायदेकारक असू शकतात का?

अगदी प्राचीन काळापासून रोगांचा उपचार करण्यासाठी वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे. सा.यु.पू. १६ व्या शतकादरम्यान ईजिप्तमध्ये तयार केलेले एबर्स पपायरस यात विविध व्याधींसाठी शेकडो पारंपरिक उपचार सांगण्यात आले आहेत. परंतु, सहसा एक पिढी पुढच्या पिढीला हर्बल (वनौषधींचे) उपचार सांगत असे.

पाश्‍चात्त्य देशांत, वनस्पतींच्या वैद्यकीय उपचारांची सुरवात पहिल्या शतकातील ग्रीक वैद्य, डायसकोरडीज (ज्यांनी ड मटेरिया मेडिका हा ग्रंथ लिहिला) यांच्या ग्रंथापासून झाली असावी असे दिसते. पुढील १,६०० वर्षांकरता ते एक प्रमुख वैद्यकीय मार्गदर्शक ठरले. जगाच्या अनेक भागांमध्ये, पारंपरिक वनस्पतींचे उपचार आजही लोकप्रिय आहेत. जर्मनीत काही वेळा सरकारी स्वास्थ्य कार्यक्रम, वनस्पतींच्या उपचाराच्या खर्चाची भरपाई देखील देतात.

वनस्पतींचे पारंपरिक किंवा घरगुती उपचार आधुनिक औषधांपेक्षा सुरक्षित असल्याचा काही वेळा दावा केला जात असला तरी त्यांनी काही नुकसान होत नाही असे नाही. म्हणून असे प्रश्‍न उद्‌भवतात: वनस्पतींनी उपचार करण्यासंबंधीचा विचार करताना कोणत्या गोष्टींबद्दल सावध असावे आणि कोणते सल्ले लक्षात ठेवावेत? शिवाय, विशिष्ट परिस्थितींमध्ये एखादी उपचारपद्धत अधिक फायदेकारक असते असे काही असते का? *

वनस्पती उपयोगी कशा ठरू शकतात

वनस्पतींमध्ये अनके औषधी गुण असतात. काही वनस्पतींनी शरीरातील संसर्गाचा प्रतिकार करता येतो असे म्हणतात. तर इतर वनस्पती पचन, मज्जातंतूंना आराम देण्यासाठी, पोट साफ करण्यासाठी किंवा ग्रंथींचे कार्य नीट चालावे म्हणून मदत करतात.

वनस्पतींमध्ये पोषक आणि औषधी हे दोन्ही गुण असू शकतात. उदाहरणार्थ, मूत्रवर्धक पार्सलीसारख्या काही वनस्पतींमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यातील पोटॅशियममुळे, मूत्राद्वारे शरीरातून बाहेर पडणाऱ्‍या या महत्त्वपूर्ण मूलद्रव्याची भरपाई होते. त्याचप्रमाणे, अनेक वर्षांपासून शामक औषध म्हणून वापरण्यात येणाऱ्‍या तगर वनस्पतीत (वॅलेरिआना ऑफिशीनलीस) कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. कॅल्शियममुळे या वनस्पतीचा तंत्रिका तंत्रावरील शामक परिणाम वाढू शकतो.

वनस्पतींचा वापर कसा करावा

चहा, काढा, टिंक्चर आणि लेप अशा विविध प्रकारे वनस्पतींचा उपयोग करता येतो. चहा तयार करण्यासाठी वनस्पतीवर उकळते पाणी ओतले जाते. परंतु, तज्ज्ञांच्या मते, चहा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्‍या औषधी वनस्पती पाण्यात घालून उकळू नयेत. औषधी मुळे आणि सालींपासून काढा तयार करताना त्यातील कारक तत्त्वे बाहेर पडण्यासाठी ते पाण्यात उकळले जाते.

टिंक्चरच्या बाबतीत काय? एका पुस्तकात म्हटले आहे की, टिंक्चर “वनस्पतींचा अर्क असतो जो शुद्ध किंवा सौम्य केलेल्या मद्यात, ब्रँडीत किंवा वोडका यात घालून तयार केला जातो.” मग वेगवेगळ्या प्रकारे तयार केले जाणारे लेपही आहेत. सहसा हे लेप इजा झालेल्या किंवा दुखऱ्‍या भागावर लावले जातात.

