व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव आपल्यावर दुःखद प्रसंग का येऊ देतो?

देव आपल्यावर दुःखद प्रसंग का येऊ देतो?

तरुण लोक विचारतात. . .

देव आपल्यावर दुःखद प्रसंग का येऊ देतो?

“देव वरती स्वर्गात राहतो, जेथे सर्वकाही सुखद आहे, आपण मात्र खाली पृथ्वीवर दुःख सहन करतो.”—मेरी. *

सध्याच्या तरुण पिढीचा जन्म एका निष्ठुर जगात झाला आहे. अशा जगात, जेथे क्षणार्धात हजारो लोकांचे नामोनिशाण मिटवून टाकणारे भूकंप व नैसर्गिक आपत्ती अगदी सर्वसामान्य घटना बनल्या आहेत. बातम्यांमध्ये युद्धे व दहशतवादी हल्ले यांविषयीच्याच वृत्तांची भरमार असते. रोगराई, गुन्हेगारी व दुर्घटनांमुळे आपले प्रियजन आपल्यापासून हिरावून घेतले जातात. सुरवातीला जिचे शब्द उद्धृत केले आहेत त्या मेरीनेही स्वतः जवळून दुःख अनुभवले आहे. वरील तिरस्कारयुक्‍त विधान तिने आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर केले होते.

आपल्यावर दुःखद प्रसंग येतात तेव्हा निराशा, रिक्‍तपणाची भावना किंवा क्रोध वाटणेही स्वाभाविक आहे. तुमच्या मनात विचार येत असेल, की ‘असे का घडले? माझ्या जीवनात का घडले?’ किंवा ‘हे आताच का घडले?’ या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे निश्‍चितच मिळाली पाहिजेत. पण अचूक उत्तरे मिळण्याकरता अचूक व्यक्‍तीकडे जाणे आवश्‍यक आहे. टरल नावाच्या एका तरुणाने म्हटल्याप्रमाणे, कधीकधी लोक “आपल्या दुःखात इतके आकंठ बुडालेले असतात की ते योग्यप्रकारे विचार करण्याच्याही स्थितीत नसतात.” त्यामुळे, कदाचित प्रथम तुम्हाला आपल्या दुःखातून सावरण्याचा मार्ग शोधावा लागेल, जेणेकरून तुम्ही तर्कशुद्धरित्या विचार करू शकाल.

कटू वास्तवाला तोंड देणे

मृत्यू व दुःख यांविषयी विचार करण्यास अर्थातच आपल्याला आवडत नाही, पण या गोष्टी जीवनातल्या कटू वास्तविकता आहेत. ईयोबाने हे वास्तव अगदी अचूक मांडले, तो म्हणाला: “स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो.”—ईयोब १४:१.

बायबलमध्ये एका नव्या जगाचे वचन दिले आहे, ‘ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करील.’ (२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:३, ४) पण ती आदर्श परिस्थिती वास्तवात उतरण्याआधी मानवजातीला अभूतपूर्व प्रमाणावर दुष्टतेचा सामना करावा लागणार आहे. बायबल म्हणते: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे.”—२ तीमथ्य ३:१.

हे कठीण दिवस किती काळ राहतील? येशूच्या शिष्यांनी त्याला याच आशयाचा प्रश्‍न विचारला होता. पण येशूने त्यांना या दुःखाने भरलेल्या व्यवस्थीकरणाचा अंत होण्याचा निश्‍चित दिवस किंवा घटका सांगितली नाही. उलट, त्याने म्हटले: “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.” (मत्तय २४:३, १३) येशूचे शब्द आपल्याला दूरदृष्टीने विचार करण्यास प्रोत्साहन देतात. अंत येण्याआधी आपण अनेक दुःखद प्रसंगांना तोंड देण्यास तयार असले पाहिजे.

देव जबाबदार आहे का?

देवाने या दुःखाला अनुमती दिली आहे म्हणून देवाबद्दल राग व्यक्‍त करण्यात काही अर्थ आहे का? देवाने स्वतःच सर्व दुःखाचा अंत करण्याचे वचन दिले आहे हे लक्षात घेता, असे करणे निश्‍चितच निरर्थक आहे. तसेच, देवच वाईट गोष्टी घडायला लावतो असा विचार करणेही निरर्थक आहे. कारण कित्येक दुःखद घटना निव्वळ योगायोगाने घडून येतात. उदाहरणार्थ, जोरदार वाऱ्‍यामुळे एखादे झाड कोसळते आणि त्यामुळे एखाद्या व्यक्‍तीला दुखापत होते. बरेचजण अशा घटनेला देवाची करणी म्हणतात. पण ते झाड काही देवाने पाडले नव्हते. बायबल आपल्याला समजायला मदत करते की अशा घटना केवळ ‘समय व प्रसंगाचे’ दुःखद परिणाम आहेत.—उपदेशक ९:११, पं.र.भा.

