व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कोवळ्या वयात प्रशिक्षण देणे कितपत हिताचे?

कोवळ्या वयात प्रशिक्षण देणे कितपत हिताचे?

कोवळ्या वयात प्रशिक्षण देणे कितपत हिताचे?

चाळीस वर्षांच्या फ्लॉरन्सला कसेही करून मूल हवे होते. पण तिला दिवस गेले तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितले की तिचे बाळ मोठे झाल्यावर त्याला शिकण्यासंबंधी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. फ्लॉरन्स गर्भपात करवून घ्यायला तयार झाली नाही आणि शेवटी तिने एका निरोगी मुलाला जन्म दिला.

आपल्या मुलाच्या, स्टीवनच्या जन्मानंतर काही काळातच फ्लॉरन्सने त्याला मोठ्याने वाचून दाखवण्यास आणि त्याच्यासोबत सतत काही न काही बोलत राहण्यास सुरुवात केली. स्टीवन थोडा मोठा झाल्यावर ते सोबत मिळून निरनिराळे खेळ खेळू लागले. कधी ते बाहेर फिरायला जायचे. कधी वस्तू मोजण्याचा सराव करायचे तर कधी गाणी गायचे. फ्लॉरन्स सांगते, “अंघोळीच्या वेळीसुद्धा आम्ही काहीतरी खेळत असायचो.” या सर्व प्रयत्नांचे चीज झाले.

चौदा वर्षांचा असताना स्टीवन मायामी विद्यापिठातून चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. दोन वर्षांनंतर, १६ वर्षांच्या वयात त्याने विधी महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण केले आणि त्याच्या जीवनचरित्रानुसार, कालांतराने तो अमेरिकेतील सर्वात कमी वयाचा वकील बनला. त्याची आई डॉ. फ्लॉरन्स बॅकस या पूर्वीच्या शिक्षिका आणि निवृत्त सल्लागार आहेत व त्यांनी मुलांना अगदी लहानपणापासूनच शिकवण्याच्या महत्त्वावर बराच अभ्यास केला आहे. त्यांची खात्री पटली आहे की आपण आपल्या मुलाला बालपणापासूनच जे लक्ष पुरवले आणि योग्य उत्तेजन दिले त्यामुळे त्याचे भविष्य बदलले.

आनुवंशिकता विरुद्ध जोपासना

अलीकडच्या काळात बाल मनोविश्‍लेषकांमध्ये एक महत्त्वाचा विषय वादग्रस्त ठरत आहे; तो म्हणजे मुलांच्या विकासात “आनुवंशिकतेचे” आणि “जोपासनेचे” कितपत योगदान असते. आनुवंशिकता (नेचर) म्हणजे मुलांजवळ उपजत जे असते ते, आणि जोपासना (नर्चर) म्हणजे त्यांचे केले जाणारे संगोपन किंवा त्यांना दिले जाणारे प्रशिक्षण. मुलांच्या विकासावर या दोन्ही गोष्टींचा प्रभाव पडतो असे बहुतेक संशोधकांचे ठाम मत आहे.

बालविकास तज्ज्ञ डॉ. जे. फ्रेझर मस्टर्ड याविषयी असे सांगतात: “मूल आपल्या जीवनातील सुरुवातीच्या काही वर्षांत ज्या अनुभवांना सामोरे जाते, त्यांचा परिणाम त्याच्या मेंदूच्या वाढीवर होत असतो हे आमच्या अभ्यासातून निष्पन्‍न झाले आहे.” याच धर्तीवर, प्राध्यापिका सूझन ग्रीनफील्ड असे म्हणतात: “उदाहरणार्थ, अभ्यासातून आम्हाला असे दिसून आले आहे, की इतर लोकांच्या तुलनेत, व्हायोलिन वादकांच्या मेंदूत डाव्या हाताच्या बोटांशी संबंधित असलेल्या भागाचा जास्त विकास झालेला असतो.”

कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण पुरवावे

अशाप्रकारच्या संशोधनांच्या परिणामांमुळे उत्तेजित होऊन, बरेच पालक आपल्या मुलांसाठी सर्वात उत्तम असे पाळणाघर (डे केअर सेंटर्स) शोधण्यासाठी बराच खटाटोप करतात; शिवाय, संगीत व कला वर्गांना त्यांना पाठवण्याकरता बराच पैसा खर्च करतात. काहींचे असे मत असते की लहानपणी मुलांना सर्व गोष्टींचा सराव मिळाला तर मोठेपणी ते सर्व काही करू शकतील. यामुळे खास कलाकौशल्यांच्या शिकवणी आणि बालोद्यान शिक्षण संस्था (प्रीस्कूल) आजकाल बऱ्‍याच निघाल्या आहेत. आपले मूल इतरांपेक्षा कोठे कमी पडू नये म्हणून काही आईवडील वाट्टेल ते करायला तयार असतात.

या सर्व प्रयत्नांमुळे खरच काही चांगला परिणाम होतो का? लहानपणी मिळालेल्या या प्रशिक्षणामुळे भविष्यात मुलांना निरनिराळ्या क्षेत्रांत प्रविणता मिळवण्याकरता अनेक संधी प्राप्त होतील असा काहीजण विचार करतात; पण अनौपचारिक रित्या, मोकळेपणाने खेळताना मुलांना जे शिकायला मिळते ते त्यांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते आणि नेमके हेच त्यांना या औपचारिक प्रशिक्षणामुळे मिळू शकत नाही. शिक्षण तज्ज्ञांच्या मते मुले स्वयंस्फूर्तीने खेळतात तेव्हा त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळते आणि यामुळे मुलांचा सामाजिक, मानसिक व भावनिक दृष्ट्या विकास होतो.

काही विकास तज्ज्ञांचे असे मत आहे की आईवडिलांनी आयोजित केलेल्या खेळांमुळे एका नव्या प्रकारचे ‘समस्या बालक’ निर्माण होऊ पाहात आहे. अशा मुलांच्या बारीकसारीक हालचाली देखील आईवडिलांनी नियंत्रित केलेल्या असतात. यामुळे ही मुले तणावग्रस्त आणि अस्थिर वृत्तीची होतात, त्यांना नीट झोप लागत नाही आणि वरचेवर दुखणीखुपणी होत असतात. एक मनोविज्ञान तज्ज्ञ सांगतात की किशोरावस्थेत येईपर्यंतही त्यांच्यापैकी बऱ्‍याच मुलांमध्ये कठीण प्रसंगांना स्वतःहून तोंड देण्याची क्षमता विकसित झालेली नसते; यामुळे ती “मलूल, एकलकोंडी व हट्टी होतात.”

अशारितीने, पालक कोंडीत सापडले आहेत. आपल्या मुलांच्या अंगी असलेल्या सर्व क्षमतांचे, गुणांचे चीज व्हावे म्हणून त्यांना लागेल ती मदत द्यायला एकीकडे ते तयार आहेत. तर दुसरीकडे, कमी वयात लहान मुलांवर खूप जास्त दबाव आणणे हितकारक नाही हेही त्यांना कळते. यातून सुवर्ण मध्य कसा साधता येईल? मुलांमध्ये कितपत विकास होण्याची क्षमता असते आणि या क्षमतेची जोपासना कशी करता येईल? आपल्या मुलांनी यशस्वी व्हावे या दृष्टीने पालक काय करू शकतात? पुढील लेखांत या प्रश्‍नांवर चर्चा केली आहे. (g०४ १०/२२)

[३ पानांवरील चित्र]

जीवनातील सुरुवातीच्या काही वर्षांत आलेल्या अनुभवांचा परिणाम मुलांच्या मेंदूच्या वाढीवर होत असतो

[४ पानांवरील चित्र]

खेळताना मुलांच्या सर्जनशीलतेला चालना मिळते आणि मुलांचा सर्वांगीण विकास होतो