व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमाटे मेक्सिकोचे लव्हाळे

आमाटे मेक्सिकोचे लव्हाळे

आमाटे मेक्सिकोचे लव्हाळे

मेक्सिकोतील सावध राहा! नियतकालिकाच्या लेखकाकडून

मेक्सिकन लोकांचा समृद्ध आणि रोचक इतिहास आहे. गतकाळातून प्राप्त केलेल्या मौल्यवान पारंपरिक वस्तूंपैकी एक आहे “पुरावे”—चित्रलिपीतील हस्तलिखिते किंवा कोडायसेस. या हस्तलिखितांकरवी माहितीच्या अनेक क्षेत्रांबद्दल—इतिहास, विज्ञान, धर्म आणि कालगणनाशास्त्र—व मेसोअमेरिका त्याचप्रमाणे ॲझ्टेक व माया यांसारख्या प्रगत संस्कृतींच्या दैनंदिन जीवनाविषयी जाणून घेणे शक्य होते. असाधारण कौशल्य बाळगणाऱ्‍या ट्‌लाक्वीलोस, किंवा लेखनकारांनी विविध साहित्यांवर त्यांचा इतिहास नमूद करून ठेवला.

काही हस्तलिखिते कापड, हरिणांची चामडी किंवा मॅगे कागदाच्या तुकड्यांची बनली होती तरीपण यासाठी वापरले जाणारे सर्वात मुख्य साहित्य आमाटे होते. आमाटे हे नाव अमाटल या नाहूआटल शब्दापासून आले असून त्याचा अर्थ कागद असा होतो. मोरेसी कुलातील अंजिराच्या झाडाच्या सालीपासून आमाटे प्राप्त केले जात होते. एन्सायक्लोपेडिया दे मेक्सिको यानुसार, “फिकसच्या बुंध्याचे, पानांचे, फुलांचे आणि फळांचे बारकाईने परीक्षण केल्याशिवाय विविध जातींमधील फरक सांगता येणे कठीण आहे.” ते व्हाईट आमाटे, व्हाईट वुडलंड आमाटे किंवा डार्क-ब्राऊन आमाटे असू शकते.

निर्मिती पद्धत

स्पॅनिश लोकांनी १६ व्या शतकात कब्जा केल्यावर, आमाटे तयार करण्याचे काम थांबवण्याचे प्रयत्न करण्यात आले. का? कब्जा करणाऱ्‍यांच्या दृष्टीत, आमाटेचा संबंध स्पॅनिशपूर्व धार्मिक चालीरीतींशी होता ज्यांची निंदा कॅथलिक चर्चने केली होती. इस्टोर्या जे ला इंड्यास दे न्यूवा एस्पान्या ए इसलास दे ला टायरा फर्मे (न्यू स्पेन इंडीज आणि टेरा फर्मा द्वीपांचा इतिहास) या आपल्या साहित्यात स्पॅनिश फ्रायर डेगो ड्यूरान यांनी सांगितले की, मूळ रहिवाशांनी “आपल्या पूर्वजांचा तपशीलवार इतिहास लिहून ठेवला होता. अज्ञानतेच्या आवेशात येऊन [लोकांनी] तो नष्ट केला नसता तर आपल्याला पुरेशी माहिती मिळू शकली असती. काही अज्ञानी लोकांनी त्यास मूर्ती समजून जाळून टाकले पण खरे पाहता तो जपवून ठेवण्याजोगा इतिहास होता.”

परंतु, आमाटे कागद तयार करण्याच्या परंपरेला मिटवून टाकण्याचे प्रयत्न मात्र फसले आणि सुदैवाने ती परंपरा आजपर्यंत जिवंत आहे. प्युब्ला राज्याच्या उत्तर सियरा पर्वतांमध्ये, सान पाब्लीटो, पावाटलान नगरपालिका यांसारख्या ठिकाणी अजूनही कागद तयार केला जातो. राजा फिलिप दुसरा यांचा वैद्य, फ्राथिस्को एर्नानडेद यांच्या लिखाणांतून आर्केओलोकिया मेहेकेने (मेक्सिकन पुराणवस्तुशास्त्र) या पत्रिकेने अशी माहिती दिली की, “कागद तयार करणारे, झाडाच्या केवळ जाड फांद्या कापत आणि कोवळ्या फांद्या सोडत असत. मग या फांद्या जवळपासच्या नदीत किंवा ओहोळांमध्ये रात्रभर भिजत ठेवल्या जात. दुसऱ्‍या दिवशी, फांदीवरची साल काढून वरची साल व आतली साल वेगळी केली जाऊन केवळ आतली साल ठेवली जात.” ही साल स्वच्छ करून घेतल्यावर, त्याचे तंतू सपाट पृष्ठभागावर पसरवून ठेवले जात आणि दगडी हाताड्याने त्यांना बडवले जात असे.

