व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबल आपल्यापर्यंत कसं पोहोचलं?

बायबल आपल्यापर्यंत कसं पोहोचलं?

बायबल आपल्यापर्यंत कसं पोहोचलं?

बायबल कित्येक शतकांआधी लिहिलेलं पुस्तक असूनही, ते आपल्यापर्यंत जसंच्या तसं पोहोचलं, हा खरंच एक चमत्कारच आहे! कारण बायबल आजपासून १,९०० पेक्षा जास्त वर्षांआधी लिहून पूर्ण झालं. शिवाय, ते अशा साहित्यावर लिहिण्यात आलं होतं, जे लवकर खराब होतं. जसं की, पपायरस गवतापासून तयार केलेला कागद आणि प्राण्यांच्या कातडीपासून तयार केलेली चर्मपत्रं. आणखी एक गोष्ट म्हणजे बायबल अशा भाषांमध्ये लिहिण्यात आलं होतं, ज्या आज फार कमी लोक बोलतात. इतकंच नाही, तर बऱ्‍याच शक्‍तिशाली लोकांनी, जसं की सम्राटांनी आणि धर्म पुढाऱ्‍यांनी बायबलचं नामोनिशाण मिटवून टाकायचा खूप प्रयत्न केला.

एवढं सगळं असूनही हा अनोखा ग्रंथ आजपर्यंत कसा काय टिकून राहिला? आणि तो इतिहासातला सगळ्यात प्रसिद्ध ग्रंथ कसा काय बनला? हे समजण्यासाठी आपण दोन गोष्टींवर विचार करू.

भरपूर प्रती तयार करण्यात आल्या

इस्राएली लोकांनी बायबलची मूळ हस्तलिखितं खूप जपून ठेवली आणि त्यांच्या भरपूर प्रती तयार केल्या. इस्राएलमधल्या राजांना अशी आज्ञा देण्यात आली होती, की त्यांनी “लेवीय याजकांकडे असलेलं नियमशास्त्र घ्यावं आणि एका पुस्तकात लिहून स्वतःसाठी त्याची प्रत तयार करावी.”​—अनुवाद १७:१८.

इस्राएली लोकांना शास्त्रवचनं वाचायला खूप आवडायचं, कारण ते देवाचं वचन आहे हे त्यांना माहीत होतं. आणि म्हणून शास्त्रवचनांच्या प्रती तयार करण्याचं हे काम खूप काळजीपूर्वक केलं जायचं. हे काम निपुण असलेले शास्त्री करायचे. देवाचा सेवक असलेला एज्रा असाच एक शास्त्री होता आणि त्याच्याबद्दल बायबलमध्ये असं म्हटलंय, की “त्याला इस्राएलचा देव यहोवा, याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्राचं चांगलं ज्ञान होतं.” (एज्रा ७:६) इसवी सन ५०० ते १,००० या काळात, इब्री शास्त्रवचनाच्या किंवा “जुन्या कराराच्या” प्रती तयार करणारे मॅसोरेट्‌स शास्त्री तर चुका टाळण्यासाठी एकेक अक्षर मोजायचे. अशा प्रकारे काळजीपूर्वक काम केल्यामुळे, बायबलच्या संदेशाची अचूकता टिकून राहिली. तसंच, बायबलचा विरोध करणाऱ्‍यांनी ते नष्ट करायचा वारंवार प्रयत्न करूनही त्यांना यश मिळालं नाही.