कधीकधी दुःखद प्रसंग हे अविचारीपणामुळेही येतात. समजा, काही तरुण मिळून मद्यपान करतात आणि त्यानंतर कारने फिरायला जातात. गंभीर दुर्घटना होते. आता यासाठी जबाबदार कोण? देव? निश्‍चितच नाही, त्यांनी अविचारीपणाने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना हा परिणाम भोगावा लागला.—गलतीकर ६:७.

पण तुम्ही म्हणाल, ‘दुःखाचा अंत आता करण्याइतके देवाजवळ सामर्थ्य नाही का?’ बायबल लिहिण्यात आले त्या काळातही काही विश्‍वासू पुरुषांनी हा प्रश्‍न विचारला होता. संदेष्टा हबक्कूक याने देवाला प्रश्‍न केला: “तू या बेईमानी करणाऱ्‍यांकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून धार्मिक त्यास दुष्ट गिळून टाकितो तेव्हा तू का उगा राहतोस?” पण हबक्कूकने उतावीळपणे कोणताही निष्कर्ष काढला नाही. उलट तो म्हणाला: ‘मी आपल्या पहाऱ्‍यावर उभा राहीन; तो मजबरोबर काय बोलेल ते मी पाहीन.’ नंतर देवाने त्याला आश्‍वासन दिले की ‘नेमिलेल्या समयी’ तो दुःखाचा अंत करील. (हबक्कूक १:१३; २:१-३) आपणही उतावीळ न होता धीर धरला पाहिजे आणि देव त्याच्या नेमलेल्या वेळी दुष्टाईचा अंत करेपर्यंत प्रतीक्षा केली पाहिजे.

आपण दुःख भोगावे अशी देवाचीच इच्छा आहे किंवा तो प्रत्येकाची परीक्षा घेतो असा उतावीळपणाने निष्कर्ष काढण्याचे टाळा. अर्थात आपल्यावर कठीण प्रसंग येतात तेव्हा आपले उत्तम गुण प्रकट होतात हे खरे आहे आणि बायबल असे सांगते की देव आपल्यावर ज्या परीक्षा येऊ देतो त्यांमुळे आपला विश्‍वास ताऊन सुलाखून निघतो. (इब्री लोकांस ५:८; १ पेत्र १:७) किंबहुना, ज्यांना जीवनात कठीण परीक्षा किंवा आघात सहन करावे लागले आहेत ते सहसा जास्त सहनशील व कनवाळू बनल्याचे पाहण्यात आले आहे. पण म्हणून, त्यांच्यावर आलेले दुःखद प्रसंग देवाने आणले होते असा निष्कर्ष आपण काढू नये. असा विचार करणारे देवाच्या प्रेमाकडे आणि त्याच्या बुद्धीकडे दुर्लक्ष करतात. बायबल स्पष्टपणे सांगते की: “कोणाची परीक्षा होत असता, देवाने मला मोहांत घातले, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहांत पाडीत नाही.” उलट, “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” हे देवाकडून येते. (तिरपे वळण आमचे.)—याकोब १:१३, १७.

देव दुःखाला परवानगी का देतो

मग दुःखद प्रसंग का येतात? आठवणीत असू द्या की देवाचे काही विरोधकही आहेत. खासकरून ‘सर्व जगाला ठकविणारा, दियाबल व सैतान.’ (प्रकटीकरण १२:९) देवाने आपल्या पहिल्या पालकांना अर्थात आदाम व हव्वा यांना एका त्रासमुक्‍त जगात ठेवले होते. पण सैतानाने हव्वेला असे पटवून दिले की देवाच्या शासनाशिवाय तिचे जीवन अधिक सुखी होईल. (उत्पत्ति ३:१-५) दुःखाची गोष्ट म्हणजे हव्वेने सैतानाच्या लबाडीवर विश्‍वास ठेवून देवाची अवज्ञा केली. आदामानेही तिला तिच्या या विद्रोहात साथ दिली. परिणाम? बायबल सांगते त्याप्रमाणे, “सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”—रोमकर ५:१२.

सैतानाचा व त्याच्या अनुयायांचा नाश करून हा विद्रोह लगेच संपुष्टात आणण्याऐवजी देवाला काही काळ जाऊ देणे योग्य वाटले. यामुळे काय साध्य होणार होते? देवाला माहीत होते की यामुळे एकतर, सैतानाच्या खोटेपणाचा पर्दाफाश होईल! आणि देवापासून स्वतंत्र होऊन मनुष्य स्वतःवर केवळ दुःख ओढवतो हे सिद्ध करणारा पुरेसा पुरावा जमा होईल. हेच घडले आहे, नाही का? “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) शिवाय “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.” (उपदेशक ८:९) मानवी धर्म हे केवळ परस्परविरोधी शिकवणुकींचा चक्रव्यूह बनले आहेत. नीतिस्तर कधी नव्हते इतके रसातळाला गेले आहेत. मानवी सरकारांनी सर्व प्रकारच्या शासनपद्धती आजमावून पाहिल्या आहेत. ते शांती तहांवर सह्‍या करतात आणि नवनवे कायदे अंमलात आणतात, पण सामान्य लोकांच्या गरजा आजही पूर्ण होत नाहीत. युद्धे, आधीच जर्जर झालेल्या लोकांच्या दुःखात आणखी भर घालतात.

