व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

साफसुथरे घरकूल आपल्या सर्वांचाच हातभार

साफसुथरे घरकूल आपल्या सर्वांचाच हातभार

साफसुथरे घरकूल आपल्या सर्वांचाच हातभार

मेक्सिकोतील सावध राहा! लेखकाकडून

स्वच्छ, अदूषित परिसरात राहणे किती आल्हाददायक आहे! पण, शहरांमध्ये वाढत असलेला कचऱ्‍यामुळे, आपला परिसर स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवणे कठीण झाले आहे.

नगरपालिका, कचरा गोळा करण्याची व्यवस्था करून रस्ते स्वच्छ ठेवण्याचा बराच प्रयत्न करतात. परंतु तरीसुद्धा काही ठिकाणी कचरा साठतच राहतो. हे दृश्‍य पाहायला नको वाटते शिवाय ते लोकांच्या आरोग्यासही धोकादायक होते. साठलेल्या कचऱ्‍यामुळे, उंदरांना, झुरळांना व रोगराई फैलावणाऱ्‍या कीटकांना आश्रय मिळतो. आपला परिसर स्वच्छ ठेवण्याच्या बाबतीत तुम्ही काही करू शकता का? तुम्ही आपले घर, आपला परिसर स्वच्छ आणि नीटनेटका ठेवू शकता.

उचित मानसिकता

काही लोकांना वाटते, की गरिबी म्हणजे गलिच्छ वस्ती किंवा घरे. परंतु हे नेहमीच बरोबर नाही. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी भौतिक साधनांची गरज आहे हे खरे असले तरी, एक स्पॅनिश म्हण अशी आहे: “गरिबी आणि स्वच्छता एकमेकांच्या विरोधात नाहीत.” दुसरीकडे पाहता, एखाद्याजवळ भरपूर भौतिक साधने असली तरी तो आपला परिसर स्वच्छ ठेवेलच असे नाही.

घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे हे एका मनोवृत्तीवर अवलंबून आहे व ही मनोवृत्ती आपल्याला आपले घर स्वच्छ ठेवण्यास प्रवृत्त करते. खरे पाहता, घराची स्वच्छता बहुतांशी संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक वृत्तीवर अवलंबून आहे. म्हणूनच, आपल्या घराची आणि आपल्या परिसराची स्वच्छता ठेवण्यात आपण हातभार कसा लावू शकतो याची परीक्षण करणे उत्तम आहे.

स्वच्छता उपक्रम

आईचे घरकाम कधीच संपत नाही, असे म्हणतात. स्वयंपाक व मुलांना शाळेसाठी तयार करण्याव्यतिरिक्‍त तिला घर आणि अंगणही स्वच्छ ठेवावे लागते. तुमच्या कधी लक्षात आले का, मुलांनी टाकलेले मळीन कपडे किंवा इकडेतिकडे फेकलेली खेळणी आईच सहसा उचलत असते? एक साधा व स्पष्ट स्वच्छता कार्यक्रम तयार केल्यामुळे आईचे ओझे हलके होऊ शकेल. या कार्यक्रमांतर्गत कुटुंबातील प्रत्येक सदस्याला कामे वाटून द्यावीत.

काही पत्नींना वाटते, की घरातील काही गोष्टींकडे दररोज लक्ष दिले पाहिजे व त्या साफ केल्या पाहिजेत. तर बाकीच्या काही गोष्टी आठवड्यातून एकदा आणि इतर काही गोष्टी महिन्यातून एकदा साफ केल्या तरी चालतात. आणि खरे तर काही गोष्टी वर्षातून एकदा साफ करण्याची योजना केली जाऊ शकते. जसे की, बेथेल गृहांमध्ये, प्रत्येक राष्ट्रांतील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरांमध्ये, वर्षांतून एकदा अगदी बारकाईने क्लोझेट क्लिनिंग केले जाते. याप्रसंगी, वापर होत नसलेल्या गोष्टी फेकून देण्याची व क्लोझेट टापटीप ठेवण्याची संधी मिळते. आतील भिंती स्वच्छ करण्याचा देखील एक नियमित उपक्रम असतो.

