व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा २४

योसेफ त्याच्या भावांची परीक्षा घेतो

योसेफ त्याच्या भावांची परीक्षा घेतो

आपले १० वडील भाऊ अजूनही नीच आणि निर्दय आहेत की काय, हे योसेफाला माहीत करून घ्यायचं असतं. म्हणून तो म्हणतो: ‘तुम्ही हेर आहात. आमचा देश कोठे कमकुवत आहे, ते हेरायला तुम्ही आलेले आहात.’

ते म्हणतात: ‘नाही, नाही. आम्ही सरळ माणसं आहोत. आम्ही सर्व भाऊ असून, १२ जण होतो. पण एक भाऊ नाहीसा झाला, आणि सर्वात धाकटा आमच्या वडिलांपाशी घरी आहे.’

योसेफ त्यांच्यावर विश्‍वास नसल्याचं नाटक करतो. शिमोन नावाच्या भावाला तो तुरुंगात ठेवतो. आणि इतरांना अन्‍नसामग्री घेऊन घरी जाऊ देतो. परंतु तो त्यांना सांगतो: ‘तुम्ही परत याल तेव्हा, तुमच्या धाकट्या भावाला सोबत आणलं पाहिजे.’

कनानला घरी परतल्यावर, ते भाऊ, घडलेल्या सर्व गोष्टी आपल्या वडिलांना, याकोबाला, सांगतात. याकोब फार दुःखी आहे. तो व्याकुळ होऊन म्हणतो: ‘योसेफ तर नाहीसा झाला. आणि आता शिमोनही नाही. माझ्या सर्वात धाकट्या मुलाला, बन्यामिनाला, मी तुमच्याबरोबर जाऊ देणार नाही.’ पण त्यांचं अन्‍न सरत आल्यावर, आणखी अन्‍न आणण्यासाठी, त्यांना बन्यामिनाला इजिप्तला नेऊ देण्याची पाळी याकोबावर येते.

त्याचे भाऊ येत असलेले योसेफाला दिसतात. आपल्या लहान भावाला, बन्यामिनाला पाहून त्याला खूप आनंद होतो. अर्थात, हा मोठा माणूस योसेफ असल्याचं, त्यांच्यापैकी कोणालाही माहीत नसतं. आता, त्याच्या १० सावत्र भावांची परीक्षा घेण्यासाठी योसेफ काहीतरी करतो.

तो त्याच्या नोकरांकडून त्यांच्या थैल्या अन्‍नसामग्रीनं भरवतो. पण त्यांच्या नकळत, तो, त्याचा खास चांदीचा प्याला बन्यामिनाच्या थैलीत ठेववतो. ते सर्व निघून वाटेनं थोडं अंतर गेल्यावर, योसेफ आपल्या नोकरांना त्यांच्या मागे पाठवतो. त्यांना गाठल्यावर नोकर म्हणतात: ‘तुम्ही आमच्या धन्याचा चांदीचा प्याला का चोरलात?’

सर्व भाऊ म्हणतात: ‘त्याचा प्याला आम्ही चोरलेला नाही. तो प्याला आमच्यापैकी कोणापाशी सापडल्यास, त्याला वाटल्यास मारुन टाका.’

तेव्हा ते नोकर सर्व थैल्यांची झडती घेतात. आणि तुम्हाला इथे दिसतो तसा, त्यांना तो प्याला बन्यामिनाच्या थैलीत सापडतो. नोकर म्हणतात: ‘बाकीचे तुम्ही जाऊ शकता. पण बन्यामिनाला आमच्याबरोबर यावं लागेल.’ आता ते १० सावत्र भाऊ काय करतील?

ते सर्व बन्यामिनासोबत योसेफाच्या घरी परत येतात. योसेफ त्याच्या भावांना सांगतो: ‘तुम्ही सर्व जाऊ शकता. पण माझा गुलाम म्हणून बन्यामिनाला इथेच राहिलं पाहिजे.’

मग हिंमत करून यहूदा बोलतो, अन्‌ म्हणतो: ‘त्या मुलाविना मी घरी परतलो तर माझे वडील प्राण सोडतील. कारण त्यांचं त्याच्यावर अतिशय प्रेम आहे. त्यामुळे कृपा करून, मला आपला गुलाम म्हणून ठेवून घ्या. पण त्या मुलाला घरी जाऊ द्या.’

आपले भाऊ बदलले असल्याचं योसेफाच्या ध्यानात येतं. ते नीच आणि निर्दय राहिलेले नाहीत. आता योसेफ काय करतो, ते पाहू या.