याचं एक उदाहरण म्हणजे, इसवी सन पूर्व १६८ मध्ये सिरियाचा शासक ॲन्टियॉकस चौथा याने पॅलेस्टाईनमधून हिब्रू शास्त्रवचनांच्या सगळ्या प्रती नष्ट करायचा प्रयत्न केला. यहुद्यांच्या इतिहासात असं सांगितलंय, की नियमशास्त्राच्या गुंडाळ्या एकतर फाडून टाकण्यात आल्या किंवा जाळून टाकण्यात आल्या. तसंच यहुदी विश्‍वकोशात  असं म्हटलंय: “ज्या अधिकाऱ्‍यांना हे आदेश देण्यात आले होते, त्यांनी त्यांचं काटेकोरपणे पालन केलं. ज्या कोणाजवळ पवित्र शास्त्रवचनांच्या गुंडाळ्या सापडायच्या, त्यांना मृत्युदंड दिला जायचा.” असं असलं, तरी फक्‍त पॅलेस्टाईनमध्ये राहणाऱ्‍या यहुद्यांजवळच नाही, तर इतर देशांत राहणाऱ्‍या यहुद्यांजवळही पवित्र शास्त्रवचनांच्या या प्रती सुरक्षित राहिल्या.

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनं, किंवा “नवा करार” लिहिणाऱ्‍या लेखकांनी त्यांचं लिखाण पूर्ण केल्यावर लगेचच इतरांनी त्यांच्या लिखाणांच्या भरपूर प्रती तयार केल्या. या लिखाणांमध्ये प्रेरित पत्रं, भविष्यवाण्या आणि इतिहासातले अहवाल होते. उदाहरणार्थ, योहानने त्याच्या नावाचा आनंदाचा संदेश इफिसमध्ये किंवा त्याच्या आसपासच्या ठिकाणी लिहिला. तरीपण या पुस्तकाच्या काही भागांची एक प्रत नंतर शेकडो मैल दूर असलेल्या इजिप्तमध्ये सापडली. विद्वानांचं म्हणणं आहे, की योहानने आपलं पुस्तक लिहिल्याच्या ५० वर्षांच्या आतच ही प्रत तयार करण्यात आली. यावरून कळतं, की दूरदूरच्या देशांमध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना अलीकडेच लिहिण्यात आलेल्या देवप्रेरित शास्त्रवचनांच्या प्रती मिळाल्या होत्या.

बऱ्‍याच लोकांकडे देवाच्या वचनांची एक प्रत होती. आणि म्हणूनच देवाचं वचन ख्रिस्तानंतरही शेकडो वर्षांपर्यंत टिकून राहिलं. उदाहरणार्थ, इसवी सन ३०३ साली २३ फेब्रुवारीला रोमी सम्राट डायक्लीशनने आपल्या सैनिकांना एका चर्चचे दरवाजे तोडून शास्त्रवचनांच्या प्रती जाळून टाकण्याचा आदेश दिला. त्याला वाटलं की पवित्र शास्त्राची लिखाणं नष्ट केल्यामुळे तो ख्रिस्ती धर्माचं नामोनिशाण मिटवू शकतो. म्हणून दुसऱ्‍याच दिवशी त्याने असा आदेश दिला, की संपूर्ण रोमी साम्राज्यातल्या बायबलच्या प्रती सार्वजनिक ठिकाणी जाळून टाकल्या जाव्यात. तरीसुद्धा बायबलच्या काही प्रती टिकून राहिल्या आणि त्याच्या आणखी प्रती तयार करण्यात आल्या. खरंतर, डायक्लीशनने केलेल्या या छळाच्या काही काळानंतरच तयार करण्यात आलेल्या बायबलच्या दोन ग्रीक प्रती आजपर्यंत सुरक्षित आहेत. त्यांतली एक रोममध्ये आहे आणि दुसरी लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये आहे.