घरातील काही ठिकाणे अशी असतात ज्यांची स्वच्छता चांगल्या आरोग्यासाठी करणे आवश्‍यक असतात; जसे की बाथरूमची स्वच्छता. बाथरूम दररोजच स्वच्छ करणे आवश्‍यक असले तरी, आठवड्यातून एकदा ते घासले पाहिजे जेणेकरून तिथे कीटाणू जमणार नाहीत. काहींना वाटते, की शौचकूपात तर डाग पडतच राहतात आणि ते निघत नाहीत. पण तुम्हाला अशीही घरे पाहायला मिळतील ज्यांची शौचालये अगदी चकचकीत असतात. यासाठी, नियमित स्वच्छता व उचित स्वच्छता उत्पादनांचा उपयोग करण्याची गरज आहे.

स्वयंपाक घर देखील काळजीपूर्वक स्वच्छ करण्याची गरज आहे. तुम्ही दररोज खरकटी भांडी धुवत असला, स्टोव्ह किंवा गॅस व किचन ओटा स्वच्छ करत असला तरीसुद्धा, वेळोवेळी—निदान महिन्यातून एकदा तरी—तुम्ही चांगल्याप्रकारे स्वच्छता करू शकता. जसे की, गॅस शेगडी आणि फ्रीजची मागची बाजू, सिंक खालची जागा तुम्ही स्वच्छ करू शकता. स्वयंपाक घराची किंवा कपाटांची वेळच्या वेळी साफसफाई केल्याने झुरळांना व इतर हानीकारक कीटकांना तिथे वस्ती करायला जागा मिळणार नाही.

कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य

काही पालक आपल्या मुलांसाठी नियम बनवतात आणि त्यांना शिकवतातही की, सकाळी शाळेला निघण्याआधी त्यांनी आपापला बिछाना काढून घडी घालून ठेवला पाहिजे, मळीन कपडे योग्य ठिकाणी ठेवले पाहिजेत आणि वस्तू जागच्या जागी ठेवल्या पाहिजेत. घरातील सर्वांसाठी एक नियम बनवला पाहिजे जो अतिशय उपयुक्‍त आहे: “प्रत्येक वस्तुची एक जागा आहे आणि प्रत्येकाने आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या पाहिजेत.”

तसेच, कुटुंबातील काही सदस्यांना घरातील विशिष्ट कामे नेमण्यात यावीत किंवा घरातील एखादा हिस्सा स्वच्छ करण्याचे काम नेमण्यात यावे. जसे की, वडील वर्षातून एकदातरी आपल्या गॅरेजची साफसफाई करून ते व्यवस्थित करतात का? त्यांचा मुलगा अथवा मुलगी त्यांना या कामात मदत करू शकतो का? घरासमोरच्या जागेत वाढलेले जंगली गवत किंवा बागेतील गवत कापण्याचे काम कोणाचे आहे? बाहेरूनही घर आकर्षक दिसावे म्हणून असे कितींदा करण्याची गरज आहे? तुमच्या घरात माळा असेल तर तो तुम्ही वेळोवेळी साफ करता का? तो कोण साफ करेल? किंवा मग, तुम्हाला दररोज लागत नाहीत अशा वस्तू ठेवण्याची एखादी वेगळी खोली असेल तर त्या खोलीतून अनावश्‍यक गोष्टी फेकून तुम्ही वरच्यावर खोली स्वच्छ करता का? काही पालक आपल्या मुलांना आळीपाळीने अशी साफसफाईची कामे देतात.

आपले घर नीटनेटके ठेवण्यासाठी एक उत्तम उपक्रम बनवा. मुख्य गोष्ट, हा उपक्रम तुम्ही स्वतः करणार असाल किंवा मग आपल्या कुटुंबाबरोबर करणार असाल अथवा तुम्हाला मदत करण्याकरता एखाद्या मोलकरणीला हाताशी घेणार असाल, ही नाही; मुख्य गोष्ट ही आहे की तुम्ही असा एक उपक्रम बनवला पाहिजे. आपले घर नीटनेटके ठेवणाऱ्‍या एका आईने सांगितले, की तिच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्‍ती घर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करते. ती म्हणते: “आम्ही, माझ्या तीन मुली आणि मी अशा चौघींत कामं वाटून घेतली आहेत. नॉर्मा एड्रियना, बैठकीची खोली, दोन बेडरूम, घरासमोरचे अंगण आणि समोरचा रस्ता स्वच्छ करते. ॲना जोयकिना स्वयंपाकघर सांभाळते. मी धुणं आणि बाकीची कामं करते आणि मारीया डेल कारमन भांडी करते.”