पुष्कळ व्हिटामिन आणि औषधे कशाच्या तरी सोबत घेतली जातात; परंतु, वनस्पतींच्या बाबतीत सहसा तसे नसते. बहुतेक औषधी वनस्पती अन्‍न समजून अनशेपोटी खाल्ली जातात. त्या गोळ्यांच्या रूपातही घेतल्या जाऊ शकतात; या गोळ्या अधिक सोयीस्कर आणि खाण्यास सुलभ असतात. औषधी वनस्पतींचा उपचार करण्याचे तुम्ही ठरवल्यास, तज्ज्ञांचा सल्ला निश्‍चित घ्या.

सर्दी, अपचन, मलावरोध, निद्रानाश आणि मळमळ या विकारांवर परंपरेनुसार औषधी वनस्पती दिल्या जातात. परंतु, काही वेळा अधिक गंभीर रोगांकरता—केवळ रोग घालवून देण्याकरताच नव्हे तर तो पुन्हा होऊ नये म्हणूनही—औषधी वनस्पती दिल्या जातात. उदाहरणार्थ, कर्कजन्य नसलेल्या प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया (अष्ठीला ग्रंथीची सूज) या विकारावर प्रथम उपचार म्हणून सॉ पाल्मेटो (सेरेनोआ रिपेन्स) ही औषधी वनस्पती जर्मनी व ऑस्ट्रियात वापरली जाते. काही देशांमध्ये ५० ते ६० टक्के पुरुषांना हा विकार कालांतराने होतो. परंतु, सूज कशामुळे आली हे डॉक्टरांकडून जाणून घेणे महत्त्वाचे आहे; यामुळे कर्करोगात ज्याप्रमाणे अधिक तीव्र उपचार केला जातो तसा उपचार करण्याची गरज नाही हे निश्‍चित होते.

सावधगिरी बाळगण्यासाठी काही सल्ले

एखादी औषधी वनस्पती अगदी सुरक्षित आहे असे सर्वांचे मत असले तरी सावध असण्याचा सल्ला दिला जातो. एखाद्या उत्पादनावर “नैसर्गिक” असे लेबल आहे म्हणून चिंता करण्याची गरज नाही असा विचार करू नका. औषधी वनस्पतींच्या विषयावर एका विश्‍वकोशात म्हटले आहे: “याची एक वाईट बाजू म्हणजे, काही औषधी वनस्पती एकदम घातक असू शकतात. [दुःखाची गोष्ट अशी की,] काही लोक औषधी वनस्पती—घातक असो नाहीतर उपयुक्‍त असो—तिच्या विपरीत परिणामांचा विचार करत नाहीत.” औषधी वनस्पतींमधील रासायनिक तत्त्वांमुळे हृदयाचे ठोके, रक्‍तदाब आणि ग्लुकोजचे प्रमाण यात बदल होऊ शकतात. यास्तव, हृदयविकार, उच्च रक्‍तदाब, किंवा मधुमेहासारखे रक्‍तातील शर्करेचे विकार असलेल्यांनी अधिक सावधगिरी बाळगावी.

परंतु, औषधी वनस्पतींचे विपरीत परिणाम फार तर अर्लजी होणे असे असतात. डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ होणे किंवा अंगावर पुरळ येणे असे त्याचे काही परिणाम असू शकतात. औषधी वनस्पतींनी फ्लूसारखी किंवा इतर लक्षणे निर्माण होऊन त्रास जास्त होण्याची शक्यता असते असेही म्हटले जाते. औषधी वनस्पतींमुळे, व्यक्‍ती बरी होण्याआधी तिचा त्रास अधिक वाढला आहे असे भासू शकते. सहसा असे म्हटले जाते की, औषधी वनस्पती उपचाराच्या सुरवातीच्या टप्प्यात शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकले जात असल्यामुळे हा त्रास होतो.

