व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ३

पहिले स्त्री-पुरुष

पहिले स्त्री-पुरुष

या चित्रात काय वेगळं आहे? होय, त्यातली माणसं. ते पहिले स्त्री-पुरुष आहेत. त्यांना कोणी बनवलं? देवानं. त्याचं नाव तुम्हाला माहीत आहे का? ते आहे यहोवा. आणि त्या पुरुष व स्त्रीचं नाव आदाम आणि हव्वा पडलं.

यहोवा देवानं आदामाला बनवलं ते असं. त्यानं जमिनीची थोडी माती घेतली. आणि त्यापासून एक परिपूर्ण शरीर, एका माणसाचं शरीर, बनवलं. मग त्यानं त्या माणसाच्या नाकपुड्यात फुंकर घातली, आणि आदाम जिवंत झाला.

यहोवा देवानं आदामासाठी काम ठरवलं होतं. सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांना नावं द्यायला त्यानं आदामाला सांगितलं. त्या सर्वांसाठी उत्तम नावं सुचण्याकरता आदामानं त्यांना बराच काळ बारकाईनं पाहिलं असेल. प्राण्यांना नावं देत असताना एक गोष्ट आदामाच्या ध्यानात येऊ लागली. ती कोणती, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

सर्व प्राण्यांना जोडीदार होते. हत्ती नि हत्तीण, सिंह नि सिंहीण होते. पण आदामासाठी जोडीदारच नव्हता. तेव्हा यहोवानं आदामाला गाढ झोप आणली; आणि त्याची एक फासळी काढून घेतली. त्या फासळीपासून यहोवानं आदामासाठी एक स्त्री बनवली. आणि ती त्याची बायको झाली.

आता आदाम किती आनंदात होता! आणि कल्पना करा, इतक्या सुंदर बागेत राहायला मिळाल्यानं हव्वा किती खूष असेल! आता, त्यांना मुलं होऊ शकत होती व ते आनंदात एकत्र राहू शकत होते.

आदाम आणि हव्वेनं अनंत काळ जगावं अशी यहोवाची इच्छा होती. त्यांनी सर्व पृथ्वी एदेन बागेसारखी सुंदर करावी, अशीही त्याची इच्छा होती. ते करण्याच्या विचारानं आदाम आणि हव्वेला किती आनंद झाला असेल! पृथ्वीला एका सुंदर बागेसारखी करण्यात भाग घ्यायला तुम्हाला आवडलं असतं का! परंतु आदाम आणि हव्वेचा आनंद टिकला नाही. का, ते शोधू या.