व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ८

पृथ्वीवरचे राक्षस

पृथ्वीवरचे राक्षस

जर कोणी तुमच्याकडे चालत येत असला आणि तो तुमच्या घराच्या छपराइतका ऊंच असला, तर तुम्हाला कसं वाटेल? तो एक राक्षस असेल. एके काळी खरोखरच पृथ्वीवर राक्षस होते. बायबल सांगतं की, स्वर्गातून आलेले देवदूत त्यांचे वडील होते. पण असं कसं होऊ शकलं?

लक्षात ठेवा की, तो दुष्ट देवदूत, सैतान, गडबड घडवून आणण्यात गढला होता. देवाच्या इतर दूतांनाही वाईट बनवण्याच्या खटपटीत तो होता. काही वेळानं त्यातले काही देवदूत सैतानाचं ऐकायला लागले. स्वर्गात देवानं त्यांच्यासाठी नेमलेलं काम थांबवून ते पृथ्वीवर आले; आणि त्यांनी स्वतःसाठी मानवी शरीरं बनवली. का, ते तुम्हाला माहीत आहे का?

कारण, बायबल म्हणतं की, देवाच्या या मुलांनी पृथ्वीवरच्या सुंदर स्त्रिया पाहिल्या आणि त्यांना त्यांच्याबरोबर राहण्याची इच्छा झाली. तेव्हा, ते पृथ्वीवर आले आणि त्यांनी त्या स्त्रियांशी लग्न केलं. देवानं त्यांना स्वर्गात राहण्यासाठी बनवलं असल्यानं, त्यांनी तसं करणं चूक होतं, असं बायबल म्हणतं.

या देवदूतांना आणि त्यांच्या बायकांना मुलं झाली तेव्हा, ती वेगळीच होती. प्रथम ती फारशी वेगळी दिसली नसतील. पण ती वाढतच राहिली आणि अधिकाधिक शक्‍तिशाली होत गेली. व शेवटी प्रचंड राक्षस झाली.

हे राक्षस दुष्ट होते. आणि इतके मोठे नि दणकट असल्यानं लोकांना त्रास द्यायचे. इतरांना ते स्वतःसारखे वाईट व्हायला भाग पाडायचे.

हनोख मरण पावला होता. पण आता पृथ्वीवर एक चांगला माणूस होता. त्या माणसाचं नाव होतं नोहा. त्यानं जे करावं अशी देवाची इच्छा होती, तेच तो नेहमी करायचा.

सर्व दुष्ट लोकांचा नाश करण्याची आपली वेळ आली असल्याचं, देवानं एका दिवशी नोहाला सांगितलं. पण देव नोहा, त्याचं कुटुंब आणि अनेक प्राण्यांना वाचवणार होता. देवानं ते कसं केलं, हे आपण पाहू या.