व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या शिस्तीत मुलांना वाढवणे

देवाच्या शिस्तीत मुलांना वाढवणे

बायबलचा दृष्टिकोन

देवाच्या शिस्तीत मुलांना वाढवणे

“तुमची मुले हमखास पाळतील असे नियम बनवण्याचा कानमंत्र”

“पाच वर्षांच्या मुलांना शिकवावयाची पाच नीतीमूल्ये”

“प्रत्येक मुलाजवळ हमखास असावीत अशी पाच भावनात्मक कौशल्ये”

“तुम्ही मुलांना फाजील स्वातंत्र्य देताहात हे ओळखण्याची पाच लक्षणे”

“एका मिनिटात मुलांना ताळ्यावर आणण्याचा जादुई मंत्र”

मुलांना शिस्त लावणे सोपे असते, तर वरील उदाहरणांसारखी शीर्षके असलेले मासिकांतले लेख कोणी वाचले नसते. पुस्तकांच्या दुकानांत बाल संगोपनाच्या विषयावरील पुस्तकांचा महापूर नसता. पण मुलांवर उचित संस्कार करणे हे मुळातच सोपे नाही. कधीच नव्हते. अगदी हजारो वर्षांआधीही एका लेखकाने असे म्हटले होते: “मूर्ख मुलगा आपल्या बापाला दुःख देतो आणि आपल्या जन्मदात्रीला क्लेश देतो.”—नीतिसूत्रे १७:२५.

आज या विषयावर भरपूर सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध आहे, पण तरीसुद्धा आपल्या मुलांना वळण कसे लावावे याबद्दल बऱ्‍याच पालकांच्या मनात अनेक शंका आहेत. बायबल यासंबंधी कोणते मार्गदर्शन पुरवते?

शिस्तीचा खरा अर्थ

शिस्त लावण्यासंबंधी आईवडिलांची काय भूमिका असावी याबद्दल बायबलमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. उदाहरणार्थ इफिसकर ६:४ [NW] म्हणते: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर शिस्तीत व यहोवाच्या शिक्षणात त्यांना वाढवा.” मुलांची काळजी घेण्याच्या संदर्भात, खासकरून वडिलाने पुढाकार घ्यावा असे हे शास्त्रवचन सुचवते. अर्थात आईसुद्धा या कार्यात आपल्या पतीला सहयोग देते.

या विषयावर दी इन्टरप्रेटर्स डिक्शनरी ऑफ द बायबल यात म्हटले आहे: “बायबलनुसार, शिस्त लावणे यात एकमेकांशी निगडीत असलेल्या दोन पैलूंचा समावेश आहे; एक पैलू प्रशिक्षण, बोध व ज्ञान याजशी तर दुसरा ताडन, सुधारणूक व शिक्षा याजशी संबंधित आहे. शिस्त लावणे या अर्थाच्या शब्दांचा सहसा मुलांना दिल्या जाणाऱ्‍या प्रशिक्षणाच्या संदर्भात वापर केला जातो.” त्याअर्थी, शिस्त लावणे हे केवळ ताडन देण्यापुरतेच सीमित नाही. तर मुलांचा सर्वांगीण विकास होण्याकरता आवश्‍यक असलेले सर्व प्रशिक्षण त्यांना पुरवण्याचा यात अंतर्भाव आहे. पण मुलांना चीड येणार नाही अशा पद्धतीने आईवडिलांना हे कसे करता येईल?

सहानुभूतीशील असा

मुलांना चीड का येते? असे समजा, की तुम्ही जेथे काम करता तेथे तुमच्यासोबत, अतिशय तापट स्वभावाचा एक माणूस काम करतो. तो सतत तुमच्यावर रागावत असतो. उठता बसता तुमच्या वागण्याबोलण्यात काही न काही चुका काढत असतो. तुम्ही केलेले काम त्याला सहसा पसंत पडत नाही आणि तो तुम्हाला अगदीच पाण्यात पाहतो. तुम्हाला त्याच्या अशा वागण्याची चीड येणार नाही का व तुम्ही हताश होणार नाही का?

आईवडील जेव्हा सतत मुलांच्या मागे लागून त्यांचे दोष दाखवत राहतात व त्यांना रागावत राहतात तेव्हा मुले देखील चिडतात व हताश होतात. मुले वेळोवेळी चुका करतात तेव्हा त्यांच्या चुका सुधारणे आवश्‍यक असून बायबलही आईवडिलांना असे करण्याची परवानगी देते. पण कठोर व क्रूर वागणूक देऊन मुलांना चीड आणल्यामुळे भावनात्मक, आध्यात्मिक व शारीरिक हानी देखील होऊ शकते.

