व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

महत्त्वाकांक्षी असणे चुकीचे आहे का?

महत्त्वाकांक्षी असणे चुकीचे आहे का?

बायबलचा दृष्टिकोन

महत्त्वाकांक्षी असणे चुकीचे आहे का?

“प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सत्ता यांत गैर काय?” हा प्रश्‍न एका धार्मिक संस्थेने प्रकाशित केलेल्या वृत्तात “नैतिक विवाद” या मथळ्याखाली विचारला होता. या लेखात, देवाने अब्राहामला दिलेल्या वचनाचा संदर्भ देण्यात आला आहे: “मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन.”—उत्पत्ति १२:२.

“इतरांना काही नुकसान होईल अशा पद्धतीने आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू नये” असे विधान या लेखात करण्यात आले. पण त्यात पहिल्या शतकातील एका प्रसिद्ध रब्बीचे मत उद्धृत केले होते. या रब्बीने म्हटले: “मी जर स्वतःचा पुरस्कार केला नाही तर मला कोण विचारेल?” शेवटी त्याने म्हटले: “आपण स्वतःच जर आपल्या क्षमता ओळखल्या नाहीत तर दुसरेही ओळखणार नाहीत.” जे देवाची सेवा करू इच्छितात त्यांच्याकरता महत्त्वाकांक्षा एक समस्या बनू शकते का? आपल्या क्षमता ओळखणे म्हणजे नेमके काय? महत्त्वाकांक्षी असणे चुकीचे आहे का? बायबलचा यासंदर्भात काय दृष्टिकोन आहे?

अब्राहाम महत्त्वाकांक्षी होता का?

बायबलमध्ये अब्राहामला उल्लेखनीय विश्‍वास बाळगणारा म्हणून ओळखले जाते. (इब्री लोकांस ११:८, १७) देवाने अब्राहामपासून एक मोठे राष्ट्र निर्माण करण्याचे व त्याचे नाव मोठे करण्याचे वचन दिले तेव्हा तो अब्राहामला महत्त्वाकांक्षी होण्यास प्रोत्साहित करत नव्हता. तर देव अब्राहामद्वारे मानवाजातीला आशीर्वादित करण्याचा आपला उद्देश व्यक्‍त करत होता; हा असा उद्देश होता जो मानवांच्या इच्छाकांक्षांपेक्षा कित्येक पटीने महत्त्वाचा होता.—गलतीकर ३:१४.

देवाच्या आज्ञेचे पालन करून, अब्राहामने ऊर देशातील आरामशीर, समृद्ध जीवन त्यागले. (उत्पत्ति ११:३१) नंतर, शांती कायम राखण्याकरता अब्राहामने आपला भाचा लोट याला स्थाईक होण्याकरता उत्तम प्रदेश देऊ केला व अशारितीने त्याने सत्ता व अधिकार मिळवण्याची संधी आपणहून सोडून दिली. (उत्पत्ति १३:८, ९) बायबलमधील अहवालात कोठेही अब्राहामचे महत्त्वाकांक्षी असे वर्णन केलेले नाही. उलट त्याचा विश्‍वास, आज्ञाधारकता व नम्रता यांमुळे तो देवाचा प्रिय “मित्र” ठरला.—यशया ४१:८.

प्रतिष्ठा, प्रसिद्धी व सत्ता यांविषयी एक वेगळा दृष्टिकोन

महत्त्वाकांक्षा या शब्दाची व्याख्या, “प्रतिष्ठा, प्रसिद्धी व सत्ता मिळवण्याची उत्कट इच्छा” अशी करण्यात आली आहे. प्राचीन काळात राजा शलमोन याच्याजवळ प्रतिष्ठा, प्रसिद्धी व सत्ता होती, व त्यासोबत अमाप संपत्ती देखील. (उपदेशक २:३-९) पण लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे हे सर्व मिळवण्याची उत्कट इच्छा त्याला नव्हती. शलमोनाने राज्यपद मिळवल्यानंतर, देवाने त्याला म्हटले की तुला जे काही हवे असेल ते माग. पण शलमोनाने नम्रपणे देवाला एक सावधान चित्त व त्याच्या निवडलेल्या लोकांवर राज्य करण्याकरता आवश्‍यक असलेली समजबुद्धी देण्याची विनंती केली. (१ राजे ३:५-९) नंतर, आपल्याजवळ असलेल्या सर्व संपत्तीचे व सत्तेचे वर्णन केल्यावर शलमोनाने म्हटले की “सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता.”—उपदेशक २:११.

मानवांनी आपल्या क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठण्याविषयी शलमोनाने काही म्हटले का? होय, एका अर्थाने. आपल्या जीवनातल्या निरनिराळ्या अनुभवांवर विचार केल्यानंतर त्याने असा निष्कर्ष काढला: “देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.” (उपदेशक १२:१३) मानव प्रतिष्ठा, संपत्ती, प्रसिद्धी किंवा सत्ता मिळवण्याद्वारे नाही, तर देवाची इच्छा पूर्ण करण्याद्वारे आपल्या क्षमतांची सर्वोच्च पातळी गाठू शकतात.

