व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रेशीम “तंतूंची राणी”

रेशीम “तंतूंची राणी”

रेशीम “तंतूंची राणी”

जपानमधील सावध राहा! लेखकाकडून

जगातील सर्वात सुंदर वस्त्रे—जपानी किमोनो, भारतीय साडी आणि कोरियन हॉनबोक—या सर्वात एक गोष्ट समान आहे. बहुतेकदा, ही सर्व वस्त्रे रेशमापासून बनवली जातात. रेशीम, हा एक चमकदार तंतू आहे ज्याला तंतूंची राणी म्हटले जाते. रेशमाच्या सुरेखपणाने, संपूर्ण जगभरात, गतकाळातील राजामहाराजांपासून सध्याच्या सामान्य लोकांपर्यंतच्या सर्वांना वेड लावले आहे. पण रेशीम नेहमीच इतक्या सहजासहजी उपलब्ध नव्हते.

प्राचीन काळात, रेशीम तयार करण्याची कला केवळ चीनमध्येच ज्ञात होती. रेशीम कसे तयार करायचे हे दुसऱ्‍या कोणालाच माहीत नव्हते व चीनमधील कोणी जर रेशीम किड्यांचे गुपीत कोणाला सांगितलेच तर त्याला फितूर म्हणून मृत्यूदंड देण्याचा कायदा होता. म्हणूनच, रेशीम केवळ चीनमध्ये बनत असल्यामुळे ते खूपच महाग होते. उदाहरणार्थ, संपूर्ण रोमी साम्राज्यात, रेशमाची किंमत सोन्याएवढीच होती.

हळूहळू, पर्शियाने चीनमधून येणाऱ्‍या रेशमाच्या उद्योगावर कब्जा मिळवला. तरीपण त्याची किंमत जास्तच होती आणि पर्शियन व्यापाऱ्‍यांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रयत्न विफल ठरले. मग, बायझंटाईन सम्राट जस्टिनियनने एक शक्कल लढवली. सा.यु. ५५० च्या सुमारास त्याने दोन भिक्षूकांना चीनला गुप्तपणे पाठवले. दोन वर्षांनंतर हे भिक्षू परत आले. येताना त्यांनी ज्या खजिन्याची ते खूप दिवसांपासून वाट पाहत होते तो खजिना आणला. त्यांच्या बांबूंच्या छड्यांच्या पोकळीत त्यांनी रेशीम किड्यांची अंडी लपवून आणली. अशाप्रकारे गुप्ततेचा भंग झाला. रेशीम उद्योगाची मक्‍तेदारी तेथे समाप्त झाली.

रेशमाचे गुपीत

रेशमाच्या किड्यांपासून किंवा किड्यांच्या अळ्यांपासून रेशीम तयार केले जाते. रेशीम किड्याचे शेकडो प्रकार आहेत; पण उच्च दर्जाचे रेशीम बनवणाऱ्‍या किड्याचे शास्त्रीय नाव बॉम्बिक्स मोरी हे आहे. रेशीम तंतू बनवण्यासाठी अनेक रेशीम किडे लागतात; त्यामुळे रेशीम बनवण्यासाठी किड्यांचे संवर्धन करण्याचे उद्योग वाढू लागले. जपानमधील गुनमा प्रीफकचर येथे राहणारे शोईची कावाहारादा कुटुंब, या देशातील सुमारे २,००० घराण्यांपैकी एक आहे जे आजही या परिश्रमी कामात आहे. किड्यांच्या संवर्धनाच्या हेतूने बांधलेली त्यांची दोन मजली इमारत एका टेकडीच्या बाजूला आहे जेथून आपल्याला तुतीची लागवड दिसते ().

मादी रेशीम पतंग जवळजवळ ५०० अंडी घालते; प्रत्येक अंडे टाचणीच्या डोक्याच्या आकाराइतके असते (). सुमारे २० दिवसांनंतर अंड्यातून अळी बाहेर पडते. या बारीक अळ्यांना प्रचंड भूक असते. दिवस आणि रात्र ते फक्‍त तूतीचीच पाने खात असतात (३, ४). केवळ १८ दिवसांत, या अळ्या त्यांच्या मूळ आकारापासून ७० पटीने वाढतात आणि चार वेळा कात टाकतात.

