व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भेदभावाची नाना रूपे

भेदभावाची नाना रूपे

भेदभावाची नाना रूपे

“भेदभावांना दारातून बाहेर घालवा, तर ते खिडकीतून परत येतील.”फ्रेडरिक द ग्रेट, प्रशियाचा राजा.

राजेश हा भारतातील पालियाड नावाच्या खेडेगावात राहणारा मुलगा. बाकीच्या अस्पृश्‍यांसारखेच त्यालाही आपल्या कुटुंबाकरता पाणी भरून आणण्याकरता १५ मिनिटे पायी चालत जावे लागते. तो सांगतो, “गावात नळं आहेत, पण ती फक्‍त मोठ्या जातीचे लोकच वापरू शकतात.” लहानपणी राजेश शाळेत जायचा तेव्हा मुले फुटबॉल खेळायची, पण राजेशला आणि त्याच्या अस्पृश्‍य मित्रांना त्यांच्या फुटबॉलला स्पर्शही करण्याची परवानगी नव्हती. “मग आम्ही गोट्या खेळायचो,” तो सांगतो.

क्रिस्टिना नावाची एक किशोरवयीन आशियाई मुलगी युरोपमध्ये राहते. ती म्हणते, “लोक माझा तिरस्कार करतात हे मला जाणवतं; पण का ते मात्र समजत नाही, त्यामुळे खूप मनस्ताप होतो. मी सहसा लोकांत मिसळण्याचे टाळते पण त्यामुळे काही प्रश्‍न सुटत नाही.”

पश्‍चिम आफ्रिकेचा स्टॅनली म्हणतो, “भेदभाव आणि द्वेष काय असतो हे सर्वप्रथम, मी १६ वर्षांचा असताना अनुभवलं. मी ज्यांना धड ओळखतही नव्हतो अशा लोकांनी मला गाव सोडून जाण्याची ताकीद दिली. माझ्या जमातीच्या काही लोकांची तर घरं जाळून टाकण्यात आली. माझ्या वडिलांचे बँक खाते गोठवण्यात आले. हे सर्व पाहून, आमच्यावर अन्याय करणाऱ्‍या जमातीचा मलाही तिरस्कार वाटू लागला.”

राजेश, क्रिस्टिना आणि स्टॅनली द्वेषपूर्ण भेदभावाला बळी पडले आहेत आणि त्यांच्यासारखे जगात असंख्य लोक आहेत. संयुक्‍त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेचे (युनेस्को) मुख्य संचालक कोईचीरो मात्सूऊरा म्हणतात: “कोट्यवधी लोकांना आज जातीयवाद, भेदभाव, विदेश्‍यांविषयी असलेली संशयी वृत्ती आणि समाजाकडून बहिष्कृती सहन करावी लागते. अज्ञान व द्वेषामुळे अधिकच फोफावणाऱ्‍या या अमानुष प्रथा, जगातल्या अनेक देशांत आंतरिक संघर्षाला आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर मानवी दुःखाला कारणीभूत ठरल्या आहेत.”

तुम्ही स्वतः कधी असा भेदभाव अनुभवला नसल्यास, यामुळे किती मानसिक यातना होऊ शकतात हे समजून घेणे कदाचित तुम्हाला कठीण जाईल. फेस टू फेस अगेंस्ट प्रेजुडिस या पुस्तकात म्हटले आहे, “काहीजण [द्वेषपूर्ण भेदभाव] निमूटपणे सहन करतात. तर इतरजण ‘ईंट का जवाब पत्थर से’ ही नीती अवलंबतात.” भेदभावामुळे लोकांच्या जीवनावर कोणता विघातक परिणाम होतो?

तुम्ही एखाद्या अल्पसंख्याक गटाचे सदस्य असाल तर लोक कसे तुम्हाला टाळतात, कसे संशयी दृष्टीने तुमच्याकडे पाहतात, किंवा तुमच्या संस्कृतीविषयी कसे टाकून बोलतात हे तुम्ही अनुभवले असेल. कदाचित, चांगल्या नोकऱ्‍यांपासूनही तुम्हाला वंचित ठेवले जात असेल; इतर कोणाला नको असलेली मजूरीची कामेच करावी लागत असतील. कदाचित चांगल्या वस्तीत, चांगले घर मिळणेही कठीण असेल. तुमच्या मुलांनाही कदाचित शाळेत इतर मुले एकटे पाडत असतील.