बायबलच्या मूळ हस्तलिखितांपैकी आजपर्यंत एकही सापडलेलं नाही. असं असलं, तरी संपूर्ण बायबलच्या किंवा त्यातल्या काही भागांच्या हजारो प्रती आजपर्यंत सुरक्षित आहेत. यांपैकी काही प्रती तर खूप जुन्या आहेत. पण मूळ हस्तलिखितांच्या प्रती तयार करताना त्यांतल्या मजकुरात काही बदल झाला का? हिब्रू शास्त्रवचनांच्या मजकुराबद्दल बोलताना डब्ल्यू. एच. ग्रीन हे विद्वान असं म्हणाले: “आपण अगदी खातरीने म्हणू शकतो, की प्राचीन काळातलं दुसरं कोणतंही लिखाण इतक्या अचूकपणे आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही.” बायबलच्या हस्तलिखितांचा अभ्यास करणारे सर फ्रेडरिक केन्यॉन ग्रीक शास्त्रवचनांबद्दल असं म्हणतात: “आज उपलब्ध असलेल्या सगळ्यात जुन्या प्रती, बायबलच्या लेखकांनी ही पुस्तकं लिहिण्याच्या फक्‍त काही वर्षांनंतरच तयार करण्यात आल्या होत्या. म्हणून आपण हे खातरीने म्हणू शकतो, की आज आपल्याजवळ असलेलं बायबल हे अचूक आहे. ही खातरी आपल्याला जुन्या काळातल्या दुसऱ्‍या कोणत्याही पुस्तकाबद्दल देता येणार नाही.”

बायबलचं भाषांतर करण्यात आलं

आणखी एक कारण आहे ज्यामुळे बायबल, हे इतिहासातलं सगळ्यात प्रसिद्ध पुस्तक ठरलंय. ते म्हणजे, इतर कोणत्याही पुस्तकाच्या तुलनेत या पुस्तकाचं जास्त भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलंय. यावरून दिसून येतं की सगळ्या देशांच्या आणि वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्‍या लोकांनी आपल्याला जाणून घ्यावं आणि ‘पवित्र शक्‍ती आणि सत्याप्रमाणे’ आपली उपासना करावी अशी देवाची इच्छा आहे.​—योहान ४:२३, २४; मीखा ४:२.

इब्री शास्त्रवचनांचं सगळ्यात पहिलं भाषांतर म्हणजे ग्रीक भाषेतलं सेप्टुअजिंट भाषांतर. हे ग्रीक भाषा बोलणाऱ्‍या यहुदी लोकांसाठी तयार आलं होतं, जे पॅलेस्टाईनच्या बाहेर राहायचे. येशू पृथ्वीवर येण्याच्या जवळजवळ दोन शतकांआधीच हे लिहून पूर्ण झालं होतं. संपूर्ण बायबल लिहून पूर्ण झाल्यावर काही शतकांतच त्याचं अनेक भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलं. पण पुढे, राजांनी आणि पाळकांनी लोकांना बायबल वाचायचं प्रोत्साहन दिलं नाही. बायबल सर्वसामान्य लोकांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यांनी उलटंच केलं. त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये बायबलचं भाषांतर करायची परवानगी दिली नाही. कारण लोकांनी देवाबद्दलचं सत्य शिकून घ्यावं अशी त्यांची इच्छा नव्हती.

चर्चकडून आणि सरकारकडून इतका विरोध होत असूनही, काही धाडसी माणसांनी आपला जीव धोक्यात घालून सर्वसामान्य लोकांच्या भाषांमध्ये बायबलचं भाषांतर केलं. त्यांपैकी एक होते, इंग्लंडचे विल्यम टिंडेल. त्यांना खूप विरोध झाला. पण तरीसुद्धा १५३० साली इब्री शास्त्रवचनांच्या पहिल्या पाच पुस्तकांचं त्यांनी हिब्रू भाषेतून इंग्लिशमध्ये भाषांतर केलं. इंग्लिश बायबलमध्ये यहोवाचं नाव वापरणारे ते पहिलेच भाषांतरकार होते. आणखी एक उदाहरण म्हणजे, स्पेनचे कॅसयोडोरो डी रेना हे विद्वान. कॅथलिक चर्चच्या पाळकांना त्यांना मारून टाकायचं होतं, कारण त्यांनी स्पॅनिशमध्ये बायबलचं भाषांतर केलं होतं. भाषांतर करताना त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांना इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, हॉलंड आणि स्विटजरलॅंडला पळून जावं लागलं. a

आजही जास्तीत जास्त भाषांमध्ये बायबलचं भाषांतर होत आहे आणि याच्या लाखो प्रती छापल्या जात आहेत. अशा रितीने आजपर्यंत बायबल टिकून राहिलं आहे आणि आज बहुतेक लोक आपापल्या भाषेमध्ये ते वाचू शकतात. यावरून सिद्ध होतं की प्रेषित पेत्रने लिहिलेले हे शब्द खरे आहेत: “गवत कोमेजून जातं आणि फूल गळून पडतं, पण यहोवाचं वचन सर्वकाळ टिकतं.”—१ पेत्र १:२४, २५.