आजकाल, तंतू मऊ करण्यासाठी आणि त्याच वेळी त्यांपासून विशिष्ट पदार्थ वेगळे करण्यासाठी हे तंतू मोठ्या कढयांमध्ये उकळले जाऊन त्यात राख व चुना घातला जातो. ही उकळण्याची क्रिया सहा तासांपर्यंत चालू शकते. मग हे तंतू धुवून पाण्यात भिजत ठेवले जातात. कारागीर, एक-एक तंतू सपाट लाकडी पृष्ठभागावर आडव्या-उभ्या पद्धतीने मांडतात. मग, जोपर्यंत हे तंतू एकमेकांत गोवले जाऊन त्यांचे पान तयार होत नाही तोपर्यंत त्यांना दगडी हाताड्याने एकसारखे बडवले जाते. शेवटी, कागदाच्या बाजू आत मुडपून कडा मजबूत केल्या जातात आणि मग तो कागद उन्हात वाळायला ठेवला जातो.

आमाटे अनेक रंगांत उपलब्ध आहे. पारंपरिक रंग तांबूस असला तरी ते पांढऱ्‍या किंवा हस्तदंती रंगात, ठिपकेदार तांबूस आणि पांढऱ्‍या रंगात तसेच पिवळ्या, निळ्या, गुलाबी आणि हिरव्या रंगातही उपलब्ध आहेत.

आधुनिक वापर

मेक्सिकन हस्तकलेच्या सुरेख वस्तू आमाटेने तयार केल्या जातात. या कागदावरील काही चित्रकलेचे प्रकार धार्मिक असले तरी इतर चित्रे विविध आकारातील प्राण्यांची त्याचप्रमाणे उत्सवांची व मेक्सिकन लोकांच्या आनंदी जीवनाचे दर्शन घडवणाऱ्‍या दृश्‍यांची आहेत. आमाटेचा वापर करून सुंदर रंगीबेरंगी चित्रांशिवाय कार्ड, बुकमार्क आणि इतर हस्तकलेच्या वस्तू देखील तयार केल्या जातात. या हस्तकलेच्या वस्तू मूळ रहिवाशांना तसेच परदेशी लोकांनाही आवडतात; शोभेच्या वस्तू म्हणून ते त्यांचा उपयोग करतात. ही कला मेक्सिकोच्या सीमेपलीकडे गेली आहे; जगातील अनेक भागांमध्ये तिची निर्यात केली जाते. प्राचीन हस्तलिखितांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्‍या प्रती तयार करण्यात आल्या आहेत. स्पॅनिश लोकांनी पहिल्याच वेळी ही हस्तकला पाहिली तेव्हा त्यांना किती आश्‍चर्य वाटले असेल नाही? डोमिनिकन मठवासी, डेगो ड्यूरान, (ज्यांचा आधी उल्लेख केला आहे) म्हणाले की, मूळ रहिवाशांकडे “सर्वकाही लिहून ठेवलेले होते, पुस्तकांमध्ये आणि लांब कागदाच्या तुकड्यांवर चित्रे काढून ठेवलेली होती; शिवाय [घटना] केव्हा घडल्या त्या वर्षांचा, महिन्यांचा आणि दिवसांचा अहवाल लिहून ठेवलेला होता. या चित्रकलांमध्ये त्यांचे कायदेकानून, त्यांची खानेसुमारी यांचा समावेश होता आणि हे सर्व अत्यंत सुव्यवस्थितपणे व नीटनेटकेपणाने लिहून ठेवले होते.”

आमाटे तयार करण्याची पद्धत आणि त्यासोबत मेक्सिकन परंपरेचे सौंदर्य आपल्या काळापर्यंत टिकून राहिले आहे ही गोष्ट किती उत्तम आहे. प्राचीन काळातील ट्‌लाक्वीलोस किंवा लेखनकार यांच्याप्रमाणे आधुनिक काळातील साध्या कारागीरांनाही आमाटे ही अद्‌भुत वस्तू वाटते—ज्याला उचितपणे मेक्सिकोचे लव्हाळे म्हणता येईल. (g०४ ३/८)

[२४ पानांवरील चित्र]

तंतू बडवणे