व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे होणारा परिणाम—तुमच्या मैत्रीवर

इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे होणारा परिणाम—तुमच्या मैत्रीवर

दोन मित्र आज जगाच्या कुठल्याही कोपऱ्‍यात असले, तरी ते मेसेज, ई-मेल, व्हिडिओ कॉल आणि सोशल मिडियाद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहू शकतात. अशा लोकांना इलेक्ट्रॉनिक साधनांचा योग्य प्रकारे वापर केल्यामुळे फायदा होतो. पण असेही काही असतात जे फक्‍त आणि फक्‍त इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करूनच मैत्री जपण्याचा प्रयत्न करतात.

अशांना काही समस्या येऊ शकतात. जसं की:

  • त्यांना त्यांच्या मित्रांच्या भावना समजून घेता येत नाहीत.

  • त्यांना एकटं पडल्यासारखं वाटतं.

  • ते इतरांपेक्षा स्वतःचा जास्त विचार करतात.

लक्षात ठेवण्यासारखं काही . . .

समजून घेणं

आपल्याला जर समोरच्या व्यक्‍तीच्या भावना समजून घ्यायच्या असतील, तर आपण तिच्याबद्दल विचार करण्यासाठी वेळ काढला पाहिजे. पण मेसेज करण्यात आणि सोशल मिडियावरच्या पोस्ट पाहण्यातच जर आपला वेळ जात असेल, तर आपल्याला तसं करता येणार नाही.

जर तुम्हाला खूप सारे मेसेज येत असतील तर तुमच्या मित्राच्या मेसेजला उत्तर देणं तुम्हाला एक खूप अवघड काम वाटेल. इतके सगळे मेसेज पाहून तुम्ही गोंधळून जाल. आणि कधी एकदा या सगळ्यांना उत्तर देऊ असं तुम्हाला वाटेल. पण या नादात तुमच्या मित्राला खरंच मदतीची गरज आहे, हे तुमच्या लक्षातही येणार नाही.

जरा विचार करा: जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना मेसेज पाठवता, तेव्हा तुम्हाला त्यांची खरंच काळजी आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता?—१ पेत्र ३:८.

एकटेपणा

एका संशोधनातून असं दिसून आलं, की बरेच लोक सोशल मिडियावर ब्राउझिंग केल्यानंतर खूश होण्याऐवजी उदास झाले. याबद्दल संशोधकांनी असं म्हटलं, की सोशल मिडियावर दुसऱ्‍यांनी पोस्ट केलेले फोटो आणि कमेंट पाहिल्यानंतर एखाद्याला वाटू शकतं, ‘आपण उगाच वेळ वाया घालवला.’

शिवाय, इतरांचे मौजमजा करतानाचे फोटो पाहिल्यानंतर बरेच जण स्वतःच्या जीवनाचा विचार करून निराश होतात. त्यांना असं वाटतं, की ‘बाकी सगळे जण तर धमाल करताहेत, पण माझं जीवन किती रटाळवाणंय.’

जरा विचार करा: सोशल मिडियाचा वापर करताना, तुम्ही इतरांसोबत स्वतःची तुलना करायचं कसं टाळू शकता?—गलतीकर ६:४.

स्वार्थीपणा

एका शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यांबद्दल असं म्हटलं, की काही जण मैत्री करताना स्वार्थीपणे विचार करतात. त्यांना असे मित्र हवे असतात, जे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागतील. अशा लोकांना त्यांचे मित्र मोबाईल ॲपप्रमाणे वाटतात, जे हवं तेव्हा वापरता येतात आणि मग बंद करता येतात.

जरा विचार करा: तुम्ही ऑनलाईन जे पोस्ट करता त्यातून स्पर्धेची किंवा स्वतःकडे लक्ष वेधण्याची वृत्ती दिसून येते का?—गलतीकर ५:२६.

हे करा

उपकरणांचा तुम्ही कसा वापर करता हे तपासा

इलेक्ट्रॉनिक साधनांना तुमच्यावर ताबा मिळू देण्याऐवजी, तुम्ही त्यांना आपल्या ताब्यात ठेवा. असं केल्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांच्या संपर्कात राहू शकाल. इतकंच काय तर त्यांच्यासोबत नातंही घट्ट करू शकाल.

बायबलचं तत्त्व: “प्रेम . . . स्वार्थ पाहत नाही.”—१ करिंथकर १३:४, ५.

तुम्हाला आवडलेल्या सल्ल्यावर खूण करा किंवा तुम्हाला सुचलेले पर्याय लिहा.

  • इतरांशी प्रत्यक्ष बोलायचा प्रयत्न करा; फक्‍त मेसेज किंवा ई-मेल पाठवू नका

  • इतरांशी बोलताना फोन बाजूला ठेवा किंवा सायलेंट करून ठेवा

  • सोशल मिडियावर इतरांचे फोटो आणि कमेंट पाहण्यात कमी वेळ घालवा

  • इतरांचं लक्ष देऊन ऐका

  • कठीण परिस्थितीतून जात असलेल्या एखाद्या मित्राशी संपर्क करा