व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रक्‍ताच्या शाईने लिहिलेला इतिहास

रक्‍ताच्या शाईने लिहिलेला इतिहास

रक्‍ताच्या शाईने लिहिलेला इतिहास

आता आतापर्यंत, लोकांचा असा ग्रह होता की दहशतवाद हा फक्‍त काही तुरळक ठिकाणीच घडू शकतो. उत्तर आयर्लंड, उत्तर स्पेनचा बास्क प्रदेश, मध्य पूर्व यांसारखी नावे सहसा दहशतवादाशी जोडली जायची. पण आता विशेषतः ११ सप्टेंबर, २००१ रोजी न्यूयॉर्क येथील ट्‌विन टावर्सवर अतिरेकी हल्ला झाल्यापासून दहशतवाद अचानक सबंध जगातील निरनिराळ्या ठिकाणी डोके वर काढू लागला आहे. निसर्गरम्य बाली बेट, माद्रिद, स्पेन, लंडन, इंग्लंड, श्रीलंका, थायलंड आणि नेपाळसारखा देशसुद्धा दहशतवादाच्या विळख्यातून सुटला नाही. तसा दहशतवाद मानव इतिहासात पूर्वी कधी घडलाच नव्हता अशातला भाग नाही. पण “दहशतवाद” म्हणजे नेमके काय?

“समाजातील लोकांना किंवा सरकारांना दहशत बसावी म्हणून किंवा त्यांना विशिष्ट कृती करण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने, एखाद्या व्यक्‍तीने किंवा संघटननेने आदर्शवादी किंवा राजकीय कारणांनी प्रेरित होऊन, बेकायदेशीररित्या जोरजबरदस्ती किंवा हिंसाचार करणे, अथवा असे करण्याची धमकी देणे” अशी दहशतवादाची व्याख्या करण्यात आली आहे. (दी अमेरिकन हेरिटेज डिक्शनरी ऑफ दी इंग्लिश लँग्वेज) पण, लेखिका जेसिका स्टर्न यांच्या मते: “दहशतवाद या विषयावर अभ्यास करणाऱ्‍या विद्यार्थ्याला या शब्दाच्या अनेक व्याख्या वाचायला मिळतात. . . . पण त्या सर्वांमध्ये दहशतवादाची दोन अशी महत्त्वाची वैशिष्ट्ये उठून दिसतात, ज्यांमुळे तो इतर प्रकारच्या हिंसाचारापेक्षा वेगळा ठरतो.” ही कोणती वैशिष्ट्ये आहेत? “पहिले म्हणजे, निःशस्त्र लोकांना दहशतवादी हल्ल्यांचे निशाण बनवले जाते. . . . दुसरे म्हणजे, दहशतवाद्यांच्या हिंसाचारी कृत्यांचा उद्देश दुखापत घडवून आणण्यापेक्षा, लोकांच्या मनात भीती निर्माण करणे हा असतो. म्हणूनच, खून किंवा हल्ला यापेक्षा दहशतवाद वेगळा असतो कारण यात मुद्दामहून दहशत निर्माण होईल असा प्रयत्न केला जातो.”

हिंसाचाराची पाळेमुळे

पहिल्या शतकात जुडिया या देशात झीलट्‌स नावाचा एक हिंसाचारी गट होता. त्यांना यहुद्यांना रोमपासून स्वातंत्र्य मिळवून द्यायचे होते. या गटाच्या सर्वात उत्साही सदस्यांना “सिकाराय” किंवा खंजीरधारी हे नाव पडले कारण ते आपल्या कपड्यांखाली लहानसे खंजीर लपवत. जेरूसलेमला सणांकरता एकत्रित झालेल्या यहुद्यांच्या गर्दीत मिसळून ते आपल्या शत्रूंचा गळा कापायचे किंवा त्यांच्या पाठीत भोसकायचे. *

सा.यु. ६६ साली झीलट्‌सच्या एका गटाने मृत समुद्राजवळील मसाडा नावाचा गड जिंकला. त्यांनी रोमी रक्षक सैन्याची कत्तल करून डोंगरावरील या गडाला आपला बालेकिल्ला बनवले. कित्येक वर्षे त्यांनी तेथेच राहून निरनिराळ्या ठिकाणी हल्ले केले व रोमी अधिकाऱ्‍यांना हैराण करून सोडले. सा.यु. ७३ साली सुभेदार फ्लेव्हियस सिल्वा याच्या नेतृत्त्वाखाली रोमच्या दहाव्या फौजेने मसाडा गड तर परत मिळवला पण ते झीलट्‌सवर विजय मिळू शकले नाहीत. त्या कालखंडाच्या एका इतिहासकाराने म्हटले आहे की रोमपुढे हात टेकण्यापेक्षा तेथे असलेल्या दोन स्त्रिया व पाच लहान मुलांना वगळता एकूण ९६० झीलट्‌सनी आत्महत्या करणे पसंत केले.

काहींच्या मते झीलट्‌सचे बंड ही आपल्या काळात होणाऱ्‍या दहशतवादाची सुरुवात होती. हे खरे असो वा नसो, पण काळाच्या ओघात दहशतवादाचा मानव इतिहासावर बराच प्रभाव पडला आहे इतके मात्र खरे.