आपल्या मुलांना वेळ द्या

आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी वेळ काढलाच पाहिजे. देवाच्या आज्ञांच्या संदर्भात अनुवाद ६:७ वडिलांना असे सांगते: “त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.” आपल्या आईवडिलांना आपली मनापासून काळजी वाटते अशी मुलांना जाणीव होणे आवश्‍यक आहे. ही त्यांची एक जन्मजात गरज आहे. आपल्या मुलांशी दररोज निवांत संभाषण केल्यामुळे तुम्हाला त्यांच्या मनात काय चालले आहे हे समजून घेता येईल. यामुळे तुम्हाला बायबलमधील तत्त्वे त्यांच्या मनावर बिंबवणे आणि ‘देवाचे भय धरून त्याच्या आज्ञा पाळण्यास’ त्यांना प्रेरित करणे सोपे जाईल. (उपदेशक १२:१३) हे देखील देवाच्या शिस्तीत त्यांना वाढवण्यात अंतर्भूत आहे.

मुलांच्या संगोपनाची तुलना घर बांधण्याशी केल्यास, शिस्त लावणे हे बांधकामात उपयोगी पडणाऱ्‍या एखाद्या हत्यारासारखे आहे असे म्हणता येईल. आईवडिलांनी या हत्याराचा उचित रीत्या उपयोग केला, तर ते आपल्या मुलांमध्ये अनेक उत्तम गुणांनी युक्‍त असे व्यक्‍तिमत्त्व उभारू शकतात व त्यांना जीवनाच्या निरनिराळ्या आव्हानांना तोंड देण्यास सुसज्ज करू शकतात. यामुळे काय परिणाम होईल, याचे नीतिसूत्रे२३:२४, २५ यात वर्णन केले आहे: “धार्मिकाचा बाप फार उल्लासतो; सुज्ञ मुलास जन्म देतो तो त्याजविषयी आनंद पावतो. तुझी मातापितरे आनंद पावोत, तुझी जन्मदात्री हर्ष पावो.” (g०४ ११/८)

[२१ पानांवरील चौकट/चित्र]

“यहोवाच्या शिक्षणात”

इफिसकर ६:४ यात “यहोवाच्या शिक्षणात” मुलांना वाढवण्याविषयी उल्लेख केला आहे. “शिक्षणात” असे येथे भाषांतर केलेल्या मूळ ग्रीक शब्दाचे वेगवेगळ्या बायबल भाषांतरांत “जाणीव,” “सल्ला,” “मार्गदर्शन,” असे भाषांतर केलेले आढळते. या सर्व शब्दांवरून हेच सूचित होते की आईवडिलांनी आपल्या मुलांसोबत केवळ बायबल वाचणे किंवा एखाद्या बायबल आधारित प्रकाशनातून यांत्रिकपणे नियमितरित्या काही भाग विचारात घेणे पुरेसे नाही. आपल्या मुलांना देवाच्या वचनाचा अर्थ कळतो; तसेच, आज्ञापालनाचे महत्त्व, यहोवाला त्यांच्याबद्दल असलेले प्रेम, आणि जे संरक्षण तो त्यांना देऊ करतो या सर्व गोष्टींचीही त्यांना जाणीव आहे, याची आईवडिलांनी खात्री केली पाहिजे.

हे कसे काय साध्य करता येईल? तीन मुलांची आई असलेल्या ज्यूडीला जाणीव झाली की आपल्या मुलांना देवाच्या तत्त्वांची केवळ वारंवार आठवण करून देणे पुरेसे नव्हते. “मी त्याच त्या गोष्टी, त्याच त्या पद्धतीने सांगू लागले की त्यांना ते आवडत नाही हे माझ्या लक्षात आले. तेव्हा त्यांना वेगळ्या पद्धतीने कसे शिकवता येईल याचा मी विचार करू लागले. सावध राहा! नियतकालिकांतील लेख पडताळून पाहिल्यावर, तेच मुद्दे अगदी नवीन पद्धतीने कसे सादर करता येतील हे मला शिकायला मिळाले. अशारितीने, मुलांना चीड येणार नाही याची काळजी घेऊन, त्यांना आवश्‍यक असलेल्या सूचना पुरवणे मला शक्य झाले.”

ॲन्जेलो यांच्या कुटुंबाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे; आपण आपल्या मुलींना देवाच्या वचनावर मनन करण्यास कसे शिकवले याविषयी ते सांगतात: “आम्ही बायबलमधील काही वचने एकत्र मिळून वाचल्यावर मी विशिष्ट वाक्यांशांकडे लक्ष वेधून माझ्या मुलींच्या परिस्थितीशी त्यांचा कसा संबंध आहे यावर खुलासा करायचो. नंतर जेव्हा त्या वैयक्‍तिक बायबल वाचन करायच्या तेव्हा मला त्या अगदी गहन विचार करताना, [देवाच्या वचनाचे] आपल्या जीवनात काय तात्पर्य आहे यावर मनन करताना दिसायच्या.”