व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एक तरुणी माझ्या प्रेमात पडते तेव्हा माझी प्रतिक्रिया कशी असावी?

एक तरुणी माझ्या प्रेमात पडते तेव्हा माझी प्रतिक्रिया कशी असावी?

तरुण लोक विचारतात . . 

एक तरुणी माझ्या प्रेमात पडते तेव्हा माझी प्रतिक्रिया कशी असावी?

“सुझननं पुढाकार घेतला, माझी याला काही हरकत नाही. मला ते पटलं.”—जेम्स. *

“पुरुषानं स्त्रियांबरोबर प्रामाणिकपणे व्यवहार केला नाही तर, याचे परिणाम अतिशय घातक ठरू शकतात.”—रोबर्टो

अलिकडेच, एक तरुणी तुमच्याकडे येऊन म्हणाली, की तिला तुम्हाला काहीतरी विचारायचं. या मुलीला तुम्ही नेहमी मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात पाहता. तुम्हाला तिच्याबरोबर बोलायला, कामं करायला आवडतं. पण तिने तुम्हाला जे सांगितलं ते ऐकून तुम्ही थक्क झाला आहात. ती तुमच्या प्रेमात पडली आहे आणि तुम्हालाही तिच्याबद्दल असंच वाटतं का, हे तिला माहीत करून घ्यायचं आहे.

प्रणयराधनेचे संकेत हे आधी पुरुषाने दिले पाहिजे, अशा विचाराचे तुम्ही असाल तर तुम्हाला या मुलीने जे काही केले त्याबद्दल आश्‍चर्य वाटेल. सहसा पुरुषच पहिले पाऊल उचलतात हे खरे असले तरी, या मुलीने पहिले पाऊल उचलून बायबल तत्त्वांचे उल्लंघन केले नाही, हे लक्षात ठेवा. * ही वस्तुस्थिती जर तुम्ही समजून घेतलीत तर तुम्ही उचित प्रतिक्रिया दाखवाल.

याबाबतीत योग्य विचार केल्यानंतर तुम्हाला असे वाटेल, की प्रणयराधनेसाठी तुम्ही अद्याप तयार नाही किंवा त्या मुलीला तुमच्याविषयी जसे वाटते तसे तुम्हाला तिच्याविषयी अद्यापतरी वाटत नाही. आपण त्या मुलीला चुकीचा संदेश दिला की काय, म्हणून तुम्हाला वाईटही वाटेल. अशावेळी तुम्ही काय करावे? सर्वप्रथम, तुम्ही तिच्या भावनांचा विचार केला पाहिजे.

तिच्या भावनांचा विचार करा

या परिस्थितीत असलेल्या एका मुलीच्या मनात काय काय चाललेले असते त्याचा विचार करा. तुम्हाला प्रभावीत करण्यासाठी तुमच्याबरोबर बोलण्याआधी तिने कित्येक दिवसांपासून शब्दांची अक्षरशः जुळवाजुळव करून ते पाठ केले असतील. उचित प्रकारचे हास्य आणून उचित शब्द बोलून झाल्यावर, मुलाने म्हणजे तुम्ही, नाही म्हणाला तर, या शक्यतेचाही तिने विचार केला असेल. आणि मग आपले सर्व धैर्य एकवटून, आपल्या मनातील भीतीवर मात करून तिने आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवली असेल.

पण तिने इतका हा आटापिटा का केला असावा? कारण ती तुमच्या प्रेमात पडली आहे. शिवाय तिने कदाचित तुमच्यातले उत्तम गुण पाहिले असावेत जे इतरांना दिसले नसावेत. त्यामुळे तिने जणू काय तिच्या शब्दांतून तुमची प्रशंसा केली. अशी प्रशंसा सहसा तुम्हाला दररोज कोणाकडून मिळणार नाही.