ख्रिस्ती धर्मजगताने घडवून आणलेला दहशतवाद

एक हजार पंचाण्णवपासून दोन शतकांच्या काळात क्रूसेडर सैन्यांनी युरोप व मध्य पूर्वेत बराच हैदोस घातला. त्यांच्या विरोधात आशिया व उत्तर आफ्रिकेतील मुस्लिम सैन्ये होती. या संघर्षाचा उद्देश जेरूसलेमवर ताबा मिळवण्याचा होता आणि दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत होते. कित्येक लढायांत या “पवित्र लढवय्यांनी” एकमेकांचे अक्षरशः तुकडे तुकडे केले. तसेच निर्दोष लोकांचीही त्यांनी तलवारींनी व कुऱ्‍हाडींनी कत्तल केली. १२ व्या शतकातला एक धर्मगुरू विल्यम ऑफ टायर याने १०९९ साली क्रुसेडर्सनी जेरूसलेममध्ये प्रवेश केला तेव्हाच्या प्रसंगाचे अशाप्रकारे वर्णन केले:

“ते हातात तलवारी व भाले घेऊन रस्त्यांवरून गेले व जो दिसेल त्याला त्यांनी ठार मारले. पुरुष, स्त्रिया, लहान मुले कोणाचीही त्यांनी गय केली नाही. . . . त्यांनी इतक्या लोकांचा जीव घेतला की रस्त्यांवर मृतदेहांची रास जमली. अशी परिस्थिती होती, की मृतदेहांवर पाय ठेवून जाण्याशिवाय मार्गच नव्हता. . . . इतका रक्‍तपात झाला की नाल्यांतून व गटारींतून रक्‍ताचे पाट वाहात होते. गावातल्या रस्त्यांवर प्रेतेच प्रेते होती.” *

नंतरच्या शतकांत अतिरेक्यांनी स्फोटकांचा उपयोग करण्यास सुरुवात केली. ही स्फोटके भयानक होती व त्यांनी असंख्य लोकांचा बळी घेतला.

कोट्यवधी लोक मृत्यूमुखी

इतिहासकारांच्या मते, २८ जून, १९१४ ही तारीख युरोपच्या इतिहासाला कलाटणी देणारी होती. त्यादिवशी, एका तरुणाने ऑस्ट्रियाचा युवराज आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनंड याला गोळ्या घालून ठार मारले. काहीजण त्या तरुणाला वीरपुरूष मानतात. पण त्या घटनेने पहिल्या जागतिक महायुद्धाची ठिणगी पेटली. दोन कोटी लोकांचा बळी घेतल्यावरच हे महायुद्ध शांत झाले.

पहिल्या महायुद्धाच्या पाठोपाठ दुसरे महायुद्ध झाले. छळ छावण्या, बॉम्बवर्षाव करून नागरिकांची हत्या, आणि शत्रूंच्या हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी निर्दोष लोकांची कत्तल ही या युद्धाची वैशिष्ट्ये होती. युद्धानंतरही अतिरेकी, लोकांचा बळी घेतच राहिले. १९७० च्या दशकात कंबोडियाच्या युद्धभूमीत दहा लाखांपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले. आणि रूआंडाचे नागरिक १९९० च्या दशकात झालेल्या ८,००,००० लोकांच्या संहारानंतर अजूनही सावरलेले नाहीत.

१९१४ पासून आपल्या काळापर्यंत पाहिल्यास, अतिरेकी कारवायांमुळे मानवजातीने बरेच दुःख सोसले आहे. तरीपण, आजही लोकांनी गतकाळातून धडा घेतलेला नाही असेच दिसते. दर काही दिवसांच्या अंतराने, अतिरेकी शेकडो लोकांचा जीव घेतात. त्यांच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे हजारो लोकांना कायमचे अपंगत्व येते आणि लाखो लोकांकडून शांततेच्या व सुरक्षिततेच्या भावनेने जगण्याचा हक्क हिरावून घेतला जातो. गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये बॉम्बस्फोट होतात, गावेची गावे जाळून राख केली जातात, स्त्रियांवर बलात्कार केले जातात, मुलांना पळवून नेले जाते, कित्येक लोकांचा नाहक बळी जातो. कोणत्याही कायद्यांना व जागतिक निषेधाला न जुमानता हा अमानुष परिपाठ सुरूच आहे. दहशतवाद कधी थांबेल का? (६/०६)

[तळटीपा]

^ परि. 5 प्रेषितांची कृत्ये २१:३८ यात सांगितल्याप्रमाणे एका रोमी सेनाधिपतीने प्रेषित पौलावर, तो ४,००० ‘मारेकऱ्‍यांचा’ म्होरक्या होता असा आरोप लावून त्याला गैरवागणूक दिली.

^ परि. 10 येशूने त्याच्या शिष्यांना, शत्रूंचा द्वेष करा व त्यांचा जीव घ्या असे नव्हे, तर “आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा” असे सांगितले होते.—मत्तय ५:४३-४५.

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

जून २८, १९१४ रोजी सबंध जग युद्धात लोटले गेले

[५ पानांवरील चित्र]

इस्तंबुल नोव्हेंबर १५, २००३

[५ पानांवरील चित्र]

माद्रिद मार्च ११, २००४

[५ पानांवरील चित्र]

लंडन जुलै ७, २००५

[५ पानांवरील चित्र]

न्यूयॉर्क सप्टेंबर ११, २००१

[५ पानांवरील चित्राचे श्रेय]

डावीकडून: AP Photo/Murad Sezer; AP Photo/ Paul White; Photo by Peter Macdiarmid/Getty Images

[६ पानांवरील चित्राचे श्रेय]

Culver Pictures