[तळटीप]

a १५६९ मध्ये रेना यांचं भाषांतर प्रकाशित करण्यात आलं आणि नंतर १६०२ मध्ये सिप्रियानो डी वॅलेरा यांनी त्यात सुधारणा केली.

[चौकट/ चित्र]

बायबलचं कोणतं भाषांतर वाचावं?

बऱ्‍याच भाषांमध्ये बायबलची पुष्कळ भाषांतरं उपलब्ध आहेत. काही भाषांतरांमध्ये खूप कठीण आणि जुनी भाषा वापरली आहे. तर दुसऱ्‍या भाषांतरांमध्ये अचूकतेकडे लक्ष देण्याऐवजी, वाचायला सोपं जावं म्हणून फक्‍त सारांश दिला आहे. आणि इतर भाषांतरांमध्ये शब्दशः भाषांतर केलं आहे.

यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेलं पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर  याच्या इंग्लिश आवृत्तीचं भाषांतर, बायबलच्या मूळ भाषांमधून करण्यात आलं होतं. हे भाषांतर करणाऱ्‍या समितीच्या सदस्यांनी आपली नावं जाहीर केली नाहीत. याच इंग्लिश भाषांतराचा उपयोग करून, आणखी बऱ्‍याच भाषांमध्ये बायबलचं भाषांतर झालं आहे. यासोबतच भाषांतरकारांनी मूळ भाषेतल्या लिखाणांचीही मदत घेतली. नवे जग भाषांतरात  शक्यतो मूळ भाषेतून शब्दशः भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ज्या ठिकाणी अर्थ स्पष्ट होणार नाही असं भाषांतरकारांना वाटलं, त्या ठिकाणी त्यांनी शब्दशः भाषांतर करण्याचं टाळलंय. कारण त्यांची अशी इच्छा होती की बायबल काळातल्या वाचकांना मूळ भाषेतली माहिती जितकी सहजपणे समजायची, तितकीच सहजपणे आजच्या वाचकांनाही बायबलमधली माहिती समजली पाहिजे.

बायबलची आधुनिक काळातली भाषांतरं अचूक आहेत की नाहीत, आणि भाषांतरकारांनी त्यांत स्वतःची मतं तर घातली नाहीत ना, हे पाहण्यासाठी काही भाषातज्ज्ञांनी नवे जग भाषांतर  यासोबतच बऱ्‍याच आधुनिक बायबल भाषांतरांचं परीक्षण केलं. त्यांपैकी एक विद्वान म्हणजे जेसन डेविड बेडन. ते अमेरिकेच्या नॉर्दन ॲरीझोना युनिवर्सिटीमध्ये धार्मिक विषयांचे प्राध्यापक आहेत. २००३ साली त्यांनी “इंग्लिश भाषा बोलणारे लोक सगळ्यात जास्त वापरत असलेल्या भाषांतरांपैकी” नऊ भाषांतरांबद्दल आपलं संशोधन प्रकाशित केलं. b या २०० पानांच्या संशोधनात त्यांनी बायबलच्या अशा उताऱ्‍यांचा अभ्यास केला, ज्यांबद्दल म्हटलं जातं की “त्या वचनांचं भाषांतर करताना भाषांतरकारांनी आपली मतं घातली.” या प्रत्येक उताऱ्‍याचा अभ्यास करताना त्यांनी इंग्लिश भाषांतर मूळ ग्रीक भाषेतल्या लिखाणांसोबत पडताळून पाहिलं. त्यांना पाहायचं होतं की भाषांतरकारांनी आपल्या मतांप्रमाणे उताऱ्‍यांमध्ये काही बदल केले आहेत का. मग त्यांना काय दिसून आलं?