घराचा प्रसन्‍न चेहरा

आता घराबाहेरच्या परिसराविषयी पाहू या. तुम्ही मोठ्या घरात राहत असला किंवा लहानशा घरात राहत असला तरी, घराबाहेरचा परिसर स्वच्छ ठेवण्याचाही एक उपक्रम बनवणे आवश्‍यक आहे. जसे की, घरासमोरील फाटकाची बिजागरी ढिली झाली असेल. नवीन बिजागरी बसवली नाही तर, फाटक किती वाईट दिसेल हे तुम्हाला माहीतच आहे. एक दिवशी तर फाटक निखळून खाली पडेल. घराच्या दारातच किंवा घराकडे येणाऱ्‍या मार्गात जर तुम्ही कचरा साठू दिलात तर आपल्या घराला काही शोभाच राहणार नाही. घराबाहेरच्या आवारात मोकळे डबे, उपकरणे किंवा इतर अनावश्‍यक गोष्टी साठू दिल्यास तेथे उंदरा-सापांना आपले बस्तान मांडण्यासाठी आयती जागा मिळेल.

काही कुटुंबात असे ठरवले जाते, की घराबाहेरचा आवार, घराकडे येणारी पायवाट किंवा मग घरासमोरील रस्ता गरज लागेल तशी, दिवसातून एकदा किंवा दर आठवडी स्वच्छ केला पाहिजे. हे खरे आहे, की काही देशांतल्या नगरपालिकांनी, परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उत्तम व्यवस्था केल्या आहेत; परंतु इतर देशांत नगरपालिकांचे उपक्रम नसतात. पण आपण राहत असलेला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण प्रत्येकाने आपली जबाबदारी पूर्ण केली तर परिसर स्वच्छ दिसेलच शिवाय लोकांचे आरोग्यही अधिक चांगले राहील, यात काही शंका नाही.

काही कुटुंबात, वर सांगितलेल्या कामांचा फक्‍त उपक्रमच नसतो तर ते, एक आराखडा बनवून एखाद्या कागदावर लिहून तो अशा ठिकाणी लावतात जिथे कुटुंबातील प्रत्येक सदस्य तो पाहू शकतो. याचे खूप फायदे आहेत. अर्थात, साफसफाईविषयी तुम्हाला जे जे माहीत असले पाहिजे त्या सर्वांची आम्ही नोंद केलेली नाही. जसे की, तुमच्या भागात कोणती धुलाई उत्पादने जास्त चालतात आणि कोणती साधने तुमच्या खिशाला परवडतील अशा भावात तुम्ही मिळवू शकाल ते पाहिले पाहिजे.

या काही सूचनांमुळेच, सबंध कुटुंबाला, आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याच्या महत्त्वाची जाणीव होईल, यात काही शंका नाही. लक्षात ठेवा, घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे हे तुमच्या खिशावर नव्हे तर तुमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. (g०५ ६/८)

[२२, २३ पानांवरील चौकट]

गृह स्वच्छतेचा व्यवहारोपयोगी उपक्रम

यादीतील मोकळ्या जागेत, तुमचे मुद्दे लिहा

महत्त्वाची सूचना: काही धुलाई उत्पादनांचे मिश्रण अतिशय धोकादायक असू शकते; खासकरून, ब्लीच आणि अमोनिया यांचे मिश्रण करू नका

दररोज

बेडरूम: बिछाना करा आणि सर्व गोष्टी जागच्या जागी ठेवा

स्वयंपाकघर: भांडी आणि सिंक धुवा. किचन ओटा आणि टेबलावर वस्तू साठवून ठेवू नका. गरज असल्यास खोली झाडून पुसून घ्या

बाथरूम: सिंक आणि शौचालय धुवा. सर्व वस्तू जागच्या जागी ठेवा

बैठकीची खोली आणि इतर खोल्या: सर्व वस्तू जागच्या जागी ठेवा. फर्निचर पुसून घ्या. गरज असल्यास खोली झाडून पुसून घ्या, किंवा व्हॅक्यूमने स्वच्छ करा.

