व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नैतिकतेच्या घसरणीला कमालीचा वेग येतो तेव्हा

नैतिकतेच्या घसरणीला कमालीचा वेग येतो तेव्हा

नैतिकतेच्या घसरणीला कमालीचा वेग येतो तेव्हा

नैतिकतेच्या घसरणीला कमालीचा वेग केव्हापासून आला असे तुम्हाला वाटते? तुमच्या किंवा कदाचित तुमच्या वयस्क नातेवाईकांच्या अथवा मित्रांच्या आयुष्यक्रमादरम्यान? काही म्हणतात, की १९१४ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धापासून नैतिकतेला अतुलनीय उतरती कळा लागली. इतिहासाचे प्राध्यापक रॉबर्ट वोल यांनी, १९१४ ची पिढी (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात असे लिहिले: “युद्धातून वाचलेले लोक असा विचार करणे थांबवू शकत नव्हते, की १९१४ सालच्या ऑगस्टपासून एका जगाचा अंत झाला आहे व दुसऱ्‍या जगाची सुरुवात झाली आहे.”

इतिहासकार नॉर्मन कॅन्टर म्हणतात: “आधीच अधोगतीला लागलेल्या सामाजिक वर्तणुकीचा सर्वत्र ऱ्‍हास होऊ लागला. राजकिय नेत्यांनी व वरिष्ठ अधिकाऱ्‍यांनीच त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या लोकांना, कत्तलखान्यात पाठवल्या जाणाऱ्‍या पशूंप्रमाणे वागवले आहे तर मग, लोक जेव्हा एकमेकांना जंगली प्राण्यांप्रमाणे वागवतात तेव्हा कोणत्या धर्माचे नीतिनियम किंवा नैतिकता त्यांना असे करण्यापासून थांबवू शकतात? . . . पहिल्या महायुद्धात [१९१४-१८] मोठ्या प्रमाणावर झालेल्या लोकांच्या कत्तलीने मानवी जीवनाचे मूल्यच नाहीसे करून टाकले.”

इतिहासाची रूपरेषा (इंग्रजी) या आपल्या बहुसमावेशक पुस्तकात इंग्रज इतिहासकार एच. जी. वेल्स यांनी असे म्हटले की, उत्क्रांतीवादाच्या शिकवणीचा स्वीकार केल्यापासूनच “नैतिकतेची खरी घसरण सुरु झाली.” का बरे? कारण, काही असा विचार करत होते, की मनुष्य हा प्राणीजीवनापासून किंचित उच्च आहे. वेल्स हे स्वतः उत्क्रांतीवादाचे समर्थक होते. त्यांनी १९२० मध्ये असे लिहिले: “त्यांच्या मते मनुष्य हा भारतातील शिकारी कुत्र्यासारखा एक सामाजिक प्राणी आहे. . . . त्यामुळे, मनुष्य कळपातील जी मोठी कुत्री आहेत त्यांनी इतरांवर शिरजोरी केली पाहिजे आणि त्यांच्यावर आपला दबदबा ठेवला पाहिजे, हे त्यांच्या दृष्टीत उचित होते.”

होय, कॅन्टर यांनी म्हटल्याप्रमाणे, पहिल्या महायुद्धामुळे लोकांच्या नैतिकतेच्या जाणीवेवर विनाशकारक परिणाम झाला. त्यांनी असे स्पष्टीकरण दिले: “जुन्या पिढीला पूर्णपणे मोडीत काढण्यात आले—त्यांचे राजकारण, त्यांची शृंगारपद्धती, सेक्सविषयी असलेली त्यांची मनोवृत्ती, सर्व चूक आहे असे भासवण्यात आले.” उत्क्रांतीवादाची शिकवण स्वीकारण्याद्वारे व युद्धात भाग घेणाऱ्‍यांची बाजू घेण्याद्वारे ख्रिस्ती शिकवणुकींना भ्रष्ट करणाऱ्‍या चर्चचा नैतिक ऱ्‍हासात खूप मोठा हात आहे. ब्रिटिश ब्रिगेडियर जनरल फ्रँक क्रोझर यांनी असे लिहिले: “आपल्याजवळ असलेले ख्रिस्ती चर्चेस हे, रक्‍तपात करणाऱ्‍यांना तयार करण्यात पहिल्या नंबरावर आहेत. आपली पोळी भाजण्यासाठी आपण या चर्चेसचा अगदी मुक्‍तपणे उपयोग करून घेतला.”

