व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लॅक्टोज अपचन काय आहे

लॅक्टोज अपचन काय आहे

लॅक्टोज अपचन काय आहे

आवडत्या आईस्क्रीमवर किंवा चीजवर ताव मारून जवळजवळ एक तास होत आला आहे. तुमचे पोट फुगल्यासारखे तुम्हाला वाटते; तुम्हाला अस्वस्थ वाटते आणि पोटात गॅस झाला आहे. तुम्ही लगेच, नेहमी जवळ बाळगण्यास सुरवात केलेली गोळी घेता आणि तुम्हाला बरे वाटू लागते. तुमच्या मनात असा प्रश्‍न येतो: ‘माझं पोट इतकं नाजूक का आहे?’

दुध प्यायल्यावर किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यावर तुम्हाला मळमळ होत असेल, पोटात कळा मारत असतील, पोट गच्च भरल्यासारखे वाटत असेल, गॅस होत असेल किंवा वारंवार शौचास होत असेल तर कदाचित तुम्हाला लॅक्टोज अपचनाचा त्रास असेल. लॅक्टोज अपचनाचा त्रास बहुधा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर होतो. मधुमेह, पचनक्रिया व मूत्रपिंडासंबंधित रोगांची राष्ट्रीय संस्था असा अहवाल देते, की “३ ते ५ कोटी अमेरिकनांना लॅक्टोज अपचनाचा त्रास आहे.” हावर्ड मेडिकल स्कूलने प्रकाशित केलेल्या, संवेदनक्षम आतडे (इंग्रजी) नावाच्या पुस्तकानुसार, “जगाच्या लोकसंख्येपैकी ७० टक्के लोकांना लॅक्टोजचा काही ना काही तरी त्रास होतो” असा अंदाज लावला जातो. लॅक्टोज अपचन आहे तरी काय?

लॅक्टोज ही दुधातील शर्करा [साखर] आहे. लहान आतडे लॅक्टेज नावाचे एक एंजाईम तयार करते. लॅक्टोजचे ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज म्हटलेल्या दोन शर्करांमध्ये विघटन करणे, हे या एंजाईमचे काम आहे. यामुळे ग्लुकोज रक्‍तात मिसळले जाते. हे कार्य होण्यासाठी पुरेसे लॅक्टेज नसल्यास, विघटन न झालेले लॅक्टोज मोठ्या आंतड्यात जाते व तेथे आंबू लागते ज्यामुळे आम्ल व गॅस तयार होतो.

याला लॅक्टोज अपचन म्हणतात; यामुळे वर सांगितलेले काही किंवा सर्वच लक्षणे दिसू लागतात. जीवनाच्या पहिल्या दोन वर्षांत लॅक्टेज अधिक प्रमाणात तयार होत असते; त्यानंतर त्याचे तयार होण्याचे प्रमाण कमीकमी होत जाते. म्हणूनच, पुष्कळांना लॅक्टोज अपचनाचा त्रास हळूहळू सुरू होतो परंतु त्यांना त्याची जाणीव होत नाही.

ही अलर्जी आहे का?

काहींना दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास होऊ लागत असल्यामुळे त्यांना वाटते, की त्यांना दुधाची अलर्जी आहे. तेव्हा, ही अलर्जी * आहे, की अपचन? काही अलर्जी तज्ज्ञांच्या मते, अन्‍नासंबंधीची खरी अलर्जी फार क्वचित होते; सामान्य जनतेपैकी केवळ १ ते २ टक्के लोकांना अन्‍नाची अलर्जी होते. मुलांमध्ये ही संख्या अधिक असली, तरी ती ८ टक्क्यांपेक्षा कमी आहे. अलर्जीची आणि लॅक्टोज अपचनाची लक्षणे सारखीच असली तरी, यांत फरक आहे.

रोग प्रतिकार क्षमता, तुम्ही जे खाता किंवा पीता त्याचा प्रतिकार करत असल्यामुळे अर्थात हिस्टामीन तयार करत असल्यामुळे अन्‍नाच्या अलर्जीची लक्षणे दिसून येतात. काही लक्षणांमध्ये, ओठांवर किंवा जिभेवर सूज येणे, पुरळ येणे किंवा दमा यांचा समावेश होतो. लॅक्टोज अपचनात अशी लक्षणे दिसून येत नाहीत कारण यात प्रतिकारक्षमता गोवलेली नसते. लॅक्टोज अपचनात, शरीराला एखादा अन्‍न पदार्थ व्यवस्थित पचवता येत नसल्यामुळे विपरित प्रतिक्रिया दिसते.

