व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा १६

इसहाकाला चांगली बायको मिळते

इसहाकाला चांगली बायको मिळते

या चित्रातली स्त्री कोण आहे, ते तुम्हाला ठाऊक आहे का? तिचं नाव आहे रिबका. आणि ज्या माणसाला भेटायला ती येते आहे, तो आहे इसहाक. ती त्याची बायको होणार आहे. हे कसं झालं?

झालं असं की, अब्राहामाला त्याच्या मुलासाठी एक चांगली बायको हवी होती. इसहाकानं कनानमधल्या कोणत्याही स्त्रीशी लग्न करू नये, अशी त्याची इच्छा होती. कारण ते लोक खोट्या देवांची भक्‍ती करायचे. त्यामुळे अब्राहामानं आपल्या सेवकाला बोलावलं आणि म्हणाला: ‘हारानमध्ये माझे नातेवाईक राहतात. तिथे परतून तू माझ्या मुलासाठी, इसहाकासाठी, एक बायको आणावी, अशी माझी इच्छा आहे.’

ताबडतोब दहा उंट घेऊन अब्राहामाच्या सेवकानं तो लांबचा प्रवास केला. अब्राहामाचे नातेवाईक राहात होते त्या जागेजवळ आल्यावर, तो एका विहिरीपाशी थांबला. दुपार टळली होती. शहरातल्या स्त्रिया पाणी भरायला येण्याची वेळ झाली होती. तेव्हा अब्राहामाच्या सेवकानं यहोवाला प्रार्थना केली: ‘जी माझ्यासाठी व उंटांसाठी पाणी काढील, तीच, तू इसहाकासाठी बायको म्हणून निवडलेली स्त्री असू दे.’

थोड्या वेळानं रिबका पाणी घेण्यासाठी आली. आणि त्या सेवकानं तिला पाणी मागितलं, तेव्हा तिनं त्याला ते दिलं. मग तिनं तहानलेल्या सर्व उंटांना देखील पुरेल इतकं पाणी काढलं. ते काम कष्टाचं होतं, कारण उंट खूप खूप पाणी पितात.

रिबेकानं ते काम आटोपल्यावर, अब्राहामाच्या सेवकानं तिला तिच्या वडिलांचं नाव विचारलं. रात्री तो त्यांच्या घरी राहू शकेल का, हेही त्यानं विचारलं. ती म्हणाली: ‘माझ्या वडिलांचं नाव बथुवेल आहे. आणि तुम्हाला आमच्याकडे राहायला जागा आहे.’ बथुवेल हा, अब्राहामाचा भाऊ नाहोर याचा मुलगा असल्याचं अब्राहामाच्या सेवकाला माहीत होतं. त्यामुळे, अब्राहामाच्या नातेवाईकांकडे आणल्याबद्दल, गुडघे टेकून त्यानं यहोवाचे आभार मानले.

त्या रात्री, अब्राहामाच्या सेवकानं, बथुवेल आणि रिबकेचा भाऊ लाबान यांना आपल्या येण्याचं कारण सांगितलं. रिबकेनं त्याच्याबरोबर जाऊन इसहाकाशी लग्न करण्याबद्दल, त्या दोघांनी होकार दिला. तिला विचारल्यावर, रिबका काय म्हणाली? ती म्हणाली, ‘होय,’ तिला जायची इच्छा होती. तेव्हा, लगेच दुसऱ्‍या दिवशी, ते उंटांवर स्वार झाले, आणि कनानला परतण्याच्या लांबच्या प्रवासाला लागले.

ते पोहचले तेव्हा, संध्याकाळची वेळ होती. एक माणूस शेतात फिरत असलेला रिबकेला दिसला. तो इसहाक होता. रिबकेला पाहून त्याला आनंद झाला. तीनच वर्षांपूर्वी त्याची आई वारली होती. आणि त्यामुळे तो अजूनही दुःखी होता. आता इसहाकाचं रिबकेवर अतिशय प्रेम जडलं, आणि तो पुन्हा आनंदी झाला.