संपूर्ण घर: सर्व कचरा योग्य ठिकाणी फेका.

आठवड्याला

बेडरूम: चादरी धुवा. गरज असल्यास, खोली झाडून, पुसून घ्या किंवा व्हॅक्यूमने स्वच्छ करा. फर्निचरवरची धूळ पुसा.

किचन: शेगडी, ओट्यावर ठेवली जाणारी उपकरणे आणि सिंक धुवून काढा. फरशी पुसून घ्या.

बाथरूम: बाथरूमच्या भिंती आणि सिंक असेल तर ते धुवून काढा. शौचकूप, बाथरूममधील कॅबिनेट आणि इतर गोष्टी जंतुनाशक द्रव्याने स्वच्छ करा. टॉवेल बदला. फरशी झाडून पुसून काढा.

महिन्याला

बाथरूम: सर्व भिंती घासून काढा

संपूर्ण घर: सर्व दारांच्या चौकटी स्वच्छ करा. गाद्यांचे कव्हर व्हॅक्यूमने स्वच्छ करा किंवा धुवून काढा.

बाग, अंगण, गॅरेज: झाडून काढा, गरज असेल तर धुवून काढा. अनावश्‍यक वस्तू साठू देऊ नका.

दर सहा महिन्याला

बेडरूम: उत्पादकांच्या सूचनांनुसार बिछान्यावर घालण्याच्या चादरी धुवा

स्वयंपाकघर: फ्रीज मोकळा करून चांगल्याप्रकारे साफ करा

बाथरूम: बाथरूममधील कॅबिनेट, ड्रॉवर असतील तर ते मोकळे करून स्वच्छ करा. तुम्ही वापरत नसलेल्या किंवा जुन्या झालेल्या वस्तू फेकून द्या

संपूर्ण घर: दिवे, पंखे, लॅम्प स्वच्छ करा. दारे पुसून काढा. खिडक्यांना लावलेल्या जाळ्या, खिडक्या, खिडक्यांच्या काचा धुवून काढा

वर्षाला

बेडरूम: बेडरूममध्ये असलेली कपाटे मोकळी करा आणि चांगल्याप्रकारे स्वच्छ करा. अनावश्‍यक गोष्टी फेकून द्या. ब्लँकेट, रजया इत्यादी धुवा. गाद्या व्हॅक्यूमने स्वच्छ करा किंवा मग एक-दोन दिवस उन्हात ठेवा. उत्पादकांच्या सूचनांनुसार उशा स्वच्छ करा

स्वयंपाकघर: सर्व कपाटे, मांडण्या रिकाम्या करून स्वच्छ करा. अनावश्‍यक वस्तू फेकून द्या. उपकरणे बाजूला काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्यांच्या खालची फरशी किंवा ओटा स्वच्छ पुसता येईल

संपूर्ण घर: सर्व भिंती धुवून काढा. उत्पादकांच्या सूचनांनुसार, उशांचे, गाद्यांचे कव्हर, पडदे धुवून काढा

गाडी ठेवण्याचे गॅरेज किंवा सामान ठेवण्याची खोली. चांगल्याप्रकारे झाडून काढा. सर्व गोष्टी जागच्या जागी ठेवा आणि अनावश्‍यक गोष्टी फेकून द्या

[२४ पानांवरील चित्रे]

“प्रत्येक वस्तुची एक जागा आहे आणि प्रत्येकाने आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या पाहिजेत”

[२४ पानांवरील चित्रे]

तुम्ही वापरत नसलेल्या गोष्टींची विल्हेवाट लावल्यामुळे घर आणखी स्वच्छ दिसेल