श्री. कावाहारादा यांच्या मळ्यात, सुमारे १,२०,००० रेशीम किड्यांचे संवर्धन केले जाते. पाल्या-पाचोळ्यावर जोरदार पाऊस पडतो तेव्हा जसा आवाज येतो तसा आवाज हे किडे तुतीची पाने खात असतात तेव्हा येतो. एका अळीची पूर्ण वाढ होऊन तिचे सुरवंट होते तेव्हा ती तिच्या मूळ वजनापेक्षा १०,००० पटीने वाढलेली असते! आता ती कोशावरण कातायला सज्ज असते.

मूक कामगार

पूर्ण वाढ झालेल्या सुरवंटाचे शरीर पारदर्शक दिसू लागते तेव्हा, कोशावरण कातायला हा सुरवंट तयार झाला आहे असे समजते. हे सुरवंट खूप हलू लागतात व कोश तयार करण्यासाठी जागा शोधू लागतात तेव्हा त्यांना अनेक चौकोन असलेल्या तट्टीत ठेवतात. तेथे ते त्यांचा बारीक, पांढरा धागा काढून स्वतःला रेशमाच्या कोशात लपेटून घेतात ().

हा श्री. कावाहारादा यांच्यासाठी सर्वात धावपळीचा समय असतो कारण सर्व १,२०,००० सुरवंट जवळजवळ एकाच वेळी कोश कातायला सुरू करतात. घराच्या दुसऱ्‍या मजल्यावर, थंड व खेळती हवा असलेल्या वरच्या खोलीत ओळीने असंख्य चौकटी ठेवल्या जातात ().

तोपर्यंत, सुरवंटाच्या शरीरात एक चमत्कारीक बदल होत असतो. पचवलेल्या तुतीच्या पानांचे फायब्रोईन तयार होते. हे एकप्रकारचे प्रथिन आहे जे सुरवंटाच्या पूर्ण लांबीइतकेच लांबीच्या ग्रंथींमध्ये साठवलेले असते. या ग्रंथींमधून फायब्रोईनचा स्राव बाहेर पडत असतो तेव्हा त्याच्यावर सेरिसिन नावाचा चिकट थर असतो. सुरवंटाच्या मुखाजवळ असलेल्या तनित्रातून बाहेर पडताना दोन फायब्रोईन तंतू सेरिसिनच्या स्रावाने चिकटले जातात. हे द्रव्यरुपात असलेले रेशीम जेव्हा हवेच्या संपर्कात येते तेव्हा त्याचा घट्ट धागा बनतो.

रेशीम काढायचे सुरवंटाचे काम सुरू झाले की ते थांबत नाही. एका मिनिटाला हा किडा ३० ते ४० सेंटीमीटर, या गतीने, इंग्रजी आठाच्या आकाराप्रमाणे डोके हलवत स्वतःच्या शरीराभोवती रेशीम लपेटत राहतो. एका लेखात असा अंदाज लावला होता, की एक कोश करण्यासाठी या किड्याने १,५०,००० वेळा आपले डोके हलवलेले असेल. दोन दिवस व दोन रात्र काम करून एक किडा १,५०० मीटर लांब धागा गुंडाळतो. म्हणजे, एका उंच गगनचुंबी इमारतीच्या उंचीपेक्षा सुमारे चार पट उंच!

अवघ्या एका आठवड्यात, श्री. कावाहारादा १,२०,००० कोश गोळा करून ते पुढील प्रक्रियेसाठी पाठवून देतात. एक किमोनो बनवण्यासाठी ९,००० कोश लागतात तर, एक टाय बनवण्यासाठी सुमारे १४० कोश लागतात. आणि एक रेशमी स्कार्फ बनवण्यासाठी १०० पेक्षा अधिक कोश लागू शकतात.