अधूनमधून औषधी वनस्पतींपासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांमुळे घडलेल्या मृत्यूमुळे सावध असण्याची आणि योग्य सल्ला घेण्याची गरज दिसून येते. उदाहरणार्थ, एफेड्रा ही वनस्पती, सहसा वजन कमी करण्यासाठी घेतली जाते; परंतु तिने रक्‍तदाबही वाढू शकतो. एफेड्राने तयार केलेल्या उत्पादनांमुळे संयुक्‍त संस्थानांत सुमारे १०० मृत्यू झाल्याची नोंद आहे; परंतु सॅन फ्रान्सिसको येथील एक पॅथोलॉजिस्ट स्टीव्हन कार्च म्हणतात की, “[एफेड्रामुळे] मरण पावलेल्या केवळ त्या लोकांच्या केसेस मला ठाऊक आहेत ज्यांना गंभीर हृद्‌ रोहिणी विकार होता किंवा ज्यांनी अधिक मात्रेत हे [औषध] घेतले.”

वनौषधींनी तयार केलेले पूरक या विषयावरील पुस्तकात लेखक, डॉ. लोगन चेंबरलेन म्हणतात: “अलीकडील वर्षांमध्ये, वनौषधींच्या हानीकारक परिणामांविषयी दिलेल्या जवळजवळ प्रत्येक अहवालात दिसून येते की, लोकांनी सूचनांचे पालन केले नव्हते. . . . विश्‍वसनीय उत्पादनांवर दिलेली औषधाची मात्रा सुरक्षित प्रमाणात आणि साधारण असते. वनौषधी तज्ज्ञाकडून चांगला सल्ला असल्याखेरीज या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका.”

वनौषधी तज्ज्ञ लिंडा पेज आणखी सावधानतेचा सल्ला देतात: “एखाद्याची स्थिती एकदम गंभीर असली तरीही साधारण प्रमाणातच औषध द्यायला हवे; मोठा डोस देऊ नये. चांगले परिणाम दिसून येण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि सौम्य उपचार घ्यावा लागतो. आरोग्य सुस्थितीत आणण्याकरता वेळ लागतो.”

वनौषधी शास्त्राच्या एका पुस्तकात म्हटले आहे की, काही वनौषधी अधिक मात्रेत दिल्या तरीही विपरित परिणामापासून संरक्षण देण्याचे तंत्र त्यांच्यात जात्याच असते. उदाहरणार्थ, शरीराला शिथिल करण्यासाठी वापरली जाणारी एक वनौषधी अधिक मात्रेत घेतल्यास तिने उलट्या होतात. मात्र, हा गुण सर्व वनौषधींमध्ये नसतो आणि जरी असला तरी सुरक्षित मात्रेत औषध घेण्याची गरज नाही असा त्याचा अर्थ होत नाही.

तरीही, अनेकांचा असा विश्‍वास आहे की, पुरेशा प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वनौषधी सेवन केल्यावरच ती परिणामकारक असते. काही वेळा, असे करण्यासाठी अर्क घेणे हाच एक मार्ग असतो. कित्येक वर्षांपासून स्मरणशक्‍ती आणि रक्‍ताचे अभिसरण वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्‍या गिंक्गो बिलोबा या वनौषधीच्या बाबतीत असेच आहे. कारण याच्या एकाच गुणकारी मात्रेसाठी कित्येक किलो पाने लागतात.

संभाव्य घातक मिश्रण

वनौषधींचा परिणाम इतर गोळ्या-औषधांवर होऊ शकतो. उदाहरणार्थ, गोळ्या-औषधांचा परिणाम जास्त अथवा कमी होऊ शकतो, शरीरातून ती नेहमीपेक्षा लवकर बाहेर फेकली जाऊ शकतात किंवा विपरित परिणामांचा धोका वाढू शकतो. जर्मनीत, सौम्य ते मध्यम प्रकारच्या खिन्‍नतेसाठी दिली जाणारी सेंट जॉन्स वोर्ट या वनौषधीने इतर अनेक औषधे शरीरातून नेहमीपेक्षा दुप्पट गतीने बाहेर फेकली जातात आणि अशाप्रकारे त्या औषधांची शक्‍ती कमी केली जाते. म्हणून तुम्ही इतर गोळ्या-औषधे—गर्भनिरोधक गोळ्या देखील—घेत असाल तर वनौषधी घेण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वनौषधींच्या औषधी गुणांविषयीच्या एका पुस्तकात म्हटले आहे: “मद्य, गांजा, कोकेन, मनःस्थितीत बदल घडवणारे इतर मादक पदार्थ आणि तंबाखू यांच्यासोबत काही वनौषधी घेतल्याने त्याचा परिणाम घातक असू शकतो. . . . आजारी असताना [असे मादक पदार्थ] टाळणे हाच शहाणपणाचा मार्ग आहे.” गरोदर स्त्रियांनी आणि अंगावर पाजणाऱ्‍या मातांनी देखील या सल्ल्याकडे लक्ष द्यावे. अर्थात, तंबाखू आणि मादक पदार्थांच्या बाबतीत, ख्रिश्‍चनांना बायबलमधील पुढील संरक्षक आज्ञा देण्यात आली आहे, “देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून . . . स्वतःला शुद्ध” करा.—२ करिंथकर ७:१.