नैतिकतेच्या नियमांची पायमल्ली

पहिल्या महायुद्धानंतरच्या दशकात—ज्याला उफाळणारे विसावे शतक म्हटले जाते—जुन्या नीतिमूल्यांना व नैतिक बंधनांना बाजूला सारण्यात आले व त्यांच्याऐवजी ‘सब कुछ चलता है’ ही मनोवृत्ती स्वीकारण्यात आली. इतिहासकार फ्रेडरीक लुईस ॲलन म्हणतात: “युद्धानंतरच्या दहा वर्षांना अगदी योग्यपणे वाईट शिष्टाचाराचे दशक म्हणता येईल. . . . जुन्या व्यवस्थेबरोबरच जीवनास समृद्ध व अर्थभरीत करणारी मूल्येही नाहीशी झाली आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी पर्यायी नीतीमूल्ये सहजपणे मिळू शकली नाहीत.”

एकोणीसशे तीस दशकात जगाच्या महामंदीमुळे पुष्कळांच्या डोळ्यांवरील झापड उडाली; अनेकांना तेव्हा अगदी हालाखीत दिवस काढावे लागले. परंतु या दशकाच्या शेवटी, पहिल्यापेक्षाही अधिक विनाशकारक युद्धास अर्थात दुसऱ्‍या महायुद्धास सुरुवात झाली. लवकरच राष्ट्रे विनाशाची शक्‍तिशाली शस्त्रे बनवू लागली. त्यांनी जगाला महामंदीतून बाहेर ओढून काढले खरे, परंतु मानव कल्पनाही करू शकत नाही अशा दुःखाच्या व भीतीच्या खाईत ढकलले. या युद्धाच्या शेवटी, शेकडो शहरे उद्ध्‌वस्त झाली; दोन अणुबाँम्ब हल्ल्यात जपानमधील दोन शहरे बेचिराख झाली! कोट्यवधी लोकांचा निर्दयी छळछावण्यात अंत झाला. एकूणच, या संघर्षात ५ कोटी स्त्रीपुरुषांना व मुलांना आपल्या जीवाला मुकावे लागले.

दुसऱ्‍या महायुद्धाच्या या वाईट परिस्थितीत, परंपरागत चालत आलेली नीतिमूल्ये जपण्याऐवजी लोकांनी स्वतः बनवलेले वर्तणुकीचे नियम स्वीकारले. लव, सेक्स ॲण्ड वॉर—चेंजींग व्हॅल्यूज, १९३९-४५ या पुस्तकात असे म्हटले होते: “युद्ध काळादरम्यान लैंगिक बंधने जणू काय तात्पुरत्या काळासाठी रोखून धरण्यात आली होती; पण त्याऐवजी रणभूमीवरील बेछूटपणास घरात मान्यता होती. . . . युद्धकाळातील निकड व उत्साह यांमुळे नैतिक बंधने नाहिशी झाली आणि रणभूमीवर जसे जीवन अगदी अल्पकाळ व स्वस्त होते तसे घरातील जीवन सवंग झाले.”

मृत्यूची टांगती तलवार सतत डोक्यावर लटकत असल्यामुळे लोक भावनिक नातेसंबंध मग तो तात्पुरत्या काळासाठी का होईना, जोडण्याची उत्कंठा बाळगू लागले. त्या नाट्यमय काळातील लैंगिक स्वच्छंदीपणाचे समर्थन करीत एका ब्रिटिश गृहिणीने म्हटले: “आम्ही खरोखर अनैतिक नव्हतो. युद्ध चालल्यामुळे नैतिकतेच्या बाबतीत आम्ही जरा ढिले पडलो होतो.” एका अमेरिकन सैनिकाने कबूल केले: “लोकांच्या नजरेत आम्ही अनैतिक होतो. पण आम्ही तरुण होतो आणि कोणत्याही क्षणी आमचा जीव जाऊ शकत होता.”