रेशीम वस्त्रे

कोशावरणातील धागा उलगडण्याच्या प्रक्रियेला रीलींग म्हटले जाते. रेशीम धाग्याचे उलगडणे केव्हा सुरू झाले? याविषयी बऱ्‍याच समजुती व दंतकथा आहेत. त्यापैकी एका दंतकथेनुसार, चिनी सम्राज्ञी सी लिंग शी हिला तुतीच्या झाडावरून आपल्या चहाच्या कपात एक कोश पडलेला दिसला. ती तो कोश बाहेर काढत होती तेव्हा त्यातून एक नाजूक रेशीम धागा निघत असल्याचे तिने पाहिले. अशाप्रकारे रिलींगचा जन्म झाला; आज ही प्रक्रिया यंत्रे करतात.

या कोशांना बाजारात चांगला भाव मिळावा म्हणून कोशातील अळी पतंग व्हायच्या आधी मारण्याची आवश्‍यकता असते. हे दुःखद काम करण्यासाठी उष्णतेचा उपयोग केला जातो. खराब झालेले कोश बाजूला केले जातात आणि निरोगी व दर्जेदार कोशांवर प्रक्रिया केली जाते. पहिल्यांदा, सर्व कोश गरम पाण्यात किंवा वाफेत टाकली जातात ज्यामुळे त्यांच्यावरील चिकट द्रव्य विरघळून जाते व धागा उलगडणे सोपे जाते. मग, कोशावरणातील तंतूचे टोक फिरत्या ब्रशने धरले जातात (). हव्या त्या जाडीनुसार, एक किंवा त्यातूनही अनेक तंतू एकत्रित गुंडाळून एक धागा बनवला जातो. हा धागा रिळावर गुंडाळताना वाळवला जातो. कच्चे रेशीम, हव्या तितक्या लांबीची व वजनाची लडी बनवण्यासाठी पुन्हा दुसऱ्‍या एका मोठ्या रिळावर गुंडाळले जाते (८, ९).

तलम मऊ सूत रेशीम कापड हातात घेतल्याबरोबर तुम्हाला ते आपल्या गालावरून फिरवावेसे वाटेल. पण हे इतके मऊ कसे होते? त्यावर केल्या जाणाऱ्‍या संस्करणांपैकी एका संस्करणामुळे अर्थात रेशमावर असलेल्या सेरिसिनचा थर काढल्यामुळे. चिकट पदार्थ न काढलेले रेशीम, भरड असते व ते रंगविणे कठीण असते. शिफॉन कापडाचा पोत भरड असतो कारण धाग्यावरील चिकटपणा पूर्णपणे काढून टाकलेला नसतो.

धाग्यात किती फेऱ्‍यांचा पीळ असतो त्यानुसारही कापडास मऊपणा येतो. जपानी हाबुटाई कापड मऊ, गुळगुळीत असते. कारण या कापडाच्या धाग्याला फार कमी किंवा पीळच नसतो. त्याउलट, क्रेप कापडाचा पोत कुरकूरीत असतो. कारण त्यात अनेक फेऱ्‍यांचा पीळ असतो.

रंजनक्रिया ही आणखी एक प्रक्रिया आहे. रेशमाला सहज रंगवले जाऊ शकते. फायब्रोईनच्या घडणीमुळे त्यावर रंग अधिक गडद व समृद्धपणे बसतो. याशिवाय, रेशमाच्या तंतूत धन आणि ऋण असे दोन्ही विद्युतसंचित कण असतात, म्हणजे कोणत्याही प्रकारचा रंग रेशमावर चांगला चढतो; कृत्रिम तंतूंत असे कण नसतात. रेशमाला केव्हाही रंगवता येते; धागा रूपातही (१०किंवा मागावर तयार केलेले कापडही. युझेन पद्धतीने किमोनोवर रंजनक्रिया करताना, सुबक आकृत्या काढल्या जातात आणि मग रेशीम विणल्यानंतर त्यावर हातांनी रंग चढवला जातो.