तुम्ही तुमचा निर्णय बदलावा, म्हणून हे मुद्दे सांगितले जात नाहीत, तर तुम्ही दयाळुपणे प्रतिक्रिया दाखवावी अशी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी सांगितले जात आहेत. जुली नावाच्या एका तरुणीने म्हटले: “एखाद्या तरुणाला, एखाद्या तरुणीविषयी प्रणयराधनेच्या भावना नसल्या तरी, आपल्याकडे कोणाचे तरी लक्ष आहे या विचाराने तरी त्याला कृतज्ञ वाटलं पाहिजे. त्यामुळे, ‘नाही,’ असं बोथटपणे सांगण्याऐवजी त्याने निदान तिच्याशी चांगलं वागलं पाहिजे आणि तिच्या भावना न दुखावता, ‘मला तुझ्याविषयी तशा भावना नाहीत,’ असं सांगावं.” समजा तुम्ही असेच म्हणजे तिच्या “भावना न दुखावता” किंवा अगदी सौम्य पद्धतीने तिला नकार दर्शवण्याचा विचार करता.

पण याआधीसुद्धा तुम्ही तिला नकार दिला होता, मग? आता तुम्हाला, तिला सरळ सरळ सांगावेसे वाटेल. पण असे करू नका. नीतिसूत्रे १२:१८ म्हणते: “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करितो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.” ‘सुज्ञांच्या जिव्हेने’ तुम्ही कसे बोलू शकाल?

तिने आपल्या भावना व्यक्‍त केल्या, आपल्याबद्दल आदर व्यक्‍त केला म्हणून तुम्ही तिचे आभार मानू शकता. तुम्ही अजाणतेत तिला चुकीचा संदेश दिला, याबद्दल तिची क्षमा मागा. स्पष्ट परंतु दयाळुपणे तिला सांगा, की तिला जसे तुमच्याबद्दल वाटते तसे तुम्हाला तिच्याबद्दल वाटत नाही. एवढे सांगूनही जर तिला तुमचे उत्तर समजत नसेल तर तुम्हाला आणखी ठामपणे तिला सांगावे लागले; परंतु असे करताना, कठोर किंवा खोचक शब्द वापरू नका. जरा सबुरीने घ्या कारण तुम्हाला तिच्या कोमल भावनांचा विचार केला पाहिजे. तुम्ही जर तिच्या जागी असता तर, तिने नरमाईने उत्तर दिलेले तुम्हाला आवडले असते, हो ना?

परंतु ती कदाचित म्हणत राहील, की तुम्ही मुद्दामहून तिची दिशाभूल करीत होता. तुम्ही तिच्याशी कसेकसे वागला होतात ज्यामुळे तिला तुमच्याबद्दल असे वाटू लागले होते, हे ती कदाचित सांगेल. ती म्हणेल, ‘तू मला ते फूल दिलं होतंस, आठवतं?’ किंवा ‘त्या दिवशी आपण सोबत चाललो होतो, तेव्हा तू मला काय म्हणाला होतास, आठवतं?’ आता तुम्हाला जरा गंभीरपणे स्वतःचे परीक्षण करावे लागेल.

सत्याला सामोरे जा

गतकाळात, संशोधकांनी ज्या भूमींचा शोध लावला त्या, जणू काय त्यांनी विजयामुळे किंवा लूटीमुळे मिळवल्या, असे ते समजायचे. काही तरुणांचा तरुणींबद्दलचा असाच समज असतो. त्यांना त्यांच्याबरोबर मैत्री करायला आवडते परंतु लग्नाची जबाबदारी नको असते. वचनबद्धतेविना ते स्त्रियांशी गोड गोड बोलून त्यांच्या भावनांशी खेळतात. असा तरुण, फसवणुकीद्वारे एखाद्या तरुणीचे प्रेम मिळवतो. एका ख्रिस्ती वडिलांनी यावर अशी टिपणी केली: “काही तरुण कधी या मुलीबरोबर तर कधी त्या मुलीबरोबर असतात. तरुणींच्या भावनांशी अशाप्रकारे खेळणं बरोबर नाही.” अशा स्वार्थी वृत्तीचा परिणाम काय होतो?