नम्रतेमुळे गौरव होते

स्वतःवर वाजवी प्रमाणात प्रेम बाळगणे चुकीचे नाही. बायबलमध्ये आपल्याला अशी आज्ञा देण्यात आली आहे, की “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.” (मत्तय २२:३९) तसेच आराम व आनंद मिळवण्याची इच्छाही स्वाभाविक आहे. पण शास्त्रवचने आपल्याला मेहनत करण्याचे व नम्र असण्याचेही प्रोत्साहन देतात. (नीतिसूत्रे १५:३३; उपदेशक ३:१३; मीखा ६:८) जे लोक प्रामाणिक व भरवशालायक असतात आणि जे मेहनत करतात त्यांच्याकडे सहसा दुर्लक्ष होत नाही, त्यांना चांगले काम मिळते आणि ते इतरांचा आदरही मिळवतात. हे नक्कीच, वैयक्‍तिक फायद्याकरता इतरांचा गैरफायदा घेण्यापेक्षा किंवा इतरांशी एखाद्या पदवीकरता स्पर्धा करण्यापेक्षा चांगले आहे.

येशूने आपल्या श्रोत्यांना लग्नाच्या मेजवानीत सर्वात मुख्य आसन निवडू नका असा इशारा दिला. त्याने त्यांना सर्वात खालच्या आसनावर जाऊन बसण्याचा सल्ला दिला जेणेकरून यजमानाला इच्छा असल्यास तो त्यांना वरच्या आसनावर बसण्यास सांगू शकतो. यामागचे तत्त्व स्पष्ट करताना येशूने म्हटले: “जो कोणी आपणाला उंच करितो तो नमविला जाईल; व जो आपणाला नमवितो तो उंच केला जाईल.”—लूक १४:७-११.

खरे ख्रिस्ती महत्त्वाकांक्षी वृत्ती टाळतात

बायबल सांगते की गर्विष्ठ महत्त्वाकांक्षा ही मानवी अपरिपूर्णतेशी संबंधित आहे. (याकोब ४:५, ६) प्रेषित योहान हा एकेकाळी महत्त्वाकांक्षी होता. उच्च पद मिळवण्याची त्याला इतकी उत्कट इच्छा होती की त्याने व त्याच्या भावाने बेधडक येशूला त्याच्या राज्यात आपल्याला अगदी उच्च स्थान देण्याची मागणी केली. (मार्क १०:३७) कालांतराने, योहानाने आपल्या मनोवृत्तीत बदल केला. किंबहुना, त्याच्या तिसऱ्‍या पत्रात त्याने दियत्रफेस याला सडेतोड शब्दांत दोषी ठरवले कारण त्याला “अग्रगण्य होण्याची लालसा” होती. (३ योहान ९, १०) आज ख्रिस्ती, येशूच्या शब्दांचे प्रामाणिकपणे पालन करतात आणि नम्र मनोवृत्ती बाळगतात. त्याचवेळेस ते वयस्क प्रेषित योहानाच्या उदाहरणाचे पालन करून महत्त्वाकांक्षी वृत्ती टाळतात.

पण वस्तुस्थिती पाहिल्यास, एखाद्याजवळ कौशल्ये, क्षमता असल्या, तो चांगले काम करत असला किंवा खूप मेहनत करत असला तरीसुद्धा या सर्व गोष्टींची दखल घेतली जाईलच असे नाही. कधीकधी अशा व्यक्‍तींची इतरांकडून प्रशंसा केली जाते आणि कधी केली जात नाही. (नीतिसूत्रे २२:२९; उपदेशक १०:७) कधीकधी, कमी योग्यता असलेल्या व्यक्‍तींना अधिकारपदी बसवले जाते पण जे जास्त कार्यक्षम आहेत अशा व्यक्‍तींकडे दुर्लक्ष केले जाते. या अपरिपूर्ण जगात ज्यांना पद व अधिकार मिळतात ते सर्वात योग्य असतीलच असे नाही.

खऱ्‍या ख्रिश्‍चनांकरता महत्त्वाकांक्षी वृत्ती चांगली की वाईट असा विवाद निर्माणच होत नाही. बायबलच्या आधारावर प्रशिक्षित असलेला त्यांचा विवेक त्यांना महत्त्वाकांक्षी वृत्तीपासून दूर राहण्यास साहाय्य करतो. ते केवळ, सर्व परिस्थितीत आपल्याकडून होईल तितकी चांगली कामगिरी करून देवाचे गौरव करण्याचा प्रयत्न करतात आणि परिणाम देवाच्याच हातात सोडून देतात. (१ करिंथकर १०:३१) ख्रिस्ती, देवाचे भय मानून व त्याच्या आज्ञांचे पालन करून आपल्या क्षमतांची सर्वोच्च पातळी गाठण्याचा प्रयत्न करतात. (g०५ ६/८)

[१६ पानांवरील चित्र]

देवाने अब्राहामला महत्त्वाकांक्षी होण्यास प्रोत्साहित केले का?