व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ७

एक धाडसी माणूस

एक धाडसी माणूस

पृथ्वीवरल्या लोकांची संख्या जसजशी वाढायला लागली, तशा त्यांच्यामधल्या बहुतेक जणांनी काईनासारख्या वाईट गोष्टी केल्या. पण एक माणूस मात्र निराळा होता. तो हा हनोख नावाचा माणूस. हनोख धाडसी होता. त्याच्या सभोवतालचे लोक अत्यंत वाईट गोष्टी करत होते. पण हनोख मात्र देवाची सेवा करतच राहिला.

त्या काळी त्या लोकांनी इतक्या वाईट गोष्टी का केल्या, ते तुम्हाला ठाऊक आहे का? विचार करा, आदाम आणि हव्वेनं देवाची आज्ञा मोडायला आणि जे फळ खाऊ नका असं देवानं म्हटलं होतं, ते खायला कोण कारणीभूत होतं? तो एक दुष्ट देवदूत होता. बायबल त्याला सैतान म्हणतं. आणि तो सर्वांना वाईट बनायला लावण्याचा प्रयत्न करतो आहे.

एका दिवशी यहोवा देवानं हनोखाला अशी गोष्ट सांगायला लावली की, जी ऐकण्याची लोकांची मुळीच इच्छा नव्हती. ती अशी होती: ‘एका दिवशी देव सर्व वाईट लोकांचा नाश करणार आहे.’ बहुतेक हे ऐकून लोकांना अतिशय राग आला. त्यांनी हनोखाला ठार करण्याचा प्रयत्नही केला असेल. त्यामुळे, देव करणार असलेल्या गोष्टींबद्दल लोकांना सांगण्यासाठी हनोखाला अतिशय धाडसी असण्याची गरज होती.

देवानं हनोखाला त्या दुष्ट लोकांमध्ये जास्त काळ राहू दिलं नाही. हनोख फक्‍त ३६५ वर्ष जगला. “फक्‍त ३६५ वर्ष” असं आपण का म्हणतो? कारण त्या काळात माणसं आतापेक्षा अधिक कणखर होती व जास्त काळ जगत होती. फार काय, हनोखाचा मुलगा मथुशलह ९६९ वर्ष जगला!

हनोख मरण पावल्यानंतर, लोक अधिकच दुष्ट होत गेले. बायबल म्हणतं, ‘त्यांच्या मनात येणाऱ्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट होत्या,’ आणि ‘पृथ्वी जाच-जुलुमांनी भरली हाती.’

त्या काळी पृथ्वीवर इतकी अशांतता का होती, याचं एक कारण तुम्हाला ठाऊक आहे का? लोकांकडून वाईट गोष्टी करवून घेण्याचा एक नवीन मार्ग सैतानाने काढला होता. यानंतर आपण त्याच्याबद्दल शिकू.