आज, बहुतेक रेशीम उत्पादन चीन व भारत या देशांत होत असले तरी, फ्रान्सचे आणि इटलीचे फॅशन डिझाईनर आजही रेशीम वस्त्रांत अग्रगामी आहेत. आज, रेयॉन व नायलॉन सारखे कृत्रिम तंतू देखील स्वस्त कपडे बनवण्यासाठी वापरले जातात. परंतु, रेशमाची तोड यापैकी कोणालाच नाही. “विज्ञानाने आजपर्यंत कितीही प्रगती केलेली असली तरी, कृत्रिम रेशीम कोणालाच बनवता येणार नाही. आपल्याकडे रेशमाविषयी इत्यंभूत माहिती आहे. पण आपण त्याची नक्कल करू शकत नाही. यालाच मी, रेशमाचे गुपीत म्हणतो,” असे जपानच्या योकोहामामधील रेशीम संग्रहालयाच्या अभिरक्षकांनी म्हटले. (६/०६)

[२६ पानांवरील चौकट/चित्र]

रेशमाचे गुणधर्म

बळकट: रेशमाचा तंतू पोलादी तंतूइतका बळकट असतो.

सुंदर: रेशमाला मोत्याप्रमाणे मंद रुपेरी चमक असते. फायब्रोईनचे अनेक थर व प्रिझमसारखी रचना असल्यामुळे प्रकाशाचे परावर्तन होऊन रेशीम चमकते.

मऊ: ज्या अमिनो ॲसिडमुळे रेशीम बनते ते त्वचेसाठी अपायकारक नसते. रेशीम त्वचासंबंधित विकारांपासून संरक्षण करते, असे म्हटले जाते. काही सौंदर्यप्रसाधनांमध्ये रेशमाची पूड वापरली जाते.

आर्द्रताशोषक: रेशमातील अमिनो ॲसिडमुळे व लहान लहान छिद्रांमुळे ते पाणी व घामही शोषून घेते ज्यामुळे उष्ण हवामानातही रेशीम वस्त्रे परिधान केल्यास तुम्हाला कोरडे व गार वाटेल.

उष्णता रोधक: रेशीम सहजासहजी जळत नाही आणि त्याला जरी आग लागली तरी त्यातून विषारी वायू निघत नाही.

संरक्षक: रेशीम जंबुपार किरणे शोषून घेते ज्यामुळे त्वचेचे रक्षण होते.

विद्युतशक्‍ती जमा न होणे: रेशमात धन आणि ऋण असे दोन्ही विद्युतसंचित कण असल्यामुळे व ते आर्द्रता शोषक असल्यामुळे, इतर कापडाप्रमाणे रेशमी कापडाच्या पृष्ठभागावर विद्युतशक्‍ती लगेचच जमा होत नाही.

रेशमी वस्त्रांची निगा

धुणे: रेशमी वस्त्रांचे सहसा ड्राय-क्लिनिंग करणे उत्तम आहे. जर तुम्ही घरीच धुणार असाल तर कोमट पाण्यात (३०°से.) मृदू साबणाचा उपयोग करा. रेशमी वस्त्रे धुताना हलक्या हाताने चोळा; ती रगडू नका किंवा पिळू नका. धुतल्यानंतर ती हवेत वाळवा.

इस्त्री: रेशमी कपड्यांवर इस्त्री फिरवताना रेशीम कापडावर दुसरे कापड ठेवून मग इस्त्री करा. कापडाचा धागा ज्या दिशेने आहे त्या दिशेने जवळजवळ १३०°से. इतकी इस्त्री तापवून इस्त्री करा. इस्त्री करताना, वाफेचा फार कमी उपयोग करा, किंवा करूच नका.

मळ काढताना: रेशमी वस्त्रावर पडलेले डाग लवकरात लवकर काढण्यास, ज्या भागावर माती पडली आहे तो एखाद्या कोरड्या कापडावर ठेवा. आणि मग उलट्या बाजूवर एखाद्या ओल्या कापडाने हलक्या हाताने झटका. चोळू नका. त्यानंतर मग ते ड्राय-क्लिनिंगसाठी द्या.

जपून ठेवणे: उष्णता, पतंग, प्रकाश यांपासून त्यांचे संरक्षण करा. स्पॉज लावलेले हँगर असतील तर त्यावर ते अडकवून ठेवा नाहीतर, जर सपाट ठेवायचे असतील तर होता होईल तितक्या कमी घडी घाला.

[२५ पानांवरील चित्र]

रेशमाचे कोश

[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]

फोटो ७-९: Matsuida Machi, Annaka City, Gunma Prefecture, Japan; १० व जवळून घेतलेले चित्र: Kiryu City, Gunma Prefecture, Japan