या युद्धातून वाचलेल्या लोकांनी अनेक अघोरी गोष्टी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या त्यामुळे त्यांच्या मनावर अतिशय खोल परिणाम झाला. आजही, अनेक लोकांना व त्याकाळी मुले असलेल्यांना त्या अघोरी गोष्टींच्या भयानक आठवणी सतावतात. अनेकांचा विश्‍वास उडून गेला होता व नैतिक मार्गदर्शनाची त्यांची जाणीव मरून गेली होती. बरोबर व चूक यांचे मापक ठरवणाऱ्‍या कोणत्याही अधिकाराबद्दल आदर न बाळगता लोक सर्व गोष्टींकडे सापेक्ष दृष्टीने पाहू लागले.

नवीन सामाजिक मापदंड

दुसऱ्‍या महायुद्धानंतर, मानव लैंगिक वर्तनाविषयीचे काही अभ्यास प्रकाशित करण्यात आले. एकोणीसशे चाळीसच्या दशकात संयुक्‍त संस्थानातील असाच एक अभ्यास किन्से रिपोर्ट होता जो ८०० पेक्षा अधिक पानांचा होता. यामुळे पुष्कळ लोक, पूर्वी ज्यांच्याविषयी सर्वसामान्यपणे चर्चा केली जात नसे अशा लैंगिक गोष्टींविषयी उघडउघड बोलू लागले. या रिपोर्टमध्ये, समलैंगिकता व इतर विकृत लैंगिक वर्तन आचरणाऱ्‍यांविषयीची आकडेवारी जरा वाढवूनच सांगण्यात आली होती, हे नंतर समजले असले तरी, अभ्यासात हे स्पष्ट दिसून आले, की युद्धानंतरच नैतिकतेला नाट्यमयरीत्या उतरती कळा लागली होती.

काही काळासाठी तरी, नीतिमूल्ये जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. जसे की, रेडिओ, चित्रपट, आणि टीव्हीवर अश्‍लील भाग काढून टाकले जायचे. पण असे जास्त दिवस चालले नाही. शिक्षणाचे भूतपूर्व यु.एस. सचिव विल्यम बेनेट यांनी असे म्हटले: “१९६० च्या दशकापासून अमेरिकेची, ज्याला असंस्कृतपणा म्हणतात त्या दिशेने उभी व अखंड घसरण सुरू झाली.” हेच अनेक देशांतही दिसून येते. आणि, एकोणीसशे साठच्या दशकात तर नैतिकतेची घसरण आणखीच वेगाने होऊ लागली!

या दशकाने तर एकाच वेळी दोन गोष्टी अनुभवल्या; एक, स्त्रियांची मुक्‍ती चळवळ आणि दुसरी नवीन नैतिकता या नव्या नावाने लैंगिक क्रांती. तसेच, परिणामकारक गर्भनिरोधक गोळ्या तयार करण्यात आल्या. आता गर्भधारणा होण्याची भीती न बाळगता लैंगिक संबंध ठेवणे शक्य झाले; “फ्री लव्ह” किंवा कसल्याही वचनबद्धतेविना लैंगिक संबंध ठेवण्याची मनोवृत्ती सर्वसामान्य बनली.

त्याचवेळेला, वृत्तपत्रे, चित्रपट, टीव्ही यांनी आपली नैतिक संहिता मोकळी केली. नंतर, झ्बीगन्येव ब्राझिंकस्की या राष्ट्रीय सुरक्षा मंडळाच्या भूतपूर्व प्रमुखांनी टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्‍या मूल्यांविषयी असे म्हटले: “ते अगदी उघडउघड आत्म-तृप्तीची स्तुती करतात, तीव्र हिंसाचार व अघोरीपणा रोजचाच आहे असे दाखवतात आणि लैंगिक अनैतिकतेला उत्तेजन देतात.”

एकोणीसशे सत्तरच्या दशकापर्यंत तर घराघरात व्हीसीआर आला होता. लोक आता आपल्या घरात बसून, त्यांनी थिएटरमध्ये जाऊन सर्वांबरोबर ज्या गोष्टी पाहिल्या नसत्या अशा अनैतिक व लैंगिकरीत्या अगदी उघड असलेल्या गोष्टी पाहू शकत होते. अलीकडच्या काळात तर, अतिशय घृणास्पद असलेले अश्‍लील साहित्य संपूर्ण जगातील देशांत ज्यांच्याकडे कंप्यूटर आहे त्या सर्वांना इंटरनेटवर उपलब्ध आहे.