तुम्हाला अलर्जी आणि अपचनातील फरक कसा ओळखता येईल? संवेदनक्षम आतडे हे पुस्तक या प्रश्‍नाचे उत्तर देते: “खऱ्‍या अलर्जीचे विपरित परिणाम . . . उपद्रवी बाह्‍य पदार्थाचे सेवन केल्यानंतर काही मिनिटांतच दिसून येतो. एकापेक्षा अधिक तासांनंतर दिसून येणारी लक्षणे, बहुतेकदा अपचन झाल्याचे सूचित करतात.”

बालकांवर होणारे परिणाम

एखाद्या बाळामध्ये किंवा लहान मुलामध्ये दुध प्यायल्यावर विपरित परिणाम दिसून येत असल्यास, ते स्वतः मुलाला तसेच त्याच्या पालकांनाही अतिशय यातनादायक ठरू शकते. लहान मुलाला वारंवार शौचास होत असल्यास निर्जलीकरण होण्याची भीती असते. अशा वेळी पालकांनी एखाद्या बालरोगतज्ज्ञाचा सल्ला घेणे इष्ट आहे. लॅक्टोज अपचन, असे निदान केल्यावर काही डॉक्टरांनी दुधाऐवजी पूरक देण्याची शिफारस केली आहे. यामुळे बऱ्‍याच रोग्यांना, पीडादायक लक्षणांपासून आराम मिळाला आहे.

अलर्जी असल्यास हे चिंतेचे कारण आहे. काही डॉक्टर अँटीहिस्टामीन देतात. परंतु, श्‍वास घेण्यास त्रास होत असेल तर, परिस्थिती सुधारण्याकरता डॉक्टरांना अधिक प्रयत्न करावे लागतील. क्वचित प्रसंगी, रोग्याची ॲनाफेलॅक्सीस ही मृत्यू ओढवणारी अवस्था होऊ शकते.

लहान बाळाला जर उलट्या सुरू झाल्या असतील तर आणखी एक काळजी करण्यासारखी विकृती म्हणजे गॅलेक्टोसेमीआ. आधी उल्लेख केल्याप्रमाणे, गॅलॅक्टोज लॅक्टोजपासून विलग केले जाते परंतु गॅलॅक्टोज ग्लुकोजमध्ये परिवर्तीत होण्याची गरज आहे. असे न होता गॅलॅक्टोज साचत राहिल्यास, गंभीर यकृत हानी, मूत्रपिंड खराब होण्याची, मानसिक विकृती, हायपोग्लायसेमिया आणि मोतीबिंदू होण्याची शक्यता असते. त्यामुळे, लहान बाळाच्या आहारातले लॅक्टोज लवकरात लवकर आणि पूर्णपणे बंद करून टाकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

लॅक्टोज अपचन किती गंभीर?

एका स्त्रीला दीर्घकाळापासून गॅसचा आणि पोटात कळा मारण्याचा त्रास होता. तिचा आजार इतका विकोपाला गेला की ती वैद्यकीय उपचार घेण्यासाठी गेली. अनेक चाचण्यांनंतर, तिला (आयबीडी) आतड्यांना दाह असल्याचे निदान करण्यात आले. * या विकृतीला आटोक्यात ठेवण्यासाठी तिला औषधे देण्यात आली. परंतु तिने दुग्धजन्य पदार्थ खाण्याची आपली रोजची सवय सोडली नव्हती; त्यामुळे तिच्या विकृतीची लक्षणे औषध घेऊनही दिसत होती. मग तिने स्वतःच परीक्षण केल्यावर तिला समजून आले, की कदाचित ती जे अन्‍न खात होती त्यामुळे तिला त्रास होत असावा; यासाठी ती एक एक करून विशिष्ट अन्‍नपदार्थ खाण्याचे टाळू लागली. कालांतराने, तिने दुधापासून बनलेले पदार्थ खाण्याचे सोडून दिले तेव्हा तिच्या आजाराची लक्षणेही गायब होऊ लागली! एका वर्षात—तिने आणखी चाचण्या केल्यानंतर—तिच्या डॉक्टरांनी तिला आयबीडीचा आजार नव्हता असे सांगितले. तिला लॅक्टोज अपचनाचा आजार होता. तिला किती आराम मिळाला असावा याची तुम्ही कल्पना करू शकता!