सर्वात भयंकर म्हणजे, द्वेषपूर्ण भेदभावांमुळे काहीजण चक्क दुसऱ्‍यांच्या जिवावर उठतात. द्वेषामुळे झालेल्या कत्तली, जातीसंहार आणि तथाकथित वांशिक शुद्धीकरण यांसारख्या हिंसाचाराच्या व रक्‍तपाताच्या भयावह अहवालांनी इतिहासाची पाने रंगली आहेत.

शतकानुशतके चालत आलेला द्वेषभाव

एकेकाळी ख्रिस्ती लोकांना भयंकर भेदभावाला तोंड द्यावे लागत होते. उदाहरणार्थ, येशूच्या मृत्यूनंतर त्यांचा क्रूरपणे छळ केला जाऊ लागला. (प्रेषितांची कृत्ये ८:३; ९:१, २; २६:१०, ११) दोन शतकांनंतर, ख्रिश्‍चनांना पुन्हा एकदा क्रूर दुर्व्यवहाराला तोंड द्यावे लागले. तिसऱ्‍या शतकातील लेखक टर्टुलियन याने लिहिले, “कोठे जिवघेणी साथ पसरली की लगेच, ‘ख्रिश्‍चनांना सिंहापुढे टाका’ अशी ओरड होते.”

अकराव्या शतकात धर्मयुद्धे सुरू झाली तेव्हापासून युरोपमध्ये यहुदी लोकांचा द्वेष केला जाऊ लागला. गाठींचा प्लेग सबंध युरोपात पसरून काही वर्षांतच त्याने जवळजवळ २५ टक्के जनसंख्येला गिळंकृत केले तेव्हा यहुदी लोकांना यासाठी जबाबदार ठरवण्याचे लोकांना चांगले निमित्त मिळाले कारण नाहीतरी, बहुतेकजण त्यांचा द्वेष करत होते. इनव्हिझिबल एनिमीझ या पुस्तकात लेखिका जनेट फॅरेल लिहितात: “प्लेगमुळे लोकांना द्वेष करण्याचे निमित्त मिळाले आणि प्लेगची जी भीती त्यांच्या मनात होती ती आता यहुदी लोकांवर केंद्रस्थ झाली.”

शेवटी, फ्रांसच्या दक्षिण भागात एका यहुदी माणसाने छळाला कंटाळून “कबूल” केले की यहुद्यांनीच लोकांच्या विहिरींत विष घातल्यामुळे ही साथ पसरली आहे. अर्थात हे खरे नव्हते, पण ही माहिती सर्वत्र खरी म्हणूनच पसरवण्यात आली. पाहता पाहता, स्पेन, फ्रांस व जर्मनी सारख्या देशांत पूर्णच्या पूर्ण यहुदी समाजाचा संहार करण्यात आला. या प्लेगचे मूळ कारण ठरणाऱ्‍या उंदीर-घुशींकडे कोणीही लक्ष दिले नाही. शिवाय इतर लोकांप्रमाणे यहुदी लोकही प्लेगमुळे मरत होते हे कोणाच्याही कसे लक्षात आले नाही याचे आश्‍चर्य वाटते!

द्वेषपूर्ण भेदभावाचा डोंब उसळला की मग शतकानुशतके ही आग विझत नाही. २० व्या शतकात, अडॉल्फ हिटलर याने पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या पराजयासाठी यहुद्यांना जबाबदार ठरवून, यहुदी-विरोधी भावनांना अधिकच चेतवले. दुसऱ्‍या महायुद्धाच्या शेवटी, ऑश्‍विट्‌झ बंधनागृहाचा नात्सी कमांडर रूडॉल्फ होएस याने असे कबूल केले: “आमच्या लष्करी प्रशिक्षणात आमच्या मनावर हेच बिंबवण्यात आले होते की आपल्याला कसेही करून यहुद्यांपासून जर्मनीचे रक्षण करायचे आहे.” याच होएसच्या देखरेखीखाली, “जर्मनीचे रक्षण” करण्याकरता जवळजवळ २०,००,००० लोकांचा संहार करण्यात आला, ज्यांपैकी बहुतेक यहुदी होते.