स्पष्टपणे, दुष्टाईचा अंत करण्यासाठी देवाच्या हस्तक्षेपाची आपल्याला गरज आहे! पण हे केवळ देवाने ठरवलेल्या वेळी घडेल. तोपर्यंत, बायबलमध्ये सांगितलेल्या देवाच्या नियमांचे व तत्त्वांचे पालन करण्याद्वारे त्याच्या शासनाचे समर्थन करण्याचा बहुमान आपल्याला मिळाला आहे. दुःखद प्रसंग येतात तेव्हा आपण एका त्रासमुक्‍त जगात जगण्याच्या खात्रीलायक आशेमुळे सांत्वन मिळवू शकतो.

आपण एकटे नाही

सर्वकाही खरे असले तरीसुद्धा, जेव्हा आपल्यावर दुःखद प्रसंग येतात, तेव्हा असा विचार आपल्या मनात येऊ शकतो, की ‘शेवटी हे संकट माझ्याच वाट्याला का यावे?’ पण प्रेषित पौल आपल्याला आठवण करून देतो की दुःख सहन करणारे आपण एकटे नाही. पौल म्हणतो की, “सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.” (तिरपे वळण आमचे.) (रोमकर ८:२२) ही वस्तुस्थिती ओळखल्याने तुम्हाला दुःख सहन करण्यास मदत होईल. उदाहरणार्थ, न्यूयॉर्क सिटी आणि वॉशिंग्टन डी.सी. येथे सप्टेंबर ११, २००१ रोजी झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे निकोल नावाच्या एका मुलीच्या मनावर मोठा आघात झाला. ती कबूल करते, की “मी हादरून गेले आणि मला भयंकर भीती वाटू लागली.” पण आपल्या ख्रिस्ती बांधवांनी या दुःखद प्रसंगाला कसे तोंड दिले याविषयीचे वृत्तान्त तिने वाचले तेव्हा तिचा दृष्टिकोन बदलला. * “मला जाणीव झाली की मी मुळीच एकटी नाही. हळूहळू मी आपल्या दुःखातून सावरू लागले आहे.”

कधीकधी, कोणा एकाजवळ—आईवडील, एखादा अनुभवी मित्र किंवा ख्रिस्ती वडील यांच्यापैकी कोणाजवळ मन मोकळे करणेही मदतदायी ठरू शकते. अशा भरवशाच्या माणसाजवळ तुम्ही आपले मन मोकळे करता तेव्हा तुम्हाला प्रोत्साहनाचे “गोड शब्द” ऐकायला मिळू शकतात. (नीतिसूत्रे १२:२५) एका ब्राझीलियन ख्रिस्ती तरुणाने आपला अनुभव सांगितला: “नऊ वर्षांआधी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. यहोवा कधी न कधी त्यांचे पुनरुत्थान करेल हे मला माहीत आहे. पण मला माझ्या भावना कागदावर लिहून काढल्यामुळे खूप मदत मिळाली. यासोबतच मी माझ्या ख्रिस्ती स्नेह्‍यांजवळ माझ्या भावना व्यक्‍त केल्या.” तुम्ही ज्यांच्याजवळ आपल्या मनातल्या भावना व्यक्‍त करू शकता असे ‘खरे मित्र’ तुम्हाला आहेत का? (नीतिसुत्रे १७:१७, NW) असल्यास, त्यांची प्रेमळ मदत जरूर घ्या! त्यांच्याजवळ रडण्यास किंवा आपल्या मनातले बोलून दाखवण्यास संकोचू नका. एकदा येशू देखील त्याच्या मित्राच्या मृत्यूमुळे शोकाकूल होऊन “रडला!”—योहान ११:३५.

बायबल आपल्याला आश्‍वासन देते की एक दिवस असा येईल जेव्हा आपण “नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन . . . देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” अनुभवू. (रोमकर ८:२१) तोपर्यंत, अनेक चांगल्या लोकांनाही दुःख सहन करावे लागू शकते. पण सांत्वनाची गोष्ट म्हणजे असे दुःखद प्रसंग का घडतात आणि ते लवकरच नाहीसे होतील हे आपल्याला माहीत आहे. (g०४ ३/२२)

[तळटीपा]

^ सावध राहा! जानेवारी ८, २००२ (इंग्रजी) अंकातील “संकटसमयी धैर्य” ही लेखमाला पाहावी.

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.

[१६ पानांवरील चित्र]

दुःख कोणाजवळ व्यक्‍त केल्याने ते हलके होते