वनौषधींबद्दल एका पुस्तकात सावधानतेचा पुढील सल्ला दिला आहे: “एखादी वनौषधी घेत असताना तुम्हाला दिवस गेल्यास, तुमच्या डॉक्टरांना सांगा आणि त्यांचा सल्ला घेईपर्यंत ती घेऊ नका. [वनौषधीची] नेमकी मात्रा आणि किती काळापासून तुम्ही घेत आहात ते आठवणीत ठेवण्याचा प्रयत्न करा.”

“आपणहूनच [वनौषधी] घेतल्याने निर्माण होणारे धोके अनेक आहेत,” असे वनौषधींचा एक विश्‍वकोश म्हणतो. वनौषधींनी संभावणाऱ्‍या धोक्यांची यादी “आपणहून औषधे घेण्याचे धोके” या पेटीत दिली आहे.

आरोग्यासाठी असलेल्या सर्व उत्पादनांप्रमाणे, वनौषधींचाही योग्य वापर केला पाहिजे, त्यांच्याविषयी जाणून घेतले पाहिजे आणि अर्थात माफक प्रमाणात वापर केला पाहिजे—शिवाय हे लक्षात ठेवले पाहिजे की, सद्य काळात काही गोष्टींवर कसलाच उपचार नाही. खरे ख्रिस्ती भविष्यातील त्या काळाची वाट पाहत आहेत जेव्हा आजारपण आणि मृत्यूचे मूळ कारण अर्थात आपल्या मूळ पालकांकडून आपल्याला वारशात मिळालेली अपरिपूर्णता हीच देवाच्या राज्याच्या उत्तम शासनात पूर्णपणे काढून टाकली जाईल.—रोमकर ५:१२; प्रकटीकरण २१:३, ४. (g०३ १२/२२)

[तळटीप]

^ सावध राहा! ही वैद्यकीय पत्रिका नाही; त्यामुळे विशिष्ट उपचार किंवा आहार, मग तो वनस्पतींचा असो नाहीतर इतर कोणताही असो, तो घेण्याचा सल्ला यात दिलेला नाही. या लेखात दिलेली माहिती केवळ सामान्य माहिती आहे. स्वास्थ्य आणि वैद्यकीय बाबतीत वाचकांनी स्वतः निर्णय घ्यावा.

[१८ पानांवरील चौकट]

आपणहून औषधे घेण्याचे धोके

तज्ज्ञांच्या सल्ल्याविना वनौषधी घेतल्याचे धोके पुढीलप्रमाणे आहेत.

तुम्हाला नेमकी काय समस्या आहे हे तुम्हाला माहीत नसेल.

तुम्हाला नेमके काय झाले आहे हे तुम्ही बरोबर ओळखले असले तरी तुमच्या व्याधीसाठी कदाचित तुम्ही आपणहून सुरू केलेला औषधोपचार चुकीचा असेल.

तुम्ही आपणहून औषधोपचार केल्यामुळे तुमची व्याधी मुळापासून घालवून देणारा आवश्‍यक व योग्य उपचार करण्यात विलंब होईल.

तुम्ही आपणहून औषधोपचार केल्यामुळे डॉक्टरांनी दिलेली औषधे तुम्हाला चालणार नाहीत—जसे की, ॲर्लजीचे औषध किंवा रक्‍तदाबासाठी दिलेले औषध.

आपणहून औषधोपचार केल्याने बारीकसारीक व्याधी निघून जातील पण उच्च रक्‍तदाबासारख्या स्वास्थ्य समस्या वाढतील.

[चित्राचे श्रेय]

सूत्र: रोडेल्स इलस्ट्रेटेड एन्सायक्लोपिडिया ऑफ हर्ब्स