“जो आपल्या शेजाऱ्‍याला फसवितो आणि म्हणतो की, ‘मी थट्टा नव्हतो का करीत?’ तो कोलिते, बाण व मारक शस्त्रे फेकणाऱ्‍या वेड्यासारखा आहे.” (नीतिसूत्रे २६:१८) एक तरुण जेव्हा स्वार्थी कारणांसाठी एखाद्या तरुणीबरोबर मैत्री करतो, तेव्हा त्याचे बिंग फुटल्यावर त्या तरुणीला त्याचे खरे हेतू दिसून येतील. यामुळे या तरुणीवर किती मोठा मानसिक आघात होऊ शकतो हे पुढील उदाहरणावरून दिसून येते.

एका तरुणाने एका तरुणीबरोबर अशीच मैत्री केली. पण तिच्याबरोबर लग्न करण्याचा त्याचा इरादा नव्हता. तो तिला चांगल्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचा; ते सोबत पार्ट्यांना जायचे. त्याला तिचा सहवास आवडायचा. आणि त्याचं आपल्याकडे लक्ष आहे या गोड जाणीवेत तीही आनंदी होती. तिला वाटले, की तो तिच्याबरोबर नक्की लग्न करेल. पण जेव्हा तिला कळले, की त्याला फक्‍त आपल्याबरोबर मैत्री करायला आवडते, तेव्हा मात्र ती खूप खिन्‍न झाली.

आत्ताच तुमच्याकडे आलेल्या तरुणीला तुम्ही अजाणतेत का होईना पण चुकीचा संदेश दिला असेल, तर तुम्ही काय केले पाहिजे? उडवाउडवीची उत्तरे दिल्याने किंवा पळवाटा काढण्याचा प्रयत्न केल्याने तिला आणखीनच वाईट वाटू शकते. “जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याजवर दया होते,” या बायबल तत्त्वाचा विचार करा. (नीतिसूत्रे २८:१३) यास्तव, सत्य बोला. कोणताही गैरसमज झाला असेल तर त्यास आपण जबाबदार आहोत, हे कबूल करा. आणि तुम्ही खरोखरच तिच्या भावनांचा गैरफायदा घेत होता, तर आपण खरच खूप मोठी चूक केली, हे कबूल करा. प्रामाणिकपणे क्षमा मागा.

परंतु, क्षमा मागितली म्हणजे सर्वकाही संपले असे समजू नका. त्या तरुणीच्या मनात काही दिवसांपर्यंत तुमच्याबद्दलचा राग राहीलच. तुम्हाला कदाचित तिच्या आईवडिलांना तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. तुम्हाला इतरही परिणाम भोगावे लागतील. गलतीकर ६:७ म्हणते: “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” पण क्षमा मागण्याद्वारे व संबंध पुन्हा सुधारण्याकरता तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांद्वारे तुम्ही तिला आयुष्यात पुढे जात राहण्यास मदत कराल. आणि या अनुभवावरून तुम्ही, जीवनाच्या प्रत्येक पैलूत आणि विरुद्धलिंगी व्यक्‍तीबरोबर व्यवहार करताना, ‘आपली जीभ दुर्भाषणापासून . . . आवरण्यास’ शिकाल.—स्तोत्र ३४:१३.

उत्तर देण्याआधी गंभीरपणे विचार करा

पण समजा तुम्ही खरोखरच त्या तरुणीशी आणखी परिचित होऊ इच्छित असाल तर? तर मग, गाठीभेटी आणि प्रणयराधना, एकमेकांबरोबर फक्‍त वेळ घालवण्याचे मार्ग नाहीत. गाठीभेटी करणाऱ्‍या युगुलाच्या मनात उत्पन्‍न होणाऱ्‍या तीव्र भावना दाखवून देतात, की ते लग्न करून एकमेकांना वचनबद्ध होऊ इच्छितात. लग्नानंतर पती व पत्नी म्हणून याच भावना त्यांच्या नातेसंबंधाला आणखी मजबूत करतात. आता, तुम्हाला काय वाटते?

या तरुणीचा विचार केल्यानंतर तुम्हाला दिसेल, की तिच्या अंगी अनेक चांगले गुण आहेत. तिने जणू काय दार उघडले आहे आणि ते दार उघडेच राहावे अशी तुमची इच्छा आहे. पण प्रणयराधनेस लगेच सुरुवात करू नका. भविष्यात होऊ शकणाऱ्‍या यातनामय दुःखापासून दोघांचेही संरक्षण होण्याकरता आताच पावले उचला.