बेडन म्हणतात की बऱ्‍याच लोकांना आणि बायबलच्या काही विद्वानांना असं वाटतं, की नवे जग भाषांतराच्या  भाषांतरकारांनी स्वतःच्या धार्मिक मतांप्रमाणे बायबलच्या काही उताऱ्‍यांमध्ये बदल केला आहे. पण बेडन म्हणतात: “नवे जग भाषांतर  हे शब्दशः भाषांतर असल्यामुळे आणि यात मूळ भाषेप्रमाणे जास्तीत जास्त अचूकपणे भाषांतर करायचा प्रयत्न केल्यामुळे काही ठिकाणी यातलं भाषांतर इतर बायबलपेक्षा वेगळं असल्याचं दिसून येतं.” नवे जग भाषांतरामधल्या  काही गोष्टी बेडन यांना योग्य वाटत नसल्या, तरी ते म्हणतात, की “त्यांनी संशोधन केलेल्या भाषांतरांपैकी नवे जग भाषांतर  हे सगळ्यात अचूक भाषांतर आहे.” ते या भाषांतराला “खूप चांगलं आणि उल्लेखनीय” भाषांतर असं म्हणतात.

इस्राएलमधले हिब्रू भाषेचे विद्वान डॉक्टर बेंजामिन केदार यांचं नवे जग भाषांतराबद्दल  असंच काहीसं मत आहे. १९८९ साली ते म्हणाले: “हे बायबल वाचताना असं दिसून येतं, की भाषांतर करताना लोकांना ते अगदी अचूकपणे आणि सोप्या पद्धतीने समजावं यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. . . . नवे जग भाषांतरात  मला असं एकही उदाहरण सापडलेलं नाही, ज्यात भाषांतरकारांनी आपल्या धार्मिक मतांप्रमाणे मूळ मजकुरात काही बदल केला आहे.”

स्वतःला हे प्रश्‍न विचारा: ‘बायबल वाचण्यामागे माझा उद्देश काय? मला असं बायबल वाचायचंय का, जे एवढं अचूक नाही पण वाचायला सोपं आहे? की मला असं बायबल वाचायला आवडेल ज्यात देवाने प्रेरित केलेल्या मूळ मजकुरातले विचार शक्य तितक्या अचूकपणे मांडलेले आहेत?’ (२ पेत्र १:२०, २१) या प्रश्‍नाचं तुम्ही जे उत्तर द्याल, त्यावरून तुम्ही ठरवू शकाल की तुम्ही कोणतं बायबल वाचलं पाहिजे.

[तळटीप]

b ती नऊ भाषांतरं म्हणजे: नवे जग भाषांतर, द ॲम्प्लीफाईड न्यू टेस्टमेंट, द लिविंग बायबल, द न्यू अमेरिकन बायबल विथ रिवाईज्ड न्यू टेस्टमेंट, न्यू अमेरिकन स्टॅन्डर्ड बायबल, द होली बायबल​—न्यू इंटरनॅशनल वर्शन, द न्यू रिवाईज्ड स्टॅन्डर्ड वर्शन, द बायबल इन टुडेज इंग्लिश वर्शन आणि किंग जेम्स वर्शन.

[चित्र]

“पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर” आज बऱ्‍याच भाषांमध्ये उपलब्ध आहे

[चित्र]

मॅसोरेट्‌स शास्त्रींनी तयार केलेली हस्तलिखितं

[चित्र]

हस्तलिखितातला एक तुकडा, ज्यात लूक १२:७ यातले शब्द दिसतात, “. . . घाबरू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही जास्त मौल्यवान आहात”

[चित्राचं श्रेय]

Foreground page: National Library of Russia, St. Petersburg; second and third: Bibelmuseum, Münster; background: © The Trustees of the Chester Beatty Library, Dublin