याचे परिणाम अनेक मार्गांनी अतिशय भयानक आहेत. यु.एस. तुरुंगातील एका वॉर्डनने अलिकडे असे म्हटले: “दहा वर्षांपूर्वी, तरुण मुलं-मुली जेव्हा तुरुंगात यायचे तेव्हा मी त्यांच्याशी बरोबर आणि चूक यांबद्दल बोलू शकत होतो. पण आता, तुरुंगात येणाऱ्‍या मुलांना, मी कशाविषयी बोलतोय हेच समजत नाही.”

आपल्याला मार्गदर्शन कोठे मिळेल?

नैतिक मार्गदर्शनासाठी आपण जगाच्या चर्चेसकडे मुळीच बघू शकत नाही. येशू आणि त्याच्या पहिल्या शतकातील अनुयायांप्रमाणे, धार्मिक तत्त्वे उंचावून धरण्याऐवजी, चर्चेसने स्वतःला या जगाचा आणि जगाच्या दुष्टाईचा भाग बनवले आहे. एका लेखकाने एकदा असे विचारले: “असे कोणते युद्ध होते ज्यात लोकांनी, देव आपल्या पक्षाने उभा आहे असा दावा केला नाही?” देवाच्या नैतिक दर्जांना उंचावून धरण्याच्या बाबतीत, न्यूयॉर्क सिटीमधील एका पाळकाने अनेक वर्षांपूर्वी असे म्हटले: “बसमध्ये चढण्यासाठी तरी काही नियम असतात; पण जगात फक्‍त एकच अशी संघटना आहे व ती आहे चर्च ज्यात आत जाण्यासाठी सर्वात कमी नियम आहेत.”

या जगाला लागलेली नाट्यमय उतरती कळा एका गोष्टीकडे बोट दाखवत आहे. ती ही, की लवकरात लवकर याबाबतीत ठोस पावले उचलणे आवश्‍यक आहेत. पण कोणती पावले? कोणत्याप्रकारचा बदल करणे आवश्‍यक आहे? तो कोण करू शकतो आणि हा बदल कसा केला जाईल? (g ४/०७)

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

पहिल्या महायुद्धात [१९१४-१८] मोठ्या प्रमाणावर झालेल्या लोकांच्या कत्तलीने तर मानवी जीवनाचे मूल्यच नाहीसे करून टाकले

[६ पानांवरील चौकट]

नैतिकता विरुद्ध मूल्ये

पूर्वी नैतिकता अतिशय स्पष्ट होती. एक व्यक्‍ती एकतर प्रामाणिक, एकनिष्ठ, शुद्ध व आदरणीय होती किंवा नव्हती. आता, “नैतिकता” याऐवजी “मूल्ये” हा शब्द आला आहे. पण यात एक समस्या आहे. इतिहासकार गरट्रूड हिअलफार्ब, समाजाचा घसरत चाललेला सुसंस्कृतपणा (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात असे म्हणतात: ‘नैतिकता आणि मूल्ये या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखादी व्यक्‍ती स्वतःची मूल्ये निवडू शकते पण प्रत्येकाला आपली नैतिकता निवडण्याचा हक्क आहे असे आपण म्हणू शकत नाही.’

त्या पुढे असे म्हणाल्या, की “कोणतीही व्यक्‍ती, गट किंवा समाज कोणत्याही वेळी कोणत्याही कारणासाठी ज्याला महत्त्व देईल ती गोष्ट मूल्यात समाविष्ट होऊन जाते; जसे की, विश्‍वास, मते, मनोवृत्ती, भावना, सवयी, नियम, आवडीनिवडी, पूर्वग्रह, इतकेच नव्हे तर विक्षिप्त वर्तन देखील.” सध्याच्या मुक्‍त समाजात लोकांना, सुपर मार्केटमध्ये जाऊन ते ज्याप्रमाणे भाजी निवडतात त्याप्रमाणे आपली स्वतःची मूल्ये निवडणे उचित वाटते. पण असे जेव्हा होते तेव्हा खरी नैतिकता आणि नीतिमूल्ये यांचे काय होते?

[७ पानांवरील चित्र]

आज अतिशय हलक्या प्रतीचे मनोरंजन अधिक सहजरीत्या उपलब्ध आहे