तुम्हाला, तिला ओळखत असलेल्या काही प्रौढ लोकांना तिच्याविषयी विचारावेसे वाटेल. तिलाही असेच करायला सुचवा. तुम्ही दोघांनी या प्रौढांना विचारले पाहिजे, की ते, दुसऱ्‍या व्यक्‍तितल्या कोणत्या गुणांना सद्‌गुण व दुर्गुण म्हणतात? तुम्ही कदाचित ख्रिस्ती वडिलांनाही त्यांचे मत विचारू शकता. तुमच्याकडे आकर्षित झालेल्या व्यक्‍तीचे ख्रिस्ती मंडळीत चांगले नाव आहे, हे माहीत असणे चांगले आहे.

पण तुम्ही म्हणाल, ‘माझ्या खाजगी जीवनात दुसऱ्‍यांना कशाला गोवायचं?’ वास्तविक पाहता, खाजगी गोष्टीत आणि याबाबतीत प्रणयाबाबतच्या गोष्टींतही इतरांचे विचार घेण्यात सुज्ञपणा आहे. किंबहुना ते शास्त्रवचनानुसार आहे; कारण नीतिसूत्रे १५:२२ म्हणते: “मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात.” तुम्ही ज्या प्रौढांबरोबर बोलता ते तुमच्यासाठी निर्णय घेणार नाहीत. पण त्यांनी ‘मनापासून दिलेल्या मसलतीमुळे,’ तुम्हाला दिसणार नाहीत असे दुसऱ्‍या व्यक्‍तीतले आणि तुमच्या जीवनातले गुण कदाचित दिसून येतील.—नीतिसूत्रे २७:९.

सुरुवातीला ज्याचा उल्लेख करण्यात आला त्या जेम्सने असे केले. तो वेगळे राहत होता तरीपण तो सुझनविषयी आपल्या आईवडिलांबरोबर बोलला. मग या दोघांनी, आमची जोडी तुम्हाला कशी वाटते, यावर आपले मत काय आहे असे इतर प्रौढांना विचारले. एकमेकांबद्दलची सकारात्मक मते ऐकल्यानंतर, जेम्स आणि सुझन एकमेकांना भेटू लागले व आपण लग्न करू शकतो का, या शक्यतेचा विचार करू लागले. तुम्हीसुद्धा भावनिकरीत्या गोवण्याआधी असेच करू शकता. यामुळे, तुम्ही शेवटी जो निर्णय घ्याल त्याबद्दल तुम्हाला पस्तावा होणार नाही.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यहोवाला प्रार्थना करा. लग्नाचा इरादा मनी बाळगूनच गाठीभेटी केल्या जात असल्यामुळे, या तरुण स्त्रीबरोबर तुम्ही वाढवत असलेल्या नातेसंबंधाची परिणती लग्नातच होईल हे पाहण्यास आपल्याला मदत करावी म्हणून तुम्ही देवाला प्रार्थना करू शकता. याहूनही महत्त्वाचे म्हणजे, तुझ्या जवळ येण्यास आम्हाला मदत करतील असे निर्णय घेण्यास आम्हा दोघांनाही मदत कर अशी, तुम्ही देवाला प्रार्थना करू शकता. यातच तुम्हा दोघांचा आनंद दडलाय. (g०५ ६/२२)

[तळटीपा]

^ या लेखातील नावे बदलण्यात आली आहेत.

^ सावध राहा! याच्या ऑक्टोबर २२, २००४ आणि डिसेंबर २२, २००४ (दोन्ही इंग्रजी) अंकातील “तरुण लोक विचारतात” या मालिकेत, एक तरुणी प्रणयराधनेच्या आपल्या भावना एका तरुणाला व्यक्‍त करण्यास उचितरीत्या पुढाकार कशी घेऊ शकते, यावर चर्चा करण्यात आली आहे.

[१९ पानांवरील चित्रे]

तुमचा लग्न करण्याचा खरोखरच इरादा नसेल तर, तुम्ही चुकीचे संदेश देत नाही याबाबत दक्षता बाळगा