व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा १०

जलप्रलय

जलप्रलय

तारवाच्या बाहेर, लोक पूर्वीप्रमाणेच आपापली कामं करत होते. जलप्रलय येईल यावर त्यांना अजूनही विश्‍वास नव्हता. ते आणखीन हसले असतील. पण लवकरच त्यांचं हसू थांबलं.

अचानक पाणी पडायला लागलं. आपण बादलीतून ओततो तसं ते आकाशातून पडायला लागलं. नोहाच बरोबर होता! पण आता फार उशीर झाला होता. इतर कोणी तारवात जाऊ शकत नव्हतं. यहोवानं दार घट्ट बंद केलं होतं.

लवकरच सखल भाग पाण्यानं भरला. पाण्याच्या मोठ्या नद्या झाल्या. त्यानं वृक्ष पाडले, प्रचंड खडक लोटत नेले, व मोठा आवाज केला. लोक घाबरले होते. ते उंचावर चढून गेले. दरवाजा उघडा असताना नोहाचं ऐकून तारवात जायला हवं होतं, असं त्यांना राहून राहून वाटायला लागलं. पण आता फार उशीर झाला होता!

पाणी वर वर चढू लागलं. ४० दिवस व ४० रात्री आकाशातून पाणी पडलं. ते डोंगरांवरही चढलं. आणि लवकरच सर्वात उंच डोंगरसुद्धा बुडाले. तेव्हा, देवानं म्हटल्याप्रमाणे तारवाबाहेरचे सर्व लोक व प्राणी मरण पावले. पण आतमध्ये असलेले सगळे सुखरुप होते.

नोहा आणि त्याच्या मुलांनी तारवाच्या बांधणीचं काम छान केलं होतं. पाण्यानं त्याला उचललं, आणि ते तरंगू लागलं. मग, पाऊस पडायचा थांबल्यावर एका दिवशी, सूर्यप्रकाश पडला. काय तो देखावा! पहावं तिकडे केवळ एक मोठा महासागर होता. आणि त्याच्यावर तरंगणारं तारूच काय ते दिसत होतं.

राक्षस नामशेष झाले होते. या पुढे लोकांना त्रास द्यायला ते नसतील. इतर वाईट लोक आणि त्यांच्या आयांच्याबरोबर ते सर्व मरण पावले होते. पण त्यांच्या वडिलांचं काय झालं?

त्या राक्षसांचे वडील म्हणजे काही आपल्यासारखी खरोखरची माणसं नव्हती. पृथ्वीवर माणसांसारखं राहण्यासाठी खाली आलेले ते देवदूत होते. त्यामुळे जलप्रलय आल्यावर इतर लोकांबरोबर ते मेले नाहीत. त्यांनी बनवलेली मानवी शरीरं टाकून, देवदूत म्हणून ते स्वर्गाला परतले. परंतु त्यांना देवाच्या दूतांच्या कुटुंबात सामील व्हायला मज्जाव करण्यात आला. त्यामुळे ते सैतानाचे दूत झाले. बायबलमध्ये त्यांना दुरात्मे म्हटलं आहे.

आता देवानं वारा वाहायला लावला व प्रलयाचं पाणी ओसरू लागलं. पाच महिने लोटल्यावर ते तारू एका डोंगराच्या माथ्यावर टेकलं. दिवसामागून दिवस गेले. तारवातल्यांना बाहेर पाहता आलं आणि त्यांना डोंगरांची शिखरं दिसली. पाणी ओसरत राहिलं.

मग नोहानं एका कावळ्याला तारवातून बाहेर सोडलं. थोडा वेळ उडून तो परत यायचा, कारण त्याला उतरायला चांगलीशी जागा मिळाली नाही. तो कावळा असंच करत राहिला. दरवेळी परतल्यावर तो तारवावर बसायचा.

जमिनीवरून पाणी ओसरलं आहे किंवा नाही, ते नोहाला पाहायचं होतं, म्हणून त्यानं एका कबुतराला तारवाबाहेर सोडलं. परंतु ते कबुतरही परत आलं, कारण त्याला राहण्यासाठी जागा मिळाली नाही. नोहानं त्याला दुसऱ्‍यांदा पाठवलं तेव्हा, त्यानं चोचीत जैतूनाचं एक पान आणलं. तेव्हा नोहाला समजलं की, पाणी ओसरलं आहे. नोहानं कबुतराला तिसऱ्‍यांदा पाठवलं. शेवटी त्याला राहण्यासाठी कोरडी जागा मिळाली.

आता देव नोहाशी बोलला. तो म्हणाला: ‘तारवाच्या बाहेर जा. आपल्याबरोबर आपलं सर्व कुटुंब आणि प्राण्यांनाही ने.’ एका वर्षापेक्षा जास्त काळ ते त्या तारवात होते. तेव्हा, परत बाहेर आल्याबद्दल व जिवंत असल्याबद्दल, त्यांना किती आनंद झाला असेल, याची आपण चांगली कल्पना करू शकतो!