व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा १२

माणसं एक मोठा बुरुज बांधतात

माणसं एक मोठा बुरुज बांधतात

बरीच वर्ष गेली. नोहाच्या मुलांना अनेक मुलं झाली. ती मोठी होऊन, पुढे त्यांना आणखी मुलं झाली. पाहता पाहता पृथ्वीवर पुष्कळ लोक झाले.

त्यातला एक होता, निम्रोद नावाचा नोहाचा पणतू. प्राणी आणि माणसांची शिकार करून त्यांना ठार करणारा, तो एक दुष्ट माणूस होता. इतर लोकांवर राज्य करावं म्हणून त्यानं स्वतःला राजा केलं. देवाला निम्रोद आवडला नाही.

त्या काळी सर्व लोक एकच भाषा बोलायचे. त्यांच्यावर राज्य करता यावं म्हणून, त्यांना एकत्र ठेवण्याची निम्रोदाची इच्छा होती. त्यासाठी त्यानं काय केलं माहीत आहे? एक शहर आणि त्यात एक मोठा बुरूज बांधायला त्यानं लोकांना सांगितलं. चित्रामध्ये पाहा ते विटा बनवताना दिसताहेत.

हे बांधकाम यहोवाला आवडलं नाही. लोकांनी पांगून सर्व पृथ्वीवर राहावं अशी देवाची इच्छा होती. पण लोक म्हणाले: ‘चला, आपण एक शहर आणि आकाशाला भिडेल अशा शिखराचा एक बुरूज बांधू या. मग आपण नामवंत होऊ!’ लोकांना स्वतःला प्रतिष्ठा हवी होती, देवाचा सन्मान करायचा नव्हता.

म्हणून देवानं लोकांना बुरुजाचं बांधकाम थांबवायला लावलं. त्यानं हे कसं केलं ठाऊक आहे? एकाएकी फक्‍त एका भाषेऐवजी, लोकांना वेगवेगळ्या भाषा बोलायला लावून. आता बांधकाम करणाऱ्‍यांना एकमेकाचं बोलणं कळेना. त्यांच्या शहराचं नाव बाबेल, म्हणजे “घोटाळा” असं पडलं, ते यामुळेच.

आता लोक बाबेलहून पांगायला लागले. एकच भाषा बोलणाऱ्‍या लोकांचे गट पृथ्वीच्या इतर भागात एकत्र राहायला निघून गेले.