व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा २२

योसेफाला तुरुंगात टाकलं जातं

योसेफाला तुरुंगात टाकलं जातं

योसेफाला इजिप्तला नेलं जातं तेव्हा, तो फक्‍त १७ वर्षांचा असतो. तिथे त्याला पोटीफर नावाच्या माणसाला विकलं जातं. पोटीफर इजिप्तच्या राजाकडे काम करतो. इजिप्तच्या राजाला फारो म्हणतात.

योसेफ, आपला मालक पोटीफर याच्यासाठी खूप मेहनत करतो. त्यामुळे योसेफ मोठा झाल्यावर, पोटीफर त्याला आपल्या सर्व घरादारावर नेमतो. तर मग, योसेफ इथे तुरुंगात कसा? पोटीफराच्या बायकोमुळे.

योसेफ देखणा माणूस होतो. त्यानं आपल्यासोबत निजावं, अशी पोटीफराच्या बायकोची इच्छा आहे. पण ते चूक असल्याचं योसेफाला माहीत असतं. तो तसं करीना. पोटीफराची बायको खूप चिडली आहे. त्यामुळे तिचा नवरा घरी आल्यावर ती खोटं बोलते आणि म्हणते: ‘त्या वाईट योसेफानं माझ्यापाशी निजण्याचा प्रयत्न केला!’ पोटीफर आपल्या बायकोवर विश्‍वास ठेवतो व योसेफावर संतापतो. त्यामुळे तो त्याला तुरुंगात टाकवतो.

योसेफ चांगला माणूस असल्याचं, लवकरच तुरुंगाच्या अधिकाऱ्‍याच्या ध्यानात येतं. त्यामुळे तो योसेफाला इतर सर्व कैद्यांवर नेमतो. पुढे फारो त्याच्या प्यालेबरदारावर नि आचाऱ्‍यावर रागावतो आणि त्यांना तुरुंगात टाकतो. एका रात्री त्या दोघांना एक एक खास स्वप्न पडतं. पण त्यांना त्यांच्या स्वप्नांचा अर्थ कळत नाही. दुसऱ्‍या दिवशी योसेफ म्हणतो: ‘मला तुमची स्वप्नं सांगा.’ आणि त्यांनी सांगितल्यावर, देवाच्या मदतीनं योसेफ त्यांच्या स्वप्नांचा खुलासा करतो.

प्यालेबरदाराला योसेफ म्हणतो: ‘तीन दिवसात तुला तुरुंगातून सोडलं जाईल. आणि तू पुन्हा फारोचा प्यालेबरदार होशील.’ त्या कारणानं योसेफ त्याला म्हणतो: ‘तू बाहेर जाशील तेव्हा, फारोला माझ्याबद्दल सांग. आणि इथून बाहेर निघायला माझी मदत कर.’ पण आचाऱ्‍याला तो म्हणतो: ‘केवळ तीन दिवसात फारो तुझं डोकं उडवील.’

तीन दिवसात योसेफानं म्हटल्याप्रमाणेच होतं. फारो आचाऱ्‍याचं डोकं उडवतो. प्यालेबरदार मात्र तुरुंगातून सोडला जातो नि परत राजाची सेवा करायला लागतो. परंतु तो योसेफाबद्दल पार विसरुन जातो! तो फारोला योसेफाबद्दल सांगत नाही, आणि योसेफाला तुरुंगातच राहावं लागतं.