दुःखाची गोष्ट म्हणजे, कित्येक दशके उलटूनही अशाप्रकारचे अत्याचार अजूनही घडत आहेत. उदाहरणार्थ, १९९४ मध्ये पूर्व आफ्रिकेत हुतू व तुत्सी या दोन जमातींमधील द्वेषाचा हिंसक उद्रेक होऊन कमीत कमी पाच लाख लोकांचा नाहक बळी गेला. टाईम नियतकालिकाच्या वृत्ताप्रमाणे, “लोकांना जीव वाचवण्याकरता लपण्याचे कोणतेही स्थान नव्हते. ज्या चर्चेसमध्ये लोकांनी आश्रय घेतला तेथेही रक्‍ताचे पाट वाहिले . . . लोक समोरासमोर लढून आपल्या ओळखीच्या लोकांना मारत होते; त्या पाशवी रक्‍तपातातून जे कसेबसे निसटले त्यांचे डोळे निर्विकार झाले आहेत आणि जणू त्यांची वाचाच गेली आहे.” अगदी लहान मुलेही या भयानक हिंसाचारातून सुटली नाहीत. एका नागरिकाने म्हटले: “रवांडा तसे लहानसेच ठिकाण आहे. पण सगळ्या जगातला द्वेष इथेच भरला आहे असे वाटते.”

भूतपूर्व युगोस्लाव्हियाच्या फाळणीच्या वेळी झालेल्या हिंसाचारात २,००,००० लोकांचा बळी गेला. कित्येक वर्षांपासून सुखासमाधानाने नांदलेल्या शेजाऱ्‍यांनी एकमेकांच्या कत्तली केल्या. हजारो स्त्रियांवर बलात्कार करण्यात आला आणि लाखो जणांना आपले घर सोडून जाण्यास भाग पाडण्यात आले; आणि हे सर्व वांशिक शुद्धीकरणाच्या क्रूर राजनीतीमुळे घडले.

भेदभावाची नेहमीच मनुष्यहत्येत परिणती होते असे नाही, पण तरीसुद्धा यामुळे लोकांमध्ये फूट पडते आणि द्वेषाची बिजे पेरली जातात. मोठ्या प्रमाणात जागतिकीकरण झाले असले तरीसुद्धा, वंशवाद आणि वांशिक भेदभाव “जगातल्या बहुतेक भागांत मुळावत चालले आहेत,” असे अलीकडे युनेस्कोच्या एका वृत्तात म्हणण्यात आले.

द्वेषपूर्ण भेदभाव कायमचे मिटवण्याकरता काय करता येईल? या प्रश्‍नाचे उत्तर मिळण्याआधी, भेदभावाची भावना कशाप्रकारे एका व्यक्‍तीच्या मनात घर करते हे समजून घेणे आवश्‍यक आहे. (g०४ ९/८)

[५ पानांवरील चौकट]

द्वेषपूर्ण भेदभावाची लक्षणे

द नेचर ऑफ प्रेजुडिस या पुस्तकात लेखक गॉर्डन डब्ल्यू. ॲल्पोर्ट, द्वेषपूर्ण भेदभावामुळे निर्माण होणाऱ्‍या पाच प्रकारच्या प्रतिक्रियांविषयी सांगतात. ज्या व्यक्‍तीच्या मनात भेदभाव असतो त्याच्या वर्तनात सहसा यांपैकी एक किंवा अधिक प्रतिक्रिया दिसून येतात.

१. नकारात्मक शेरे. एखाद्याला ज्या विशिष्ट गटाचे लोक आवडत नाहीत, त्यांच्याबद्दल तो टाकून बोलतो.

२. टाळण्याची प्रवृत्ती. त्या गटाच्या कोणत्याही व्यक्‍तीला तो आवर्जून टाळतो.

३. दुजाभाव. न आवडणाऱ्‍या गटाच्या सदस्यांना तो विशिष्ट प्रकारच्या व्यवसायाची संधी मिळण्यापासून, किंवा विशिष्ट ठिकाणी निवास मिळण्यापासून अथवा काही सामाजिक सुसंधींपासून वंचित ठेवतो.

४. शारीरिक हल्ला. ज्या लोकांचा आपल्याला तिरस्कार वाटतो त्यांना दहशत बसावी या उद्देशाने केलेल्या हिंसाचारात तो सहभागी होतो.

५. सर्वनाश. बेकायदेशीरपणे जबरदस्तीने फासावर लटकवणे, कत्तली किंवा एखाद्या गटाचा समूळ उच्छेद करण्याच्या मोहिमेत तो सहभागी होतो.

[४ पानांवरील चित्र]

बेनाको निर्वासितांचे शिबिर, टांझानिया, मे ११, १९९४

आपल्या पाण्याच्या कॅनशेजारी विसावा घ्यायला बसलेली एक स्त्री. बहुतेक रवांडाच्या हुतू जमातीचे लोक असलेल्या ३,००,००० निर्वासितांनी आश्रयासाठी टांझानियात प्रवेश केला

[चित्राचे श्रेय]

छायाचित्र Paula Bronstein/Liaison