सध्या तरी, मानवी शरीरात लॅक्टेज तयार करण्यास बढावा देणारी कोणतीही उपचार पद्धती उपलब्ध नाही. परंतु, लॅक्टोज अपचन मारक नसल्याचे दिसून आले आहे. मग, लॅक्टोज अपचनाची लक्षणे दिसतात तेव्हा तुम्ही काय करू शकता?

आपण दुग्धजन्य पदार्थ किती प्रमाणात पचवू शकतो, हे काही जण अनुभवानेच शिकले आहेत. तुम्ही किती प्रमाणात हे पदार्थ खाता आणि तुमचे शरीर याला कशी प्रतिक्रिया दाखवते यानुसार, तुम्ही किती पचवू शकता आणि किती पचवू शकत नाही हे ठरवू शकाल.

काहींनी दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणेच वर्ज्य करण्याचे ठरवले आहे. आत्मपरीक्षण करून व आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन काहींना, आपल्या शरीराला पुरेसे कॅल्शियम देण्याचे पर्यायी मार्ग मिळाले आहेत. विशिष्ट प्रकारच्या हिरव्या भाज्या आणि काही प्रकारचे मासे व कवचफळे यांमध्ये भरपूर कॅल्शियम असते.

ज्यांना दुग्धजन्य पदार्थ आवडतातच ते, बाजारातून गोळ्यांच्या किंवा द्रव्याच्या रूपात मिळणारे असे पदार्थ आणून खाऊ शकतात. या पदार्थांमध्ये लॅक्टेज असते जे आतड्यांना लॅक्टोजमध्ये परिवर्तीत करण्यास मदत करतात. अशा पदार्थ्यांच्या सेवनाने कदाचित एखाद्या व्यक्‍तीला लॅक्टोज अपचनाची लक्षणे टाळण्यास मदत होईल.

आजच्या जगात, आरोग्याची काळजी घेणे सोपे नाही. पण वैद्यकीय संशोधनामुळे आणि आपल्या शरीराच्या काटकपणामुळे आपण, “‘मी रोगी आहे’ असे एकहि रहिवासी म्हणणार नाही” तो काळ येईपर्यंत आरोग्याच्या समस्यांचा सामना करू शकतो.—यशया ३३:२४; स्तोत्र १३९:१४. (g०४ ३/२२)

[तळटीपा]

^ याला अतिसंवेदनशीलता देखील म्हणतात.

^ दोन प्रकारच्या आयबीडी आहेत—क्रोन्स विकृती आणि अल्सरेटीव्ह कोलीटीस (मोठ्या आतड्याचा दाह). या गंभीर आजारांमुळे, आतड्यांचा काही भाग कापून टाकण्यापर्यंत पाळी येण्याची शक्यता आहे. आयबीडीमुळे उद्‌भवलेल्या जटीलतेमुळे मृत्यू ओढावू शकतो.

[२८ पानांवरील चौकट/चित्रे]

पुढील गोष्टींमध्ये देखील लॅक्टोज असू शकते:

◼ ब्रेड आणि ब्रेडचे पदार्थ

◼ केक आणि कुकीज

◼ चॉकलेट आणि गोळ्या

◼ इन्स्टंट पटेटो (बटाट्याची तयार पूड)

◼ मार्जरीन (प्राण्याच्या किंवा वनस्पतीच्या चरबीतून बनवलेले तूप)

◼ अनेक लिहून दिलेली औषधे

◼ लिहून न दिलेली परंतु औषधांच्या दुकानात मिळणारी औषधे

◼ पॅनकेक, बिस्किटे, कुकीज बनवण्यासाठी असलेले तयार पीठ

◼ प्रक्रिया केलेली नाश्त्याच्या वेळी खाल्ली जाणारी सिरियल्स

◼ सलाड सॉस किंवा रस

◼ गोठवलेले मांस

◼ सूप